एक साक्षात्कारी अनुभवकथन

साहित्यिक असो वा कलावंत असो, त्यांच्या प्रतिभेची किंवा सृजनाची निर्मिती कुठून होते ? ज्या मेंदूमुळे आपल्याला खरेखुरे माणूसपण लाभलेले असते त्या मेंदूतच जर काही बिघाड झाला तर कसली कला आणि कसले साहित्य! हा विचार मनात येताक्षणीच मी अलीकडे वाचलेले एक पुस्तक नजरेसमोर आले.
स्वतः ‘न्यूरोसायंटिस्ट’ असणाऱ्या सदतीस वर्षांच्या एका स्त्रीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव होऊन अवघ्या चार तासांत तिची दारुण अवस्था होते. त्या अवस्थेत तिने जे चित्रविचित्र अनुभव घेतले, स्वतःला निकामी होण्यापासून वाचवण्याची जी धडपड केली ती इतरांनी समजून घेतली तर ते वेगळीच सावधगिरी बाळगून स्वतःला वाचवू शकतील, या तळमळीतून साकारली गेलेली एक विलक्षण साहित्यकृती म्हणजे डॉ. जिल टेलर हिने लिहिलेले माय स्ट्रोक ऑफ इन्साइट हे पुस्तक. जिलच्या ‘त्या अनुभवा’चा अनुभव घेणे हाच मुळी एक नितांतसुंदर अनुभव होता. मेंदूविषयीचे जगभरातले संशोधन समजावून घेण्याचा गेली दोन अडीच वर्षे मी जो अभ्यासू प्रयत्न करत आहे त्या पार्श्वभूमीवर जिलचा अनुभव मला वेगळ्या पातळीवर भिडला. मेंदूविषयक संशोधनक्षेत्रातला एखादा संशोधक त्याविषयी जे मांडतो ते बऱ्याचदा त्याचे संशोधन असते, त्याचा तो अभ्यास असतो, किंवा त्याची शास्त्रीय मीमांसा असते. पण तो खुद्द त्या संशोधकाला स्वतःला आलेला अनुभव मात्र नसतो. मेंदूरचनाशास्त्रात (न्यूरोअॅनाटॉमी) संशोधन करणाऱ्या डॉ.जिलच्या स्वतःच्या मेंदूत रक्तस्राव सुरू झाल्यावर तिला जो अनुभव आला, आपल्या अभ्यासामुळे तिला स्वतःच्या मेंदूचा झपाट्याने होत जाणारा जो हास जाणवला तसा प्रत्यक्ष अनुभव घेणारी आणि नंतर त्याविषयी लिहिणारी ती या जगातली बहुधा एकमेव न्युरोसायंटिस्ट आहे. ब्रेनस्ट्रोकमुळे मेंदूच्या गमावलेल्या सर्व क्षमता सतत आठ वर्षांच्या प्रयत्नाने जिद्दीने परत मिळवून पुन्हा पूर्वीच्याच कार्यक्षमतेने कार्यमग्न राहून शकणारी आपला तो एकमेवाद्वितीय अनुभव जेव्हा इतरांच्या फायद्यासाठी शब्दबद्ध करते तेव्हा ती शब्दांपलीकडची एक आगळीवेगळी ‘साहित्यकृती’ ठरते. नव्हे, ती एक मानवी कलाकृती बनते. स्ट्रोकपूर्वी जिल कोण होती, तिचे संशोधनक्षेत्र कोणते होते, तेच क्षेत्र तिने का निवडले होते, मनोरुग्णांच्या सेवेचा ध्यास तिला का लागला होता वगैरेची तोंडओळख करून दिल्यावर जिल मेंदूच्या रचनेची आणि कार्यपद्धतीची थोडीशी माहिती सांगते. पुढचा थरार समजून घेण्यासाठी ती आवश्यक असते. जिलच्या स्ट्रोकमुळे तिला नेमके काय झाले होते, तिने कसे आणि काय गमावले होते ते क्रमवारीने जिल मांडते. त्यावेळी गमावलेल्यातले जिलने पुढच्या आठ वर्षांच्या चिवट जिद्दीने पुन्हा काय परत मिळवले आणि त्या प्रयत्नांत तिने आणखी काय कमावले त्याचे अतिशय प्रवाही आणि लालित्यपूर्ण अनुभवकथन वाचकाला खिळवून ठेवते. त्यातले नाटक आपल्याला मुळापासून हादरवून सोडते. कारण मेंदूमधल्या रक्तस्रावामुळे