पुरोहित राजा आणि राजधर्म

आज (२३ एप्रिल २०१४) सर्व पत्रपंडित आणि ‘पोल’पंडित एकमुखाने सांगत आहेत की येत्या १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदाची वस्त्रे मिळतील. मतभेद असलेच तर भाजपचे संख्याबळ, सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून व आघाडीबाहेरून किती मदत लागेल, त्या मदतीसाठी काय मोल द्यावे लागेल, वगैरे तपशिलाबाबत आहेत.
इथपर्यंत पोचण्यासाठी मोदी, त्यांचा पक्ष भाजपा, त्यांचे ‘माहेर’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या सर्वांनी गेले सहा महिने मोदींची जनमानसातील प्रतिमा बदलण्याचा चंग बांधला आहे. संघ प्रचारक, कट्टर हिंदुत्ववादी, तितकेच कट्टर मुसलमानद्वेष्टे, ही मोदींची प्रतिमा पुसून एक सेक्युलर विकासपुरुष अशी प्रतिमा रेखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.
प्रश्न प्रतिमेपुरता न ठेवता प्रत्यक्षाकडे रोख वळवला तर येणारे सरकार कसे दिसेल ?
रा.स्व.संघ व एकूणच संघ-परिवार कोणता मुद्दा राजकीय, कोणता धार्मिक, कोणता सांस्कृतिक वगैरे बाबींमध्ये गोंधळ घालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. २००४ साली जेव्हा पहिले यूपीए सरकार निवडून आले, त्या संध्याकाळी संघप्रवक्ते राम माधव काहीतरी चुकून बोलून गेले. त्यांना या पराभवाचे कारण काय असे विचारले असता ते म्हणाले, ‘मागील वेळी राम-मंदिराचा मुद्दा होता. यावेळी आम्ही तसला भावनिक, चुकलो, राजकीय (emotional, sorry, political) मुद्दा मांडण्यात अयशस्वी ठरलो (!). तेव्हा मोदींच्या प्रचारमोहिमेतले सर्वच दावे सांभाळूनच स्वीकारायला किंवा नाकारायला हवेत.’
मोदी वृत्तीने सेक्युलर नाहीत, हे वारंवार दिसले आहे. २००२ च्या गोध्रा घटनेनंतरच्या दंगलींत जे काही घडले, ते नक्कीच सेक्युलर नव्हते. आज त्या दंगलीबाबत सर्वोच्च न्यायालयानेही मोदी सरकारला ‘क्लीन चिट’ ( जो शब्दप्रयोग बहुतेक मराठी वृत्तपत्रे ‘क्लिन चीट’ असा लिहितात!) दिल्याचे सांगितले जात आहे. कोणतेही न्यायालय अशा स्वच्छ चिठ्या देत नसते. ते फक्त सांगू शकते की उपलब्ध पुराव्याने अमुकतमुक गुन्हा सिद्ध होत नाही. आणि सत्तारूढ सरकारांविरुद्ध पुरावे नेहमीच दुबळे असतात. न्यायालयांची वकिली शिस्त न पाळता कनिष्ठ सहकाऱ्याला जाब विचारणारे अटलबिहारी वाजपेयी मात्र मोदींना राजधर्म का पाळला नाहीस? असेच म्हणाले. त्यांना राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक वगैरे क्षेत्रांत गल्लत करणे रुचले नव्हते. तेव्हा माझ्या मते तरी बोलले काहीही जावो, मोदी सेक्युलर सरकार न देता हिंदुत्ववादी शासनच पुरवू शकणार आहेत. त्याचे बरेवाईट परिणाम मात्र आपण भोगणार!
(पुरोहित राजा, Priest King, ही मोहेंजोदडो उत्खननात सापडलेली एक अत्यंत सशक्त प्रतिमा आहे. त्यातील व्यक्तीच्या चेहेऱ्यावर करारी आणि निष्ठुर भाव आहेत. येणारे दिवस कसे असतील याची चाहूल देणारे पुरोहित राजा हे व्यंग्यचित्र अर्जुन गुहा यांनी रेखाटले आहे.)
******** ******** ********
ब्राह्मणेतर चळवळीचे जनक व प्रारंभिक काळातील नेते होते एक महान माळी, महात्मा जोतिबा फुले (१८२७-१८९०). मराठा या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या व संख्येने सर्वांत मोठ्या शेतकरी जातीने या चळवळीचा शक्य तेवढा विकास करण्यात पुढाकार घेतला. या चळवळीच्या अंतिम अवस्थेने सिद्ध केले, की तिचे तत्कालीन पुढारी त्यांच्या जातींच्या उदयोन्मुख ग्रामीण भांडवली शक्तींचे राजकीय प्रतिनिधी होते; म्हणून ते या ‘शेटजी-भटजीविरोधी’ चळवळीचे वर्ण जातींच्या सरंजामशाही-भांडवलशाहीविरोधी मूलगामी लढ्यात रूपांतर करू शकले नाहीत. यामुळेच ब्राह्मणेतर चळवळ राष्ट्रीय चळवळीत विलीन होताच अस्पृश्यांची चळवळ डॉ.आंबेडकर या थोर अस्पृश्य नेत्याच्या नेतृत्वाखाली पुढे सरसावली व विकसित झाली. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी महनीय कार्य करण्यावर न थांबता त्यांनी अस्पृश्यांना बौद्ध धर्मात नेऊन त्यांच्यावरील शतकानुशतकांच्या धार्मिक व सामाजिक जुलु ला मूठमाती द्यायचे व भांडवलदारी लोकशाहीवादी मार्गाने त्यांना राजकीय मुक्तीप्रत न्यायचे प्रयत्न केले. म्हणून ते आपली चळवळ ब्राह्मणेतर चळवळीचीच पुढची मजल असल्याचे मानीत.
शरद पाटील (दास-शूद्रांची गुलामगिरी मधून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.