ओळख अर्थशास्त्रज्ञांची (३) – डेविड रिकार्डो (१८ एप्रिल १७७२ – ११ सप्टेंबर १८२३)

अॅडम स्मिथ ने मांडलेल्या आशावादाला जेव्हा माल्थसने सुरुंग लावले तेव्हा बहुतांश लोकांना डेविड रिकार्डो च्या आशावादाने तारले. घरातून व समाजातून बहिष्कृत केलेल्या त्याच्या आयुष्यात त्याने एक अत्यंत यशस्वी उद्योजक, उत्तम गुंतवणूकदार व नंतर मोठा जमीनदार, ख्यातनाम अर्थशास्त्र- पंडित होण्याचा व आयुष्याच्या शेवटी शेवटी तर ब्रिटिश संसदेमध्ये जागा मिळवण्याचा मान मिळवला होता. अर्थशास्त्राचा प्रकांड पंडित म्हणून त्याचा इतका मान होता की इंग्लंडच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला अर्थशास्त्रावरील त्याचे विचार मांडण्यासाठी बोलाविले होते. त्याकाळी व आजसुद्धा अॅडम स्मिथनंतर सर्वात प्रभावशाली अर्थशास्त्री म्हणून त्याचे नाव घेतले जाते.. कोण होता हा तरुण आणि त्याने जगाला नेमके सांगितले तरी काय?

जन्म आणि पुढील आयुष्य : डेविड रिकार्डोचा जन्म लंडन येथे 18 एप्रिल 1772 मध्ये झाला. त्याच्या 17 भावंडापैकी हा तिसरा. त्याचे आईवडील ज्यू होते व पोर्तुगाल डच रिपब्लिकमधून इंग्लंडला नुकतेच स्थलांतरित झाले होते. डेविड्चे वडील हे निष्णात रोखेदार होते. डेविडने वयाच्या 14 व्या वर्षीच वडिलांना कामामध्ये मदत करणे सुरू केले. वयाच्या 21 व्या वर्षी तो एका परधर्मीय स्त्रीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी विवाह केला. यामुळे रागावून त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले व पर्यायाने धर्माबाहेरसुद्धा. या आघातातून स्वतःला सावरत त्याने स्वतःचा नवीन धंदा सुरू केला व त्यात भरपूर नफा मिळवला. वयाच्या 42 व्या वर्षी त्याने कामकाजातून निवृत्त व्हायचे ठरविले. तोपर्यन्त त्याने 10 ते 15 लाख पौंड एवढी संपत्ती जमविली होती. डेविडने प्रमुख्याने वाटरलूच्या लढाईत एक खबऱ्या पाठविला होता. त्याच्याकडून मिळालेल्या महितीनुसार रिकर्डो सट्टे बाजारातील रोखे खोटी भीती पसरवून विकायचा व नंतर स्वतःच ते सर्व रोखे कमी किंमतीत विकत घ्यायचा. त्याचे म्हणणे असायचे की कोणत्याहि घटनेचे आकलन करताना लोक अगदी टोकाची भूमिका घेऊन प्रतिक्रिया देत असतात किंवा वागत असतात. याचा फायदा घेऊन त्याने त्यावर्षी सट्टाबाजारात अतोनात कमाई केली.

वयाच्या 27 व्या वर्षी रिकर्डो ने ॲडम स्मिथ चे The Wealth of Nations हे पुस्तक वाचले. या पुस्तकाने प्रभावित होऊन त्याचे लक्ष अर्थशास्त्राकडे वळले. वयाच्या 37 व्या वर्षी त्याने अर्थशास्त्रावर आपले पहिले पुस्तक लिहिले. यानंतर त्याने अर्थशास्त्रावर अनेक लेख, पुस्तके लिहिली. विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र शिकविले. 1818 मध्ये इंग्लंडच्या संसदेमध्ये एक सीट मिळवली. त्यापुढील 4 वर्ष ते या पदावर राहिले.

