नैतिकतेचे बदलते स्वरूप

मुळात नैतिकता कुठून येते, या प्रश्नाचे उत्तर शोधताना १८ व्या शतकातील डेव्हिड ह्यूम या स्कॉटिश तत्त्वज्ञापर्यंत आपल्याला जावे लागेल. त्याच्या मते नैतिकता वासनांची गुलामी करते (“the slave of the passions’). त्यांनी हे निष्कर्ष ‘चांगले काय व वाईट काय’ या अभ्यासाअंती काढले होते. आपण ज्याला चांगले वा वाईट असे म्हणत असतो त्याचे मूळ आपल्या मनात एखाद्या वस्तू वा व्यक्तीबद्दल वाटणारी सहानुभूती वा घृणा यात शोधता येईल. हे निष्कर्ष आपण आजकाल मान्य केलेल्या प्राथमिक स्वरूपातील वैश्विक नीतिमत्तेशी मिळते-जुळते आहेत, हे आपल्या लक्षात येईल. सहा महिन्याचे मूल आपल्यासमोरील व्यक्तीमधून आवडते वा नावडते असे ठरवू शकते. एक वर्षांचे मूल उत्स्फूर्तपणे आपला (चिमुकला !) हात इतरांच्या मदतीसाठी पुढे करू शकते. यावरून नैतिकता ठरवण्यासाठी आपल्याला विवेकी विचारांची गरज नाही असे म्हणता येईल. अनेक मानसतज्ज्ञांच्या मते नीतिमत्तेसाठी आपण व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया आपल्यातील उत्स्फूर्ततेला लपवण्यासाठीच असते. आपण नेहमीच न्यायाधीशाच्या भूमिकेतून नीतिमत्तेचे मूल्यमापन करत असतो, अशा समजुतीने वागत असतो. परंतु ते खोटे असून आपण आपल्या कल्पनेतील नैतिकतेची बाजू उचलून धरण्यासाठी एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे वकिली डावपेच लढवत असतो, हे मान्य करायला हवे. ज्या गोष्टी प्रस्थापित आहेत त्यांचीच बाजू सामान्यपणे आपण उचलून धरतो. यावरून चांगले काय वा वाईट काय हे ठरवण्यासाठी आपल्यातील जाणिवा व/वा बुद्धी अपुरे पडतात, असा निष्कर्ष काढता येईल.
पॉल ब्लूम या मानसतज्ज्ञाच्या वर उल्लेख केलेल्या विधानाला अनेकांचा आक्षेप असण्याची शक्यता आहे. कारण नीतिमत्तेला विवेकी विचारांचे अधिष्ठान नाही हे अनेकांना रुचणार नाही. नीतिमत्तेचा विकास हा केवळ भावनाविवशतेचा आविष्कार आहे, हे विधान हास्यास्पद ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दोन शतकातील नैतिकतेचा आढावा घेतल्यास नीतिमत्तेच्या स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आढळेल. या बदलत गेलेल्या नैतिकतेच्या विचार केल्यास त्यावर विवेकी विचारांचीच गडद छाया आहे हे लक्षात येईल. बाल कामगारांच्या पिळवणुकीला विरोध, गुलामगिरी पद्धतीचा नायनाट, मूक प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर न करण्याची मानसिकता, अण्वस्त्रांना विरोध, विश्वशांतीसाठीचे प्रयत्न, लोकशाही पद्धत इत्यादि नैतिक मूल्यांमागे विवेकवाद्यांचे अथक परिश्रम होते, म्हणूनच जनमत बदलू लागले.
