एक दिवाणी दावा

पुस्तक-परीक्षणः
एक दिवाणी दावा
जॉनथन हॅरा
अमेरिकन संघराज्याच्या ईशान्य कोपऱ्यातले बॉस्टनजवळचे वोबर्न नावाचे खेडे. एक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी मध्यमशी नदी, ॲबरजोना नावाची. नदीच्या पश्चिमेला वोबर्न पसरलेले. नदीजवळच्या एका वस्तीत राहणाऱ्या अॅन अँडर्सनच्या जिमी नावाच्या मुलाच्या नाकातून अधूनमधून रक्त यायचे. सहज मुक्या माराने त्याचे शरीर काळेनिळे व्हायचे. बॉस्टनचे डॉक्टर सांगायला लागले की मुलाला ल्यूकेमिया आहे, रक्ताचा कॅन्सर. साडेतीन वर्षांच्या मुलाला किरणोत्सर्गांचा मारा करण्याच्या तंत्राने मदत मिळेना. केमोथेरपी, म्हणजे कॅन्सरच्या पेशींना मारणारी औषधे देण्याचा उपचार चालू केला. हे सुरू झाले १९६६ साली. नंतरची पंधरावीस वर्षे ही महागडी आणि (त्यावेळी तर जास्तच) क्लेशकारक उपचाराच्या पद्धतीने अधूनमधून जिमीला दुरुस्त केल्यासारखे वाटायचे. पण आठदहा महिन्यांनी पुन्हा रोग उफाळून यायचा.
गावाचा पाणीपुरवठा वेगवेगळ्या खोल आणि मोठ्या विहिरींमधून होत असे. अँडर्सन कुटुंबाची वस्ती त्यावेळी नदीच्या पूर्वेकडील जी आणि एच नंबरांच्या विहिरीचे पाणी प्यायची. पाण्याला घाण वास यायचा. चवही अशी असे, की तहान भागवणे कष्टाचे वाटे. आंघोळ करताना डोळे चुरचुरत. नगरपालिकेचे अधिकारी मात्र पाणी निर्दोष असल्याची ग्वाही देत. तरीही तीव्र उन्हाळ्याचा काळ सोडता जी आणि एच विहिरी वापरल्या जात नसत. त्या वापरात आल्या, की ज्यांना परवडायचे ते लोक बाटलीबंद पाणी पिऊ लागत. तर एकदा जिमी दुरुस्त होऊन घरी आला असताना शेजारी अभिनंदन करायला आले, आणि त्यांच्या बोलण्यातून अॅन अँडर्सनला कळले, की तिच्या शेजाऱ्यांमध्ये आणिकही दोन ल्यूकेमियाग्रस्त मुले आहेत. होता होता आकडा आठाला पोचला. अॅनने डॉक्टरांना “याच्याशी पाण्याचा संबंध असेल का?’ असे विचारले. त्यांच्या मते शक्यता नव्हती, पण त्यांनी एकाच वस्तीत फार ल्यूकेमियाचे रोगी दिसत आहेत, हे अटलँटाच्या सेंटर फॉर डिसीझ कंट्रोलला कळवले. तिथला एक शास्त्रज्ञ ल्यूकेमिया गुच्छ (Leukemia Clusters), म्हणजे एकाच क्षेत्रात सरासरी संभाव्यतेपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात ल्यूकेमिया आढळणे, यातला तज्ज्ञ होता. त्याने ‘शक्य दिसते, पण पाण्यातून ल्यूकेमिया होण्याबाबत खात्री देता येत नाही.’ अशा अर्थाचे मत दिले.
ॲन पाण्यावर दोष टाकत राहिली, आणि हे निराधार, पछाडल्यासारखे (obsessive) मत तिच्या नवऱ्याला मुळीच पटेना. काही काळाने अॅनचा नवऱ्यापासून मुख्यतः या मुद्द्यावरून घटस्फोट झाला. पण स्थानिक एपिस्कोपल पंथाच्या चर्चच्या पुढाकाराने पाण्याबाबत फिर्याद करावी, असा निर्णयही झाला.