अर्थशास्त्रात त्यांनी मांडलेले नवे विचार : त्या काळी फ्रेंच इंग्लंड युद्धामुळे फ्रांसने त्यांच्या बँकेत असलेले सर्व ब्रिटिश चलन गोठविले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये ब्रिटिश चलनाचा फ़ार तुटवडा होता. यावर उपाययोजना म्हणून ब्रिटिश चलन जास्त प्रमाणात छापून लोकांपर्यन्त पोहोचविले गेले. पण यामुळे ब्रिटिश चलनाचे आंतरराष्ट्रीय बाजारात अवमूल्यन होऊन महागाई प्रचंड वाढली. या तथ्याबद्दल रिकार्डोने 1809 मध्ये लिखाण केले व बँकेच्या या चुकीच्या धोरणाबद्दल टीका केली. शेवटी बुलियन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली गेली व रिकार्डोच्या म्हणण्यातील तथ्य सर्वांनी मान्य केले. हे प्रकरण तेव्हा bullion controversy म्हणून गाजले.

इ.स. 1815 मध्ये त्याने प्रसिद्ध केलेल्या एक निबंधात (on the Influ- ence of a Low Price of Corn on the Profits of Stock) diminishing marginal returns ही अर्थशास्त्रातील अतिशय प्रसिद्ध अशी संकल्पना मांडली. जेव्हा कोणत्याही उत्पादनासाठी अधिकाधिक साधन संपत्ती एकत्रित करून सीमित अशा भांडवलाशी जोडली जाते, उत्पन्न हळूहळू कमी होत जाते. उदाहरणार्थ, जेव्हा जास्त मजूर आणि जास्त यंत्रे यांना एका सीमित प्रदेशावर शेतीसाठी वापरले जाते तेव्हा त्यातून येणारे उत्पन्न हे तेव्हा त्यातून मिळणारे मजूर आणि यंत्राची संख्या वाढविल्यानंतरही त्यामानाने कमीच राहते. यात तेवढ्याच जागेवर शेती करणे’ हे सीमित भांडवल आहे.

रिकार्डोने तत्कालीन Corn Laws वर सुद्धा टीका केली. इंग्लंडमध्ये जेव्हा युद्धामुळे महागाई प्रचंड वाढली होती तेव्हा व्यापाऱ्यांनी गहू आयात करून धान्याच्या किंमती कमी राहतील याची काळजी घेतली. (त्यांना या व्यापारामुळे मिळणाऱ्या नफ्यापोटी). परंतु याच्यामुळे जमीनदारांचे नुकसान होऊ लागले कारण त्यांचे उत्पादन कमी किंमतीत विकले जाई. यावर उपाय म्हणून जमीनदार, ज्यांचे संसदेमध्ये प्राबल्य होते, यांनी या आयातीवर भरमसाठ कर लावायला सुरुवात केली व पुढे पुढे तर या आयातीवर संपूर्ण बंदीच आणली. याला Corn Laws असे म्हणतात. याच्यामुळे जमीनदारांची प्रचंड भरभराट झाली असली तरी सामान्य जनता मात्र महागाईत होरपळून निघाली.

अशाप्रकारे रिकार्डोने मुक्त बाजारपेठेचे समर्थन केले व असे करणारा तो पहिला अर्थशास्त्रज्ञ ठरला. मुक्तबाजारपेठेचे समर्थन करताना रिकार्डोने COMPARA- TIVE ADVANTAGE ची वेगळीच संकल्पना मांडली. या अतिशय सूक्ष्म अवलोकनात त्याने मांडलेले मुद्दे हे आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया बनले आहेत. त्याच्यामते एखाद्या देशाला एखादे उत्पादन दुसऱ्या देशातून कमी किंमतीत मिळत असेल तर ते स्वतःच्याच देशात बनविण्याचा हट्ट करू नये. म्हणजेच, आपल्या देशात कोणते उत्पादन बनविण्यात आपल्याला प्रावीण्य आहे हे ओळखणे तर जरूरीचे आहेच, परंतु त्याहीपेक्षा कमी किंमतीत ते कोठे मिळत असल्यास ते तेथून घ्यावे व आपली भौगोलिक व इतर परिस्थिती बघून आपल्याला जे काही सर्वात चांगले व कमी किंमतीत बनविणे जमते, तेच बनवून इतरांना विकावे. ह्याच्या पुढे त्याने असाही विचार मांडला आहे की एखाद्या राष्ट्राला जर दोन उत्पादनांपैकी दुसऱ्या राष्ट्रापेक्षा कमी साधनसंपत्ती लागत असली तरीही, दोघांनी त्यातील एकच उत्पादनावर लक्ष देऊन त्याची एकमेकांसोबत देवाण-घेवाण केल्यास दोघांचाही फ़ायदा होतो.

