दोन्ही गोष्टी

सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली जीवजात, इतर जीवजाती, हे सारेच येते. [ कॉलिन टज्च्या सो शल वुई रीप (अॅलन लेन, २००३) या पुस्तकातील बायॉलजी, मोरॅलिटी, एस्थेटिक्सः द मीनिंग ऑफ अॅग्रिकल्चर या प्रकरणातून.]
रीथ व्याख्यानमाला
१९४८ साली बीबीसीवर रीथ व्याख्यानमालेच्या प्रसारणाला सुरुवात झाली. बीबीसीचे पहिले व्यवस्थापकीय प्रमुख सर जॉन रीथ ह्यांच्या सार्वजनिक-सेवा-प्रसारण-क्षेत्रातील भरघोस कार्याचा गौरव करण्यासाठी ही व्याख्यानमाला सुरू झाली.
समाजाचे बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी प्रसारणाचा वापर एक सार्वजनिक सेवा म्हणून करावा असा जॉन रीथ ह्यांचा आग्रह होता. ह्या विचाराला केंद्रस्थानी ठेवून बीबीसी दरवर्षी एका प्रमुख विचारवंताला ही व्याख्यानमाला रेडिओवरून सादर करण्यासाठी निमंत्रित करते. महत्त्वाच्या समकालीन प्रश्नांबाबत समाजाची जाणीव वाढावी आणि त्यावर चर्चा व्हावी हा ह्या व्याख्यानमालेचा हेतू आहे.
गेली ६२ वर्षे सातत्याने ही व्याख्यानमाला चालू आहे. पहिले रीथ – व्याख्याते होते प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि गणिती बड रसेल, आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता ‘अधिकार आणि व्यक्ति’ (Authority and Individual). इतिहासतज्ज्ञ आर्नल्ड टॉइन्बी, वैज्ञानिक रॉबर्ट ओपेनहाइमर, राजनीतिज्ञ जे.के. गालब्रेथ, प्रमुख ज्यू धर्मवेत्ते डॉ.जॉनदन सॅक्स, जनुकशास्त्रज्ञ डॉ. स्टीव्ह जोन्स अशांसारख्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अनेक विचारवंतांनी आपल्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संकल्पना व्याख्यानमालेत मांडल्या. विषयांची विविधता आणि व्याख्यात्यांचा अधिकार विचारात घेतला तर ही व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने समाजजीवन समृद्ध करणारी आहे हे लक्षात येते.