तरीसुद्धा भावनिक व विवेकरहित प्रक्रियेतून नैतिक बदल घडत गेले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या बदलांमागील कारणे शोधल्यास हे बदल मुख्यत्वेकरून आधुनिक जगातील व्यापक संपर्कव्यवस्थेत सापडतील. आपण जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो, तेव्हा आपण एखाद्या समान उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्र येत असतो. त्यासाठी इतरांबरोबर (अगदी तिहाईत असले तरी) सलोख्याचे संबंध ठेवण्यास उत्सुक असतो. प्रवासाच्या सोई-सुविधा व सुलभता, खिशाला परवडणारी संपर्कसाधने, माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी लागणारा कमीत कमी वेळ, याचबरोबर राजकीय व आर्थिक परस्परावलंबन, इत्यादींमुळे आपल्या आजोबा-पणजोबांच्यापेक्षा आपण फार मोठ्या समुदायाच्या, विविध प्रकारच्या जातकुळी असलेल्यांच्या संपर्कात येत असतो. आपले सामाजिक वर्तुळ वाढत आहे. त्याच अनुषंगाने आपले नैतिक वर्तुळही विस्तारत आहे. परंतु ही ‘संपर्क संकल्पना’ फार मर्यादित स्वरूपात नैतिक विकासाचे विश्लेषण करू शकते. गुलामगिरी व/वा मूक प्राण्यांच्या हक्कांविषयी आपल्या नैतिकतेत कसा बदल होत गेला हे संपर्कसाधनांच्या विपुलतेतून सांगता येणार नाही. लोकशाही व्यवस्थेला प्राथमिकता वा लैंगिकतेतील उदारपणा, इत्यादि प्रकारच्या नैतिक मूल्यांचे स्पष्टीकरण केवळ संपर्क सुविधा वाढल्या आहेत यावरून कळणार नाही. ज्याला आपण आयुष्यात कधीच पाहिले नाही व पाहण्याची सुतराम शक्यता नाही अशांसाठी आपला नैतिक पाठिंबा केवळ संपर्क सुविधांच्या लभ्यतेतून समजणार नाही. आपण जेव्हा रक्तदान वा नेत्रदान करतो तेव्हा ते कुणाच्या उपयोगी पडणार याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. तरीसुद्धा एका व्यापक नैतिक दृष्टिकोनातून आपण दान करतो. कुठल्यातरी सामाजिक उपक्रमासाठी देणगी देताना याचे पुढे काय होणार याचा विचार आपल्या डोक्यात येत नाही. काहींच्या मते ही परोपकारीवृत्ती परस्परता व/वा सुप्त स्वार्थ यासाठी होत असते. कारण यातून आपली प्रतिष्ठा वाढते. आपण किती दानशूर आहोत हे जगाला कळते. त्यातून लैंगिक आकर्षणाची शक्यता वाढते. परंतु अशा गोष्टी यापूर्वी नव्हत्या व त्या आजच का ऐरणीवर आल्या, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
पूर्वीच्या काळी कुठल्याही गोष्टीची मुद्दाम आग्रहाने मांडणी केली जात नव्हती, हेही एक कारण असू शकेल. संपर्क माध्यम म्हणून भाषेचा उपयोग अत्यंत मर्यादित समुदायापर्यंत पोचत असावा. खरे पाहता भाषा हे इतरांविषयी करुणा, दया, प्रेम उत्पन्न करण्यासाठी सर्वांत उत्तम साधन आहे. मुद्रणयंत्रणेच्या शोधानंतर भाषेचा प्रभावीपणे वापर होऊ लागला. साक्षरतेच्या प्रसारामुळे इतरांचे विचार कळू लागले. संवाद वाढू लागला. हॅरियट बीचर स्टो यांचे १८७२ साली लिहिलेले अंकल टॉम्स केबिन हे पुस्तक अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्याच्या मानसिकतेस व चळवळ जोर धरण्यास प्रेरणादायी ठरले. मूक प्राण्यांच्या वेदनेसंबंधी लिहिलेले पीटर सिंगर यांचे अॅनिमल लिबरेशन (१९७५) हे पुस्तक प्राण्यांविषयी करुणा दाखवण्याबद्दल अनेक देशात जागृती निर्माण करू शकले. बालविवाह, बहुपत्नीक, जरठ विवाह इत्यादींतील क्रूरता वृत्तपत्र, नियतकालिके, कथा, कादंबऱ्या इत्यादींच्या रेट्यामुळे जनसामान्यांना कळली. पुनर्विवाह, घटस्फोट, लिव्ह-इन-रिलेशन्स, समलिंगी संबंध या गोष्टींबद्दलच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी ललित साहित्याचे योगदान मोठे आहे, हे मान्य करायला हवे. परंतु प्रत्येक वेळी कथा-कादंबऱ्यांमधून चांगलेच निघेल याची खात्री नाही. कुठल्या अंतस्थ हेतूने कृती लिहिली आहे याचा अंदाज न आल्यामुळे फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा आपल्यात क्रोध उत्पन्न करणाऱ्या, चीड आणू शकणाऱ्या साहित्याला कटाक्षाने आपण दूर सारतो. लाखो ज्यूंची कत्तल करणाऱ्या अडॉल्फ हिट्लरला आपल्या नैतिकतेत स्थान नाही.
