सरड्यांमधील लिंग गुणोत्तर – जादा नरसंख्येचा परिणाम

बहुसंख्य भारतीयांना अपत्य म्हणून मुलगे हवे असतात, आणि मुली नको असतात. पूर्वी मुलगी जन्मल्यास तिला मारून टाकायचे प्रयत्न केले जात असत. हेळसांड, अन्न तुटवड्याच्या काळांत उपासमार, हेही नित्याचे होते. आज गर्भजलपरीक्षा, अल्ट्रासाऊंड वगैरे तंत्रे वापरून मुलींना भ्रूणावस्थेतच ‘हेरून’ मारून टाकले जाते. या सर्व वृत्तींवर, त्या अनिष्ट असण्यावर मेगाटनांनी कागद आणि किलोलीटरांनी शाई खर्च झाले आहेत (तोंडच्या वाफेची तर गणतीच नाही.).
एकेकाळी असे मानले जात असे, की या ‘मुलगाच हवा’ वृत्तीमुळे मुलींचा तुटवडा उत्पन्न होईल. वंशवृद्धीसाठी आवश्यक अशा मुली दुर्मिळ होतील. यामुळे त्या ‘मूल्यवान’ ठरून त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मानसन्मानाने वागवले जाईल. यामुळेच गेल्या शतकाच्या सुरुवातीला जन्मलेल्या एक विदुषी त्राग्याने म्हणून गेल्या, “मारू द्या मुलींना. मग तरी आम्हाला स्केअर्सिटी व्हॅल्यू येईल!”
पण सातत्याने स्त्रियांचे पुरुषांशी प्रमाण सुमारे 925 / 1000 असे असून, काही भागांत तर 725/1000 इतके ते घटूनही स्त्रियांना जास्त मान मिळताना दिसत नाही.
7 ऑक्टोबर 2003 ला रात्री 9.00 च्या बातम्यांमध्ये एनडीटीव्ही या दूरदर्शन वाहिनीने ही ‘स्टोरी’ दाखवली: कर्नाल या हरियाणातील गावातील एका श्रीमंत शेतकऱ्याने उत्तरप्रदेशातून एक मुलगी विकत घेतली, किंमत रु. 12,000. आपल्या मुलापासून या मुलीला दोन अपत्ये झाल्यानंतर ती मुलगी रु.7000 ला आणखी एका गरजूला विकली गेली. मुलीचे वाढलेले वय, सिद्ध झालेला उपजाऊपणा, घसारा, आणि अखेर मागणी-पुरवठा प्रमाण, या साऱ्यांचा विचार करूनच मूल्य ठरले असणार. पण ते मूल्य त्या मुलीला मिळाले नाही. मानसन्मान मिळणे दूरच राहून तिची एक क्रयवस्तू झाली.
त्यानंतरही स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त असण्याचे प्रमाण वाढतेच आहे, कारण स्त्रीभ्रूणहत्या कमी होत नाही आहेत. सोबतच स्त्रियांवर अत्याचार होणे, अॅसिड फेकले जाणे, ‘साधे’ बलात्कार, सामूहिक बलात्कार, सारे वाढते आहे.
पण हा सारा समाजशास्त्रीय, क्वचित धर्मशास्त्रीय, नीतिशास्त्रीय विचार झाला. काही वर्षांपूर्वी जीवशास्त्रातून काही संशोधन काही वेगळ्याच सूचना पाठवू लागले.
नैसर्गिक अवस्थेत प्रत्येक जीवजातीत काहीएक जवळपास ठरीव लैंगिक प्रमाण असते. यात ऋतूंप्रमाणे, क्षेत्रांप्रमाणे थोडेफार बदल होतात. ते संख्याशास्त्रीय मोजमापांत फारसे महत्त्वाचे नसतात. जर काही कारणाने हे प्रमाण बदलले तर काय होईल?
पारंपरिक जीवशास्त्र सांगते, की काही काळाने मूळ नैसर्गिक प्रमाण पुन्हा गाठले जाईल(च). यासाठी सुचवली गेलेली यंत्रणा एका उदाहरणाने समजून घेता येते.