विकलांग होणे, परावलंबी आणि दयनीय अवस्थेत उरलेले आयुष्य जगणे ही केवळ कल्पना नसून आपल्या अवतीभोवती कित्येकांच्या वाट्याला येणारे ते एक वास्तव आहे. जिल एका विलक्षण तळमळीने आपल्याला सावध करते, आपल्यासाठी उपयुक्त माहितीचे नवे दालन उघडते, स्वानुभवातून आपल्याला इशारेवजा मार्गदर्शन करते आणि आपल्या मेंदूच्या गमावल्या जाऊ शकणाऱ्या क्षमता प्रयत्नपूर्वक परत मिळवू शकण्याची आशासुद्धा निर्माण करते. या सर्वांच्या पलीकडे जिलचा आणखी एक प्रयत्न आहे. आणि तो खरा तिला झालेला साक्षात्कार आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मेंदूचे डावा आणि उजवा असे दोन प्रमुख भाग किंवा अर्धगोल असतात आणि दोन्हींच्या मध्यभागी पुलासारख्या एका विशिष्ट भागाने ते जोडलेले असतात. बाहेरच्या जगाकडून आपल्याकडे येणाऱ्या संवेदना आणि माहिती आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत गोळा करून मेंदूकडे पाठवली जाते. मेंदूचे दोन्ही अर्धगोल त्यावर आपापल्या वेगळ्या पद्धतीने पण एकमेकांना पूरक ठरेल अशा रीतीने संस्करण करतात. त्यामुळे बाह्य जगाचे आपल्याला एकात्म असे समग्र आकलन होत असते. त्यावरून बाह्यजगाविषयी आपला विशिष्ट दृष्टिकोन ठरत असतो आणि त्यानुसार आपण प्रतिक्रिया देत असतो. या प्रतिक्रियेमुळे, म्हणजेच आपल्या त्या विशिष्ट वर्तनामुळे आपले व्यक्तिमत्त्व आकाराला येत असते.
हे सर्व काम जोपर्यंत सुसंगतपणे विनाव्यत्यय चालत असते तोपर्यंत आपल्या बाहेरच्या जगापेक्षा आणि आपल्याभोवतीच्या इतरांपेक्षा आपण वेगळे असल्याची आपल्याला जाणीव असते. ही ‘स्व’ची जाणीव किंवा हे आत्मभान आपल्या जगण्याचा गाभा असतो, प्रगती घडवून आणण्याचे प्रेरणास्थान असते किंवा अवनतीच्या दिशेने जायला लावणारे प्रमुख कारण असते. मेंदूचे हे दोन अर्धगोल जोपर्यंत एकात्मरीत्या काम करत राहतात तोपर्यंत आपल्याला लाभलेले विशिष्ट व्यक्तिमत्त्व एकच एक आहे अशी आपली धारणा असते. कोणता अर्धगोल कोणते काम कशा पद्धतीने करत असतो, त्यातला प्रत्येक अर्धगोल आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या कोणत्या पैलूला जबाबदार असतो हे आपल्याला कधीच वेगळेपणाने अनुभवता येत नाही. पण मेंदूच्या या दोन अर्धगोलांचे वेगळेपण जिलने स्ट्रोकमुळे अनुभवले. हेच तर तिच्या अनुभवाचे खास वेगळेपण आहे.
१० डिसेंबर १९९६ च्या सकाळी सात वाजल्यापासून अनुभवास येत गेलेल्या विचित्र प्रकारांमुळे आपल्या मेंदूच्या डाव्या अर्धगोलात रक्तस्राव सुरू झाल्याची जाणीव एक मेंदूतज्ज्ञ म्हणून जिलला झाली. त्यापुढचे सर्व धोके क्षणार्थात जाणवल्यामुळे आपल्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्यापासून स्वतःला वाचवणाचा आटोकाट प्रयत्न जिल तात्काळ सुरू करू शकली. त्या सकाळी केवळ चार तासांत आपल्या एकेक क्षमता गमावत चाललेल्या जिलचे तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न तिच्या धैर्याचे अनोखे दर्शन घडवतात.