पाण्यात ट्रायक्लोरोइथिलीन (Trichloroethylene), ऊर्फ ढउए आणि टेट्राक्लोरोइथिलीन (Tetrachloroethylene), ऊर्फ झशील या संभाव्य कॅन्सरोत्पादक रसायनांचे जी व एच विहिरीमधील पाण्यामधले प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळल्याने त्या विहिरी उपसणे बंद केले गेले. ही कृती ज्या तपासानंतर केली गेली त्या तपासाचे कारण एका पर्यावरणीय गुन्ह्यात होते. एका रात्री अँडर्सनांच्या वस्तीच्या उत्तरेच्या एका शेतात कोणीतरी रसायनांनी भरलेली १८४ गंजकी पिंपे आणून टाकली होती. पिंपांचा मालक कोण, हे स्पष्ट नव्हते, पण शेत बीअॅट्रिस फूड्स कंपनीच्या मालकीच्या रायली टॅनरीज या कातडे कमावण्याच्या कारखान्याचे होते. कारखान्याची मालकी आधी जॉन रायलीकडे होती, पण त्याने बऱ्याच आधी ती बीअॅट्रिस फूड्सला विकली होती. रायलीच कारखान्याचा मॅनेजर म्हणून काम करत असे. नदीच्या पूर्व किनाऱ्यावर डब्ल्यू.आर.ग्रेस या कंपनीचा कारखाना होता. ढउए आणि झशील हे औद्योगिक द्रावण म्हणून दोन्ही कंपन्या वापरत. रातोरात शेतात टाकलेली पिंपे कोणाची, हे मात्र कळत नव्हते. आता अॅन व इतर ल्यूकेमियाग्रस्त कुटुंबीयांच्या फिर्याद करण्याच्या निर्णयाला लक्ष्य सापडले. याआधी मात्र वकील लोकांना कज्जा लढवण्यात रस नव्हता.
अशा प्रकारच्या कज्ज्यांना व्यक्तिगत इजा कज्जे (Personal Injury Cases) म्हणतात. अमेरिकेत असे कज्जे हाताळणाऱ्या वकिलांना हिणवून अँब्युलन्स चेजर्स म्हटले जाते – अपघातग्रस्तांच्या रुग्णवाहिकेमागून जाणारे, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे या मराठी म्हणीचा हा जरा सौम्य अवतार. बरेचदा हे कज्जे कोर्टात दाखल केले जातात. थोड्या न्यायालयीन झगड्यानंतर बहुतेक वेळी सामोपचाराने नुकसानभरपाई ठरवून मामला मिटवला जातो. यात बऱ्याच कंपन्या, व्यक्ती वगैरे व्यक्तिगत इजा कज्ज्यांसाठी विमा उतरवतात, ही बाब महत्त्वाची असते. नुकसानभरपाईचा मोठा भाग विमा कंपन्यांवर जातो, आणि त्यांना कोर्टकचेऱ्या करण्यात रस नसतो. जुजबी सौदेबाजीनेच बहुतांश वाद मिटवले जातात. अर्थातच चांगले सौदेबाज वकील यशस्वी, ख्यातनाम आणि श्रीमंतही होतात !
जॉन ग्लिख्टमन हा असा यशस्वी वकील होता. परंतु बऱ्याच नाराजीने आणि टाळाटाळीनंतरच त्याने वोबर्न ल्यूकेमियाची फिर्याद करण्याचे कबूल केले. ढउए आणि झशील ग्रेस आणि रायलींमुळे आले, हे सिद्ध करावे लागणार होते. प्रदूषण केव्हा आणि किती झाले, याचा एकीकडे रोगांशी आणि दुसरीकडे कारखान्यांशी संबंध जोडावा लागणार होता. या साऱ्या सिद्धता ग्रेस रायलींचे वैज्ञानिक चुकीचे ठरवायला धडपडतील, हे स्पष्ट होते. त्यामुळे महागडे, ख्यातनाम वैज्ञानिक, त्यांना आवश्यक त्या महागड्या तपासण्या, हे सारे खर्च आधी फिर्यादींतर्फे करावे लागणार होते. या तयारीशिवाय कोर्टाची पायरी चढणे धोक्याचे होते.
