भगवद्गीता शाळेमध्ये मुलांना शिकवली जावी ह्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या कर्नाटक व मध्य प्रदेश ह्या राज्यांनी तशी विधेयके आणून ती सम्मत करून घेतली आहेत. कर्नाटकचे मंत्री कागेरी ह्यांनी तर अल्पसंख्यक धर्मांना – बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना अशी समज दिली की गीता शाळेत शिकवणे मान्य करा अथवा भारतातून निघून जा(1) मध्यप्रदेशातील कथोलिक बिशप कौंसिल यांनी नुसतीच गीता न शिकवता साऱ्या धर्मांचा सारांश शिकवावा असा अर्ज केला. पण त्यावर म. प्र. उच्च न्यायालयाने, गीता हा काही धार्मिक ग्रंथ नाही, त्यामुळे गीता शिकवण्यास आपत्ती नसावी असा निकाल दिला. वास्तविक भगवद्गीता हा हिन्दुधर्माचा भाग आहे आणि निधर्मी भारतात कोणत्याही एका धर्माचा ग्रंथ शाळेतून शिकविणे उचित नाही(2).
गीतेच्या पुनरुज्जीवनाशी सम्बन्धित असलेली दुसरी घटना, भारत सरकारने रशियन सरकारवर दबाव आणून गीतेवरची बन्दी उठविल्याची आहे. रशियाच्या टोम्स्क ह्या सायबेरिअन शहराने हरे कृष्ण हरे राम (International Society for Krishna Consciousness – ISKCON) पंथाच्या ‘Bhagvadgeeta as it is’ ह्या पुस्तकात एकांगी व समाजाला अपायकारक असे विचार असल्यामुळे, त्या पुस्तकावर बंदी आणावी असा प्रस्ताव रशियन सरकारपुढे ठेवला. त्याबद्दल ऐकून लोकसभेत भाजपाच्या सुषमा स्वराज वगैरे खासदारांनी एवढी आरडाओरड केली की भारत सरकारने रशियाच्या सरकारला ती बन्दी उठविण्यास भाग पाडले. काही खासदारांनी तर गीतेला भारताचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे असे सुचवले. कुणी सांगावे, भारतात आपले सरकार आल्यास भाजप ह्या गोष्टी सहज करेलही. तेव्हा, गीतेच्या शिकवणीची सर्वांगीण चर्चा करून शहानिशा करण्याची गरज सांप्रत येऊन ठेपली आहे. ह्या लेखाचे प्रयोजन तेच आहे.
गीता भक्तियोग, कर्मयोग, आणि ध्यानयोग हे तीन्ही शिकवत असली, तरी मोक्षाकरता बहुजन भक्तियोगाचाच आसरा घेतात. आता गीतेचा भक्तियोग शिकवतो तरी काय? तर गीता भक्तियोगाने भगवान कृष्णाला संपूर्ण शरण जाण्याची आज्ञा देते.
“माझा भक्त हो, आपल्या स्मृतीत माझाच ध्यास ठेव, माझ्याकरता स्वतःचा त्याग कर, मला शरण जा, मलाच सर्वश्रेष्ठ देव मान”.
(गीता -9-34)
भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पाच सहकाऱ्यांना दीक्षा देताना, “मी जे सांगतो ते तुम्हास पटत असेल तरच माझ्या धर्मात या असा सल्ला दिला होता. तो कुठे आणि मीच सर्वज्ञानी, मला शरण जा हे श्रीकृष्णांचे सांगणे कुठे!
गीतेला पर्याय म्हणून बहुजनसमाजाने भक्तिमार्गाची दुसरी चळवळ भारतात मध्य युगात सुरू केली.
दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म-सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात ।।
असे मूळ गीतेमध्ये नसलेले उच्च विचार घेत सुमारे तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य लिहिले. ज्ञानेश्वरी हा त्यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य ग्रंथ झाला. गीतेमधील जात-पात, चातुर्वर्ण्य वगैरे सोडून हे वारकरी कृष्णाच्या दर्शनास विठोबाच्या देवळात जातात. असाच भक्तिमार्ग उत्तरेत कबीर व पंजाबात नानक ह्यांनी काढला. पण आजच्या गीता- पुनरुज्जीवनाच्या अजेंड्यात लोकांना गीताप्रणीत भक्तिमार्गाकडे नेण्याचा उद्देश नाही. जुना हिंदुधर्म पुनः विभागण्याकरताच हे सारे रचलेले आहे.