मेंदूमध्ये रक्तस्राव होत असला तरी जिलची शुद्ध कधीच हरपली नव्हती. त्यामुळे इतरांसारखा तिला प्रतिसाद देता येत नसला तरी आत कुठेतरी आपण अजून ‘जिल’ आहोत याची तिला नेहमीच जाणीव होत राहिली होती. त्या एका आधारावर जिलने स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काही धाडसी निर्णय घेतले. बदलत्या परिस्थितीशी सातत्याने जुळवून घेण्याच्या आणि स्वतःच्या स्वतःला दुरुस्त करण्याच्या मेंदूच्या क्षमतेवर म्हणजेच मेंदूच्या ‘प्लास्टिसिटी’वर जिलने संपूर्णपणे विश्वास टाकला. मेंदूच्या ‘बरे होण्या’च्या प्रक्रियेपासून जिलने स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला केले आणि मोजकेच वैद्यकीय उपचार घेण्यावर ती ठाम राहिली. गंभीर इजा पोहोचलेल्या आपल्या मेंदूच्या पेशींचे पुनर्वसन करून मेंदूच्या पूर्वीच्या सर्व क्षमता परत मिळवण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली एकटीचीच आहे याची तिला पक्की जाणीव होती. आणि ती जबाबदारी तिने स्वीकारली होती. यात तिच्या समंजस आईची तिला उत्तम साथ मिळाली होती. इथून पुढे सुरू झाला होता जिलचा खुद्द आपल्याच मेंदूशी एक निरंतर संवाद.
स्ट्रोकच्या वेळी जिलच्या मेंदूच्या डाव्या अर्धगोलात रक्तस्राव सुरू झाल्यामुळे अवघ्या चार तासांत तिच्या जाणिवेचे केंद्र प्रामुख्याने मेंदूच्या उजव्या अर्धगोलाच्या अखत्यारीत आले होते. त्यामुळे क्षणोक्षणी न्यायाधीशाच्या भूमिकेतून आजूबाजूच्या परिस्थितीचे मूल्यमापन करणारा, न्यायनिवाडा देणारा, सातत्याने सुरू असणारा तिचा आत्मसंवाद (ब्रेन चॅटर) संपला होता. केवळ सन्नाटा उरला होता. ना भूतकाळाची आठवण, ना भविष्याशी संबंध अशा अवस्थेत केवळ वर्तमान क्षणाचा व्यापक अनुभव मेंदूच्या उजव्या अर्धगोलाच्या साहाय्याने जिल घेत राहिली होती. स्वतःची किंवा आजूबाजूच्या कोणत्याही चेतन-अचेतन वस्तूची वेगळी व्याप्ती जिलला जाणवत नव्हती. त्रिमिती वास्तवाचे भान देण्यासाठी भिन्नतेची मर्यादा आखून देणाऱ्या सर्व रेषा कुठेतरी लुप्त झाल्या होत्या. उरला होता फक्त ऊर्जेचा अथांग महासागर आणि त्यात वावरणारे ऊर्जेचे तिच्यासारखे इतर पुंजके. स्वतःच्या शरीराच्या घनाकार, त्रिमिती व्याप्तीची जाणीव परत येण्यासाठी स्ट्रोकनंतर जिलला तब्बल सात वर्षे वाट पाहावी लागली. आठव्या वर्षी एका क्षणी आपल्या जाणिवेचे केंद्र पूर्वीप्रमाणे आपल्या मेंदूच्या डाव्या अर्धगोलाकडे सुपूर्द झाले आहे, याची जिलला खात्री पटली. त्या दरम्यान जिलने स्वतःच्या गमावलेल्या बौद्धिक क्षमता परत मिळवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न जिलमधल्या चिवट शास्त्रज्ञाचे दर्शन घडवतात.
