भाग्य आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून एक फेरफटका

अनुभवाला येणाऱ्या घटनांमध्ये यादृच्छिकता (रॅडमनेस) हा घटक असतोच. घटनांना आपले अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद असतातच. त्यामुळे आपल्यासाठी ही नुसती यादृच्छिकता न राहता ते भाग्य (फॉरच्युइटी) म्हणून सामोरे येतेच. निवड-स्वातंत्र्यांची जाणीव, भले ती आभासात्मक असो वा नसो आपल्याला आपल्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला लावतेच. ही मानवी स्थिती जमेस धरूनच राजकीय तत्त्वज्ञान उभे करावे लागते.
मग भौतिक जग नियत आहे की अनियत ? अनियतता मानवी ज्ञानाच्या सध्याच्या मर्यादांमुळे भासते की या मर्यादा नेहमीच राहणाऱ्या आहेत? की खरोखर अनियतता नसल्याचमुळे भावी काळात कधी तरी पूर्ण नियततेची जाणीव मानवांना होणार आहे ? त्या जाणिवेत निवड-स्वातंत्र्याचा अनुभव येईनासा होणार आहे किंवा कसे ? हे सर्व सद्वस्तु-स्वरूप-मीमांसेतील (मेटाफिजिकल) प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला न्याय/अन्याय, सुभाग्य/दुर्भाग्य आणि आत्मोद्धारकता/आत्मघातकीपणा या मानवी भाव-विश्वातल्या कोटींचे परस्परसंबंध उलगडणे भाग(!) आहे. घटिते : स्वकृत, अन्य-कृत आणि अ-कृत
कर्त्याच्या भूमिकेत असताना आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी आणि भोक्त्याच्या भूमिकेत असताना ज्या गोष्टी आपल्याला होतात/आपल्या बाबतीत घडतात/आपल्यावर परिणाम करतात त्या गोष्टी, यांत एक मूलभूत फरक आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्यांना आपण जबाबदार असतो, हे कोणत्याही नैतिक चर्चेचे पूर्वगृहीतक म्हणून मान्य करावेच लागते. जबाबदार असतो म्हणजे दोषी असतोच असे मात्र नाही. ते कृत्य कसे योग्यच होते किंवा नसले तरी आपला खरोखरच नाइलाज कसा होता असे खुलासे इतरांना पटोत वा न पटोत, कृत्य स्वेच्छेने केले असो वा नाइलाजाने, पण ते आपले कृत्य होते हे अमान्य करता येत नाही. आपण खुलासा तरी ‘देणे लागतो’ यात आपले ‘उत्तरदायित्व’ आपण मान्य केलेलेच असते.
याउलट दुसऱ्या प्रकारच्या, म्हणजे भोक्त्याच्या भूमिकेतल्या गोष्टींना आपण जबाबदार असूच असे नाही. १) जेव्हा आपण स्वतःलाच/स्वतःवर परिणाम करणाऱ्या गोष्टी करतो तेव्हा स्वगामी कर्ता म्हणून आपण जबाबदार असतो. २) काही गोष्टी इतर आपल्याला करतात/आपल्या बाबतीत करतात/आपल्यावर परिणाम होईल अशा करतात तेव्हा ते त्यांचे कृत्य ठरते व त्यांना ते (इतर) जबाबदार असतात. ३) आपल्या विनंतीवरून वा आज्ञेमुळे वा आपल्याशी केलेल्या कराराचे पालन म्हणून इतर लोक आपल्यावर परिणाम होईल अशा गोष्टी करतात तेव्हाही ‘अन्याद्वारा स्वगामी कर्ता’ म्हणून आपणच जबाबदार असतो याचीच उलटी बाजू म्हणजे ४) स्व-द्वारा अन्यकृत हीदेखील असते आणि ५) आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या काही गोष्टी ना आपण केलेल्या असतात, ना इतरांनी केलेल्या असतात, तर त्या फक्त झालेल्या (मानवेतर जीवांनी केलेल्या वा निसर्गतः घडलेल्या) असतात. म्हणजे त्यांना कोणीच जबाबदार नसते. (नियती किंवा पूर्वसंचित अशा धारणा वापरणे आपण वर्ण्य मानूया.) म्हणजेच थोडक्यात असे म्हणता येईल की कांच्या भूमिकेत केलेल्या गोष्टी अनिवार्यपणे स्व-कृतच असतात तर भोक्त्याच्या भूमिकेतून झेललेल्या गोष्टी या मात्र स्व-कृत, अन्याद्वारा-स्व कृत, स्व-द्वारा-अन्यकृत, अन्य-कृत व अ-कृत अशा पाचही प्रकारच्या असतात. काही अ-कृत घटितांची समाधानकारक वैज्ञानिक कारणमीमांसा मिळते तर काहींची मिळत नाही. भाग्य ही संकल्पना : असमाधानकारक कारणमीमांसा असलेले अ-कृत, एवढ्यापुरतीच संकुचित मानण्याकडे काहींचा कल दिसतो. पण भाग्य या गोष्टीचे मर्म व व्याप्ती या गोष्टी वरील व्याख्येत नेमक्या पकडल्या जात नाहीत. भाग्याचे भाग्यपण नेमके कशात असते?
