तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण असे प्रश्न जागवणारा, ते सोडवायला चौकट पुरवणारा एक अनुभव नागपूरकरांना नुकताच आला. अमरावतीच्या संजय गणोरकरांचे मांडणी शिल्पांचे (installations) प्रदर्शन असा अनुभव देऊन गेले.
अमरावती जिल्ह्याची सुपीक जमीन, हा वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड या म्हणीचा आधार. गेली काही वर्षे मात्र अमरावती जिल्हा आणि त्याच्या दक्षिणेचा यवतमाळ जिल्हा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या विक्रमी आकड्यांमुळे बदनाम आहेत. गणोरकर शेतकरी परंपरा आतून जाणतात, आणि तिच्या बाहेर उभे राहून तिला निरखतातही. त्यांच्या अनेक मांडणी शिल्पांपैकी चार जरा तपशिलाने भेटवण्याचा प्रयत्न करतो.
प्रवास : एक हजार प्रश्न या मांडणी-शिल्पात एक ऑटोरिक्षा भेटते. तिच्या मागच्या भागावर बळीराजा, विक्रमी उत्पादन वगैरे कृषिमंत्रालयाने अतिवापराने गुळगुळीत केलेले, खोटारडेपणाने बुळबुळीत केलेले शब्द वापरणारी जाहिरात आहे. रिक्षाच्या बैठकीच्या भागातून दोन्ही बाजूंना पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या एका वळकटीची टोके दिसतात. आकार सांगतो की तो मृतदेह आहे. पुढे जाऊन पाहिल्यावर ते प्रेत मांडीवर घेऊन बसलेल्या दोन मानवी आकृती, आणि चेहेऱ्यावर फडके बांधलेला रिक्षाचा चालक, हे दिसतात. तीन्ही माणसे आणि प्रेत ही चेहेरे नसलेली; शरीरे, चेहेरे केवळ कपडे-कापड यांतून सुचवलेली, अशी आहेत. प्रेताला मांडी देणाऱ्यांपैकी एक आकृती स्त्रीची आहे, एक पुरुषाची.
शेजारच्या भिंतीवर एक कागद आहे, प्रश्नपत्रिका म्हणा. पाहू या प्रश्न, तपशिलात. आयुष्यभर केवळ नाइलाजाने शेती करणारे वडील. जुन्या प्रचंड श्रीमंत खानदानी वाडा-संस्कृतीतून गरिबीत नेटाने संसार करणारी आई. गावातला सुशिक्षित, अल्पभूधारक, कोरडवाहू शेती वाहणारा बाल सवंगडी. उंबरठा ओलांडलेली, शिकलेली संवेदनशील स्त्री. आजच्या अर्थव्यवस्थेने नाकारलेले महात्मा गांधी यांचे “स्वावलंबी खेडे” अपूर्ण स्वप्न. पुढचा जन्म तरी निदान चौपदरी हमरस्त्याचा किंवा त्यावरून पळणाऱ्या मोटारींचा मिळावा ही अंतिम इच्छा बाळगणारा स्वप्नाळू मनाचा आत्महत्या केलेला तरुण मित्र. मूठभर दाणे फेकल्यावर खंडीभर परत करणारी विदर्भाची काळी माती – माय. एक काळ्या दगडाचे जाते, ज्वारीने शिगोशीग भरलेले. शेजारी एक मापटे, तेही ज्वारीने शिगोशीग भरलेले. जात्याच्या दांड्याला चारपाच दोऱ्या बांधलेल्या, दळणे थांबवू पाहणाऱ्या. दोऱ्यांची बाहेरची टोके वीतभराच्या मातीच्या स्त्रीप्रतिमांच्या हातांत. आणि जात्याभोवती भडक कुंकवाची रास. सौभाग्य दळले जाऊन बाहेर पडलेली.
का थांबवताहेत बायका हे दुष्टचक्र? स्वतःला, इतरांना अन्न पुरवणाऱ्यांच्या कुटुंबांच्या कपाळीचं कुंकू सहज का सांडते आहे, त्यांच्या उपजीविकेतून? जाते थांबले तर आपण खाणार काय? जात्यात भरायला धान्य देणाऱ्यांचे रक्तरंजित कुंकू, हाच आऊटपुट हवा होता का?
एका दोराला लटकलेली रेंगी – म्हणजे, राजेहो, एक माणूस आणि थोडेसे सामान वाहणारी बैलगाडी. वाऱ्याने, येणाराजाणाऱ्यांच्या हालचालींमुळे संथशी फिरते आहे, स्वतःभोवती. तिच्यावर काटेरी तारांची वेटोळी आहेत. लहानसा चरखा आहे. अनेक वीतभर किंवा लहान मानवाकृती आहेत. दोन कीटकनाशकांची प्लास्टिकची डबडी आहेत. आज कीटकांना सहज पचणारी महागडी कीटकनाशके आहेत. माणसांच्या आत्महत्यांना मात्र ती आजही उपयोगी ठरत आहेत. खाली औरस-चौरस वावभर बारदान अंथरलेले आहे. त्यावर गाईगुरे, माणसे यांच्या लहानखुऱ्या प्रतिमा आहेत. पाच सेकंदात संपूर्ण तपशिलांसकट पाहता येणारी ही कलाकृती. नाव आहे, तुमच्याशिवाय नाही….