एका क्षेत्रात काही हरणे राहतात. त्यांच्या प्रजातीत साधारणपणे एका काळविटामागे दोन हरिणी असे प्रमाण दिसते. आपल्या अभ्यासाच्या क्षेत्रात पंधरा काळवीट व तीस हरिणी अशी हरिणसंख्या होती. एका शिकारीच्या घटनेनंतर मात्र पंधरा काळवीट व वीसच हरिणी, अशी स्थिती घटली. आता हरिणींची संख्या पाहता केवळ दहाच काळविटांना जोडीदार मिळू शकतात, तर पाच काळवीट गरज नसलेले, अनवश्याधिक (redundant) होतील. तसेही काळवीट जोडीदारांवर छाप पाडायला एकमेकांशी झुंजतातच, पण आता या झुंजी जास्त हिंस्र, जास्त घातक होतील. एरवी सबळ काळविटांना सबळ हरिणी लाभणे, दुबळ्या काळविटांना कमकुवत हरिणींवर समाधान मानावे लागणे; येवढाच क्रम झुंजींमधून ठरतो. आता मात्र झुंजींत पराभव म्हणजे वंशविलोपन, प्रजा घडवताच न येणे! त्यामुळे झुंजींमध्ये दोन काळवीट जबर इजा होऊन अकाली मरतील. तरीही तीन काळवीट एकांडेच उरतील. त्यांना कळपात स्थान आणि मान नसेल. ते लवकरच कळप सोडून जातील, आणि शिकाऱ्यांचे भक्ष्य बनतील. आणि अखेर निसर्गात नेहमी भेटणारे एक नर: दोन माद्या प्रमाण नव्याने प्रस्थापित होईल.
प्रत्यक्षात असे होते का, हे तपासायचा एक प्रयत्न काही फ्रेंच-युरोपीय शास्त्रज्ञांनी केला (या संशोधनाचा तपशील www.pnas.org/cgi/doi/10.1073/ pnas.0505172102 या संकेतस्थळावर भेटेल. प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS ) च्या 13 डिसें. 2013 च्या खंडात तो प्रकाशितही झाला आहे.).
आधी एका विशिष्ट प्रकारच्या सरड्यांमधील नर मादी प्रमाण निसर्गात काय आहे, ते तपासले गेले. मग बारा 12 मीटर औरसचौरस अशी क्षेत्रे घडवली गेली. प्रत्येक क्षेत्र इतर क्षेत्रांपासून प्लास्टिकच्या पडद्यांनी सुटे केले गेले. पक्ष्यांनी सरडे खाऊन टाकू नयेत यासाठी सर्व क्षेत्रे जाळ्यांनी झाकली गेली.
आता या क्षेत्रांपैकी सहा क्षेत्रांत नरांचे प्रमाण नैसर्गिक प्रमाणापेक्षा जास्त, नर- बहुल केले गेले, 4 माद्या व 14 नर; तर उरलेल्या क्षेत्रांना मादी – बहुल केले गेले, 4 नर व 14 माद्या सर्व क्षेत्रांमधल्या सरड्यांची प्रजा कशीकशी बदलते याचा तरल आणि तपशीलवार अभ्यास केला गेला.
या सरडा प्रजातीत संभोगाच्यावेळी नर माद्यांना चावतात. यामुळे चाव्यांचे व्रण संभोग किती वेळा झाला ते दर्शवतात. काही माद्यांना संभोगाच्यावेळी पाठीला इजा होते. या इजा गंभीर असतात, आणि संभोगातली जबरदस्ती दाखवतात. आता नर – बहुल आणि मादी – बहुल क्षेत्रांमधल्या ‘प्रेम’चाव्यांची संख्या आणि पाठीच्या इजांची संख्या मोजली. आकडे एका क्षेत्राची सरासरी नोंदतात.
‘प्रेम’चावे पाठीच्या इजा
नर-बहुल 3.62 15.76
मादी – बहुल 1.49 5.51
म्हणजे नर-बहुल क्षेत्रांत मादी – बहुल क्षेत्रांपेक्षा सुमारे अडीच-तीनपट संभोग झाले, व तेही हिंस्र स्वरूपात केले गेले.
या निरीक्षणांवर बेतलेली संगणक प्रतिमाने (computer models) बनवून या हिंस्रतेचा एकूण प्रजाती टिकणे नष्ट होणे याच्याशी संबंध तपासला गेला. निष्कर्ष असा, नैसर्गिक प्रमाणापेक्षा वेगळी प्रमाणे प्रजातीचे विलोपन ( extinction) होण्याची शक्यता वाढवतात. आणि नर- बहुल क्षेत्रांत नर हिंस्र झाल्याने ही विलोपनाची, ‘संपून जाण्याची’ शक्यता झपाट्याने वाढते.