भाग्य हे सुभाग्य आणि दुर्भाग्य असे दोन्ही प्रकारचे असते. दोन्ही प्रकार एकदम लक्षात घेण्याने गुंतागुंत वाढेल याकरिता आपण प्रथम दुर्भाग्याशी संबंधित प्रतिपादन मांडून नंतर या प्रतिपादनाच्या सुभाग्याकडील बाजूचा विचार करणार आहोत. दुरवस्थेत असणे हे अनिवार्यपणे अन्यायग्रस्ततेमुळेच असते असे नव्हे.
अन्यायग्रस्ततेखेरीज दुरवस्थेला दुर्भाग्य आणि आत्मघातकीपणा ही स्वतंत्र कारणेदेखील असतात. या तीन कारणांचा विचार करण्यासाठी आता आपण ज्यांत ‘स्व’ला प्रतिकूल भोग भोगावे लागतात अशी घटिते प्रथम ध्यानात घेऊ.
एखाद्या तरुणाने त्याला नकार देणाऱ्या तरुणीला सूडबुद्धीने इजा पोहोचवली तर हा धडधडीत अन्याय आहे यात शंकाच नाही. ती तरुणी अन्यायग्रस्त ठरतेच. पण सगळ्याच तरुणीवर असा प्रसंग येत नाही. म्हणून हा अन्याय त्याचवेळी (म्हणजे अन्याय राहूनच) त्या अमुक (अनन्य) तरुणीचे दुर्भाग्यसुद्धा असतो.
एखादा मुलगा शायनिंग करण्यासाठी दोन्ही हात सोडून दुचाकी चालविताना पडला व त्याला कायमचे अपंगत्व आले. आता मूळ कृत्य हे त्याचे आत्मघातकी कृत्य होते यात शंकाच नाही. पण नेमके हेच कृत्य करणारे सगळेजण पडतीलच असे नाही व पडून लागले तरी कायमचे अपंगत्व येईलच असेही नाही. म्हणजे हे आत्मघातकी कृत्य असतानाच त्याच्यासाठी दुर्भाग्यपूर्णही ठरले.
एखादा जन्मतः अपंग असेल तर कृत्य असे कोणाचेच नसूनही ते दुर्भाग्य आहेच. वरील तिन्ही गोष्टींना कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक वैज्ञानिक, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय वगैरे खुलासे आहेतही. पण ते सर्व खुलासे सामान्यतः ध्यानात घेतलेल्या सामान्य घटितांचे सामान्य खुलासे आहेत. अमुकच्या- ‘च’ बाबतीत का? याला समाधानकारक खुलासा नाही. ‘अमुक’ची गर्भधारणा होणे ही अमुकच्या बाबतीत घडलेली पहिली घटना मानली तर, त्या घटनेने अमुकला ‘भोक्तृत्व’ आणि ‘अमुकत्व’ असे एकदमच मिळते. (कर्तृत्व, ज्ञातृत्व व स्व-भान या गोष्टी उशिरा उद्भूत (इमर्ज) होतात.) त्यानंतर अमुकवर परिणाम करणाऱ्या सर्व घटनांचा (ज्यांपैकी काही स्वकृतही असतील) संयुक्त (काँपोझिट) व अद्ययावत (लेटेस्ट) परिपाक म्हणजेच ‘अमुक’ होय. हे लक्षात घेता ‘अमुकच्या बाबतीत घडली होती अशी घटना’ ही अमुकच्याच बाबतीत का घडली होती? हा प्रश्न निरर्थक (द्विरुक्तिपूर्ण = टॉटॉलॉजिकल) ठरतो. म्हणजेच अनन्य म्हणून पाहता यादृच्छिकता येतेच. जी काय नियमितता असते ती सामान्य म्हणून पाहतानाच असते. अमुकच्या बाबतीत घडलेले अन्यकृत घटित जर मुद्दामहून अमुक-लक्ष्यी (टारगेटेड) असेल तर, ‘का?’ चे उत्तर, त्या अन्याने तसे ठरविले म्हणून, इतके साधे होते. त्याचे श्रेयापश्रेय त्या अन्याकडे जाते. अमुकवर (त्याची तशी अर्हता नसताना) केलेले प्रतिकूल घटित हे, त्या अन्याने अमुकवर केलेला अन्याय आणि अमुकचे दुर्भाग्य असे दोन्ही एकदम असते. कारण अमुक हा भोक्त्याच्या भूमिकेत आहे.
