अंधश्रद्धा निर्मूलन हा वारकऱ्यांचा धर्मच!

(अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक आणि वारकरी या मुद्द्यावरून काही जण वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असले तरी वारकरी ज्याला अनुसरतात त्या भागवत धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही. उलट समाजातल्या अशा अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे कामच या धर्माने शतकानुशतके केले आहे. त्या संदर्भातले विवेचन. )
राज्यातील अंधश्रद्धेचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत यावा, या चांगल्या उद्देशाने अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने कायद्याचा मुद्दा लावून धरला. सुरुवातीस त्याचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक असेच होते. मात्र नंतर ते महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम या नावे आणण्यात आले. पहिल्या विधेयकाच्या अंधश्रद्धा-निर्मूलन या नावामुळेच काही गैरसमज निर्माण झाले. त्या गैरसमजाचा गैरफायदा उठवणारे लोक होतेच. त्यांनी तेच काम केले. सनातनी धर्मवादी शक्तींनी मग त्याचा गैरफायदाच घेतला. वारकरी समाज हा महाराष्ट्रातील एक मोठी ताकद आहे, चळवळ आहे. ती आपल्या बाजूने असेल तर त्याचे अनेक राजकीय फायदेही होतील, असा विचार सनातन्यांनी करणे साहजिकच होते. गग या सनातन्यांनी आपला राजकीय अजेंडा वारकऱ्यांच्या गाध्यगातून राबविण्यास सुरुवात केली. हे विधेयक अमलात आले की, तुची कीर्तनप्रवचने बंद होतील, अशी आवई उठवली. त्यातून सामान्य वारकऱ्यांच्या मनामध्ये या विधेयकाविषयी गैरसमज निर्माण झाले.
हे विधेयक सरकारी होते पण ते प्रत्यक्षात यावे यासाठी प्रयत्न केले होते ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने. त्यात बुद्धिवादी मंडळी होती. या बाबी कायद्याच्या कक्षेत याव्यात यासाठीचा त्यांचा हेतू अतिशय चांगलाच होता. मात्र त्यासाठी लोकां ध्ये कसे जायचे, कसे पोहोचायचे, लोकसंपर्क कसा असला पाहिजे, त्यासाठी जनमत तयार करण्यासाठी नेके काय केले जाते, याचा मात्र फारसा अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. त्यांचा वावर हा केवळ मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गापुरता मर्यादित होता. याच्या अगदी उलट स्थिती सनातनी धर्मवाद्यांची होती. त्यांचा सामान्यांशी थेट संपर्क होता आणि जनमत तयार करण्याचाही त्यांचा अनुभव तसा तुलनेने दांडगाच होता. या दोघांधला म्हणजेच त्यांच्या कार्यपद्धतीमधला फरक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण पुरेसे बोलके ठरावे. हडपसर परिसरात समाजवाद्यांनी चांगले काम केले आहे. त्यात अनिल अवचट, बाबा आढाव आदींचा समावेश होता. तिथे त्यांनी साने गुरुजींच्या नावे एक रुग्णालय स्थापन केले आणि त्या माध्यमातून चांगले काम केले. नेक्या याच परिसरातून वारी दरम्यान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्याही जातात. वारीमध्ये अनेक संस्था-संघटना वारकऱ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देतात. पण या रुग्णालयातील समाजवाद्यांना एवढ्या वर्षांत कधीही असे वाटले नाही की, आपण वारकऱ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल एक अढी किंवा गैरसमज रूढ आहे. धर्म असे म्हटले की, ते घाबरतात. आपण धर्माच्या किंवा धार्मिक मंडळींच्या जवळ गेलो की, मग आपण बुद्धिवादी असण्याविषयी समाजात संशय निर्माण होईल, असे त्यांना वाटते. धर्म मानणाऱ्या मंडळींच्या जवळ न जाणे किंवा त्यांच्यापासून दूर राहणे म्हणजे खरे तर एक प्रकारचे अधार्मिकांनी पाळलेले हे सोवळेच आहे. दुसरीकडे सनातन्यांच्या बाबतीत बोलायचे तर ते या वारकऱ्यांना जवळ करतात. त्यांची कार्यपद्धतीच वेगळी आहे. आपला सत्कार हा कुणालाही आवडणाराच असतो, तो मनुष्यस्वभाव आहे. विश हिंदू परिषदेसारख्या संस्था या वारकऱ्यांधील मानकऱ्यांचा सत्कार घडवून आणतात. त्यामुळे साहजिकच वारकऱ्यांना ते जवळचे वाटतात. उलटपक्षी समाजवादी कसे वागतात पाहा. साने गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात केलेले एक सर्वांत महान कार्य म्हणजे त्यांनी उपोषण केले आणि पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात अस्पृश्यांना प्रवेश खुला झाला. ही खरे तर खूप मोठी क्रान्तिकारी घटना होती, पण समाजवादी मंडळी साने गुरुजींचे गुणगान गाताना त्यांच्या इतर गोष्टींबद्दल भरभरून बोलतात आणि पंढरपूरच्या त्यांच्या या लढ्याबद्दल बोलणे टाळतात किंवा कमी बोलतात. कारण मंदिरप्रवेश हा धार्मिक प्रश्न आहे, असे त्यांना वाटते. खरे तर साने गुरुजींनी हाताळला तो सामाजिक प्रश्न होता. ज्या दिवशी पंढरपूरच्या मंदिरात अस्पृश्यांचा प्रवेश झाला तो दिवस समाजवाद्यांनी संपूर्ण राज्यभरात प्रतिवर्षी साजरा करणे आवश्यक होते, पण त्यांनी ते टाळले. त्यामुळे आज वारकरी आणि समाजवादी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्याचा फायदा इतर सनातनी शक्तींनी घेतला आहे. हा चुकीचा दुरावा दूर करण्याची गरज आहे.
