मुस्लिम मनाचा उत्कट आविष्कारः अजीम नवाज राही यांची कविता

मराठी कवितेत मुस्लिम कवींचे योगदान प्राचीन काळासूनच राहिलेले आहे. शेख मोहंद, शेख सुलतान, अल्लाखान, याकूब हुसेनी इ. मुस्लिम कवींनी संत कवितेत सुफी पंथाच्या मानवताधर्माची मांडणी केली आहे, तर तंत कवितेच्या काळात मराठी शाहिरी काव्य लिहिणारे सगनभाऊ, दादू पिंजारी, शेख कलंदर ह्यांची नावे आपल्यासमोर येतात. आधुनिक काळात शाहीर अमरशेख, प्रा. नसीमा पठाण, खलील मो नि, अल्लाउद्दीन आणि रफीक सूरज हे नामांकित कवी आहेत. मध्ययुगीन काळातील सुफी कवींच्या कवितेतून सुफी तत्त्वज्ञानांच्या औदार्याचे दर्शन तर शाहिरांच्या कवितेतून लावण्याच्या विविध छटा आविष्कृत होत गेल्या. आधुनिक कवितेतून मुस्लिम समाजातील आर्थिक अनिश्चितता, अल्पसंख्यकपणाची जाणीव यांसह बंधुभावासाठीचे उमदे मन हे विषय अभिव्यक्त झाले. या पोर्शभूीवर अजीम नवाज राही यांच्या कवितेचा विचार करता त्यांना असणारा एक ऐतिहासिक समृद्ध वारसा आपणासमोर येतो. नव्वदोत्तर मराठी कवितेत आपली स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या राही यांची कविता जीवनानुभवाचे अस्पर्श्य विषय मांडते. आपल्या
अनोख्या शब्दशैलीने मराठी कवितेत मुक्तहस्ताने भर घालते. तिचे हे निराळेपण आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही बाजूंनी सकस नि भावपूर्ण आहे.
जवळ-जवळ पंचवीस वर्षांपासून काव्यलेखन करणाऱ्या अजीम नवाज राही यांचा आधीचा ‘व्यवहाराचा काळा घोडा’ आणि अलीकडे प्रकाशित झालेला ‘कल्लोळातील एकांत’ असे दोनच पण दर्जेदार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा पहिलाच कवितासंग्रह अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला, तसाच दुसराही ठरत आहे. मराठी कवितेत मोहल्ल्यातले सुख-दुःख खऱ्या अर्थाने राहींच्या कवितेतून आविष्कृत झाले. भांडवलकेंद्री काळातील उद्ध्वस्त जगाच्या वेदनांची, आक्रोशांची मांडणी करते. स्वतःच्या जीवनानुभूतीची अभिव्यक्ती करताना त्याला चिकटून असणारे आपल्या समष्टीचे संघर्ष य जीवनही मांडते. मुस्लिम जीवनानुभवाची रचना करणारी असली तरी ती सर्वसामान्य, गरीब आणि साधनसंपत्तीविहीन अशा माणसांचे संघर्षय जीवनानुभव मांडते, व त्याचवेळी धर्मां धील, जातींमधील समदुःखितांशी आपले नाते जोडते. मोहल्ल्याच्या कवितेत कोंबडा आरवण्यापासून तर रात्री उशीरापर्यंत वेदनांनी कण्हवणाऱ्या व हुंदक्यांनी गुदमरवणाऱ्या मोहल्ल्यास शब्दरूप दिले आहे. व्यवहाराचा धुडगूस घालणारा काळा घोडा आयुष्याचे गणितच दर वेळी चुकवून टाकतो, याचे अनेक संदर्भ ते देतात, तसेच समाज नावाच्या संपादकाने बेदखल ठरवलेल्या माणसांच्या नोंदीही घेतात. व्यवहाराचा काळा घोडा धुडगूस घालायला लागला की, धास्तावते क्षणभर अभिव्यक्ती गरजांच्या वावटळीचा वेग संपला की शब्दां धून रुणझुणतो आशयझरा कागदभर घमघमतो कवितेचा गजरा (व्यवहाराचा काळा घोडा/व्यवहाराचा काळा घोडा, पृ.क्र.२७)
निखळ जगण्याची इच्छा आणि त्याला विसंगत विद्रूप असणारा भोवतालचा व्यवहार यांधून निर्माण होणारा ताण राहींच्या कवितेस आकार देतो. आपण का, कुणासाठी व काय लिहावे या गोष्टींविषयी सुस्पष्टता असावी असे कवी म्हणतो. कवितेवर वास्तवाचा पहारा असला म्हणजे होत नाही दर्बोधतेच्या फौजेचा शिरकाव गावते लेखणीला स्पंदनाचे गाव (व्यवहाराचा काळा घोडा/व्यवहाराचा काळा घोडा, पृ.क्र.२६)