यावर कोणी म्हणेल की मग हाच न्याय कर्त्याच्या भूमिकेलाही का नाही लावायचा ? “काय की बुवा माझ्याद्वारे असे झाले इतकेच.” अशी वृत्ती अंगीकारल्यास कर्त्याची भूमिकाच बाद ठरविली जाईल. पण ज्या क्षणी, ‘होय हे मी केले व त्याची जबाबदारी मी घेतो’ हे वाक्य उमटते त्याक्षणी आपण ‘कर्तेपणा’ची उभारणी करत असतो. तश्या परिस्थितीत कोणाही द्वारा तसे घडले असते (उदा. बोटाने ट्रिगर दाबला आणि गोळी सुटली) तरी त्या कृत्याची जबाबदारी त्या कोणीही घेतलीच पाहिजे हा सामान्य किंबहुना सार्विक दावा आपण करीत असतो व ‘हा सामान्य कोणीही’ आपण बनत असतो. ‘काय की बुवा माझ्याद्वारे’ ह्या अकर्त्या भूमिकेचा त्याग करत असतो. आपली अनन्यता आपण सामान्य नियमात बसवून प्रचालित करत असतो. स्वतःकडेच कारणत्व घेतल्याने यादृच्छिकता उरत नाही. ही प्रक्रिया दसऱ्याही एका रीतीने बघता येईल. माझ्या बाबतीत हे असे का घडले हा प्रश्न आणि मी काय संकल्प करावा हा प्रश्न, हे दोन प्रश्नच मूलतः भिन्न आयामातले आहेत. पहिला प्रश्न सामान्य (तशा स्थितीत कोणाही बाबतीत) आणि घटितलक्षी (वुड) आहे तर दुसरा विध्यर्थक (शुड) आहे. पण आपण पहिला प्रश्नही अवैधपणे (इन्व्हॅलिड, इल्लिगल नव्हे) अनन्यलक्षी विध्यर्थक बनवून म्हणतो, “माझ्याबाबतीत-‘च’ हे असे का घडावे?”. या अवैध प्रश्नाला कर्मविपाक व तत्सम पारलौकिक उत्तरे दिली गेलेली आहेत. यामुळे यादृच्छिकता (रॅडमनेस) व भाग्य (फॉरच्युइटी) या इहलौकिक गौष्टींनाही विनाकारण गुणसूचकता (एनिग्मा) चिकटली आहे. अन्याय आणि दुर्भाग्य यांना देण्याचे उचित प्रतिसाद सामान्यतः पाहिलेले अन्यायपूर्ण घटित हे अनन्यतः पाहता दुर्भाग्यपूर्ण घटितही असते हे जरी खरे असले तरी त्या घटिताची अन्यायपूर्णता आणि दुर्भाग्यपूर्णता या गोष्टी पृथक (डिस्टिंक्ट) आहेत हे विसरता कामा नये. परंतु अनेकदा ही पृथकता आपल्या भानातून निसटते. हे निसटणे पुढे जाऊन मोठाच घोटाळा कसा करते हे आपण लगेचच पाहणार आहोत. ही पृथकता आपल्या भानातून निसटण्यामागे एक सबळ कारणही आहे. अर्थात हे कारण या चुकीचे समर्थन म्हणून देता येणार नाही. हे कारण जमेस धरूनही अन्याय-दुर्भाग्य-गल्लत ही चूकच आहे.
