अणुकचराः भीती व वास्तव

अणुकचरा जनसामान्यांसाठी एक कठीण व अमूर्त विचारधारणा असल्याने त्याबद्दल गैरसमज पुष्कळ आहेत. तसेच त्यामुळे अणुकचऱ्याबद्दल भीती निर्माण होणेही स्वाभाविक आहे. या सगळ्यामागचे मुख्य कारण किरणोत्सार किंवा ‘रेडिएशन’ या शब्दाने मानवी मनात जी कल्पनासृष्टी रुजवलेली आहे तीत सापडते. अणुकचरा काय असतो, तो कसा निर्माण होतो व त्याची सुरक्षित साठवण व योग्य विल्हेवाट कशी लावता येते, हे जरा पाहू.
सन १९९१ मध्ये अमेरिकेच्या ‘ऊर्जाविषयक जाणीव’ समिती (USCEA) साठी केलेल्या सर्वेक्षणातून ‘किरणोत्सार’ हा शब्द शारीरिक इजा (उदा. कॅन्सर व इतर असाध्य रोग, मृत्यू इ.) ३६ टक्के धोका व विनाश २१ टक्के, तर आण्विकयुद्ध व अणुबॉम्ब २१ टक्के यांच्याशी सहजी निगडित होता असे निष्पन्न झाले. किरणोत्साराबद्दलची तीव्र नकारात्मक विचारसरणी निर्माण होण्याची प्रमुख कारणे प्रसारमाध्यमे (८४ टक्के) व दूरचित्रवाणी आणि चित्रपटातून दाखविली जाणारी सनसनाटी दृश्ये (६१ टक्के) ही होत, असेही वरील अभ्यासातून निदर्शनास येते. किरणोत्सार हा प्रकार मानवाला नवीन नाही. पृथ्वीच्या जन्मापासून तो अस्तित्वात आहे. पण ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असल्याने तो आपल्याला मुळीच जाणवत नाही, इतकेच. आपल्याला मिळणाऱ्या एकूण वार्षिक किरणोत्सर्गाची ८७ टक्के मात्रा नैसर्गिक स्रोतांपासून येते. किरणोत्सार आपल्या सभोवताली नेहमीच होत असतो. घरादारातून (भिंती, टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, मोबाईल इ.) हवेतून, खाद्यपदार्थातून तर आसमंतातल्या टेकड्या, कातळ अगदी मातीतूनसुद्धा. किरणोत्साराच्या मात्रेचा दुसरा मोठा घटक वैद्यकीय चाचण्या व उपचारपद्धतीतून होतो. तुलनेत अणुप्रकल्प व अणुउद्योगातून होणारा किरणोत्सार आपल्याला मिळणाऱ्या एकूण मात्रेच्या एक सहस्रांश इतका कमी असतो.
अणुकचऱ्याचे वर्गीकरण त्याच्या किरणोत्सारी क्षमतेवर अवलंबून असते. या वर्गीकरणाप्रमाणे अणुकचरा सौम्य, मध्यम किंवा तीव्र अथवा प्रखर म्हटला जातो.याशिवाय तो घन, द्रव किंवा वायुरूपात असू शकतो. अणुकचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणे त्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने केली जाते; जेणेकरून त्याच्यापासून अपाय होणार नाही.
अणुभट्टी कार्यान्वित झाल्यावर त्यातील इंधनामध्ये खूप प्रमाणात किरणोत्सारी भंजनोत्तर पदार्थ तयार होत असतात. परंतु हे ‘पदार्थ’ युरेनियम इंधन व त्यावरील धातूच्या अतिसुरक्षित कवचात बंदिस्त असल्याने सुरक्षित राहतात. हे भंजनोत्तर पदार्थ अणुकचऱ्याच्या स्वरूपात केवळ इंधन फेरप्रक्रियेनंतरच अस्तित्वात येतात. क्वचितप्रसंगी अणुभट्टी चालू असताना अशा पदार्थांची अगदी सूक्ष्मप्रमाणात गळती झाल्यास त्या अणुकचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे ठरते. याव्यतिरिक्त न्यूट्रॉनच्या प्रहारामुळे तयार होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचाही अणुकचऱ्याच्या स्वरूपात समाचार घ्यावा लागतो. या अणुकचऱ्याची योग्य विल्हेवाट मुख्यतः दोन प्रकारांनी केली जाते. ‘सौम्य’ व घनरूप अणुकचरा उदा. हातमोजे, अॅप्रन, ओव्हरऑल इ. सुरक्षितरीत्या सिमेंट काँक्रिटच्या चरातून केंद्राजवळच साठविले जातात. मध्यम स्वरूपाचा कचरा जो बहुधा द्रवरूप असतो व ज्याची तीव्रता एक मिली क्युरी प्रति लिटरहून कमी असते. त्याची मात्रा प्रथम बाष्पीकरणाद्वारा कमी करून त्या मात्रेचा बीटूमेन, सिमेंट किंवा तत्सम पदार्थाबरोबर संयोग करून त्याला बंदिस्त साच्यात किंवा मॅट्रिक्स स्वरूपात सिमेंटच्या चरातून केंद्राजवळच पुरतात. अगदी सौम्य द्रवरूपी कचऱ्याच्या बाबतीत त्यावर रासायनिक प्रक्रिया करून नंतर त्याला गाळून व विपुल प्रमाणात पातळ करून (म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या शक्य तितके कमी करणे) आलारा तत्त्वाप्रमाणे समुद्रात किंवा वातावरणात सोडण्यात येते. मात्र त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका संभवणार नाही, याची काळजी घेतली जाते.