कोणाशिवाय? भिंतीवरचा एक कागद आंशिक उत्तर पुरवतो. पाहू या, घाई न करता. जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयापासून यांचे गाव किती दूर असेल?
ऑटोरिक्षा जाणार म्हणजे पंधरा ते वीस किलोमिटरवर आसपासच असेल का? मेटॉडोरसाठी खूप जास्त पैसे मागितले असतील का? इतक्या उशिरा, दिवस बुडता गावी का चालले? शवागारातील प्रेत मिळायला उशीर झाला असेल का? शवागारातील कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी अडवणूक केली असेल का? म्हातारी आई कशाला ऑटो सोबत आहे? मुलगा एकुलता एक असेल का? बहीण, भाऊ, जावई नसेल का? बहीण अविवाहित असेल का? निदान कुणी चुलत भाऊ, काका, नातेवाईक सोबत नकोत का? घराशेजारी, म्हाताऱ्याचे कुणी मित्र सोबत नाहीत का? हॉस्पिटलमध्ये किती दिवस जिवंत असेल? हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर असेल का बेशुद्ध? पिशव्या सोबत आहेत म्हणजे दोन चार सहा दिवस असेल का? पिशवीतून खेळणे बाहेर आले आहे. घरी मुलगा असेल की मुलगी? बायको, मुलगी बसने पुढे गावाला गेले असतील का? बायकोने ऑटोने यायचा हट्ट केला नसेल का? शेवटचा प्रवास म्हताऱ्या आई-वडिलांसोबतच का?
ऑटो चालकाने नाकाला रुमाल का बांधला? प्रेताचा, पोस्टमार्टमचा वास येत असेल का? आई-वडिलांचा प्रेताचा वास येत नसेल का? अंत्य संस्कार आता एवढ्या रात्री करतील का? मुलानंतर शेतीकडे कोण बघेल? समोरच्या वळणावरून अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकचा धक्का तर लागणार नाही का?
एक उपप्रमेय. तीन विटांवर मांडलेली टोपली. सभोवती पिठाची शिंपण. टोपलीखालून निघून बाहेर जाणाऱ्या तीन खेळण्यातल्या मोटारींच्या रांगा. घरात मृत्यू झाल्यावर काही दिवस असा टोपलीने झाकलेला दिवा ठेवण्याची पद्धत आहे. भोवतालच्या पिठावरून किडेमाकोडे चालतात, आणि त्यांच्या पदचिन्हां वरून मृत व्यक्तीला पुढचा जन्म कोणता येणार, याचे आडाखे बांधले जातात. इथे पुढचा जन्म ठामपणे मोटारीचा, तिच्यासाठीच्या गुळगुळीत, झुळझुळीत हमरस्त्याचा, किंवा मोटार-मालकाचा हवा आहे. कुणाचे स्वप्न हे? मयत व्यक्तीच्या पोराबाळांचे, ज्यांनी त्याची मरणाआधीची तडफड, धडपड पाहिली आहे.
असे तर नाही, की आत्महत्या केलेल्याच्या टोपलीसारख्या खोपटातून चेक देऊन मंत्रिमहोदय आणि त्यांचा ताफा बाहेर पडतो आहे? पुन्हा न फिरकण्याआधीचा उपचार पार पाडून शासकीय विश्रामगृहाकडे जातो आहे? की जैवइंधन म्हणून मेलेल्या शेतकऱ्याला टाकीत भरून गाड्या दौडताहेत? काहीही असो, आत्महत्या केलेल्या स्वप्नाळू तरुणाचा पुढचा प्रवास अन्नोत्पादनात नाही, हे मात्र अंतिम सत्य! शिल्पाचे नाव आहे, पुनर्जन्म.
चित्रे, शिल्पे, मांडणावळी अशा वीसपंचवीस कलाकृतींपैकी चारच आपण पाहिल्या. जोडपे म्हणून एकच मुखवटा ठेवलेला आपण पाहिला नाही. चार शेतकरी या फलकावर तीनच कुंभारकामी चेहेरे होते. त्यांच्याकडेही आपण दुर्लक्ष केले. एक आशा मात्र आहे. २०१० चा पावसाळा संपल्यावर गणोरकर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा गावांमध्ये हे प्रदर्शन भरवणार आहेत, जमेल तर बघा – बघाच. दीडदोनशे किलोमीटर प्रवास करावा लागला तरी बघा. तेवढा वेळ नकोच काढता येईल.
पण आजचा सुधारकच्या वाचकांनी येवढ्यावरच थांबणे योग्य नाही. (अपूर्ण).