हे कारण असे की अन्याय व दुर्भाग्य या दोहोंत एक साम्य आहे. या दोन्ही गोष्टी अर्हतेनुसारी नसणाऱ्या आहेत. (या ठिकाणी अर्हता म्हणजे हानी-अर्हता) पण त्यांच्या अर्हतेनुसारी नसण्यात एक अत्यंत महत्वाचा फरकही आहे. जे घटित, अर्हतेनुसारी असणेच योग्य असूनही, अर्हतेनुसारी नसते ते अन्यायपूर्ण घटित होय. याउलट जे घटित, अर्हतेनुसारी असण्याचा प्रश्नच उद्भवत नसण्यामुळे, अर्हतेनुसारी नसते ते दुर्भाग्यपूर्ण घटित होय. अन्याय हा अर्हतेचा भंग आहे तर दुर्भाग्यात अर्हतेची अप्रस्तुतता आहे. नेमका हा सूक्ष्म (सटल – मायक्रो नव्हे) भेद लक्षात न घेतल्याने आपण अन्याय व दुर्भाग्य यांना एकाच जातकुळीची प्रतिक्रिया देतो. अन्याय ही चीड येऊन प्रतिकार करण्याची गोष्ट आहे तर दुर्भाग्य ही उमदेपणाने स्वीकार करून परिहार करण्याची (व अर्थातच पुढल्यावेळी खबरदारी घेऊन टाळण्याची) गोष्ट आहे.
अन्यायकर्त्यांचा प्रतिशोध घेणे हे उचित आहे किंवा कसे? याचा विचार आपण करूच. पण दुर्भाग्याची चीड येऊन दिशाहीनपणे विध्वंसक/हिंसक बनणे हे नक्कीच स्व-घातकी, अन्यघातकी व सर्व-घातकी असते. दुर्भाग्याचा उमदेपणाने स्वीकार न करता येणे हे खात्रीलायकपणे अन्यायाचे दुष्टचक्र वाढवीत नेणारे ठरते. प्रतिशोध घेणे हे, इतर सखोल प्रश्नात न शिरता, उचित मानले तरी, नेमका अन्यायकर्ता वेगळा शोधून काढणे व इतर अधल्या मधल्या निरपराधींना इजा न पोहोचू देता, नेमका प्रमाणबद्ध प्रतिशोध घेणे हे बऱ्याचदा अव्यवहार्य असते हे सर्वच अन्यायग्रस्तांचे आणखी एक दुर्भाग्य होय व या समाईक दुर्भाग्याचाही उमदेपणाने स्वीकार करता आला पाहिजे (आणि अर्थातच अन्यायकर्ता नेमका शोधण्याच्या व अन्याय सिद्ध करण्याच्या रीती विकसित केल्या पाहिजेत.). स्वतः अन्यायकर्ता न बनता अन्यायाचा प्रतिकार, ग्रस्ताचे पुनर्वसन/भरपाई, अन्यायकर्त्यांचे पारिपत्य व तत्सम अन्यायाचा प्रतिबंध कसा करायचा हा स्वतंत्र विषय आहे. फक्त अन्याय होता हे सिद्ध जरी झाले तरी ग्रस्ताचा क्षोभ कमी होतो. त्याचा आत्मघातकीपणा नव्हता यावरून त्याचा आत्मगौरव सुरक्षित होतो. नुसते दुर्भाग्य नव्हते यावरून कर्त्यांचा धिक्कार करण्यातली वैधता प्राप्त होते. हे सर्व मुद्दाम याठिकाणी उल्लेखिण्याचे कारण असे की दुर्भाग्याचा उमदेपणाने स्वीकार या तत्त्वाला कुठेही अन्यायाला करण्याचा विरोध क्षीण करण्याचा भाव चिकटता कामा नये. सुभाग्यवान असणे म्हणजे अन्यायी असणे नव्हे ____ आतापर्यंत आपण प्रतिकूल किंवा हानिकारक घटितेच लक्षात घेत होतो. आता ‘अमुक’ला अनुकूल/लाभदायक घटिते व त्यांच्या अनुषंगाने सुभाग्य व अन्यायपूर्ण लाभ (अन्यायाद्वारा इतरांकडून अपहृत करून मिळविलेले लाभ) या संदर्भात वरील युक्तिवाद कोणते रूप धारण करील ते पाहू. लाभ हा ‘स्व’ला अपराधगंड न येता व इतरांना ग्रस्ततागंड न येता झाला तर तो लाभ अन्यायपूर्ण नसल्याची पावती मिळते. आत्मगौरव न गमावता लाभ होण्याला महत्त्व आहे. गैरमार्गाने यशाचे धनी होता येते पण धन्य होता येत नाही.