गीतेचे पुनरुज्जीवन
गीतेचा जन्म सवर्णाच्या उत्थानाकरताच झाला होता म्हणूनच गीतेवर भाष्य करणारे, तिची महती गाणारे सारे सवर्णांतून आले. गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे भारताच्या शूद्र व अस्पृश्य जातींनी ती वाचलीच नव्हती, तर तीवर भाष्य करणे दूरच राहिले. उदा- कबीर, नानक, नामदेव, चैतन्य, जयदेव ह्यांना गीतेत काही रस नव्हता. उलट गांधी, ऑरोबिंदो, राधाकृष्णन् ह्या उच्च जातीच्या लोकांनी तिच्यावर भाष्ये लिहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या Revolution and Counter Revolution in Ancient India – ह्या ग्रंथात लिहितात की हे ब्राह्मणांचे गीताप्रेम स्वाभाविकच आहे कारण ती त्यांना तात्त्विक आधार देण्याकरताच लिहिली गेली होती(3)
नलिनी पंडित त्यांच्या आंबेडकर ह्या ग्रंथात(4) लिहितात, बौद्ध-धर्मस्थापनेपूर्वीच्या आर्य लोकांत नीतिकल्पनांचा फारसा विकास झाला नव्हता. गौतम बुद्धाने क्रांती करून बौद्ध धर्माची स्थापना केली व अशा समाजात नैतिकता आणली. त्यामुळे ब्राह्मणांचे फार नुकसान झाले. त्यांनी पुष्यमित्र शुंगाद्वारे चंद्रगुप्त मौर्याचा वध करवून समाजात प्रतिक्रांती केली व ब्राह्मणी धर्माची पुन्हा राजधर्म म्हणून स्थापना केली. बौद्ध धर्माला उतरती कळा लागली व हिंदू राजांनी अत्याचार करून तो खतम केला. ह्याचे सामाजिक पातळीवरून समर्थन करण्यासाठी भगवद्गीतेचा जन्म झाला.
बौद्ध धर्माचे उच्चाटन केल्यानंतर भगवद्गीता काहीशी सुप्तावस्थेतच गेली. नंतर तिचे पुनरुज्जीवन भारतात ब्रिटिश आल्यानंतर झाले. ब्रिटिश विचारवंत हिंदू धर्मात बायबल, कुराण ह्यासारखा पवित्र ग्रंथ आहे का ह्याचा शोध घेऊ लागले, तेव्हा हिंदू पंडितांनी भगवदीता पढे केली. पण डॉ. आंबेडकरांच्या मते गीता हा धर्मग्रंथ नाही. ते नीतिशास्त्रही नाही. एखाद्या दर्शनाची समग्र मांडणी करणारा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथही तो नाही. ब्राह्मणी धर्मातील काही तर्कदुष्ट सामाजिक संकल्पनांचे तात्त्विक पातळीवर समर्थन करणे हेच गीतेचे प्रयोजन आहे.
भगवद्गीतेतील युद्धाचे प्रतीक –
गीतेतील मुख्य मुद्दा म्हणजे अर्जुन कुरुक्षेत्राच्या लढाईत भाग घेऊन आपल्या सग्यासोयऱ्यांना मारू इच्छित नाही. कृष्ण गीता सांगून त्याचे मत युद्धास अनुकूल बनवितो. गीता ही युद्धाचे समर्थन करते हे तिच्यावर भाष्य करणाऱ्या बऱ्याच टीकाकारांना व विद्वानांना मान्य नाही. बौद्ध धर्माच्या अहिंसेचा पगडा असल्यामुळे की काय, महाभारताचे युद्ध झालेलेच नाही असे त्यांचे मत आहे.