राही यांच्या कवितेतील काव्यानुभूतीची विविधांगी अभिव्यक्ती हे जसे महत्त्वाचे अंग आहे तसेच त्यांच्या अस्तित्वात भिनलेल्या मोहल्ल्याचा जीवनानुभव हासुद्धा मुख्य भाग आहे. त्यांचे ‘स्व’ आणि ‘मोहल्ला’ हे निराळे करताच येत नाही. स्वतःविषयी बोलतानाही त्यामध्ये मोहल्ला हमखास जाणवतो. मोहल्ला म्हणजे केवळ मुस्लिमजीवन नसून मुस्लिमबहुल परिसर त्यामध्ये अंतर्भूत आहे. मोहल्ल्यातील गरीब, लाचार, बेरोजगार, उपेक्षित, शोषित माणसांच्या घसरत्या जगण्याचा आलेख ते मांडतात. मोहल्ल्यातील मग्रुर, घमेंडखोर आणि फसवेगिरीची वृत्तीही अधोरेखित करतात, तसेच प्रतिकूल भोवतालात जगणे उमलवणारी तीव्र जीवनेच्छाही ते मांडतात. धगधगत्या वास्तवाला शब्दरूप देण्याची ही प्रक्रिया सहज नाही. ती कवीला पोळून काढते. आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून आपल्यासह भोवतालचे जीवन वस्तुस्थितीतून मांडणे म्हणजे कविमनाच्या असंख्य जखमा उसवत जाणे आहे. प्रश्नांच्या सरबत्तीत मोहल्ल्याचा दिवस निघतो. नव्या दिवसासोबत येणाऱ्या भणंगतेची मनात धडकी भरवतो. असंख्य प्रश्नांनी भरलेला हा नूर पहाटेच्या उजेडात माणसांच्या चेहऱ्यावर असतो. उठतो पाखरपहाटेत मोहल्ला चोखाळतो रस्ते रोजगाराचे मावळतीपर्यंत बाळगत नाही काळजी भारनियमनाची करत नाही उसनवारी इन्व्हर्टरसाठी वाकळ निश्चिंततेची पांघरून जातो झोपी ‘कलका कल देखेंगे’ म्हणत (मोहल्ल्याचे अंतरंग/कल्लोळातला एकांत, पृ.क्र. २२)
‘वास्तव : काही प्रसंग’ या कवितेत राही यांनी मांडलेले विदारक जगण्याचे संदर्भ हादरवून सोडतात. बायकोच्या निधनाने बेघर झालेला आंधळा रहीमखाँ घरातला कर्ता पुरुष गेला म्हणून उन्मळून गेलेल्या विधवा इत्यादि. हस्नाचा नवरा विटांचा ट्रक उलटून त्याखाली मेल्यावर निराधाराच्या अनुदानाला मंजुरी देताना लिपिक शंभर रुपयाची लाच मागतो. हे वर्णन वाचताना ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ यापेक्षा वेगळे नसावे असेच वाटते. अरबाशी लग्न करून गेलेल्या मुलीची नाही ख्यालीखुशाली वर्षोगणती फोडतात हंबरडा रात्रीअपरात्री रक्कम मेहरची वसूलणारे आईबाप व्यवहारी (वास्तवः काही प्रसंग/कल्लोळातला एकांत, पृ,क्र. १०५)
बालपणीच वाट्याला आलेल्या कष्टांनी होरपळून निघताना कवीला दिलासा गिळाला तो त्याच्या कवितेत. प्रतिकूलतेच्या टायरखाली चिरडताना आली सोशिकता अंगी घु ली दर आघातातून शीळ कवितेची ऊस चरकात पिरगळताना चाकावर निनादणाऱ्या धुंगरासारखी (प्रतिकूलतेच्या टायरखाली चिरडताना/कल्लोळातील एकांत, पृ.१६) उमेदीचे खच्चीकरण करणाऱ्या अभावग्रस्ततेचा पंजा जेव्हा आयुष्याचा गळा घोटतो, तेव्हा क्षणभर ‘आपणच नव्हतो श्वासांच्या गायकीसाठी लायक’ असे कवीला वाटते. रोजगाराचा प्रश्न आणि संसाराच्या अडचणींनी निर्माण होणाऱ्या समस्यांनी वेढले असताना कुठे काम मिळालेच तर आत्मसन्मान हिरावून घेणारी बॉसची मयूरी कवीला घायाळ करते. कवी म्हणतो, राजीनाम्याची आपली भूमिका क्षणात विरते पेल्यातल्या वादळासारखी गरजांच्या वाळवीने केलेला असतो निर्णायकतेचा भुगा (बॉस आणि सरणावरची लाकडे/व्यवहाराचा काळा घोडा पृ.