अणुवीज केंद्रात वापरलेल्या इंधनाच्या सुरक्षित साठवणीसाठी पाण्याने भरलेल्या टाक्या बांधण्यात येतात व वापरलेले किरणोत्सारी इंधन पाण्याच्या साहाय्याने थंड ठेवण्यात येते. तसेच टाक्यांतील पाण्याने त्याच्या किरणोत्साराला पुरेसा प्रतिबंधही करता येतो. असे साठवलेले इंधन कालांतराने फेरप्रक्रियेस पाठवले जाते. प्लुटोनियम मिळवण्यासाठी केलेल्या फेरप्रक्रियेतून मात्र दीर्घकालीन व तीव्र स्वरूपाच्या अणुकचऱ्याची निर्मिती होत असते. संपूर्ण इंधनचक्रातील ९९ टक्के किरणोत्सारी मात्रा या अतिप्रखर अणुकचऱ्यात सापडते ज्याची किरणोत्सारी तीव्रता १००० क्युरी प्रति लिटरच्या जवळपास असू शकते. अशा त-हेच्या अणुकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर काचसदृश पदार्थांची प्रक्रिया करणे हा उत्तम उपाय ठरला आहे.
हा तीव्र अणुकचरा विशिष्ट बोरोसिलीकेट काचेच्या साच्यात बंदिस्त केल्यास तो अतिशय घट्ट व रासायनिकदृष्ट्या टिकाऊ पदार्थ बनतो. असा काचसदृश अणुकचरा पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यावर काहीच परिणाम होत नाही. अशा स्वरूपातील तीव्र अणुकचरा अतिसुरक्षित स्टेनलेस स्टीलच्या हवाबंद पिंपामध्ये साठवता येतो व पहिली २५ वर्षे तरी तो भूमिगत साठवणीच्या व्यवस्थेखाली व देखरेखीखाली जपला जातो. त्यानंतर तो भूगर्भातील खडकांच्या आत साठवला जातो जेथे तो वर्षानुवर्षे सुरक्षित राहू शकतो. निसर्गात अशा काही जागा आहेत जेथे पूर्वापारपासून अस्तित्वात असलेले किरणोत्सारी पदार्थांचेसाठे आजतागायत जसेच्या तसेच राहिलेले आढळतात. पश्चिम आफ्रिकेच्या गॅबन प्रदेशात ‘ओक्लो’ येथे सापडलेली ‘नैसर्गिक अणुभट्टी’ हा त्यातलाच एक प्रकार. युरेनियमचे विपुल साठे असलेल्या या ठिकाणी सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी नैसर्गिक अणुभट्टी तयार होऊन त्यात शृंखला प्रक्रिया म्हणजेच ‘चेन रिअॅक्शन’ कार्यान्वित झाली होती, असा शोध १९७१ मध्ये शास्त्रज्ञांना लागला. या जागेच्या सविस्तर पाहणीतून तेथे निर्माण झालेले किरणोत्सारी पदार्थ (प्लुटोनियम सकट) आपल्या मूळ स्थानापासून दोन मीटरसुद्धा सरकले नव्हते असे आढळून आले आहे. हे उदाहरण अणुकचऱ्याच्या भूगर्भातील सुरक्षित व बंदिस्त साठवणपद्धतीला पुष्टी देणारे आहे यात शंका नाही. इतर ऊर्जास्रोतातील धोके कुठल्याही ऊर्जास्रोतातून वीजनिर्मिती करताना काही प्रमाणात जोखीग ही पत्करावीच लागते. जलविद्युत निर्मितीमध्ये धरणे बांधल्यामुळे गावेच्या गावे पाण्याखाली जातात, तसेच जंगलेसुद्धा पाण्याखाली जाऊन पर्यावरणाला काही प्रमाणात हानी पोहोचते. कोळसा किंवा गॅस स्रोतातून प्रचंड प्रमाणात राख, सल्फरडाय ऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड इ. वायूंचे उत्सर्जन होत असते. प्रचंड कार्बन उत्सर्जन तर वेगळेच. जलविद्युत निर्मितीमध्ये जगभरात कितीतरी ठिकाणी धरणे फुटून मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कोळशाच्या खाणीत स्फोट होऊन किंवा भिंती ढासळून शेकडोंनी खाणमजूर आतापर्यंत दगावले आहेत.
इतर ऊर्जास्रोतातील जोखिमा आपण सहजपणे स्वीकारल्या आहेत. अणुऊर्जा, अणुकचरा हे प्रकार सर्वसामान्यांना नवखे असल्याने त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप वेगळा व संशयास्पद आहे. ये विवेचनामुळे अणुकचऱ्याबद्दलची अवाजवी भीती कमी होण्यास मदत होईल असे लेखकास वाटते.
[लोकसत्ता, २१ जुलै २०१०]
(माजी शास्त्रज्ञ, कल्पक्कम)