‘व्हॉटेव्हर’

मध्ययुग – अंधकारयुगानंतर आपण विवेकाचे युग (The Age of Reason) घडवून आपले जग बदलून टाकले. अधूनमधून आपण रक्तलांच्छित युद्धेही लढलो, पण सोबतच साहित्य, कला, विज्ञान, वैद्यक यांत उत्तम कामेही केली. कायद्याचे राज्य बऱ्याच पृथ्वीतलावर प्रस्थापित झाले. बऱ्याच जागी लोकशाही व्यवस्थाही घडल्या. आपल्या एका पिढीत ऐहिक दारिद्र्याचे परिणाम ज्या प्रमाणात कमी झाले, तेवढे आधीच्या संपूर्ण मानवी इतिहासात झाले नव्हते. राजकीय व आर्थिक व्यवस्थांच्या वापराने आपण नात्झी व सोविएत हुकुमशाह्यांवर मात केली. हे सारे असूनही आज आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या कृतींच्या परिणामकारकतेवरचा विश्वास क्षीण होणे, निराशावाद, अशाने आपला समाज ग्रस्त आहे. मला याची फार काळजी वाटते. विवेकाचे युग पीछेहाटीकडे सरकते आहे, आणि वस्तुनिष्ठ विचारांना नाकारणारी संस्कृती बळावते आहे. यातून ‘व्हॉटेव्हर’ (whatever) म्हणणे वाढते आहे. तिपशील टाळणाऱ्या या शब्दाला समांतर म्हणजे, “जे काय असेल ते”, असे तुच्छतादर्शक उद्गार – सं.]
असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. आज पूर्वीइतक्या सहजतेने एखादी व्यक्ती ज्या सामाजिक वर्गात जन्मली त्यातून बाहेर पडू शकत नाही. पूर्वी ही ‘सोशल मोबिलिटी’ जास्त होती. आज प्रसिद्ध होण्याची, सेलेब्रिटी होण्याची आस बळावते आहे. गंभीर व्यासंग करणारे अभ्यासक घटत आहेत. अनुभवाधिष्ठित अभ्यास केले जात नाही आहेत. एकूण सामाजिक वृत्ती मूल्यांना घाबरणारी (value-phobic) होत आहे. याने पाश्चात्त्य प्रबोधित उदारमतवाद, ज्याने आपल्याला इतके प्रगत केले, त्यावरच मळभ दाटून येत आहे. वृत्तपत्रे व नियकालिके यांच्यावर सहज नजर टाकली तरी ‘सेलेब्रेटी’ होण्याचे प्रभाव दिसतात. चिल्लर कीर्ती, जिच्यामागे कोणतेही गंभीर कर्तृत्व नाही, ती मिळवण्याची आस वाढते आहे. पूर्वी तरुणांना वैज्ञानिक किंवा अंतराळवीर व्हावेसे वाटत असे. आज “तुला काय व्हायला आवडेल?’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा “प्रसिद्ध व्हायला आवडेल”, असे येईल.
याने ब्रिटिश समाजात गेल्या दशकाभरात झालेला एक मोठा बदल दुर्लक्षित होतो आहे. आज ब्रिटनला सर्व नागरिकांच्या क्षमता वापरूनच जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहता येईल. पण हलो आणि ओके टिीव्ही व क्रीडा या क्षेत्रांतील सेलेब्रिटीज्बद्दल बाजारगप्पा नोंदणारी नियतकालिके – आपल्या मुंबई मिरर या टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबईतील दैनिक पुरवणीला समांतर – सं. यांमध्ये आपले नाव आणणे सोपे आहे. विद्यापीठे व कायद्याच्या-प्रशासनाच्या क्षेत्रांत शिरणे मात्र अवघड होत आहे. कठीण विषय शिकण्याबाबतची अनास्था, घृणा म्हणा, किती घातक महत्त्वाची आहे हे ठसवू तितके कमीच पडेल. भारत प्रचंड संख्येने गणिताचे व विज्ञानाचे स्नातक घडवतो आहे, तर आपल्याकडे ते विषय मागे पडून ‘माध्यम अभ्यास’ (शिवळरविळशी) सारखे विषय लोकप्रिय होत आहेत.