अमेरिकेतली बहुमान्य पद्धत अशी, की वकिलाने सर्व तपासण्या व खर्च करत कज्जा लढवायचा. कधी न्यायालयात तर कधी सौदेबाजीतून नुकसानभरपाई मिळवायची. मग मिळालेल्या रकमेतून खर्च वजा जाता उरलेली रक्कम वकिलाचा मोबदला वजा जाता फिर्यादींमध्ये वाटून द्यायची. वकिलांचा मोबदला बहुतेक वेळी एकूण नुकसानभरपाईच्या (खर्चासकट) काही प्रमाणात आकारला जातो. एक-तृतीयांश मोबदला सामान्यपणे आकारला जातो, पण मोठ्या खटल्यांमध्ये एक-चतुर्थांश, लहान मामल्यांमध्ये अर्धा, ही प्रमाणेही अपसामान्य नाहीत. वकील हे डॉक्टरांप्रमाणेच पेशेवर असतात, धंदेवाईक नव्हे. त्यांचा मोबदला हा त्यांचे कार्यालयीन खर्च व त्यांचे उत्पन्न असा वाटला जातो. म्हणजे शेवटी निर्णय होईपर्यंतचे तज्ज्ञ आणि तपासण्यांचे खर्च, स्वतःचा कार्यालयीन खर्च आणि स्वतःची रोजीरोटी, हे सारे वकिलांना सांभाळावे लागते, आणि मगच मोबदल्यातून तोंडमिळवणी होते. फिर्याद करावी ती श्रीमंतांवर, कारण त्यांचे खिसे खोल असतात, असे अमेरिकन तत्त्व आहे. पण यासाठी खुद्द फिर्यादीच्या वकिलाचेही खिसे खोल असावे लागतात! सामान्य खटल्यांपुरते श्लिख्टमनचे खिसे पुरेसे होते, पण हा मोठा मामला होता. अडीच ते साडेतीन कोटी डॉलर्स नुकसानभरपाई मिळेल, असा श्लिख्टमन आणि त्याच्या सहकाऱ्यांचा अंदाज होता. आणि यासाठी तगडे पुरावे देणे आवश्यक होते.
आरोपी कंपन्यांचे खिसे खोल असतात, खर्चाची क्षमता भरपूर असते, पण त्यांना नुकसानभरपाई ज्यादा देण्याऐवजी प्रति-तज्ज्ञ, वकील यांच्यावर खर्च करणे आवडते, कारण त्याचा दूरगामी लाभ होऊ शकतो. खोल खिसे असल्याने त्यांचे वकीलही फाटे फोडण्यात, उशीर लावण्यात, दिशाभूल करण्यात तज्ज्ञ असतात. या क्रियांचा घटनात्मक बचाव देण्यातही ते कुशल असतात.
तर १९६६ सालापासून जाणवू लागलेल्या प्रदूषणजन्य रोगांचा खटला अखेर १९८३ साली पटावर आला. १९७९ पासून भूजलशास्त्रीय तपासण्या, वैद्यकीय तपासण्या, ग्रेस व रायलींचे माजी कर्मचारी शोधून प्रदूषणाचा इतिहास रचणे, असे सारे श्लिख्टमन करवून घेत होताच. नंतर या साऱ्या तज्ज्ञांच्या जबान्या (वशीळींळेपी) नोंदणे सुरू झाले. कोर्टापुढील वादावादी कमी करण्याच्या हेतूने या जबान्या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी एकत्रपणे घेण्याची अमेरिकन पद्धत आहे. पण यातूनच तज्ज्ञांच्या उलटतपासण्याही जहाल होतात, कारण कोणता तज्ज्ञ काय सांगणार, हे दोन्ही पक्षांना माहीत असते. कोर्टापुढे, आणि त्यातही ज्यूरीपुढे एकमेकांच्या तज्ज्ञांना खेचायची तयारी केली जातेच. येथे पुन्हा नोंदतो, की या शब्दच्छलातूनच न्याय्य काय ते ठरते, असे घटनात्मक
चौकटीत दाखवणे, हेही दोन्हीकडचे वकील हिरिरीने करत असतात.
अशा डावपेचांमधला पहिला विजय मिळवला, तो बीअॅट्रिस -रायलींच्या फॅचर या वकिलाने. ज्यूरीपुढे रोग, रोगी यांच्या वैद्यकीय इतिहासाच्या हृदयद्रावक कहाण्या येणे, हे आरोपी पक्षावर अन्याय करणारे ठरेल, असे फॅचर न्यायमूर्ती स्किनरला पटवून देऊ शकला. त्यामुळे ज्यूरीपुढे आधी फक्त पाणी आणि प्रदूषण यांची चर्चा व्हावी, रोग आणि रोगी यांची नको, असा निर्णय स्किनरने घेतला. श्लिख्टमन फार काळजीत नव्हता, कारण सत्य आपल्या पक्षाकडे आहे, असा त्याचा दुर्दम्य विश्वास होता.
