वैद्यकीय क्षेत्रांतील कॉम्प्युटराईज्ड बुवाबाजी

सध्या अनेक छोट्या-मोठ्या गावांत खालील प्रकारची पत्रके वाटली जात आहेत. ‘न्यू संजीवनी हेल्थ केअर’ द्वारा संपूर्ण शारीरिक तपासणी… ‘निरोगी निरामय सफलतेचे रहस्य’… १०० टक्के उपचार होऊ शकतो. आपण निराश आहात का? दीर्घकालीन आजाराने? आपण हरले आहात का? आपल्या स्वास्थ्यामुळे ? आपण हैराण आहात का? दवाखान्यामुळे ? आपणास चांगले आरोग्य पाहिजे का? तर या! ।
आपल्या आजाराला रशियन इव्हीए मशीन (किंवा दुसऱ्या नावाच्या मशीन)द्वारा तपासून घ्या. ही तपासणी शरीराच्या ३० विविध अंगाची होते. त्यांत मेंदूच्या रक्तपुरवठ्यापासून तर हृदय, किडनी, हाडे, सांधे इत्यादी सर्व आजारांचे आणि पूर्ण शरीरांत असलेल्या कोणत्याही आजाराची माहिती दिली जाते. सोबत भविष्यात होणाऱ्या आजारांची पूर्वसूचनासुद्धा हे मशीन देते! चेकअप फी रु.६००/- ५० मर्यादित
पेशन्टसाठी तपासणी होईल. (बुकिंग व संपर्काचा पत्ता, फोन नंबर इ.) अशी अनेक शिबिरे निरनिराळ्या गावांत, निरनिराळे डॉक्टर्स घेत आहेत आणि अनेक भोळेभाबडे लोक लाखो रुपये खर्च करून त्यामध्ये सहभागी होत आहेत. एका शिबिरात ५० रुग्ण प्रत्येकी रु. ५०० ते ६०० घेऊन तपासले जातात म्हणजे तपासणी करणारे डॉक्टर आणि शिबीर आयोजन करणारे त्यांचे एजन्टस् यांना रु. २५,००० ते ३०,००० रुपये मिळतात. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णाला २५०० ते २६०० रुपयांची औषधी विकली जातात. म्हणजेच या शिबिरांतून रु.१,२५,०००/ – ते रु.१,३०,०००/- उत्पन्न आयोजकांना/डॉक्टरांना मिळते. या शिबिरांत कशी आणि कोणकोणती तपासणी होते?
आमच्याकडे आलेल्या तक्रारदारांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर एक छोट्या पेटीएवढे मशीन घेऊन येतो. एका पेनसारख्या एका टोकाला लेझर लाईट असलेले उपकरण रुग्णाच्या हातात देऊन त्याला ते विशिष्ट प्रकारे पकडण्यास सांगण्यात येते. त्या उपकरणाचे एक टोक संगणकास केवळ वायरने जोडलेले असते आणि एका मिनिटात रुग्णाचे नाव आणि वजन असलेला २६ पानी रिपोर्ट प्रिंट होऊन बाहेर येतो. त्या रुग्णाला काय आजार आहे हे सांगून त्यावर घ्यावयाची औषधेही त्यात दिलेली असतात. ती तेथेच बाहेरच्या खोलीत विकत मिळतात. या मशीनबाबत इंटरनेटवरून माहिती काढली असता, जगभरात अनेक ठिकाणी ते वापरले जात होते असा उल्लेख आहे. हे मशीन म्हणजे एक प्रकारचा साधा गॅल्व्हॉनो ीटर आहे. पोलिस तपासात जसे आरोपी खोटे बोलतो आहे की खरे हे तपासण्याकरिता ‘लाय डिटेक्टर’ वापरण्यात येतो तसेच हे मशीन रुग्णाच्या मानसिकतेनुसार मशीनमधील चढउतार रेकॉर्ड करते आणि तपासणी करणारा डॉक्टर किंवा ऑपरेटर दाबलेल्या बटनानुसार कॉम्प्युटरमध्ये – अगोदर ‘फीड’ केलेले रिपोर्टस् प्रिंट होऊन बाहेर येतात. हे रिपोर्टस तद्दन खोटे असतात असे जगात सिद्ध झालेले आहे. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासन कायद्यानुसार अशाप्रकारच्या मशीनने तपासणी करून रुग्णाची फसवणूक करणे हा गुन्हा आहे आणि अशा भोंदू डॉक्टरांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. जर आजच्या आधुनिक वैद्यकीय शास्त्राधारे यात दिलेले निष्कर्ष तपासावयाचे असतील तर त्या सर्व तपासण्यांचा खर्च जवळ जवळ दोन लाख रुपयांपर्यंत येईल आणि या सर्व तपासण्या करण्याकरिता साधारण ८ ते १० कोटी रुपयांची मशीनरी लागेल. यांतील प्रत्येक रिपोर्टबद्दल थोडक्यात लिहिणे शक्य नाही पण वानगीदाखल थोड्या रिपोर्टबद्दल सांगता येईल. यांतील अनेक रिपोर्ट हे रक्त तपासणी झाल्यावरच होऊ शकतात. या शिबिरांत एक थेंबभरही रक्त न घेता, रक्तातील साखर, युरिया, क्रीएटीनीन, रक्तातील हारमोन्स, व्हिटॅमिनचे प्रमाण, इत्यादी अनेक चाचण्यांचे रिपोर्टस सांगितले जातात ही शुद्ध फसवणूकच आहे. प्रत्यक्षात या प्रत्येक तपासणीला खूप खर्च येतो. उदा. व्हिटीन इ१२ तपासण्यास १०० ते १२०० रुपये खर्च, इ६ तपासण्यास २५०० ते २६०० रुपये खर्च येतो. स्त्रियांचे हॉरमोन्स तपासण्यास १५०० रुपये खर्च येतो. प्रामुख्याने हृदयाला आणि मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याच्या रिपोर्ट्सकरता (Cardio-vascular & Cerebro-vascular Analysis Report) म्हणजेच कोरोनरी अॅन्जीयोग्राफी आणि सेरेब्रल अॅन्जीयोग्राफी करण्याकरिता प्रत्येकी साधारण ८ ते १०,००० रु. खर्च येतो. त्यांना लागणारी ‘कॅथ लॅब’ उभारण्यास ७-८ कोटी रुपये लागतात, या तपासण्या करण्याकरिता तज्ज्ञ डॉक्टर्स लागतात. त्यांचे या शिबिरात कोणतीही सुई नसेत न घालता एका मिनिटात रिपोर्ट दिले जातात. फुफ्फुसाच्या तपासणीचा रिपोर्ट करण्याकरिता एका मशीनमध्ये जोरात हवा फुकून त्याचा आलेख काढावा लागतो. येथे तर कोणत्याही मशीनमध्ये हवा फुकली जात नाही. या शिबिरांत स्त्रियांच्या स्तनाचे आणि गर्भपिशवीचे आजार कोणत्याही स्त्रीरोगचिकित्सक किंवा सर्जनने रुग्णाची कोणतीही शारीरिक तपासणी न करताच त्यांच्या स्तनांत गाठी आहेत असे सांगितले जाते. ही सर्व आधुनिक बुवाबाजीच! जनतेने अशा भूलथापांना बळी न पडता आपले आरोग्य राखावे. अशा आधुनिक बुवा/बायांच्या मागे लागून लाखो रुपये खर्च करू नये. त्यांनी निदान केलेल्या आणि आपल्याला नसलेल्या आजारांनी आपले मनःस्वास्थ्य बिघडवून आपले आयुष्य कमी करू नये.
डॉ. टोणगांवकर हॉस्पिटल, दोंडाईचा, जि.धुळे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.