क्र.६४) जीवनावश्यक गरजांच्या परिपूर्तीसाठी स्वतःला तुडवत न्यावे लागणे हे इथल्या कोडग्या व्यवस्थेचे अंतरंग आहे. रोजगारासोबत सन्मान हवा असतो तेव्हा कुठे खरी कल्याणकारक व्यवस्था उभी राहू शकते. मात्र शोषकांच्या हिताच्या व्यवस्थेत सर्वसामान्य मात्र पायदळी तुडविले जात असल्याचे अवतीभवती दिसून येते. कवी या तुडवल्या जाणाऱ्या जगाचा प्रतिनिधी म्हणून समोर येताना दिसतो. जीवनाची गुजराण करण्यासाठी उपेक्षा, अपमान झेलावे लागतात. बॉसच्या दडपणाखाली बरेचदा राहावे लागते. पण कवी या उदास मौसमांनी थबकला तरी थांबणारा नाही. तो संघर्षातही अविरत मार्गक्रमण करतो. मात्र काबाडकष्ट करूनही आयुष्य उजवता आले नाही, याची दुःखरी सल त्याच्या मनात सलत असते. कवी म्हणतो, नाही मिळाला खर्चासाठी पैसा रेलचेल गेले आयुष्य सारे कडकडीत रॉकेलवर ओझे ओढणाऱ्या बाईकला घुट्टी पेट्रोलची दिल्यासारखे (गर्भश्रीमंतीच्या खिडक्या/कल्लोळातला एकांत, पृ.१३)
तुटपुंज्या पगारात घर चालवताना त्याची होणारी ओढताणही असह्य करणारी असते. घरातला कर्ता पुरुष रोज एक प्रकारे मरणच अनुभवत असतो. अशा वेळी त्याला, जिच्यामुळे संसारात सौख्याचे संगीत फुलले अशा, कपाटात चिल्लर जपून ठेवणाऱ्या पत्नीचा आधार वाटतो. विकले सराफा दुकानात मोड म्हणून दागिने जिवापाड जपलेले भागविली अडचण आर्थिक माझी अटीतटीच्या वेळी तू विकले मुलांच्या फीसाठी कोळसे बोटे भाजवून साठवलेले (सौख्याचे संगीत/कल्लोळातला एकांत, पृ.क्र. ६७)
नवबदलानंतरचे बदलते गावखेडे आणि बदलता मोहल्ला यांच्या जगण्यात निर्माण झालेल्या विसंवादाचे रेखाटन ‘ग्लोबल दुधावरची हायटेक मलाई’, ‘जाहिरातीतला कलरफुल वारा’, ‘जबडा एमआयडीसीचा’, ‘ग्लोबल घोडा’ इ. कवितांधून केले आहे. जंगल, जमिनी हडपण्याच्या सत्राचाच एक भाग म्हणता येईल अशा एमआयडीसीच्या जबड्याविषयी कवी म्हणतात, वासलाय जबडा एमआयडीसीचा
घास शेतीवाडीचा घेण्यासाठी सरसावताहेत आधुनिकतेचे बाहू रोखाने गावाच्या माझ्या दंड कारखानदारीच्या विरोधात थोपटण्याची आहे बिशाद कोणाची ?
मुस्लिम समाज पूर्वग्रह आणि वास्तव
जागतिक स्तरावर मुस्लिम समाजाविषयी फार मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरले आहेत. मुस्लिम म्हणजे दहशतवादी-आतंकवादी. असे मानले जाते. त्यामुळे सतत पहाऱ्यात ठेवले गेल्याची दहशत सर्वसामान्य मुस्लिमांना घेरून आहे. आपली प्रामाणिकपणाची ग्वाही वारंवार देऊनही त्यांना आरोपातून मुक्त होता येत नाही. खरे तर दहशतवादी-आतंकवादी कुणा एका धर्माचे नसतात. ते पूर्णत: मानवताविरोधी असतात. ते कुठल्याही धर्मात-जातीत जन्म शकतात. ते माणसांना त्यांचा धर्म बघून मारत नाहीत. एखादेवेळेस जरी ते मुस्लिम समाजाचे असले तरी ते खऱ्या इस्लाम धर्माचे नसतात. खरे तर ते सच्च्या इस्लामच्या विरोधीच असतात. केवळ मुस्लिम आहे म्हणून अमेरिकेने राही यांना विश मराठी साहित्य सेंलनात सहभागी होण्यासाठी नकार दिला होता. ती वेदना ‘अमेरिका’ कवितेत शब्दबद्ध केली आहे. सांत्वन करताना बोलला मोहल्ल्यातला बुजुर्ग कीडोंके साथ गेहको रगडना है कहाँका तरीका? जान दे बेटे! तेरी कवितापे कुर्बान ऐस्या पचास अमेरिका”
