पैशाने श्रीमंती येत नाही (पुढे चालू)

ग्रामोद्योग व चंगळवाद
अंदाजे गेल्या 200 वर्षांपासून उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाच्या पद्धतीत विलक्षण फरक पडला आहे. आणि तो फरक यूरोपातून इकडे आला आहे. आपल्या भारतीय पद्धतीत, गरज पडल्यानंतर ती निर्मिती करायची अशी पद्धत होती आणि अजून आहे. शेतीला लागणारी अवजारे, गावातले सुतार व लोहार लोकांच्या मागणीवरून तयार करीत. घरे बांधण्याचे कामसुद्धा गरजेपुरती होत असे. वस्तू आधी तयार करायची व नंतर तिच्यासाठी ग्राहक शोधायचा हे आपल्याकडे कपड्याच्या बाबतीतसुद्धा कधी घडलेले नाही, कापडाच्या गिरण्या भारतात सुरू होऊन 50-60 वर्षे झाल्यानंतरही भारतात माणशी सरासरी 20 वार इतका कपडा तयार होत होता. 1952-53 च्या काळापर्यंत ग्रामीण शेतकरी, व लहान मुले जवळजवळ उघडीच असत. चांभारसुद्धा मागणीप्रमाणे जोडे तयार करून देत व क्वचित काही जोड आठवडी बाजारात नेर.. विकत. ह्याउलट वस्तू तयार करण्यासाठी यंत्रांचा उपयोग होऊ लागला, त्यावेळी वस्तू आधी तयार होणार व नंतर त्यांच्यासाठी ग्राहक शोधावे लागणार अशी स्थिती आली. आज ह्या साऱ्यांचा परिणाम असा झाला आहे की, घरे, स्कूटर्स, मोटरगाड्या, जोडे, तयार कपडे हे सर्व विकत घेण्यासाठी पूर्वी जेवढे श्रम ग्राहकाला करावे लागत होते, त्याच्या दशांशानेदेखील आज श्रम पडत नसावेत. एक लहानसे घर बांधायचे म्हणजे आयुष्यभर नोकरी व काटकसर करून निवृत्तीच्या वेळेपर्यंत पैसे साठवायचे अशी पद्धत होती. शाळामास्तरांना शाळेखेरीज इतरही शिकवण्या करत पैसा जमवावा लागत असे. आज इतकी महागाई असूनही नवराबायको दोघेही मास्तरकी करीत असतील तर त्यांच्या पगारातून ते थोड्याच काळात घरच नव्हे तर मोटरही विकत घेऊन वापरू शकतात. ह्यासाठी त्यांना जन्मभर नोकरी करून सेवानिवृत्तीची वाट बघत बसावे लागत नाही. यालाच मी आज श्रमांच्या तुलनेत वस्तुप्राप्ती अत्यंत स्वस्त झाली आहे असे म्हणतो. व त्यामुळेच पुष्कळांचे राहणीमान सुधरू शकले आणि त्याचा परिणाम म्हणून मध्यमवर्गाचा आज विस्तार होण्यात झाला आहे.