नर- बहुलता नरांना माद्यांप्रति हिंस्र बनवते. याने नर- बाहुल्य आणखी वाढते, आणि सगळी प्रजाच नष्ट होण्याचा धोका वाढतो. (… sexual aggression by males can rapidly amplify male bias and cause population collapse).
******
‘मुलगा हवा’ ही भावना फक्त भारतातच दिसते असे नाही. चीन, एकूण आशिया खंड, आफ्रिका, या सर्व क्षेत्रांत हा son preference दिसतो.
सरड्यांमध्येच (Lacerta vivipara) नर-बाहुल्य हानिकारक ठरते असेही नाही.
बिया खाणाऱ्या किड्यांमध्ये (seed eating true bugs) नरांचे प्रमाण वाढून ते माद्यांना जास्त त्रास देऊ लागतात, आणि याने माद्यांचा प्रजननाचा दर थेट अर्धा होतो.
मासे जर काही कारणाने नर- बहुल अवस्थेत गेले, तर माद्यांना जास्त वेळ संभोगात (वा तो टाळण्यात!) घालवावा लागतो. यामुळे त्या पोटभर अन्न शोधून खाऊ शकत नाहीत. याने प्रजनन क्षीण होते.
ऑस्ट्रेलियातील एका बेडकाच्या जातीत (Crinia georgiana) नरांचे प्रमाण वाढल्यास वाढीव संभोगाने माद्या गुदमरून मरू लागतात. त्या जरी मेल्या नाहीत तरी त्या ‘फळण्याचे’ प्रमाण घटते.
हवाई द्वीपसमूहात ‘मंक सील’ (Monk Seal, Monachus Schaunslandi) हा सस्तन जलचर भेटतो. ती प्रजा काही कारणाने नरबहुल झाली आहे. प्रौढ नर प्रौढ माद्यांशी जास्त हिंस्रपणे वागू लागले आहेत. ती जीवजात नष्ट होण्याच्या, कडेलोटाच्या स्थितीत आहे.
किडे, मासे, बेडूक, सरडे, सस्तन जलचर… माणूस !
माणूस माद्या आजच स्वतःचे अन्न कमावताना बिचकतात, विशेषतः भारतीय महानगरांत, त्यातही दिल्लीत! त्याऐवजी कमाई भरपूर असलेला नर-नवरा शोधणे, त्यासाठीं नर-बापाने खर्च करणे, हुंडा देणे, वगैरे पर्याय बहुतेकांना चालतात.
अपहरणे, बलात्कार इत्यादी मात्र वाढतच आहेत.
193, मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर 440010.

ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी नफ्याचे उद्दिष्ट बाळगून कार्य करणारी पण त्याचवेळी इंग्लंडच्या साम्राज्यवादी विस्ताराच्या, युरोपीय राष्ट्रांच्या सत्तासंघर्षाच्या व त्यामधून उत्पन्न झालेल्या साम्राज्यवादी विस्ताराच्या राजकारणात सक्रिय असलेली कंपनी होती. 1750 नंतर एकदा तिचे रूपांतर एका भारतीय राज्यसत्तेत झाल्यावर, उपलब्ध संधींचा पद्धतशीरपणे फायदा उठवीत तिने सगळा उपखंड ताब्यात घेतला. पण इंग्लंडच्या साम्राज्याचे एक उपांग म्हणूनच तिने भारतावरील राज्याकडे पाहिले. येथील राजेरजवाड्यांचे तिने निरुपद्रवी शोभिवंत कळसूत्री बाहुल्यांमध्ये रूपांतर केले. येथील अर्थव्यवस्थेचे खच्चीकरण केले. एका अर्थी, येथील अभिजनवर्गाला अपंग व निकामी बनवले; इंग्रजी राज्याचे चाकर म्हणूनच त्यांना गौण भूमिका बहाल केली. येथील प्रजेला रोजगार / व्यवसायविहीन, निःशस्त्र व निस्त्राण बनविले. येथील एकेकाळची भरभराटलेली, जोमदार समाजव्यवस्था पार मोडकळीला आणून ठेवली…
वसंत पळशीकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.