सूर्यकुलातील लोक

सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत अजून तुझी आवराआवर झाली का नाही ? ह्या एकोणीस ठिगळांचा आता कशाला विचार ? अजून तुझी फुले माळून झालीत का नाही ? कशाला हवे कोठीला टाळे ? उघडीच ठेव दारे अजून तुला इथला मोह सोडवत का नाही? ते रुद्राक्ष, पोथ्या, ते खुंटीवर टांगलेले देव कालच म्हणालीस “कुणीही भले केलेले नाही.” मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार : “सूर्यकुलांतील लोकांना थांबणे माहीत नाही.” खाली कशासाठी हवे नाव ; निनावे म्हणतील म्हणून आपल्या हातांचे ठसे पुरेसे का नाहीत? – अजून तुझी आवराआवर झाली का नाही ?
[नारायण सुर्वे (जन्मतिथी अज्ञात, मृत्यू १६ ऑगस्ट २०१०) यांच्या जाहीरनामा या कवितासंग्रहातून.]