उदा.– एकनाथ ईश्वरन् लिहितात, हे युद्ध म्हणजे माणसाच्या मनातील द्वंद्व होय. चांगले आयुष्य जगण्याकरिता, मनावर ताबा मिळविण्याकरिता, ते प्रत्येकाने जिंकलेच पाहिजे. स्वामी निखिलानंद अर्जुनाला आत्म्याची तर त्याच्या रथाला शरीराची उपमा देतात. म्हणजे युद्ध कुरुक्षेत्रात झालेच नाही, ते तुमच्या मनात झाले, होत असते.
महात्मा गांधी म्हणतात, हे सारे युद्धाचे रूपकात्मक वर्णन (allegory) आहे. माणसाचा आत्मा हेच युद्धक्षेत्र होय, जेथे अर्जुनाच्या तीव्र मानसिक भावना कुकर्मा पापाविरुद्ध लढत आहेत. आपल्या My Non-Violence ह्या ग्रंथात गीता अनासक्ती शिकवते व ती अहिंसाच होय(१) असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
गीतेतील कृष्णार्जुनसंवाद रूपकात्मक असल्याचे स्वामी विवेकानंद ह्यांचेही मत आहे. महाभारत युद्ध हे माणसाच्या मनातील चांगल्या व वाईट भावना यांमधील युद्ध होय (7)
भगवद्गीतेचे हे सारे वर्णन म्हणजे आंधळ्यांनी हाताने चाचपडत हत्तीचे वर्णन करण्यासारखे आहे. तीमधील युद्धाची प्रतीकात्मकता जरी मान्य केली, तरी जातिव्यवस्थेची जननी असलेल्या चातुर्वर्ण्याचा जो पुरस्कार गीतेमध्ये केला आहे, त्याचे काय? त्याबद्दल तर ह्या सर्व मीमांसकांनी सोयीस्करपणे मौन धारण केले आहे, कारण जातिव्यवस्थेमुळे त्यांचा फायदा झाला व होत आहे. कष्टाच्या कामांकरता त्यांना कामगारांची फौजच्या फौज मिळत राहिली आहे. गीतेतील युद्धाप्रमाणेच तिचा चातुर्वर्ण देखील प्रतीकात्मक आहे असे सांगून स्वामी विवेकानंदांपासून महात्मा गांधींपर्यंत सर्वांना जातिभेदाची तीव्रता कमी करता आली असती, परंतु त्यांनी तसे केलेले नाही.
डॉ. आंबेडकरांनी मात्र गीतेच्या चातुर्वर्ण्यावर प्रहार केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देखील महाभारत-युद्धाचा प्रतीकात्मक अर्थ न लावता गीतेतील कर्मयोगाचा विचार, त्यातील हिंसा स्वराज्याकरता अत्यावश्यक ठरवून तो विचार फार पुढे नेला.
टिळकांचे गीतारहस्य : मारा आणि स्वातंत्र्य मिळवा
टिळकांच्या म्हणण्यानुसार, क्षत्रियाचे परमकर्तव्य म्हणून अर्जुनाने युद्ध करावे हे सांगण्यासाठीच गीता लिहिली गेली. युद्ध-धर्म हा बंधुभावापेक्षा श्रेष्ठ आहे हाच संदेश तीमध्ये कष्णाने दिला आहे. महात्मा गांधींना टिळकांची गीतेवरील हिंसात्मक मते पाहन अचंबा वाटला व ते म्हणाले, टिळक खात्रीने माझ्या अहिंसक गीता-शिकवणीच्या विरुद्ध आहेत. मात्र पुढे कर्मयोगाचा मार्ग धरून टिळकांनी ब्राह्मणी हिंदुधर्माचीच तरफदारी केली. आदिशंकराचार्य कलारी ह्यांना धन्यवाद देत. ते लिहितात, बौद्ध आणि जैन यांनी हिंदू धर्मावर फार प्रहार केले. तेव्हा सहाशे वर्षांनंतर शंकराचार्यांनी हिंदुधर्माचे गुणगान करीत बौद्ध धर्मास हद्दपार केले. (5)
शंकराचार्यांनी केलेल्या हिंदुधर्माच्या ह्याच पुनरुज्जीवनावर प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी टीकेची झोड उठवली आहे. ते आपल्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे (6) ह्या पुस्तकात लिहितात –
शंकराचार्यांमुळे अस्पृश्यता निर्माण झाली. इसवी सनाच्या सात आठ हा शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य ह्यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनेत सामील करून घेतलेल्या सिंथियन उर्फ राजपूतांच्या पाठबळाने बौद्धांवर भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्यासुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्यांनी अस्पृश्यता निर्माण केली. लोकमान्य टिळकांनी भारताच्या मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन इत्यादी अल्पसंख्याकांविरुद्ध गीतेतील युद्धाची कर्मयोगी शिकवण अगदी सडकून, ठोकून वापरली. मुसलमानांच्या मोहरमास पर्याय म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. जरी ते स्वतःला अस्पृश्यतेच्या विरुद्ध दाखवीत असत, तरी मार्च 24, 1918 रोजी सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत त्यांनी ‘मी रोजच्या जीवनात अस्पृश्यता मुळीच पाळणार नाही’ ह्या परिषदेच्या जाहीरनाम्यावर सही केली नाही.