उदाहरण देताना त्याने इंग्लंड आणि पोर्तुगाल मध्ये गहू आणि वाईन निर्मितीसाठी लागणारे श्रमांचे तास व साधन-संपत्ती व त्या दोघांनी व्यापार केल्यावर येणारे उत्पन्न याचा तौलनिक अभ्यास केला आहे. Table 1 देश गहू एका युनिटचा खर्च (मनुष्यतास) दारू एका युनिटचा खर्च (मनुष्यतास) इंग्लंड 15 30 पोर्तुगाल 10 15 पहिल्या तक्त्यात आपण बघितले की इंग्लंडला एक बाटली वाईन बनविण्यासाठी ब्रेडपेक्षा दुप्पट तर पोर्तुगालमध्ये दीड पट वेळ लागतो. ह्यालाच वेगळ्या शब्दांत असेही म्हणता येईल की इंग्लंडमध्ये वाईनच्या दोन बाटल्या दिल्या तर ब्रेडचे चार तुकडे, तर पोर्तुगालमध्ये ब्रेडचे तीनच तुकडे मिळतील. आता असे गृहीत धरू या की इंग्लंडकडे काम करायला 270 मनुष्यतास आहेत. या वेळेत ते 8 ब्रेडचे तुकडे आणि 5 वाईनच्या बाटल्या बनवू शकतात. पोर्तुगालकडे यापेक्षा कमी म्हणजे 180 मनुष्यतास आहेत. परंतु ते कामात हुशार आहेत आणि एवढ्याच कालावधीत ते 9 ब्रेडचे तुकडे आणि 6 वाईनच्या बाटल्या बनवू शकले. आता त्यांनी एकत्र मिळून 17 ब्रेडचे तुकडे आणि 11 वाईनच्या बाटल्या बनविल्या आहेत. हे खालील तक्त्यात आपण बघू शकतो.

Table 2 उत्पादन देश व्यापारापूर्वी व्यापारानंतर गह् वाइन गह वाइन इंग्लंड 8 5 18 0 पोर्तुगाल 9 6 0 12 एकूण 17 11 18 12 परंतु जर त्यांच्यात व्यापार घडून आला आणि त्यांनी त्यांना सोईची आणि फायद्याची एकच वस्तू बनविण्याचे ठरविले तर काही नवे समीकरण तयार होते. यातून असे दिसून येते की इंग्लंडने जर ब्रेडच बनविले आणि पोर्तुगालने वाईन तर दोघांना आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेला एक ब्रेड आणि एक बाटली वाईन एवढा अतिरिक्त फायदा होतो आहे.

रिकार्डोने थॉमस माल्थस सोबत भाडे (रेन्ट) या संकल्पनेबद्दल सांगितले. यात त्याने स्पष्ट केले की जेव्हा जास्तीतजास्त जमीन लागवडीखाली येते तेव्हा शेतकरी हलक्या प्रतीच्या जमिनीचीसुद्धा मशागत करतात. यात त्यांना घेतलेल्या कष्टाएवढा नफा मिळत नसतो. परंतु त्या जमिनीवर निघालेला एक किलो गहू आणि चांगल्या जमिनीवर निघालेला एक किलो गहू यांची किंमत एकसारखीच राहील. ह्यामुळे, चांगल्या प्रतीच्या जमिनीवर पिके घ्यायला मिळावीत म्हणून शेतकरी जमीनदारांना जास्त पैसे मोजत असतात. परिणामी शेतकरी हा कितीही कष्ट करून, आहे त्याच स्थितीत राहतो आणि जमीनदार मात्र काही न करता श्रीमंत होत जातो. हा जो जमिनीच्या प्रतीनुसार जादा पैसा आकारला जातो, त्याला त्याने भाडे ही संज्ञा दिली आहे.

या संकल्पनेवरून आपल्याला आकलन होते की जेव्हा सरकार बाजारभावाला चांगली किंमत देते तेव्हा शेतकऱ्याचा कमी आणि इतरांचा जास्त फायदा होत असतो. टॅक्सीचे भाढे वाढल्यावर टॅक्सीचालकाची नव्हे तर टॅक्सीमालकाची भरभराट होते.