तीन वर्षे हा झगडा ज्यूरीपुढे चालला. यानंतर ज्यूरीला दोन मर्यादित प्रश्न विचारले गेले. एक म्हणजे जी व एच विहिरींमध्ये ढउए, झशील येण्यात बीअॅट्रिस-रायली कंपनीचा सहभाग होता का? दुसरे म्हणजे कोणत्या तारखेनंतर असा सहभाग होता. हेच दोन प्रश्न ग्रेस कंपनीसाठीही ठरवायची जबाबदारी ज्यूरीवर होती. दोन कंपन्यांच्या स्थितीतले मुख्य फरक असे सांगता येतील – ग्रेस कंपनी आणि पाण्याच्या विहिरी अँबरजोना नदीच्या पूर्वेला, एकाच बाजूला होत्या. बीअॅट्रिस-रायली कंपनी मात्र नदीच्या विरुद्ध बाजूला होती. दुसरा मुद्दा होता प्रदूषक रसायनांमध्ये ढउए आणि झशील असण्याचा. ढउए आणि झशील वापरले जात होते, आणि ते जमिनीत, खड्डयांमध्ये सोडले जात होते असे सांगणारे ग्रेसचे कर्मचारी श्लिख्टमनला सापडले होते. रायली मात्र सांगत होता, की तो तीन वर्षांपेक्षा जुने कागदपत्र ठेवत नाही, आणि १९८३ आधीची तीन वर्षे रायली ढउए आणि झशील वापरत होता असे सांगणारा कर्मचारी सापडला नव्हता!
एकदोन माजी कर्मचारी कॅन्सरग्रस्त होते!
रायलीच्या आवारातील काही पंधरा वर्षे जुनी झाड़े प्रदूषित मातीच्या ढिगांवर उगवलेली होती. पण “माझ्या आवाराचा मी नेचर पार्क केला आहे, आणि तेथे कोणी काय टाकले हे मला माहीत नाही.’ यावर रायली घट्ट होता. तीन वर्षांपूर्वीचे कागदपत्र जाळून टाकले जातात, यावरही रायली घट्ट होता.
नदीखालूनही प्रदूषित पाणी विहिरींपर्यंत पोचतच असते, हे भूजलशास्त्रीय सत्य श्लिख्टमनचा तज्ज्ञ ज्यूरीला पटवून देऊ शकला नाही. त्याची जबानी दोन आठवडे, रोज आठ तास चालली. भूजलशास्त्राविषयी अनभिज्ञ असलेल्या जज्-ज्यूरीना श्लिख्टमनचा तज्ज्ञ भूजलशास्त्र शिकवू शकलाही असता, परंतु बीअॅट्रिस-रायलीचे भूजलतज्ज्ञ प्रत्येक युक्तिवाद शंकास्पद आहे, आणि तसे नसणेही शक्य आहे, हे सांगत होते.
ज्यूरीने बीअॅट्रिस-रायलीला दोषमुक्त ठरवले!
यावेळेपर्यंत श्लिख्टमनने तज्ज्ञ-तपासण्यांवर वीस लक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला होता. त्याची, त्याच्या सहकाऱ्यांची रोजीरोटी, कार्यालयीन खर्च, हेही सुरू होते. अखेर ग्रेस कंपनीशी सौदा करायला श्लिख्टमन तयार झाला, तेव्हा तो पूर्णपणे कर्जबाजारी होता. आता ग्रेसने सौदा करण्यात टाळाटाळ सुरू केली. श्लिख्टमनचे खिसे पुरेसे खोल नाहीत, हे जाणून घेतले; नव्हे त्याची खात्री करून घेतली. आणि “ऐंशी लक्ष डॉलर्स देतो, घेता तर घ्या, नाही तर कोर्टात लढा.”, असे पर्याय श्लिख्टमनपुढे ठेवले. वैद्यकीय साक्षी, त्यांच्यामुळे होणारा खर्च, हे सारे झेपणे श्लिख्टमनच्या ताकतीपलिकडले होते. त्याला सौदा मानावा लागला. त्यावेळी ऐंशी लाखांपैकी सव्वीस लाख तज्ज्ञ-तपासण्यांचा खर्च होता. उरलेल्या चौपन्न लाखांपैकी बावीस लाख डॉलर्स लिख्टमनचा मोबदला, आणि उरलेले बत्तीस लाख आठ रोगग्रस्त कुटुंबांमध्ये वाटलेले, असा सौदा फिर्यादी आणि लिख्टमनला मान्य करावा लागला. प्रत्येक रोगग्रस्ताला, मरण पावलेल्यांनाही, पावणेचार लाख ताबडतोबीने, तर उरलेले आठ वर्षांत विभागून मिळाले. ताबडतोबीने म्हणजे १९६६-८६ अशा वीस वर्षांनी, हेही लक्षात घ्यावे. १९७९-८६ या आठ वर्षांचा श्लिख्टमनचा कार्यालयीन खर्च, सहकाऱ्यांचे व स्वतःचे जगणे, हे सारे बावीस लक्ष डॉलर्समध्ये भागणे अशक्य होते. या काळाच्या शेवटच्या टप्प्यात श्लिख्टमनची कार, घर, सारे जप्त झाले होते. नादारीचा, दिवाळखोरीचा अर्ज करणे श्लिख्टमनला क्रमप्राप्त होते.