टिळकांसारख्या विद्वानांची मते गीतेच्या शिकवणीनंतर एवढी हिंदुनिष्ठ व एकांगी बनतात, तर आज जर शाळेतूनच गीता शिकवण्यात आली, तर विद्यार्थ्यांची कोवळी मने हिंदुस्थानच्या घटनेच्या निधर्मी व समता, बंधुत्व ह्याच्या किती उलट बनतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.
गीतेतील नैतिक शिकवण
नलिनी पंडित लिहितात, भगवद्गीता हा नीतीची शिकवण देणारा ग्रंथ आहे, ह्या हिंदच्या समजुतीवर डॉ. आंबेडकरांनी प्रखर टीकाच केली आहे. गीतेमध्ये युद्धांच्या समर्थनासाठी जो युक्तिवाद करण्यात आला आहे, तो त्यांच्या टीकेचा पहिला विषय होय. कृष्ण आपल्या युक्तिवादात म्हणतो, जग हे नाशवंत आहे आणि माणूस मर्त्य आहे. तो कधीतरी मरणारच. तेव्हा त्याला नैसर्गिक मृत्यू आला किंवा त्याला ठार मारले, तरी शहाण्या माणसाच्या दृष्टीने त्यात काय फरक पडतो? कृष्णाने केलेले युद्धाचे दुसरे समर्थन हे की, देह आणि आत्मा एकच आहेत असे मानणे चुकीचे आहे. ते एकमेकांपासून अलग आहेत. देह नाशवंत आहे, तर आत्मा अनंत व अविनाशी आहे. मृत्यू झाला म्हणजे देह नाश पावतो, आत्मा नाही. जीर्ण वस्त्रे टाकून देऊन माणूस ज्याप्रमाणे नवीन धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुना देह टाकून नवा धारण करतो. म्हणून युद्ध व हिंसा ह्यांत पश्चात्ताप किंवा शरम वाटण्यासारखे काही नाही, असे भगवद्गीतेचे म्हणणे आहे.
लढाई करणे हेच क्षत्रियाचे कर्तव्य मानून केलेले हे समर्थन अत्यंत उथळ आहे असेच म्हणावे लागते.
चातुर्वर्ण्याचे समर्थन
गौतम बुद्धाने उदात्त नैतिक जीवनाचा आदर्श लोकांपुढे उभा केला. तेव्हा आत्मनिग्रहावर भर देणाऱ्या बौद्धधर्मातील संकल्पनांचा हिंदुधर्मालाही स्वीकार करावा लागला. गीतेतील दुसऱ्या अध्यायात ब्राह्मी स्थितिप्रत पोहोचण्यासाठी वर्णिलेला मार्ग, सातव्या अध्यायातील भक्तांची लक्षणे, तेराव्या अध्यायातील ज्ञानी माणसाचे वर्णन, निष्काम कर्मयोगाची शिकवण ह्या सर्वांवर बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो
मात्र बुद्धाचा जातिसंस्थेला विरोध होता. उलट गीतेचा जन्म चातुर्वर्ण्याचे समर्थन करण्यासाठीच झाला होता. गीतेमध्ये अंतर्गत विसंगती दिसण्याचे कारण हेच होय.