On the Principles of Political Economy and Taxation (1817), या त्याचा लिखाणामध्ये त्याने Iron Law of Wages वर भाष्य केले आहे. त्याच्या मते कितीहि प्रयत्न केले तरी कामगाराची खरी मिळकत कधीच वाढणार नाही, ती नेहमी त्याचे जेमतेम भागेल इतकीच असेल. कारण जसे कामगारांचे पगार वाढतील तशा वस्तूंच्या किंमतीसुद्धा वाढतील. याउलट उदाहरण घेऊन पाहू. वस्तूंच्या किंमती वाढल्या की कामगाराचा रोजगारसुद्धा वाढेल. परंतु कामगाराकडे अधिक वेतन येऊनसुद्धा काहीच शिल्लक राहणार नाही.

तसेच व्यापारातून नफा मिळवून परत गुंतवणूक करायची असेल तर कामगारांचे पगार त्याला ठेवावेच लागतील. कारण जर पगार वाढविले तर मिळणारा नफा हा कमी असेल आणि नवी गुंतवणूक कमी-कमी होत गेल्यामुळे अर्थव्यवस्था मंद होईल.

याही पुढे जाउन रिकार्डो सांगतो की जमीनदारांचे हित हे बाकी व्यापारी आणि कामगार वर्गाच्या हिताच्या अगदी विरुद्ध असते. कामगार काम करतात, व्यापारी जोखीम उचलतात परंतु शेवटी सर्वात जास्त फायदा होतो तो जमीनदारांचाच.

आयुष्यातील इतर घडामोडी : अर्थशास्त्राच्या संदर्भात कितीही क्लिष्ट मांडणी असली तरी तिचे उत्तम प्रकारे आकलन करून घेऊन सोप्या व प्रभावी पद्धतीने ती लोकांसमोर मांडण्यात डेव्हिड रिकार्डो ह्यांचा हातखंडा होता. त्यासाठी त्यांना कुठल्याही गणितीय पद्धतीची गरज भासली नाही. परंतु आजच्या घडीला रिकार्डोने जे काही सांगितले आहे ते समजून घेण्यासाठी गणितीय प्रमेये वापरावीच लागतात.

यामुळेच तत्कालीन लोकांमध्ये रिकार्डोबद्दल दरारा तर होताच, पण त्याने सांगितलेले फारसे कुणाला उमजत नसे.

डेविड रिकार्डो, जेम्स मिल आणि थॉमस माल्थस हे तिघेही खूप चांगले मित्र होते. ते नेहमी एकमेकांना भेटत, पत्र लिहीच, विविध विषयांवर चर्चा करीत व वादही घालीत. अनेक विषयांवर त्यांची परस्परविरोधी मते असत, पण त्यांच्या मैत्रीमध्ये व सामाजिक आयुष्यात यामुळे कधीच कटुता आली नाही.

आयुष्याचा शेवटी शेवटी त्याने संसदेमध्ये एक सीट मिळवली व 1818 ते 1822 अशी पुढील 4 वर्ष तो संसदेत होता. रिकार्डोला 3 मुलांसह 8 अपत्ये होती. वयाच्या 51व्या वर्षी त्याला कानाचा आजार झाला व तो मेंदूत पसरून त्यातच त्याचे निधन झाले. रिकार्डोच्या मांडणीवर झालेली टीका : अनेक अर्थशास्त्री रिकार्डोच्या मुक्त बाजारपेठेच्या मताशी सहमत नाहीत, कारण अनेकांचे मत आहे की या मुक्त बाजारपेठेत काही प्रमाणात निर्बंध आवश्यक आहेत. दोन देश दोनच उत्पादने बनवतील आणि तीच उत्पादने दोन्ही देशात बनत असतील’ ह्या गृहीतकावर तर विरोधकांनी सडकून टीका केली. कारण काही देशांमध्ये तर काहीच उत्पादन बनत नाही, किंवा दोन देशांमधली आर्थिक दरी फार मोठी असू शकते. त्यामुळे अगदी रिकार्डोने लावलेल्या तत्त्वांमुळे कोणत्याही दोन देशांत व्यापार संभवत नाही. हे तत्त्व कागदोपत्री योग्य वाटत असले तरी खऱ्या जगात त्याला स्थान नाही.