उधारीवर तिकीट काढून श्लिख्टमन बॉस्टनहून हवाईला गेला. या उष्णकटिबंधीय द्वीपसमूहात काही वेळा ‘परत येऊ नको’ असे स्वतःला बजावत श्लिख्टमन समुद्रात पोहला. पण तशी आत्महत्या करणे सोपे नसते. ते सर्व मानवी वृत्तींच्या विरोधात जाते. भिकाऱ्याचे जीवन जगून १९८९ मध्ये श्लिख्टमन अमेरिकेत मुख्य भूमीवर परतला.
अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण विभागाने ग्रेस-बीअॅट्रिसमुळेच प्रदूषण झाले असे ठरवून सफाई साठी या दोन कंपन्यांकडून सात कोटी डॉलर्स वसूल केले. हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
श्लिख्टमन , त्याची आठ अशीले मात्र चणे फुटाणे मिळून दिवाळखोरीत गेली. जॉनथन हॅरा (J. Harra) याच्या अ सिव्हिल अॅक्शन (A Civil Action, व्हिटेज बुक्स, १९९५) या पुस्तकातली ही कहाणी. पुस्तकावर चित्रपटही निघाला आहे.
आता या कहाणीची भोपाळ वायुगळती प्रकरणाशी तुलना करून पाहता येईल. डॉमिनिक लापियर आणि हेवियर मोरो यांच्या इट वॉज फाइव्ह मिनिट्स पास्ट मिडनाइट इन भोपाल (फुल सर्कल, २००१) या पुस्तकाचे परीक्षण आसु ने डिसेंबर २००१ (अंक १२.९) मध्ये छापले. औद्योगिक दुर्घटना आता सवयीच्या झाल्या आहेत. त्यांना शाहणा प्रतिसाद कसा असावा ? आजचा ‘दोषी कोण ?’ असा व्यक्तिकेंद्री प्रतिसाद कितपत शाहणा?

चित्रपट-परीक्षण
जोगवा : सामाजिक वास्तवाचे दर्शन सतेज दणाणे
‘जोगवा’ हा मराठी चित्रपट कथानक, आशय, विषय आणि अभिनय या वैशिष्ट्यांनी महत्त्वपूर्ण ठरला आहे. जागतिकीकरणातील अनेक प्रश्न माणसांना सतावत असताना देवधर्म या संस्कृतीत अडकून पडलेली माणसे, स्वतःचे आणि आपल्याच माणसाचे कसे नुकसान करतात, हे ‘जोगवा’मध्ये पाहावयाला मिळते. ही देवधर्मनिष्ठ व्यवस्था माणसांना जनावरांप्रमाणे जगायला भाग पाडते. पुरुषाचे शरीर, मन असताना, पुरुषाला स्त्रीप्रमाणे जगावे लागते. स्त्री ही माणूस आहे हे विसरून तिला जनावराप्रमाणे वागविले जाते. देवधर्माच्या अधिराज्यातून बोकाळलेली अंधश्रद्धा माणसाच्या नसानसात भिनलेली दिसते. पुरुषसत्ताक व्यवस्था आणि वासनांध झालेली माणसे देवाच्या नावाखाली स्त्रियांचा उपभोग घेतात. स्त्री ही पुरुषांना फक्त उपभोग घेण्यासाठी हवी असते, तिची जबाबदारी नको असते; हे चित्र ‘जोगवा’मध्ये दिसते. स्त्री असो किंवा पुरुष असो जोगत्यांचे जीवन हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. ‘जोगवा’ मध्ये प्रामुख्याने करुण, गंभीर, बीभत्स, अतिशय क्लेशकारी, बोचणाऱ्या, मनाला वेदना देणाऱ्या, विषण्णता देणाऱ्या अनुभवांचा प्रत्यय येतो.