चातुर्वर्ण्याधिष्ठित समाजव्यवस्था ईश्वराची निर्मिती आहे असे गीतेचे प्रतिपादन आहे. ती मानवाच्या उपजत गुणांवर आधारलेली आहे असा गीतेचा दावा आहे. माणसाचा वर्ण हा कुणाच्या लहरीवर अवलंबून नाही, तर त्याचे पूर्वजन्माचे पापपुण्य आणि त्यामधून त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या स्वाभाविक प्रवृत्ती ह्यांमधून तो निश्चित होतो. म्हणजे एखादा मनुष्य शूद्र वर्णात जन्माला येऊन दारिद्र्यात अपमानित जिणे जगत असेल तर त्याच्या ह्या परिस्थितीला तोच जबाबदार आहे, असे गीता मानते.
चातुर्वर्ण्यव्यवस्था आपल्या पूर्वजांनी जाणूनबुजून निर्माण केलेली एक अतुलनीय अशी समाजव्यवस्था आहे, अशी बहुसंख्य हिंदूंची समजूत आहे. परंतु हा आदर्श मुळातच चुकीचा आहे. समाजातील सर्व व्यक्तींना काही थोड्या वर्गाच्या पक्क्या चौकटीत कोंबून त्यांचे कार्य एकेका विशिष्ट वृत्तीपुरते मर्यादित ठेवल्याने व्यक्तींवर अन्याय होतो व समाजाचे नुकसान होते, हे आधुनिक समाजविज्ञानाने दाखवून दिले आहे.
प्रत्येक माणसात जन्मतः सर्व प्रकारच्या प्रवृत्ती असतात. मात्र एका प्रबळ कारणामुळे काही चटकन दृष्टोत्पत्तीस येतात व बाकीच्या सुप्त राहतात. मात्र एकाच माणसात आज जी प्रवृत्ती असेल, त्याच्याहून वेगळी अगदी विरोधी प्रवृत्तीही दुसऱ्या वेळी प्रबळ होऊ शकेल. मात्र म्हणून समाजातील काही माणसांचा जन्म मालक म्हणून आज्ञा देण्याकरिता आणि दुसऱ्यांचा आज्ञापालनाकरता म्हणजे गुलाम होण्याकरता झाला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.(4) क्रांतीची वेळ येईपर्यंत अगदी सामान्य वाटणारे नम्र आणि आज्ञाधारक लोक एका पहाटे उठून हजारो लोकांचे नेते होतात, असे अनेक क्रांतीमध्ये दिसून आले आहे. चातुर्वण्याच प्रत्यक्ष व्यवहारात पालन होईल हे निश्चित करण्यासाठी चातुर्वर्ण्य गुण-कर्मावर आधारित आहे एवढे सांगून श्रीकृष्ण थांबले नाहीत. समाजाची विशिष्ट घडण कायम राहावी ह्या हेतूने त्यांनी काही निर्बंध घातले आहेत. जसे की
कर्मकांडावर विश्वास ठेवणाऱ्या म्हणजेच चातुर्वर्ण्याचे निमूटपणे पालन करणाऱ्या अज्ञ लोकांचा शहाण्या माणसाने बुद्धिभेद करू नये. (गीता 3-26) प्रत्येकाने वर्णव्यवस्थेप्रमाणे प्राप्त झालेले विहित कर्म पार पाडलेच पाहिजे (गीता 18-41 ते 48 ) भक्त कितीही मोठा असला, तरी केवळ भक्तियोगाने त्याला मोक्षप्राप्ती होणार नाही. त्यासाठी विहित कर्मांची जोडी असावयास पाहिजे.
थोडक्यात सांगायचे तर एखादा शूद्र भक्त म्हणून कितीही श्रेष्ठ असला तरी शूद्र म्हणून वरिष्ठ वर्णाच्या सेवेसाठी जगण्याचे आणि मरणाचे त्याचे कर्तव्य आहे. ते त्याने पार पाडले नाही तर त्याला मोक्ष मिळण्याची शक्यता नाही. बुद्धाचा काळ हा भारतातील प्रबोधनाचा व बुद्धिवादाचा काळ होता. अशा काळात प्राचीन त चशून्य, तर्कदुष्ट व पोकळ परंपरा लोकांना मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून भगवद्गीतेला त्यांच्या संरक्षणासाठी धावून यावे लागले. तिने प्रतिक्रांतीचे जे समर्थन केले, त्याचे परिणाम आजतागायत टिकून आहेत.