(अमेरिका/कल्लोळातला एकांत, पृ.क्र. २९३) बुद्धी गहाण ठेवून सामाजिक शांतता, सद्भावना उद्ध्वस्त करणाऱ्या मूलतत्त्ववाद्यांच्या हिंस्र कृतींनी सामान्य लोकच होरपळून निघतात. खरे तर त्याचा धर्माशी काहीच संबंध नसतो. ह्या द्वेषाची कारणे धर्मात नव्हे तर आर्थिक, सांस्कृतिक राजकारणातच सापडतील. याच वास्तवाचे अनेक संदर्भ कवी देतात. राहींच्या कवितेतील आशयाचा हा संपन्न पट आपल्या प्रभावी अभिव्यक्तीने लक्षणीय ठरतो. त्यांच्या कवितेतील आशयाप्रमाणेच त्यासाठीची भाषाही अनोखी आहे. आपल्या भावपूर्ण, सहज अभिव्यक्तीतून तिची नजाकत कवी स्वाभाविकपणे मांडतो. वास्तवाला शब्दरूप देताना आलंकारिक होणारी त्यांची भाषा मात्र शब्दावडंबर माजवत नाही, हे विशेष. त्यांची साधीसरळ, अर्थपूर्ण अशी भाषिक समृद्धता आणि सुभाषितांची पेरणी काळजावर ठसणारी आहे. आपल्या आशयाभिव्यक्तीसाठी त्यांनी वापरलेला मुक्तछंददेखील स्वाभाविकपणे येतो. त्यांच्या कविता आंतरिक लयीने भावार्थ उलगडत नेतात. त्यांच्या कवितेतील प्रतिमा-प्रतीकांची निराळी अदाकारी एक स्वतंत्र अभ्यासविषय ठरावा. त्यांच्या कवितांचे शीर्षक घ्या की कवितां धील ओळी, त्या प्रतिमांनी डवरलेल्या दिसतील. त्या प्रतिमा जगण्याचा स्वाभाविक भाग म्हणून येतात. ‘ग्लोबल मेंदीची नक्षी’, ‘डिजिटल नागवणूक’, ‘आशयाचा तहानलेला घोडा’, ‘भाषेत नाकारलेल्या शब्दांची दंगल’ यांसारख्या कवितांची शीर्षके जशी आशयगर्भ आहेत, तशाच कवितेतील ओळी पुराच्या घोंघावणाऱ्या पाण्याने हादरतात काठालगतची गावे पण पाण्याच्या खवळलेपणाची घेत नाही फुलांचे डोळे नोंद, प्रत्येक घटका गोंदून ठेवायची गनाला सवय जडली की, वेदनांची हमाली करत पोचते आयुष्ययात्रा वजाबाकीच्या प्रदेशात अन् शून्यांचे कलेवर उठविण्यापलीकडे उरत नाही हाती काही (गणगोत/व्यवहारांचा काळा घोडा, पृ.क्र. ४४)
कविता काळजात मुक्कामाला आल्यापासून ओसांडायला लागते जगण्याचे काठ; (कविता आणि तत्त्वज्ञानाची फुले/व्यवहाराचा काळा घोडा, पृ.८६) यांसारखे प्रतिमांकन आशयाला सरळ भिडवते. काही कवितां ध्ये सुभाषितवजा मांडणीही केलेली दिसते, जसे – अडाणी श्रीमंतांकडे गुणवत्ता गहाण असते शेवटी अर्थाचे मोल महान असते (वलय/व्यवहाराचा काळा घोडा, पृ.क्र. ६३)
शब्दाना श्वास मानणाऱ्यांच्या हळवेपणाला पाहावले जात नाही फुलपाखराचे मरण (कविता आणि तत्त्वज्ञानाची फुले/व्यवहाराचा काळा घोडा, पृ.८५)
काजव्यांवर अधिकारवाणीने आसूड उगारताना दिव्याने पडताळावा आधी तळातला पारंपरिक अंधार. (दिवा आणि पारंपरिक अंधार/व्यवहाराचा काळा घोडा, पृ.९५)
एकूण राही यांची कविता मराठी कवितेत निराळी जाणवते. यामागे या कवितेचा अपूर्व आशय, तिची साधीसरळ पण सौंदर्यपूर्ण, अभिव्यक्ती आहे. देशातल्या महत्त्वपूर्ण घटितांची प्रांजळ अभिव्यक्ती करताना तिने केलेल्या माणूसपणाच्या, बंधुभावाच्या आणि अमन – शांततेच्या अपेक्षाही मोलाच्या आहेत.
सहयोगी प्राध्यापक, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. मो. नं. ९४२२१५५०८८
सदंर्भः
१) व्यवहाराचा काळा घोडा, अजीम नवाज राही, मुक्तछंद प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती २००४,
२) कल्लोळातला एकांत, अजीम नवाज राही, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती २०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.