आधुनिक अंधश्रद्धा

प्रत्येक समाज वा संस्कृती कित्येक पिढ्यांपासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य तितके पालन करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा – अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा, ‘त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन-अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाड्यांची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात. परंतु पूजा करण्याची मानसिकता नष्ट झाली नाही. भारतीय परंपरेने याबाबतीत तर कहर केला आहे व अजूनही आपण त्या जंजाळापासून मुक्त होऊ शकलो नाही. गंत म्हणजे स्वत:ला अत्याधुनिक म्हणून घेणारे श्रीमंत व अतिविकसित राष्ट्रांतील समाजसुद्धा याला अपवाद नाहीत. अत्याधुनिक जीवनशैलीनुसार या समाजातील शकुन-अपशकुन विमान, डॉक्टर्स, सिगारेट्स इत्यादीत शोधल्या जातात. यांतील काही नमुनेदार गोष्टी अंकात पुढे चौकटींमध्ये दिल्या आहेत.

विमान: विमानप्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत त्या सीटवर बसून प्रवास करते म्हणे! ग्रेलिन नावाच्या भुतामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचा नैवेद्य दाखविला जातो.
अॅम्ब्युलन्स : घाईगर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास ती नजरेआड होईपर्यंत शास रोखून धरला जातो. तसे न केल्यास अम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यू अटळ आहे, असे समजतात.
कॅलेंडर: वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते. लीप वर्षाच्या २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या मुलीचे लग्न लवकर होते व ती आयुष्यभर निरोगी राहते.
खुर्ची : खुर्चीसारख्या निरुपद्रवी वस्तूभोवतीसुद्धा अंधश्रद्धा आहेत. खुर्ची खाली पडणे अशुभ समजले जाते. कुणीतरी उठून गेल्यानंतर खुर्ची पडल्यास ती व्यक्ती खोटारडी मानली जाते. दवाखान्यातील खुर्चीवर झाकून ठेवलेले कापड खाली जमीनीवर पडल्यास नवीन रुग्ण येतो. खुर्ची उलटी ठेवल्यास घरात भांडण होते, अशा समजुती खुर्चीबाबत आहेत.

हातरुमाल : हातरुमाल खाली पडल्यास स्वतः उचलणे अशुभ समजले जाते. घडी केलेला रुमाल सतत बाळगणे संकटांना आमंत्रण देऊ शकते. एखाद्याचा/एखादीचा रुमाल उसना घेणे म्हणजे त्याचे/तिचे दु:ख/ अश्रू मागून घेणे. रुमालाला गाठ बांधून ठेवल्यास भूतबाधा होत नाही.
सुईदोरा : काळा दोरा ओवलेली सुई रस्त्यावर दिसणे अशुभ समजले जाते. गर्भिणीने अशी सुई बघितल्यास तिला मुलगी होणार. दिवसाची सुरुवात सुई या शब्दाने केल्यास दिवस वाईट जाणार. मित्राला सुई देणे हे मैत्री तोडल्याचे लक्षण आहे. शिवत असताना सुई मोडल्यास तो शुभशकुन मानला जातो.
फोटो : भिंतीवर टांगलेली फोटोची फ्रेम अचानक पडल्यास संकट कोसळणार. एखाद्या प्राण्याबरोबर फोटो काढून घेणे हे प्राण्याच्या स्वरूपातील भुताचा फोटो काढल्यासारखे होते. तिघांचाच फोटो काढल्यास मधल्या व्यक्तीवर संकट येते. आवडत्या व्यक्तीचा फोटो स्टिअरिंग व्हीलजवळ ठेवल्यास गाडीला अपघात होत नाही.
साबण: एकमेकांना साबण देणे मैत्री तोडण्याचे लक्षण मानले जाते. आंघोळ करताना साबण निसटणे संकटाला आमंत्रण दिल्यासारखे असते. चमचे : चमचा खाली पडल्यास घरात लहान मूल येणार. मोठा चमचा स्वयंपाकाच्या ओटयावर किंवा डायनिंग टेबलवर पडल्यास ८-१० माणसं जेवायला येणार. चमचा उलटा पडल्यास मनासारखी गोष्ट होणार नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.