वर आपण पाहिले की हानी-प्रसंगी ‘स्व’चे दुर्भाग्य आणि ‘अन्या’कडून ‘स्व’ वर होणारा अन्याय यांत ‘स्व’च्या मनात गल्लत केली जात होती. त्याच्या नेमकी उलट प्रक्रिया लाभ-प्रसंगी घडते. ‘स्व’चे सुभाग्य आणि ‘स्व’कडून अन्यांवर केला जाणारा अन्याय, यांत ‘अन्यांच्या मनात गल्लत केली जाते.
हानी-प्रसंगी ‘स्व’ प्रतिशोधाच्या आगीत जळत होता तर लाभ-प्रसंगी ‘अन्य’ मत्सराच्या आगीत जळतात. कारण पुन्हा तेच आहे. अन्याय-अर्जित लाभ आणि सुभाग्य या दोन्ही गोष्टी अर्हतेनुसारी नसतात. पण त्यांचे अर्हतेनुसारी नसणे हे अगदी वेगळ्या जातकुळीचे असते. अन्याय-अर्जित लाभ हा अर्हतेनुसारी पाहता न व्हायला हवा होता म्हणून तो अर्हतेनुसारी नसतो. याउलट सुभाग्याने होणाऱ्या लाभाला अर्हता ही अप्रस्तुत असल्याने (अर्हतेचा प्रश्नच उद्भवत नसल्याने) तो अर्हतेनुसारी नसतो.
अन्यायकर्ता एकदा काळाच्या ‘उदरात’ गडप झाला की त्याला दंडित करण्याची अथवा त्याच्याकडून भरपाई वसूल करण्याची संधी मानवजात कायमची गमावून बसते. त्याच्या जैविक वारसांना अन्यायकर्ता गणता येत नाही. कारण वाट्याला अन्यायकर्ती जनक/जननी व्यक्ती येणे हे त्यांचे दुर्भाग्य असते. अन्याय-कर्त्याने अन्याय-अर्जित लाभातून कोणाला दान दिले तर दान घेणारा (त्या बदल्यात अन्याय लपविण्यात मदत करीत नसेल तर) अन्यायकर्ता ठरत नाही.
ज्याप्रमाणे दुर्भाग्य आणि आत्मघातकीपणा यांची जोड असते त्याचप्रमाणे सुभाग्य आणि आत्मोद्धारकता याची जोड असते. महत्त्वाचे असे की दुर्भाग्य हा दुर्भाग्यवंताचा दोष नसतो पण याचा अर्थ असा नव्हे की सुभाग्य हा सुभाग्यवंताचा दोष मानावा. सुभाग्य लाभण्यात सुभाग्यवंताचे श्रेय नसते हे खरेच पण यावरून ते त्याचे अपश्रेय ठरते असे नाही. जे आत्मोद्धारक प्रयत्नातून मिळविले त्याला केवळ सुभाग्य गणले जाणे हा आत्मोद्धारकावर, मानसिकदृष्ट्या, अन्याय असतो. तसेच जे सुभाग्य आहे, त्याबद्दल आत्मोद्धारक प्रयत्नाचे श्रेय नसेल, पण ते अन्याय-अर्जित गणले जाणे हाही सुभाग्यवंतावर, मानसिकदृष्ट्या, अन्याय असतो.