चातुर्वर्ण्याच्या समर्थनाबद्दलचे गीतेतील काही श्लोक पहा –
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्
अर्थ – कारण हे पार्था, नीच कुलांत जन्मलेले- स्त्रिया, वैश्य, शूद्र लोकदेखील माझा आश्रय करून परमश्रेष्ठ गतीला जातात.
इथे बऱ्याच जातीचे लोक खालचे व नीच आहेत असा संदेश गीता देते. अध्याय अठरावा, श्लोक 44 मध्ये गीता म्हणते –
कृषिगोरक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्
अर्थ – शेती, गुरांचे (गाईंचे) पालन आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म असून शुश्रूषा हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक कर्म होय. तात्पर्य, शूद्रांना ह्या जीवनात तरी दुसऱ्याची सेवा करून, त्यांचे गुलाम बनून राहावे लागेल.
चातुर्वर्ण्य मया सृष्टं, गुणकर्मविभागशः
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्
ही चार वर्णांची समाजरचना मनुष्यांचे स्वभावधर्म आणि तदनुरूप त्यांची कर्म ह्यांना अनुसरून मी निर्माण केली आहेत. मी तिचा कर्ता असूनही, अकर्ता व अविनाशी आहे असे जाण.
भगवद्गीतेचे पुनरुज्जीवन हानिकारक
गीतेची चातुर्वर्ण्याधिष्ठित जातिप्रथा आजच्या युगात फारच विचित्र व हानिकारक आहे. शाळेमध्ये ती शिकवून विद्यार्थी कट्टर (तालिबान) बनण्याचा धोका आहे. शूद्र, अस्पृश्य आणि स्त्रिया ह्यांनी ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांचे वर्चस्व न स्वीकारल्यास देशामध्ये यादवी युद्ध होण्याचाही धोका आहे. धर्मनिरपेक्ष संविधानाने बहाल केलेले सामाजिक स्थैर्य त्याने लयास जाईल.
1) ब्राह्मण व उच्च जातीचे हिंदू भगवद्गीता हा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ आहे असे मानतात. तो त्यांचा एक पवित्र ग्रंथ आहे. शिवाय परस्पराहून वेगळे असे अनेक विचारप्रवाह त्यात एकत्र आल्याने निरनिराळ्या विद्वानांनी आपल्या समजुतीनुसार लावलेला तिचा अर्थ स्वतःपरताच मर्यादित ठेवन स्वतःची उन्नती करून घ्यावी. तो इतरांवर लाद नये. विविध जातिधर्मातील विद्यार्थ्यांना शाळेत शिकवून त्यांच्या विचारांत गोंधळ माजवू नये.
16802, Shipshaw River Dr. Leander, TX USA 78641-3324. madmkamble@yahoo.com
संदर्भ:
The Times of India, Bangalore, July 21, 2011
The Indian Express, Bhopal, Jan. 28,2012.
Dr. B.R. Ambedkar, ‘Revolution and Counter-Revolution in Ancient India’, (Writings & Speeches.) Vol.3,Govt. of Maharashtra Publications. Mumbai, India.
Nalini Pandit, ‘Ambedkar’ Granthali Publication.
Dr. J. Kuruvachira, ‘Bal Gangadhar Tilak.. of Gita’ – Paper.
Prabodhankar Thakrey, ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे.’
Bhagvad Gita, Wikipedia, Allegory War.
M. K. Gandhi, ‘My Non-Violence’, pg. 1523, Navajivan Publication House. Ahmedabad.
धर्म-ग्रंथ कालनिरपेक्ष व कालातीत नाहीत!
२०१३ जानेवारी महिन्याचा ‘आजचा सुधारक माझ्या हातात आला. ह्यातील उत्पल व.बा. च्या कवितेत शेवटच्या कडव्यात ‘तरी व्यापून उरावी, संवेदना…..’ म्हटले आहे. कवितेतले फारसे काही मला कळत नाही. पण, ‘संवेदना व्यापून उरावी’ एवढे मात्र कळू शकले आहे. पण, श्री मधुकर कांबळे यांचा ‘भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन’ हा लेख वाचल्यामुळे त्यातल्या भाव-भावनांचा मी विचार करू लागलो. अर्थात, श्री मधुकर कांबळे यांच्य या लेखावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याच्या मनःस्थितीत मी यावेळी नाही. फक्त जो विचार मला सुचला वा स्फुरला तेवढाच या ठिकाणी देण्याचा विचार केला आहे.