टीकाकार हेसुद्धा निदर्शनास आणतात की रिकार्डोचे comparative ad- vantage असे गृहीत धरते की उत्पादन हे सतत होत राहणार आहे. परंतु ते हे लक्षात घेत नाही की कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. असा देश फक्त काही ठरावीक उत्पादनांवर व त्यांच्या व्यापारावर निर्भर रहिला तर त्या देशाची संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून जाऊ शकते.

अनेकांचे मत आहे की सर्व काही नियंत्रित असेल तर छोट्या जागेवर रिकार्डोची भाकिते तंतोतंत खरी ठरतात परंतु या रोज बदलणाऱ्या जगात ते तेवढे लागू पडत नाही.

निष्कर्ष : रिकार्डोचे योगदान अर्थशास्त्रात अजिबात नाकबूल करता येणार नाही. अॅडम स्मिथ नंतर सर्वात प्रतिभाशाली म्हणून नाव कमावलेल्या रिकार्डोने अर्थशास्त्राला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळवून दिली. त्याने अर्थशास्त्राला अतिशय सूत्रबद्ध आणि क्रमवार पद्धतीने लोकांसमोर मांडले. कोणतेही पूर्वग्रह न ठेवता शास्त्रोक्त पद्धतीने तात्पर्यापर्यन्त पोहोचण्याची त्याची विलक्षण हातोटी होती. त्याने मांडलेल्या अनेक सिद्धांतांमधून पुढील अर्थतज्ज्ञांच्या विचारांना खतपाणी मिळाले.

त्याच्या विचारांनी प्रभावित होणाऱ्यांपैकी, थॉमस हॉगस्किन, विल्यम थॉमसन, जॉन फ्रान्सिस ब्रे आणि पर्सी रॅव्हेनस्टोन ह्या अठराव्या शतकातील समाजवाद्यांचा समावेश आहे. तसेच हेन्री जॉर्ज, कार्ल मार्क्स यांच्यासाठीसुद्धा त्याची काही तत्त्वे मार्गदर्शक ठरली.

पिएरो खाफाने तर नव- रिकार्डियन्स नावाची अर्थशास्त्राची नवीन शाखाच उघडली. यात त्याला अनेक लोक सामील झाले. त्यात पिएरो खाफा, लुइगी पासिनेटी (1930), पिएरांजेलो गारेग्ग्रानी (1930-2011), इयान स्टीडमन (1941), जेफरी हरकोर्ट (1931), हीन्झ कुर्झ (1946), नेरी साल्वादोरी (1951-), पिअर पावलो साविओत्ती इत्यादी अर्थतज्ज्ञ होते. पिएरो स्राफाने परत नव रिकार्डियन व्यापार सिद्धांत नावाची नवी शाखा सुरू केली. यात इयान स्टीडमन व स्टॅनले मेटकाफ यांनी महत्त्वाचे योगदान दिले. नव रिकार्डियन्स शाखेतून पुढे उत्क्रांती वाढ सिद्धांत नावाची शाखा निघाली. यात लुइगी पासिनेटी, जे. एस. मेटकाफ, पिअर प्रावलो साविओट्टी, लुइगी पासिनेटी, आणि कोएन फ्रेंकन यांनी पुढाकार घेतला. डॉर्नबुश फिशर आणि सॅम्युएलसो यांनी सुद्धा रिकार्डोच्या अनेक मुद्द्यांना पुढे नेले.

आज जेव्हा आपण रिकार्डोचा विचार करतो तेव्हा असे लक्षात येते की कोणतीही साधने हाती नसताना, गणिताची जोड नसताना त्याने त्या काळात जे काही क्लिष्ट निष्कर्ष मांडले, ते मांडणे आजसुद्धा अर्थतज्ज्ञांना शक्य झालेले नाही. पुढील ओळीत रिकार्डोचे अतिशय सुंदर वर्णन आलेले आहे.

Writing a century before PAUL SAMUELSON and other modern economists popularized the use of equations, Ricardo is still esteemed for his uncanny ability to arrive at complex conclusions without any of the mathematical tools now deemed essential. As economist David Friedman put it in his 1990 textbook, Price Theory, The modern econo- mist reading Ricardo’s Principles feels rather as a member of one of the Mount Everest expeditions would feel if, arriving at the top of the mountain, he encountered a hiker clad in T-shirt and tennis shoes. मेडिकल ऑफिसर, पीएचसी कटकुम्भ, ता. चिखलदरा, जि. अमरावती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.