परंतु मत्सरी लोक हे दोन्ही अन्याय करीत असतात. यामुळे कोणत्याही लाभान्विताला लाभार्हता सिद्ध करण्याची (यत्रार्जित लाभाबाबत) किंवा किमान लाभ-अनार्हता नसल्याचे सिद्ध करण्याची (सुभाग्याबाबत) गरज असते. (निर्लज्जपणे-अन्यायी माणसाला ती नसते. तसेच आत्मगौरवाबाबत इतरांवर अवलंबून न राहणाऱ्या आत्मनिष्ठ-न्यायी माणसालाही ती नसते. पण सामान्यतः माणसे या दोन्ही टोकांच्या मध्ये असतात.) मत्सर हा वरील अर्थाने अन्यायकारक तर असतोच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मत्सर हा मत्सरकर्त्याला अत्यंत आत्मघातकी असतो. मत्सरात त्याची मानसिक ऊर्जा व्यर्थ खर्ची पडत राहते. त्याला स्वःला मत्सराचे दुःख पदरी येतेच पण त्याशिवाय मत्सरापोटी हातून दुष्कृत्ये घडून शासन आणि/किंवा अपराधगंडही पदरी येतो. स्वदोष चिकित्सा, स्वदोष स्वीकृती व सुधारणा या संधीही हुकतात ते वेगळेच. न्याय्यतेचे दावे आणि कल्याणकारकतेचे दावे यांतील फरक मानवी कल्याण नेमके कशात आहे यावर अपार मतभिन्नता आहे व कल्याण ही कल्पना इतकी व्यापक आहे की ही मतभिन्नता स्वाभाविकच मानावी लागेल. न्याय ही कल्पना कल्याणापेक्षा जास्त नेमकी आहे. न्याय कशाला म्हणावे यावर मतभिन्नता नाही असे नाही. परंतु न्यायाचे स्वरूपच असे आहे की कोणत्याही राज्याला कोणत्यातरी न्यायकल्पनांचा सुसंगत संच सर्वांसाठी म्हणून मान्य करणे भाग असते. म्हणूनच कल्याणकल्पनांत बरीच बहुलता नांदू शकते पण न्याय कल्पनांत काही कल्पनांची हार तर काही कल्पनांची जीत व्हावी लागते.
ह्या फरकाखेरीज आणखी एक फरक सध्याच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या चर्चा-विश्वांत बऱ्यापैकी मान्यता पावलेला आहे. सर्वच मानवांचे सक्षमीकरण शक्य तितके वाढवावे व त्यात काही अंशी न्याय अन्याय बाजूला ठेवावे लागले तरी चालतील अशी ‘कल्याणाची’ कार्यात्मक व्याख्या मान्यता पावत आहे. म्हणजे कल्याणाचा चल-घटक क्षमता हा धरला जात आहे. याउलट न्याय म्हणजे दुष्प्रवृत्तींना पायबंद घालणे व सत्प्रवृत्तींना प्रोत्साहन देणे ही न्यायाची साधारणतः सर्वमान्य कल्पना मानावी लागेल. अर्हतेनुसार अधिकार हे न्यायाचे सारतत्त्व राहणारच. अर्हता म्हणजे नीतिमानपणे जबाबदारीने आचरण करून कार्यपूर्ती करून दाखविणे. भाग्याशी सामना करताना तो कल्याणाच्या अंगाने जावा पण न्यायाचा बळी न देता असे सूत्र मान्य होण्यास हरकत नसावी. कल्याणाच्या अभावालाच अन्याय मानणे ही चूक टाळली पाहिजे. या चुकीमुळे कल्याणाच्या नावाखाली अन्याय पुरस्कृत होण्याचा धोका आहे. किंबहुना जनानुरंजनवादी राजकारणात (डेमॅगॉगरी) नेमके हेच घडतही आहे. कल्याणाचे प्रयत्न सहृदयतेने व्हावेत पण न्यायाचा निवाडा काटेकोरपणे करण्यात सहृदयता आड येऊ दिली जाऊ नये. भले हा काटेकोर निवाडा अंमलात आणणे पुरतेपणी शक्य नसेलही, पण निवाडा काय हेच धूसर होता कामा नये. यासाठीच भाग्य आणि न्याय यातील फरक आणि संबंध जास्तीत जास्त स्पष्ट होणे अगत्याचे आहे व या दृष्टीने वरील खटाटोपाकडे पाहिले जावे.
२, स्नेह क्लासिक्स्, ७/१ एरंडवणे, पाडळे पॅलेस समोरील रस्ता, पुणे ४११ ००४