मेंदूच्या विराट अंतरंगाचे दर्शन आपल्याला जिलच्या अनुभवकथनातून घडते. त्या अनुभवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मेंदूच्या केवळ उजव्या अर्धगोलाच्या क्षमतेवर अवलंबून जगताना जिलला स्वतःविषयी आणि बाह्यजगाविषयी एक वेगळी अनुभूती आली होती, एक प्रकारची आंतरिक शांतता अनुभवता आली होती. आपण या विश्वाशी कसे एकरूप झालेले असतो याचे वेगळे भान तिला आले होते. त्यात एक असीम शांतता होती, अत्युच्च आनंद होता आणि हे सर्व तिला कधीच गमवायचे नव्हते.
मेंदूच्या डाव्या अर्धगोलाची क्षमता हळूहळू प्रयत्नपूर्वक परत आणत असताना त्यासोबत अविभाज्यपणे जोडले गेलेले आपल्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू पुन्हा डोके वर काढत असल्याचे तिला जाणवत होते. त्यातले नकोसे असणारे किंवा त्रासदायक ठरू शकणारे पैलू ती पुन्हा आकाराला येऊ देत नव्हती. ही निवड आपण करू शकतो, मेंदूमधली ती विशिष्ट न्यूरॉलॉजिकल सर्किट्स रोखून धरण्याची ताकद आपल्यात आहे, याचा त्या काळात जिलला साक्षात्कार झाला होता. स्ट्रोकपूर्वीच्या सर्व क्षमता आपण परत मिळवल्या असल्या तरी आपण स्ट्रोकपूर्वीच्या नाही हे ती आतून ओळखून होती. कारण आपले हे नवे व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक कठोर प्रयत्नाने आपण स्वतःच घडवले आहे, हे फक्त एकटी जिल जाणत होती. इतकेच नव्हे, आपल्यापैकी प्रत्येकाकडे ती ताकद आहे व ब्रेनस्ट्रोक येण्याची वाट न पाहता ती आपण वापरली पाहिजे, असे जिल ठामपणे मांडते. फक्त त्यासाठी मेंदूला सावकाशपणे प्रशिक्षित करत राहण्याचा चिवटपणा आणि अपार कष्ट घेण्याची तयारी आपल्याकडे असायला हवी.
आपण कोण असतो, जन्म घेणे म्हणजे काय, मृत्यूचा अर्थ काय, आपण या अफाट विश्वाचाच एक भाग कसे असतो, जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर आपला या विश्वाशी काही संबंध असतो का? यांसारखे प्रश्न आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाला पडत असतात. वैज्ञानिक पद्धतीने ज्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकत नाहीत. त्यांचे स्पष्टीकरण द्यायला अध्यात्म पुढे सरसावते. त्या अध्यात्माभोवती सामान्य माणसे बऱ्याचदा एक प्रकारचे गूढ वलय निर्माण करतात आणि या प्रक्रियेत काही अंधश्रद्धा मूळ धरू शकतात.
जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला मेंदू असतो. शरीराच्या संदर्भात त्या मेंदूला प्रत्यक्ष अस्तित्व असते, विशिष्ट स्थान असते. तो मेंदू आपल्या भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेताना, प्रतिसाद देताना, मेंदूत ज्या प्रक्रिया घडतात त्याला विचार करणे किंवा मन असे मानता येते. या प्रक्रियांना नेमकेपणाने एकच एक उगमस्थान नसते. गेल्या दहा वीस वर्षांत मानवी मेंदू, मन, जाणीव याविषयी जगभर जे संशोधन चालू आहे त्यामुळे शास्त्रीय प्रयोग, निरीक्षणे आणि माहिती यांचा प्रचंड साठा जमत चालला आहे. तरीदेखील त्याविषयी एखादा निश्चित सिद्धान्त अजून मांडता आलेला नाही, असे काही शास्त्रज्ञ प्रामाणिकपणे मान्य करतात. अध्यात्म, साक्षात्कार हा सर्व आपल्या मेंदूचा आविष्कार असतो याची जाणीव मात्र जिलच्या या अनुभवकथनातून आपल्याला होऊ शकते.