आधी मागणी व त्याप्रमाणे पुरवठा आणि आधी पुरवठा व त्यासाठी मागणी निर्माण करणे ह्या पद्धती आपण समजून घेऊ. ह्यातील दुसऱ्या प्रकाराला ‘चंगळवाद’ हा शब्द अलीकडे वापरला जातो. पहिल्या प्रकारात म्हणजे आधी मागणी व नंतर पुरवठा जेव्हा केला जातो, तेव्हा कोणत्याही नवीन वस्तू निर्माण होण्याची शक्यता कमी असते. कारण नवीन म्हणजे ज्या वस्तू माहीतच नाहीत, त्यांची मागणी कोण कशी करणार? नव-वस्तु-निर्मतीची प्रक्रियाच ह्या प्रकारात सुरू होत नाही. क्वचित् काही कल्पक लोक एखाद्या नवीन वस्तूची कल्पना करून व त्यानुसार ती तयार करून राजाला भेट देत असत. अश्या वस्तू बहुधा कलाकुसरीच्या व एखाद्या कुटुंबातील सदस्यांनी बनविलेल्या असत. म्हणजे त्यात एखाद-दुसऱ्याचेच परिश्रम कारणी लागत असत. त्यामुळे येथे ग्रंथांची सुंदर हस्तलिखिते तयार झाली; पण छपाईची विद्या निर्माण झाली नाही. कारण कोणत्याही कल्पनेचे विद्येत अथवा कोणत्याही विद्येचे उद्योगात रूपान्तर होण्यासाठी अनेकांची बद्धी व अनेकांचे परिश्रम एकत्र यावे लागतात. एक उदाहरण देतो. कितीही जाड व मोठ्या कड्यांचे साखळदंड किंवा तलवारी येथील लोहार बनवू शकत होते; पण रुळांवरून धावणाऱ्या आगगाडीची कल्पना करणे व त्यानुसार रूळ व एंजीन बनविणे आपल्या येथे होऊ शकले नाही. रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आढळत असला तरी त्याचे भौतिक अवशेषही कोठे राहिलेले दिसत नाहीत. ह्याचे कारण माझ्या मते सामुदायिक प्रयत्नांचा आम्हा लोकांत अभाव होता व आजही आहे. येथे कल्पकता काही प्रमाणात असली तरी तिला मूर्तस्वरूप देण्यासाठी आजही आपल्याला परदेशात जावे लागते; कारण त्यासाठी लागणाऱ्या सामुदायिक प्रयत्नांची मदत आपल्याला जी परदेशात सहजपणे मिळते, तिचा आपल्या देशात अभावच आहे. धार्मिक कामाखेरीज इतर गोष्टींसाठी आपण एकत्र येऊन काम करीत नाही असे दिसते. आपल्या शतकानुशतकांच्या गुलामगिरीचे व दारिद्र्याचेही मूळ कारण आपल्या ह्या स्वभावात दडलेले आहे.
भारतीयांच्या ह्या स्वभाववैशिष्ट्यांचे परिणाम इतरही क्षेत्रांत दिसतात. आपला स्वभाव एकेकट्याने कामे करण्याचा आहे. त्यामुळे आम्ही आपण होऊन काहीच केले नाही. (अर्थात् हे सर्व मी इंग्रजांच्या आगमनापूर्वीच्या काळाविषयी सांगत आहे) कारण हे प्रश्न एकेकट्याने सुटण्यासारखे नाहीतच. आजही आम्ही त्या प्रयत्नांत कमी पडतो. स्वातंत्र्यप्राप्तीला साठ वर्षे होऊन गेली, तीन पिढ्या झाल्या; पण आम्ही आमच्यातील सर्वांना साधे साक्षरही करू शकलो नाही. आदिवासी मुलांसाठी आपण आश्रमशाळाही चालवू शकत नाही. सार्वजनिक दवाखाने, शाळा, विद्यापीठे, विश्वविद्यालये, सार्वजनिक हिताची कोणतीच कामे आम्हाला संघटितपणे धडपणे करता येत नाहीत व त्याची आम्हाला यत्किंचितही खंत नाही.
आमच्या देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी अण्णा हजारे व त्यांचे सहकारी जनलोकपाल नेमण्याच्या गोष्टी करतात. केजरीवाल ‘आम आदमी’चा पक्ष काढतो म्हणतात. पण आमच्या येथील आम आदमीच भ्रष्ट आहे, ह्याकडे कोणाचेच लक्ष नाही. सर्वत्र राजकारणाचे अड्डे होऊन बसले आहेत. ह्यातून केवळ त्यांची व्यक्तिगत प्रसिद्धी होणार आहे, याहून दुसरे काहीच साधणार नाही. सर्व चित्र अत्यंत हृदयविदारक आहे. आमचा देश खालपासून वरपर्यंत पूर्ण किडलेला आहे. काही व्यक्तींचे अपवाद सोडल्यास कोणताही पक्ष त्यापासून दूर नाही. यामुळेच खाजगी मालकीच आपल्या लोकांना समजते – सार्वजनिक मालकी अजिबात समजत नाही.
आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्न आणि अभूतपूर्व असा फरक केल्याशिवाय ह्या चिखलातून आपण बाहेर पडणार नाही..