धर्म कशाला म्हणायचे असते, हे कोणत्याही धर्म-ग्रंथातून कळण्याची शक्यता तशी फारच कमी असते. ‘गीता’ हा धर्मग्रंथच मानायचा किंवा आणखी काही, दृष्टीने महत्त्वाचे नाही. पण, यातून जो ‘स्वधर्म’ प्रतिपादिलेला आहे. तेवढे लक्षात घेणे मात्र गरजेचे वाटते. ‘धर्म’ हा शब्द भारतीय जीवनदर्शनातून मूलतः आलेला आहे. याला इंग्रजीत ‘रिलिजन’ म्हटले जाते. पण, ‘रिलिजन’ या अर्थाने याकडे पाहिले जाऊ नये कारण, इंग्रजीत ‘रिलिजन’चा अर्थ ‘धर्म-संप्रदाय’ असाच केला गेला आहे. तेव्हा, ‘धर्म’ हा केवळ धर्म-ग्रंथांनी प्रतिपादिलेला आहे. म्हणूनच स्वीकारायचा नसतो. कारण, धर्म- ग्रंथासह कोणीही ‘स्वधर्म’ सुस्पष्ट प्रतिपादिलेला नाही व नसतो! या दिशेने विचार केल्यास लक्षात येईल की, ‘स्वधर्मात भला मृत्यु परधर्म भयावह’ हे विनोबाच्या गीताईमधले वचन स्वधर्माच्या वाटचालीतल्या मार्गावर प्रकाशझोत टाकते.
श्री. मधुकर कांबळे यांनी त्यांच्या लेखात आद्य शंकराचार्य, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या (धर्म) मतांना उजाळा देऊन ‘गीता’ या हिन्दु धर्माने मान्य केल्या गेलेल्या धर्म-ग्रंथावर विवेचन केलेले आहे. पण, विनोबांच्या धर्मविषयक प्रतिपादनाकडे पाहिलेले लेखात तरी दिसत नाही. ते त्यांनी पहायला हवे होते. कारण, विनोबा ग्रंथप्रामाण्य मानणाऱ्यापैकी नव्हते. धर्म-ग्रंथ म्हणवल्या गेलेल्या ग्रंथांमधला सारच तेवढा त्यांना ग्रहण करता आला व महत्त्वाचाही वाटला. म्हणून त्यांनी जगातल्या बहुतेक सर्वच धर्म-ग्रंथांमधला सार काढून संक्षेपलेले सारग्रंथ रचलेले आहेत. म्हणून, कोणत्याही धर्म-ग्रंथांच्या पसाऱ्याकडे ते आकर्षिले गेले नाहीत. तेव्हा या ठिकाणी सांगायचे ते एवढेच की, कालसापेक्ष जे असते व आहे त्याला कालनिरपेक्ष वा कालातीत म्हणता येत नाही व म्हणूही नये! म्हणून, कोणताही धर्म-ग्रंथ कालातीत नाही व नसतो. यामुळे अशा ग्रंथातला युगानुरूप सारच. तेवढा घ्यायचाही असतो! बाकीचा पसारा टाकायचा नाही पण सोडायचा असतो. यातूनच ‘स्वधर्म’ विकसित होतो व होत आलाही आहे. कालक्रमणेतून अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते की, कोणतेही धर्म-ग्रंथ कालनिरपेक्ष वा कालातीत नसल्यामुळे कालांतराने उपयोगी वाटणारच नाहीत. म्हणून, अशा विकासशील प्रक्रियेतूनच मानवी जीवन घडत आलेले आहे व यातूनच वैश्विकता घडत आलेलीही आहे!
कोणाला आवडेल, रुचेल व पटेल याचा काही एक विचार न करता सहज वाटले व सुचले म्हणून या ठिकाणी धैर्यपूर्वक प्रतिपादिलेले आहे एवढेच!