‘जोगवा’ मध्ये व्यक्तिलक्ष्यी समस्या दिसते. पण ती एकट्या जोगता असणाऱ्या तायाप्पाची नाही. एकट्या सुली या जोगतिणीची नाही, तर संपूर्ण जोगती मेळ्याची आहे. परंतु जो तो आत्मभान नसल्याने आपापल्या पातळीवर नशिबाला दोष देत राहतो. बंड करण्याचा मात्र विचारही करीत नाही. ‘यल्लम्मा’ हीच कर्तीकरविती आहे. आपल्या नशिबाला आले ते आपल्याला भोगावे लागणार आहे. अशी समजूत रूढ झालेली आहे. तायाप्पाच्या मनात दुःखाची सल आहे, तशीच शेवंताच्याही मनात आहे. फुलीच्या मनात आहे. जोगत्यांच्या मेळ्यात अनेक कुटुंबांतून आलेले आणि जोगती म्हणून जगणाऱ्यांचे एक जिवाभावाचे कुटुंब आहे. त्यांच्यामध्ये मानवी पातळीवर नातेसंबंध आहेत. पुरुष हे स्त्रीकडे एक भोग्यवस्तू म्हणून पाहतात. तिच्या मनाचा, भावनाचा स्त्री म्हणून विचार केला जात नाही. जोगतीण ही सर्व गावाची सार्वजनिक मालमत्ता आहे, या दृष्टीने तिच्याकडे पाहिले जाते; आणि अशी देवभोळी, अंधश्रद्धाळू, संस्कृतीने किडलेली माणसे ‘जोगवा’मध्ये दिसतात.
तृतीय-पंथीयांचे भावविश्व कॅमेरामनने कौशल्याने टिपलेले आहे. त्याची कुचंबणा, अवहेलना, समस्या, मनातील हेलकावे, जोगता म्हणून जीवनात आलेले एकाकीपण अनेक प्रसंगांतून चित्रित केले आहे. तायाप्पाचे सायकलवरून फिरणे, डोंगराच्या कडेवर बसून विचारमग्न होणे, त्यावेळी पेटलेले वाहनांचे टायर त्यांच्या मनातील धग दाखविण्यासाठी दाखविणे, सायकलवरून भ्रमंती करताना दुसऱ्या पुरुषाने कोड्यात टाकणारे प्रश्न तायाप्पा या जोगत्याला विचारणे, तायाप्पाच्या शरीरावरून पुरुषाने हात फिरवणे, त्याच्याशी लगट करणे, आंघोळ करताना पाठ घासायला लावणे, स्त्री-पुरुषांना ब्रिजवरून आणि इतर ठिकाणी एकत्र फिरताना पाहणे, या घटनांच्या वेळी तायाप्पाच्या चेहऱ्यावरील भाव टिपलेले आहेत. या घटना चित्रित करताना तायाप्पाच्या चेहयावरील भाव आणि डोंगराचे उंच कडे, निळे अथांग पाणी, त्यामधील खडक या निसर्ग-प्रतिमांमुळे तृतीयपंथीयांचे भावनिक विश्व, भावनिक आंदोलने दिग्दर्शकाने अप्रतिम टिपली आहेत.
जोगतीण म्हणून देवाच्या नावाने सोडलेली देवदासी, देवाची सेवा करण्यात आपले आयुष्य खर्ची घालते. ती देवाची दासी असते. मात्र तिच्याकडे पुरुषसत्ताक व्यवस्थेत राहणारे सर्व गावकरी सार्वजनिक मालमत्ता म्हणून पाहतात. तिच्यावर अन्याय होतो तेव्हाही तिचा देव तिला एकाकीच टाकतो. तिच्या भावना, मन यांचा कोणीही (देव आणि माणूस) माणूस म्हणून विचार करत नाहीत. हे दाखविण्यासाठी अनूचे आणि सुलीचे संबंध आणि त्यानंतर अनूचे पळून जाणे, पाटलाने मेळ्याचा मालक म्हणून मेळ्यातील सुलीवर आणि सर्वच स्त्रियांवर हक्क सांगणे, मेळ्यातील तरुण जोगतिणींचा भोग घेणारी माणसे, झुलवा लावण्यास नकार देणे, जोगतिणीच्या पोटी जन्माला येणाऱ्या अपत्याची जबाबदारी नाकारणे, त्यावेळी घराण्याची प्रतिष्ठा आणि जोगतिणीची भ्रष्ट नीतिहीनता असा फरक दाखविणे, यामधून जोगतिणींच्या भावविश्वाचे दर्शन घडविलेले आहे. पुरुषव्यवस्था स्वार्थी आहे. ती भोग घेण्यासाठी पुढे येते, पण तिला जबाबदारी नको असते, हे दाखविले आहे.