आपल्याला सार्वजनिक हिताच्या गोष्टी समजतही नाहीत म्हणून त्या करताही येत नाहीत. तसेच त्या सर्वांनी मिळून, समजून-उमजून, एकमेकांसाठी एकमेकांच्या म्हणजेच सर्वांच्या हितासाठी त्या केल्याशिवाय हे प्रश्न सुटू शकत नाहीत. समजून-उमजून म्हणजे सर्वांच्या कल्याणात माझेही कल्याण आहे व सर्वांच्या कल्याणातच माझे कल्याण आहे ही गोष्ट समजणे, म्हणजे आपण एकेकट्याने आपापले कल्याण करायचे ठरविले तर त्यामुळे सर्वांचे कल्याण होऊ शकत नाही – उलट त्यात अडथळाच येतो, आपल्या स्वार्थाचा.
माणसाची शारीरिक श्रम टाळण्याची सहजप्रवृत्ती आहे आणि दुसरीकडे आपले राहणीमान वाढवत नेण्याचीही आहे. जेव्हा वस्तूंचे उत्पादन यंत्रांच्या साह्याने वाढवीत नेता येते हे माहीत नव्हते, तेव्हाही माणसाच्या ह्या दोन इच्छा अस्तित्वात होत्याच. जेव्हा स्नायूंच्या (जनावरे व माणसे यांच्या) साह्याने वस्तूंचे उत्पादन होत होते, तेव्हा वैयक्तिक श्रीमंती वाढू शकत होती; सार्वजनिक श्रीमंती वाढू शकत नव्हती. कारण त्यावेळी जास्त उत्पादन होऊच शकत नव्हते. काही मोजक्या व्यक्ती श्रीमंत असत पण त्या दुसऱ्यांचे ओरबाडून.
इंधन गोळा करणे, पाणी भरणे, लाकडे फोडणे, इ.कामांमध्ये एका गावातील लोकांचे किती मनुष्यतास खर्च होत असत, त्याचा हिशेब नाही. अशा प्रकारची कामे करण्यात मुख्यतः स्त्रियांचे सारे आयुष्य खर्ची पडत असे. श्रीमंतांच्या घरी ही कामे गडीमाणसे करीत असत. त्यामुळे त्यांना यांहून दुसरी कामे करण्यास वेळ मिळत असे. त्यांची श्रीमंती ही वैयक्तिक स्वरूपाची होती. आता पाणी नळावाटे घरोघर जाऊ लागल्यापासून ह्या कामासाठी खर्च करावा लागणारा प्रत्येकाचा म्हणजेच सर्वांचा वेळ वाचू लागला असून त्यामुळे आपण सारेच त्या बाबतीत श्रीमंत झालो आहोत असे म्हणता येईल. हे काम यंत्राच्या साह्याने झाल्यामुळे ही श्रीमंती सर्वांकडे येऊ शकली व त्यांच्या स्नायूंचे श्रमही वाचले. केवळ स्नायूंच्या शक्तीवर ही श्रीमंती कदापि येऊ शकली नसती.
दुर्दैवाची गोष्ट अशी की, मानवाचे श्रम वाचवणारी यंत्रे भारतात निर्माण झाली नाहीत व त्या वस्तूंच्या साह्याने आपले सर्वांचेच राहणीमान कसे वाढेल ह्याचा विचारही कोणाला येथे पूर्वी सुचला नाही व आजही सुचत नाही. आपण जेव्हा स्नायूंच्याच ऊर्जेचा वापर वस्तुनिर्मितीसाठी झाला पाहिजे असा आग्रह धरतो, तेव्हा आपण नेमके काय साधतो? आपल्या राहणीमानाच्या वाढीला आपण मर्यादा घालतो आणि सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठीची श्रीमंती आपण निर्माण होऊ देत नाही. इतकेच नव्हे तर ज्यांची अशा प्रकारचे कष्ट करण्याची इच्छा नाही, त्यांच्याही माथी आम्ही ते कष्ट मारतो. अश्या परिस्थितीत जे वैयक्तिक श्रीमंती वाढवितात, ते इतरांचे शोषण करतात, याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण एका जागी बसायचे व आपल्यासारख्याच दुसऱ्या माणसाला आपल्यासाठी शारीरिक श्रम करायला लावायचे व त्याचे राहणीमान आपल्याहून कमी राहील याची काळजी घ्यायची. जमीनदार, मालगुजार, सावकार हे सर्व ह्याच वर्गातील आहेत. याउलट यंत्राचा वापर करून स्नायूंची ऊर्जा वाचविणारा व यंत्राद्वारे सार्वजनिक श्रीमंती वाढविणारा शोषक कसा काय होऊ शकतो?