कथा कादंबऱ्या वाचल्यामुळे जनसामान्यांची मते बदलतात व मतांची देवाण घेवाण होत असते, याविषयी मानसतज्ज्ञ अनभिज्ञ आहेत. या प्रकारच्या सामाजिक क्षमतांना आधुनिक मानसतज्ज्ञ अजूनही विचारात घेत नाहीत. केवळ काही जुजबी चाचण्या, वा काही अवास्तव कल्पना आपल्यासमोर मांडत त्यावरून सर्वसमावेशक निष्कर्ष काढण्याच्या तज्ज्ञांच्या घातक सवयीमुळे नैतिकतेचे स्वरूप स्पष्ट होत नाही. पाच मुलांना वाचवण्यासाठी एका मुलास बळी दिले तरी चालेल का, अश्या समस्या उथळ वाटतात.
नैतिकतेला विवेकी विचारांचे अधिष्ठान नाही, असे विधान करणाऱ्याच्या मते नैतिकतेची सैद्धान्तिक चर्चा धर्मशास्त्रज्ञ वा तत्त्वज्ञच करू शकतात व यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असते. त्यासाठी त्यांना स्वतःचे आयुष्य वेचावे लागते. काही सर्जनशील तज्ज्ञच नवीन पायंडा पाडू शकतात. अशा तज्ज्ञांच्या विचारमंथनातून नैतिकतेच्या स्वरूपात बदल होऊन समाजाचा पाठिंबा मिळणे अशक्य वाटते. त्या उलट सामान्य माणसे आपल्या मर्यादित कार्यक्षेत्रातच राहून आपल्या कुवतीनुसार नैतिक समस्यांना उत्तरे शोधतात, अनुकरण करू लागतात, व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. आपल्यातील फारच कमी जणांना कथा-कादंबऱ्या, नाटक-चित्रपट या कलाक्षेत्रात नवीन भर घालण्यास जमते. परंतु आपण कथा-कादंबऱ्या वाचण्यामध्ये, नाटक-सिनेमा बघण्यामध्ये रमतो. मुळातच मनुष्यप्राणी हा गप्पागोष्टींत रमणारा प्राणी असल्यामुळे कथा-कादंबऱ्यातील आशय इतरांपर्यंत सहजपणे पोचवू शकतो. इतरांना प्रभावित करणे न जमले तरी किमान आपल्या मुलांबाळांना तरी आपण प्रेरित करू शकतो. यातूनच नैतिक परिवर्तन घडत जाते.
राजकीय-सामाजिक-आर्थिक जबाबदारी पेलणारा एक सुज्ञ नागरिक म्हणून नैतिकतेच्या बदलत्या स्वरूपाबद्दल, व या बदलत्या स्वरूपामुळे बदलत असलेल्या जगाबद्दल, गंभीररीत्या विचार न केल्यास ती एक मोठी चूक ठरेल. याविषयी अभ्यास करणे, संशोधन होणे गरजेचे आहे. लहान मुले दैनंदिन नैतिक समस्यांना सामोरे कसे जातात, हा एक अभ्यासाचा चांगला विषय होऊ शकेल. भोवतालची परिस्थिती त्यांच्या नैतिकतेवर कसे परिणाम करते याचाही अभ्यास करता येईल. नैतिकतेचे मूळ भावनेत शोधता येते, हे आज तरी निरीक्षणाच्या स्वरूपात असले जरी याचे सैद्धान्तिक विश्लेषण करणे आवश्यक आहे.
संदर्भ : Nature; 25 March 2010 ८, लिली अपार्टमेंट्स, वरदायिनी स.गृ.र. संस्था, सूस रोड, पाषाण, पुणे ४११०२१.
e-mail : pkn.ans@gmail.com