जोगता आणि जोगतीण हे संसार करणार हे ऐकल्यानंतर जसा त्या जोगत्यांच्या मेळ्याला आणि गावाला आश्चर्याचा धक्का बसतो, तसा प्रेक्षकांनाही धक्का बसतो. ही देवधर्माची व्यवस्था बंदिस्त आहे. या व्यवस्थेच्या विरोधात कोणी जात नाही. कारण व्यवस्था मोडणे, परंपरा तोडणे हे पाप आहे, हे प्रत्येक माणसाच्या मनात ठसलेले आहे. ‘यल्लम्मा म्हणजे वल्या झाडाला आग लावणारी देवी’ आहे. तिच्याबद्दल बोलणे म्हणजे कोप ओढवून घेणे. अशी समजूत जनमानसात रुजलेली आहे. अशा रूढिग्रस्त समाजव्यवस्थेत जोगता आणि जोगतीण यांनी लग्न करणे, संसार करणे ही गोष्ट मान्य होण्यासारखी नाही. ‘पोतराज’ हेही याच प्रकारे रूढी, परंपरेत अडकलेले दिसतात. ते केस वाढवून देवाचा जोगवा मागत फिरतात. त्यांच्यामध्ये अलिकडे शिक्षणामुळे परिवर्तन होत असलेले दिसते. बऱ्याच ठिकाणी पोतराज झालेल्या मुलांनी डोक्याचे वाढविलेले केस काढून टाकलेले आहेत हे वास्तव आहे. असेच परिवर्तन जोगती समाजात होत आहे. यात नवल वाटण्यासारखे असले तरी हा बदल शक्य आहे. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. ‘जोगवा’ या चित्रपटामध्ये मोरे मास्तर या पात्राला जोगत्यांच्या समूहाचा मार खावा लागतो, शिव्या खाव्या लागतात. तरी ते परिवर्तनाचा ध्यास सोडत नाहीत. त्यामुळेच तायाप्पा आणि सुली हे जोगता-जोगतीण आपली जोगत्याची वस्त्रे आणि डोक्यातील केसाची जट सोडून टाकतात; आणि बंड करतात.
तायाप्पाला समाजव्यवस्था बोचत राहते. हेमल्या, फलक्या (बायकी) म्हणून हेटाळणी होते. त्याला पुरुष असूनही बाईसारखे जीवन जगावे लागते. ह्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर झिरपताना कॅमेरामनने टिपले आहे. त्याची मानसिकता कॅमेयातून टिपलेली आहे. या समाजामधील, व्यवस्थेमधील प्रत्येक पुरुष भोगविलासी नजरेने सुली, फुली, शेवंता या जोगतिणींना हेरताना दिसतो. आपल्या मनाप्रमाणे ह्यांना वागवतो. त्याला या स्त्रिया बळी पडतात.
‘जोगवा’ चित्रपटाचा वाण देशी वाटतो, तो या पात्रांच्या अभिनयाने. तायाप्पा या पात्राचा अभिनय व सुली या पात्राचा अभिनय अप्रतिम साधलेला आहे. तायाप्पाला जोगता म्हणून जगाव्या लागणाऱ्या जीवनाचे भावविश्व त्याच्या अभिनयातून अभिव्यक्त होते. सुली आणि तिच्यासारखी इतर स्त्रीपात्रे, त्यांचे भावविश्व, देवधर्म, ग्रामीण परिसर, रूढी पंरपरा अभिनयामधून उठून दिसतात. तायाप्पाला देहाने पुरुष असूनही स्त्री-देहाचे आकर्षण नाही, ही जाणीव होते व मनातल्या मनात धुमसत राहते. स्त्रीसारखे जगण्यातून त्याच्या भावनेचा उद्रेक होणे, बापासमोर त्याने त्यासंबंधी उघडपणे बोलणे, ‘तूच माझं लुगडं नेसवून वाटुळं केलं’ म्हणून हातावर हात मारणे, या घटना अनपेक्षित वाटतात.
