हिमालय वितळतो आहे

डेव्हिड ब्रीशीअर्स (D. Breashears) पाचदा एव्हरेस्ट चढून गेला आहे. १९८३च्या पहिल्या चढाईनंतर प्रत्येक फेरीत त्याला भूचित्रबदल आणि हिमनदांचे आकुंचन जाणवू लागले. जुनी छायाचित्रे आणि ताजी छायाचित्रे यांची तुलना करताना हिमनदांची प्रचंड पीछेहाट दिसू लागली. १९२१ साली जॉर्ज मॅलरीने घेतलेल्या एका छायाचित्राची (मॅलरीने छायाचित्र घेतले तिथूनच) नवी आवृत्ती हिमनद शंभर मीटर मागे गेल्याचे दाखवते. ब्रीशीअर्स आता यावर लक्ष ठेवण्यासाठी खास उपकरणे बसवत आहे.
जागतिक तापमान मोजायला १८८० पासून सुरुवात झाली. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते जानेवारी-जून २०१० हा १८७० पासूनचा सर्वांत गरम काळ होता. रूटगर्स विद्यापीठाची जागतिक हिम प्रयोगशाळा सांगते, की गेल्या मे-जूनइतके कमी बर्फाच्छादन उत्तर गोलार्धात कधीच दिसलेले नाही. रूटगर्स १९६७ पासून ह्या घटकाचे मोजमाप करत आहे. अमेरिकेच्या हिमनद राष्ट्रीय उद्यानात शतकाभरापूर्वी दीडशे हिमनद होते. आज पंचवीस उरले आहेत. चिनी व भारतीय हिमनद तज्ज्ञ हिमालयातील पीछेहाटीचा बराच तपशील देतात. गेल्या महिन्याच्या सायन्स मासिकात हिमालयीन हिमनद टिकून असणे आणि वितळत राहणे, याची आशियाई नद्यांसाठीची आवश्यकता तपासली आहे. ब्रह्मपुत्र व सिंधूंना धोका सर्वांत जास्त आहे. गंगा, पीतनदी, यांगत्से यांना तुलनेने कमी, पण परिणामांध्ये मोठा धोका आहे. केवळ ब्रह्मपुत्र व सिंधू खोऱ्यांमधील सहा कोटी माणसांची अन्नसुरक्षा धोक्यात आहे. इतर नद्यांवरचे परिणामही त्याच आसपासचे असतील.
[एन. डी. क्रिस्टॉफच्या रूफ रिपेअर (इंडियन एक्स्प्रेस, १९ जुलै २०१०) या न्यू यॉर्क टाईम्स मधील लेखावरून]