सेलेब्रिटी होण्याच्या आशेने चित्त विचलित झालेले, अभ्यास-शिक्षण सोपेपणाकडे झुकणारे, या सर्वाने आपण एका प्रकारच्या बौद्धिक सापेक्षतावादाला (intellectual relativism) बळी पडतो आहोत. आज बऱ्याच लोकांना वाटते की त्यांच्या मतांच्या खरेखोटेपणापेक्षा, वैधतेपेक्षा, त्यांची त्या मतांशी बांधिलकी किती हे महत्त्वाचे आहे. मतांना अनुभवाचा आधार असणे तर असंबद्धच मानले जाते. यामुळे आपल्याला, “बरं बाबा, ते तुझं सत्य झालं-माझं सत्य ते नाही’, असली वाक्ये ऐकू येतात आणि वस्तुनिष्ठ चर्चा टाळायला, आजच्या ‘फॅशनेबल’ मतांचा पोकळपणा झाकायला ‘व्हॉटेव्हर’ आहेच. एकदा, “हं, काय असेल ते.” असे म्हटले की सत्य, वस्तुनिष्ठा यांचे मूल्य संपते.
आणि यातच राजकीय योग्यता (पोलिटिकल करेक्टनेस) ही एक संकल्पना वापरली जाते. लोक म्हणतात, “हो, पण तसं म्हणायचं नसतं ना!” हा दुर्लक्ष करण्यासारखा मुद्दा नाही. विचारांच्या अभिव्यक्तीचा खुलेपणा हा विवेकाच्या वापरातला अत्यावश्यक घटक आहे. विवेकानेच सत्य सापडेल, आणि ‘यथातथ्य’ शोधांमधूनच प्रबोधनकाळानंतरची सारी प्रगती घडली आहे. आजही अभिव्यक्तिस्वातंत्र्य सोडून देणे परवडण्यासारखे नाही.
आपण इतरांना न रुचेलसे बोलायला घाबरू लागलो आहोत. यामुळे आपण धडपडत अशा स्थितीला पोचलो आहोत की कोणतीही मूल्ये ठामपणे मांडायची भीती आपल्याला ग्रासते. पण आधुनिक, उदारमतवादी, सेक्युलर समाज मूल्यविहीन असणे आवश्यक नाही. सहिष्णुता आणि शरणागती यांत फरक आहे. आपण इतरांची मते ऐकून घ्यायला हवीत, पण त्यांचा नैतिक स्वीकार केलाच पाहिजे असे नाही. राज्यसंस्था एखाद्या धर्माशी औपचारिकपणे निगडित नाही, याचा अर्थ ती सशक्त मूल्यव्यवस्था टाळते असा होत नाही. मुळात इष्ट काय, अनिष्ट काय, याबाबतच्या आपल्या धारणा आपल्या कृतींचे परिणाम जाणण्यातून, आणि आपल्या मूलभूत सहजप्रवृत्तींमधून घडतात. या धारणा, ही मूल्ये, धर्मांनी आदेशात्मक रूपांत मांडली, येवढेच-ती मूल्ये धर्मसंस्थापकांनी शोधून काढली’ नाहीत. धर्माबाहेरची मूल्येही आपल्या वारशाचा भाग असतातच–ज्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही त्यांची काळजी घेणे, परिश्रमातूनच जगणे, चिकाटी, अडीअडचणींसाठी साठवणूक करणे, ह्या मूल्यांना धर्मांचा आधार असतोच असे नाही. राज्यव्यवस्थाही मूल्यांशिवाय चालवता येत नाहीत. इतरांना ‘बोलू देणे’ यासोबत इष्ट वर्तणूक म्हणजे काय, हेही सांगता येते. अशी स्पष्ट मांडणी कायदेशीरच असते.
राजकारणी आणि माध्यमपंडित या लोकांनी लोकांना ऐकावेसे वाटते तेच सांगण्याची वाईट सवय टाळली पाहिजे. सर्वसामान्यांला जे ऐकणे फायद्याचे असेल, ते सांगायला पाहिजे. त्यात ‘व्हॉटेव्हर’ नको. मागील पिढ्यांनी त्यांचे प्रश्न हाताळण्यात जो चिवटपणा दाखवला, तो आपण आपल्या समस्या सोडवताना दाखवायला हवा. आपण काय आहोत, इथपर्यंत कसे आलो, कसे घडलो, याचे आपले आकलन वाढवत न्यायला हवे — नाहीतर आपण मेहेनतीने कमावलेली प्रगती गमावून बसू.
[वुई आर इन डेंजर ऑफ एंटरिंग अ न्यू डार्क एज, हा ४ एप्रिल २००९ चा लियाम फॉक्स यांचा इंटरनेट लेख हर्षवर्धन निमखेडकरांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. जरी फॉक्स मुख्यतः ब्रिटिश समाजाला उद्देशून बोलत आहेत तरी त्यांच्या मांडणीत आगरकरांचा भास होतो! त्यांच्या लेखाचा हा संक्षेप. – सं.]