या दुराव्यामुळे समाजवादी आपले नाहीत, असे वारकऱ्यांना वाटणे खूप साहजिकच आहे. यात मी वारकऱ्यांना दोष देणार नाही, कारण ते फारसे शिकलेले नसतात. नवीन संकल्पना, नवीन येणाऱ्या बाबी यांची त्यांना फार कमी कल्पना असते किंवा अनेकदा नसतेही. त्यामुळे ही जबाबदारी खरे तर शिकलेल्या बुद्धिवाद्यांचीच आहे. त्यांनीच ती पार पाडायला हवी. अशा प्रकारची भूमिका मी मांडली की, तुम्ही त्यांची बाजू घेताय, असे मला म्हटले जाते. त्या वेळेस मी वारकऱ्यांना सांगतो की, जे आपले काम आहे, तेच काम – – अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम वारकऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी सुरुवातीच्या काळात केले आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात वारकऱ्यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे आता जे अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम सुरू आहे, त्याला आपण पाठिंबा देणे आवश्यक आहे. खरे तर ते वारकऱ्यांचेच काम करणारी एक दुसरी बाजू आहे. अगदी तुकोबांनीही त्यांच्या अभंगामध्ये हे सांगितलेलेच आहे की, आदेश कुणी दिला ते महत्त्वाचे नाही. व्यक्ती कोण हे गौण आहे. चुकीच्या आणि अनावश्यक असलेल्या गोष्टी बाजूला सारून त्यांतील चांगल्या गोष्टी घेणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. वारकऱ्यांच्याच बाबतीत बोलायचे तर बंडातात्या कराडकर हे खूप मोठे नाव आहे. त्यांनी या विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या ह्या विधेयकाच्या नावावरून धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न होतो आहे, म्हणूनच मी असे म्हणतो की, या अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयकाला (आता त्याचे नाव बदलले असले तरी ते याच ढोबळ नावाने ओळखले जात आहे) विरोध करणारा तो खरा वारकरी असूच शकत नाही किंवा मग त्याची दिशाभूल तरी करण्यात आली आहे, मात्र सनातनी मंडळी यातील ‘तो खरा वारकरी असूच शकत नाही’ एवढेच अर्धवट विधान घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील ‘मग त्याची दिशाभूल तरी करण्यात आली असावी’ हा वाक्यांश टाळत आहेत. ही दिशाभूल दूर करणे गरजेचे आहे.
तुकोबांनीच स्वतः काय सांगितले आहे पाहा… ते म्हणतात… “कपट कांहीं एक, नेणे भुलवायाचे लोक दाऊं नेणे जडीबुटी, चमत्कार उठाउठी।। नाहीं देवार्चन, असें मांडीलें दुकान नाहीं वेताळ प्रसन्न, कांहीं सांगे खाणाखूण नाहीं जाळीत भणदीं, उठो म्हणोनी आनंदी नाहीं हलवीत माळा, भोवतें मेळवुनी गबाळा आगमीचें कुडे नेणे, स्तंभन मोहन उच्चाटणे नव्हें यांच्या ऐसा, तुका निरयवासी पिसा।।२७२।।”
यात तुकोबांनी अंधश्रद्धेचेच तर वर्णन केले आहे. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धांना थारा नाही. इथे वारकऱ्यांच्या अंगात येणे नाही, नवस बोलणे नाही. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला वारकऱ्यांध्ये स्थान नाही. मग अशा त्यांच्या धर्माचाच पुरस्कार करणाऱ्या कायद्याचा वारकऱ्यांना उपसर्ग होण्याचे काहीही कारणच नाही, किंबहुना त्यांचा धर्मच अधिक प्रखरपणे या कायद्यात येतो आहे. त्यामुळे खया वारकऱ्यांचा पाठिंबा याला निश्चितच असणार, पण सध्या मात्र या विधेयकाने धर्म संकटात आल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता वारकऱ्यांनीच जनजागृती घडवून तो प्रयत्न हाणून पाडायला हवा! (लोकप्रभाः १९ जुलै २०१३ वरून साभार)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.