यंत्र माणसाचे शोषण करते हा असाच एक अपसमज आहे. यंत्र शोषण करीत नसून यंत्र चालविणारा शोषण करतो.
काही लोकांजवळ पैसा एकवटल्यामुळे बाकीचे लोक गरीब होतात का? मला वाटते, होत नाहीत. ह्या प्रश्नाचे उत्तर देतानासुद्धा आधुनिक उत्पादनपद्धतींचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या उत्पादनपद्धतींमुळे केवळ यंत्रसिद्ध वस्तूंच्या उत्पादनातच वाढ झाली आहे असे नाही, तर धान्य व दूध ह्यांच्याही उत्पादनपद्धतींत क्रान्तीच झाली आहे. ‘हरितक्रान्ती’, ‘श्वेतक्रान्ती’ असे शब्दही त्यांच्यासाठी रूढ झाले आहेत. धान्याच्या जुन्या उत्पादनपद्धतीमध्ये हातांत पीक किती येणार यावर शेतकऱ्यांचा कुठलाही ताबा नव्हता. पाऊसमान, टोळधाडी, गव्हावर पडणारे गेरव्यासारखे रोग ह्यांमुळे यंदा सर्वांना पुरेल इतके पीक होईल की नाही ह्याचा काहीच अंदाज शेतकऱ्यांना बांधता येत नसे. पुढच्या वर्षी कोणते बियाणे किती लावायचे हे ठरविताना बाजारभावाशिवाय कोणतेच साधन त्यांच्याजवळ नसे. यंदा भाव पडले तर पुढील वर्षी ते कमी लावायचे; व भाव वाढले तर पुढील वर्षी ते जास्त लावायचे इतकेच. आज कोठे किती पिकले, हे ताबडतोब कळते. पूर्वी आतासारखी दळणवळणाची (communication) ची साधने उपलब्ध नव्हती. रोगराईला प्रतिबंध करण्याऱ्या जाती जश्या आज उपलब्ध आहेत, तश्या कमी पाण्यात जास्त पीक देणाऱ्या बियाण्यांच्या जातीही आज उपलब्ध आहेत. त्यामुळे पूर्ण देशाच्या गरजा पुऱ्या होतील व त्या उपलब्ध पाण्यातच पूर्ण होतील असे नियोजन करणे शक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर पर्यावरणाची हानी होऊ न देता आपल्या अन्नधान्याच्या गरजा पुऱ्या करणेही शक्य झाले आहे. हे आज घडू शकत नाही याचे कारण, आम्हाला आमच्या प्रश्नांना सामुदायिकपणे भिडता येत नाही, एवढे एकच आहे. एकदिलाने हे प्रश्न सोडविले, तर ते सहज सुटण्यासारखे आहेत. थोडक्यात काय, तर यापुढे आपल्या देशातील लोकांना अन्नाच्या अभावी अर्धपोटी राहण्याची गरज राहिली नाही असे एकूण चित्र आहे. पण खाजगी मालकी व एकदिलाने केलेला सामूहिक प्रयत्नांचा अभाव ह्यांमुळे आम्हीच आमच्या वाटेत अनुल्लंघ्य अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत!