साक्षात्कार घडवणारा अनुभवकथनातला प्रसंग म्हणजे स्ट्रोक येत असल्याची जाणीव झाल्यावर स्वतःला वाचवण्याची, तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याची प्रत्यक्ष धडपड. ज्यावेळी मेंदूत रक्तस्राव सुरू झाला त्यावेळी जिलच्या मनाचा आणि शरीराचा संबंध हळूहळू तुटत चालला होता. ठरावीक वेळाने येणाऱ्या लाटेप्रमाणे तिचे नेहमीचे भान थोड्या वेळापुरते परत यायचे आणि तातडीने कोणती कृती आपण आता करायची आहे हे तिला कळायचे. पण….
मदतीसाठी टेलिफोनचा नंबर फिरवताना ते तबकडीवरचे आकडे म्हणजे काय, त्यांचा एकमेकांशी संबंध काय, आणि आपल्याला नेमके कोणते आकडे कोणत्या क्रमाने लावायचे आहेत याचा काहीच अर्थबोध झाला नाही तर ? इतकी यातायात करून जर पलीकडचा नंबर लागला, तर “मी जिल टेलर आहे, माझ्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे.” असे साधेसुधे वाक्य बोलायची गरज असूनही आपण बोलणेच गमावून बसलो आहोत असे लक्षात आले तर ? जिवाच्या आकांताने मदत मागताना आपला आपल्या शरीराशी, या जगाशी असलेला संबंध तुटत चालला आहे. आपले आयुष्य विझत चालले आहे, हे विदारक सत्य उमगत स्वतःला वाचवण्याची धडपड करणे किती भीषण असू शकते हे जिलच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोचते.
मूल वाढत असताना भाषेचे वाचन आणि लेखन यानंतर शिकवण्याच्या गोष्टी असतात, असे आपण मानतो. पण मूल जन्मल्यापासून त्याच्या आजूबाजूची माणसे जी भाषा बोलत असतात ती भाषा ते मूल जणू आपोआपच शिकते असे आपण गृहीत धरून चालतो. संवाद, आत्मसंवाद, परस्परसंवाद, सुसंवाद, विसंवाद या सर्व आपल्या भाषिक प्रवासातल्या प्रगत टप्प्यांवरच्या गोष्टी म्हणता येतील. पण मुळातच ‘भाषा’ हे मानवप्राण्याचे इतर सजीवांपेक्षा आगळेवेगळे वैशिष्ट्य मानताना त्या भाषेचा, तिच्या उगमाचा आणि विकासाचा मानवाच्या मेंदूशी काय संबंध असतो, याचा विचार सहसा कधी मनात येत नाही. साधी अक्षरओळख ही किती मामुली गोष्ट वाटते! पण त्यात अनेक बाबी गुंतलेल्या असतात. आपल्याला होणाऱ्या ‘आकलना’साठी मेंदूच्या किती विविध क्षमता एकत्र गुंफलेल्या असतात ही गोष्ट कधीच आपल्या लक्षात येत नाही. मेंदूमुळे भाषेचा विकास आणि भाषेमुळे मेंदूचासुद्धा विकास हे विधान आपल्याला कोड्यात टाकणारे वाटू शकते. परंतु एका मध्यमवयीन स्त्रीच्या शरीरात एक लहान मूल वसलेले असल्याप्रमाणे जिलची अवस्था झाल्यानंतर पुन्हा नव्याने अक्षरओळख, त्या अक्षराशी जोडला गेलेला उच्चार, त्या उच्चारासकट वाचन शिकताना जिल आणि तिच्या आईला करावे लागलेले प्रयत्न पाहून वाचकाला याचे भान येते. गीता किंवा ज्ञानेश्वरी यांची पारायणे करताना प्रत्येक वेळी अधिक खोलवर अर्थ एखाद्याला उमगू शकतो आणि त्यावर तो भाष्य करतो किंवा निरूपण करतो. माय स्ट्रोक ऑफ इन्साइट वाचताना प्रत्येक वेळी मानवी मेंदू, माणसाचे आयुष्य, त्याचे जगणे याविषयी काहीतरी वेगळे आकलन मला होत गेले. त्या पुस्तकातून मला झालेला हाच तो साक्षात्कार. २०२, चेतना, प्रताप सोसायटीसमोर, जे. पी. रोड, अंधेरी (प.), मुंबई ४०० ०५३