देवधर्म, रूढीपरंपरा आणि समाजव्यवस्था यामुळे हतबल झालेला तायाप्पाचा बाप जोगवामध्ये दिसतो, तर तायाप्पा आणि सुली हे बंड करून व्यवस्था नाकारतात. ते ज्या ज्यावेळी बंड करण्याचा विचार करतात त्यावेळी पाणी, मोकळा माळ दाखविलेला आहे. सकाळ झाल्याचे वातावरण टिपलेले आहे. सुली आंघोळ करताना तिच्या जटा सोडवतानाचे दृश्य, ही व्यवस्थेची गुंतागुंत सोडवण्याचे प्रतीक म्हणून चित्रित झाल्याचे दिसते. त्यावेळच्या संवादांतून ते परिणामकारक साधले आहे. ते दोघे बेभान होऊन सर्व रूढिग्रस्त समूहावर दगड फेकतात, तेव्हाही सकाळचेच वातावरण दिसते. तो मोकळा परिसर आणि त्या परिसरात नुकतेच गवत उगवत आहे. हे बदलाचे चित्रण प्रतीक म्हणून टिपलेले आहे. मेळ्यातील गाणी आणि नाच यावेळी रात्रीचा अंधुकसा सावट असलेला दिसतो. यामधून रूढिग्रस्तता सूचित केलेली दिसते.
कथानकाला संवाद आणि गाणी यामधून ही गती मिळते. ग्रामीण बोलीभाषेतील संवाद जोगत्याचे जग अभिव्यक्त करतात. त्यावेळी केलेला शिव्यांचा आणि जोगती समाजातील बोलीभाषेचा वापर परिणामकारक झालेला आहे. जोगतिणींचे गर्भधारणा झाल्यानंतरचे जीवन, प्रश्न, भावना, जोगत्यांची होणारी कुचंबणा, असे प्रसंग वास्तवतेचा वेध घेताना दिसतात. जोगत्यांच्या पंथात अनेक बंधने आहेत. ती बंधने मोडणारांना शिक्षा होते. अशी अंधश्रद्धा आहे. या समस्येच्या मुळाचा शोध घेणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून पाहता येणार नाही. तो प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावतो. अस्वस्थ करतो, बेचैन करतो. त्यात विचाराला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे.
हा चित्रपट एक महत्त्वाचा संदेश देतो, तो असा – सुली आणि तायाप्पा हे रूढी, परंपरांच्या बंदिस्त चौकटीपासून पळून जात नाहीत. ते रूढीने, परंपरेने, अंधश्रद्धेने जखडलेल्यांना पळवून लावतात. त्यांना पळून जाऊनही जगता आले असते. परंतु त्यांना त्या रूढींना पळवून लावायचे आहे; आणि समाजात बदल करून माणूस म्हणून माणसासारखे जगायचे आहे. त्यासाठी ते बेभान होऊन लढा देतात आणि रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना पळवून लावतात.
चाकोरीबाहेरील विषय मोठ्या कौशल्याने आणि आह्वान म्हणून स्वीकारलेला दिसतो. हिंदी चित्रपटसृष्टी, केबलचे जग, जागतिकीकरणाचा जमाना, मोबाईल संस्कृती, अशा अनेक आह्वानांपुढे डॉ. राजन गवस यांच्या चाकोरीबाहेरील कथेवर राजीव पाटील यांनी ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी अनेक आह्वाने यशस्वीपणे पेलली. त्यांनी परंपरागत मराठी चित्रपटाची वाटही मोडलेली दिसते. माणसाला धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आत्मजाणीव झाली पाहिजे, तरच तो जगण्यासाठी बंड करेल. ती जाणीव जोगवा निर्माण करते. आणि त्यामुळे अंधश्रद्धा, रूढी परंपरा मोडण्याचे धाडस झाल्याचे दिसते.
मराठी चित्रपटसृष्टीला नवा चाकोरीबाहेरील विषय ‘जोगवा’ने दिला आहे आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी धाडसी नवी वाट निर्माण करण्याचे सामर्थ्य पुरविले आहे.
द्वारा – जयवंत शां. देसाई, ओरी रोड, टेलिफोन टॉवर शेजारी,
जाकादेवी (खालगाव), ता.जि.रत्नागिरी. फोन : ९०२१८४३८१६, ९९६०४०४१०८