आज आमचे सरकार, कोठे धान्याची कमतरता झाली तर धान्य बाहेरून मागविते. अश्या परिस्थितीत आम्हाला रेशनिंगची गरज का पडावी? कुठल्याही रेशनिंगशिवाय पुरेसे धान्य प्रत्येकापर्यंत अत्यल्प किंमतीला पोचविणे आमच्यासाठी अत्यंत अवघड होऊन बसले आहे एवढे खरे! एकीकडे अतिरिक्त धान्य कुजून चालले आहे. व दुसरीकडे धान्याचे न्याय्य वाटप होत नाही. धान्याचा भाव देशभरात एकच असायला हवा. दौरिद्र्यरेषेखाली (BPL) व दारिद्र्यरेषेवर (APL) ही वर्गवारी आम्ही ताबडतोब रद्द केली पाहिजे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांकडून योग्य किंमतीला धान्य विकत घेऊन कोणाच्या खिशात किती पैसे आहे हे न पाहता सर्वांना ते फुकट वाटले पाहिजे. कारण तो प्रत्येकाचा हक्क आहे. आमचे प्रश्न पैशाने सुटत नसून, उलट, पैशामुळे प्रश्न निर्माण होतात याकडे मला सर्वांचे लक्ष वेधायचे, वळवायचे, आहे.
माणूस जी काही आणि जेवढी म्हणून कामे करतो, ती आपले राहणीमान सुधारण्यासाठी करतो. शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे राहणीमान सुधारतेच असे नाही. त्यामुळे जे प्रश्न निर्माण होतात, त्याकडे सध्या दुर्लक्ष करू. पण बाकीची सगळी कामे ह्या एका हेतूने होतात असे म्हणावयास हरकत नाही.
यांत्रिकीकरणामुळे उत्पादनवाढीच्या प्रमाणात जो फरक पडतो, त्यामुळे अधिक लोकांकडे नवीन निर्माण होणारा माल पोचतो. इतकेच नव्हे तर सगळ्या लोकांना-म्हणजे त्या मालाच्या ग्राहकांना ते करीत असलेल्या श्रमांच्या मोबदल्यातच तो मिळत असतो. त्यासाठी त्यांना वेगळे अधिक श्रम करावे लागत नाहीत,
एकदा सर्वांना पोटभर जेवायला मिळू लागल्यानंतर सर्वांनी मिळून आपल्याला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती का करू नये आणि झालेले उत्पादन सर्वांनी (फुकट) वाटून का घेऊ नये असा मला प्रश्न पडतो. आज ह्या वाटपामध्ये पैशाचे माध्यम आल्याने आणि तो (पैसा) आपण सर्वांकडे एकसारखा जाणार नाही अशी व्यवस्था आपण करून ठेवली असल्यामुळे आपण मानवी श्रमांची आणि मालमत्तेची प्रचंड नासाडी करीत आहोत.
आपण औषधांचे उदाहरण घेऊ. आपल्या आरोग्यासाठी अंदाजे तीन-चारशे प्रकारची औषधे लागतात, पण बाजारात पाच-सहा हजार नावांची औषधे उपलब्ध आहेत. औषधांची निरनिराळ्या प्रकारची मिश्रणे करून तसेच त्यात औषधांचे प्रमाण कमीजास्त करून एकच औषध वेगवेगळ्या नावांनी विक्रीला ठेवले जाते आणि आपलाच माल अधिक खपावा यासाठी त्याची जाहिरात केली जाते. औषधांच्या कार्यक्षमतेचा काही कालावधी असतो. (shelf life). त्या अवधीत तो माल विकला गेला नाही तर तो नष्ट करावा लागतो. जाहिरातीसाठी कागद, शाई, चित्रकाराचा वेळ; जाहिरात टीव्हीवर करायची असेल तर मॉडेल्स, फोटोग्राफर्स व अभिनेते आणि त्यांची चमू ह्यांचा वेळ व त्यावर खर्च होणारा प्रेक्षकांचा बेसुमार वेळ ह्या सर्वांची नासाडी कशी थांबविणार? ही सर्व मानवी संसाधनांची (human resources) प्रचंड नासाडी लोकांना रोजगार देण्याच्या नावाखाली आम्ही खपवून घेतो. तसेच ज्या वस्तूंची सर्वांना निकड/गरज नाही अश्या वस्तूंचे प्रचंड प्रमाणात उत्पादन करून ते सरसकट सर्वांच्या माथी मारतो, नको त्या किंवा मुळात त्यांना नसलेल्या गरजा त्यांच्यात कृत्रिमपणे, जाहिरातीद्वारे, निर्माण करतो हा खरा चंगळवाद आहे!
गौरीवंदन 123 शिवाजीनगर नागपर 4100105

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.