पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न

नुकताच 16 मे रोजी निवडक निकाल जाहीर होऊन भारताची सोळावी लोकसभा सत्तेवर आली. भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळून तो निवडून आला. कोणत्याही एका पक्षाला इतके स्पष्ट बहुमत अनेक वर्षांनी मिळाले असेल. भारतासारख्या अनेक धर्मांचे नागरिक राहत असलेल्या आणि निधर्मी संविधान असलेल्या राज्यात तर हे प्रथमच घडले आहे. हे कशामुळे घडून आले व राजकीय परिप्रेक्ष्यात ह्याचा अर्थ काय होतो वगैरेबद्दल प्रसार माध्यमांमध्ये अनेक ठिकाणी लिहिले – बोलले वर्षात गेलेले आहे. आम्हाला मात्र त्यावरून आजचा सुधारक च्या दुसऱ्या 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखाची आठवण झाली. तो येथे पुनःप्रकाशित करीत आहोत.

भाजपचे मूळ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. इस. 1990 मध्ये त्यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडून तेथे कथित रूपाने त्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेले राममंदिर साकार करण्याचा प्रयोग केला होता. ह्या प्रयोगात स्वतःच्या हाताने सेवा देण्यासाठी देशभरातून लाखो स्वयंसेवक तेथे गेले होते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा नारा रास्वसंने तेव्हा दिला होता. हिंदू अस्मिता तीव्रपणे प्रज्वलित झाल्याचे उभ्या देशाने तेव्हा पाहिले होते. रामजन्मभूमी बाबरी मस्जिद हा मुळातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम. हिंदू देवतेची पूजा, सेवा म्हणजे हिंदुत्व अशी व्याख्या उभी करण्याचा प्रयत्न तेव्हा त्यांनी केला. त्या व्याख्येची, त्या वर्तनाची मीमांसा ह्या लेखात केलेली आहे. ह्या देशातील सर्वसामान्य हिंदू असणे, हिंदू देवतेची पूजा करणे, हिंदुत्वाचा अभिमान बाळगणे ह्या साऱ्या गोष्टी कशा परस्परसंबंधित आहेत, त्या अतिव्याप्त वा अव्याप्त आहेत काय त्याचबरोबर मानवता नावाची गोष्टही ह्या हिंदुत्वाच्या आसपास कुठे येते का ह्याचा लेखकाने आढावा घेतला आहे. विवेकवादाच्या नजरेतून धर्मनिरपेक्षतेचे विवेचन करणारा हा लेख आपण सर्वांनी अवश्य वाचावा. -कार्यकारी संपादक

आणखी काही दिवसांनी आम्हाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावयाचे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांचे जे बलाबल होते त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अस्थैर्य हा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आहे हे कोणालाही मान्य होईल. ह्या वेळच्या ह्या राजकीय अस्थैर्याचे मूळ अलीकडे वाढलेल्या धर्माभिमानामध्ये आणि धर्माच्या आधारावर स्वतःला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक मानण्यामध्ये आहे असे मला वाटते. त्याचप्रमाणे हा धर्माभिमान वाढविण्याची जबाबदारी हिन्दुनेतृत्वाची आहे असेही मला वाटते. त्याचप्रमाणे हा धर्माभिमान वाढविण्याची जबाबदारी हिन्दुनेतृत्वाची आहे व कोणाचे काही चुकत आहे की काय; चुकत असल्यास काय चुकत आहे हे पाहण्याचा यत्न आवश्यक झाला आहे. हिन्दुनेतृत्व काय म्हणते ?

(1) “हिन्दू हे ह्या देशामध्ये बहुसंख्याक आहेत. (2) बहुसंख्याकांचे अधिकार डावलून अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण शासनकर्त्यांकडून आजवर सुरू आहे. (3) राज्यकर्त्यांच्या ह्या तुष्टीकरणाच्या नीतीमुळे हिन्दुधर्मीय अपमानित होत आहेत. (4) हिन्दुधर्म हा religion ह्या अर्थाने धर्म नाही. Religion म्हणजे उपासनेचा प्रकार. ) ती एक संस्कृती आहे. एक विचारप्रवाह आहे, एक ‘परंपरा’ आहे. (कारण त्यामध्ये एक देव नाही, एक धर्मग्रन्थ नाही, एक पैगंबर नाही किंवा पैगंबर वा प्रेषितच नाही.) ही ‘परपंरा’ मानणारे जितके कोणी आहेत ते सारे हिन्दू. मग त्यांना लोक ख्रिश्चन किंवा मुसलमान म्हणून ओळखत असले तरी. (5) हिन्दूइतके सहिष्णु जगात अन्य कोणी नसतील. त्यांनी अन्यधर्मीयांवर अन्याय वा अत्याचार केल्याचे उदाहरण नाही. (6) सिख्ख, बौद्ध जैन इत्यादि पंथ हिन्दुस्थानातच जन्मले म्हणून त्या हिन्दुत्वाच्याच शाखा आहेत. (7) खैत्य व इस्लाम हे धर्म हिन्दुस्थानाबाहेर जन्मल्यामुळे व मुख्यतः त्यांच्या अनुयायांनी धर्मप्रसार करण्यासाठी इतरांवर बलात्कार केल्यामुळे, म्हणजेच काय तर त्यांची अन्यधर्मीयांबद्दल सहिष्णुता न दाखविल्यामुळे ते धर्म हिन्दुत्वाच्या शाखा होऊ शकत नाहीत. अन्यधर्मीयांबाबत सहिष्णुता हे हिन्दूंचे व्यवच्छेदक लक्षण आहे. (8) कट्टर मुसलमान हा कधीच खऱ्या अर्थाने भारतीय होऊ शकत नाही. जरी त्याच्या निष्ठा भारताच्या भूगोलावर आणि संविधानावर असल्या तरी, कारण भारतीयत्व हिन्दुत्वाशिवाय पूर्ण होत नाहीं. भारतीयत्व हिन्दुपरंपरेशी संस्कृतीशी- निगडित आहे. त्यामुळे निव्वळ भारतीयत्व संभवतच नाही. पूर्णांशाने जरी नसले तरी अल्पांशाने का होईना जे येथल्या ‘परंपरेशी’, हिन्दुसंस्कृतीशी’ जोडलेले असतील तेच भारतीय. हिन्दूंना आदरणीय असलेले त्यांना आदरणीय असेल तरच ते भारतीय. (9) परदेशस्थ हिन्दू जोपर्यंत ‘हिन्दू’ संस्कृतीविषयी आदरभाव बाळगतो, (मग तो परदेशाचा नागरिक का झाला असेना) तोपर्यंत तो हिन्दू, तो अभारतीय हिन्दू. (10) हिन्दूसंस्कृतीच्या अभिमानाशिवाय कोणीही भारतीय होऊ शकत नाही. पण भारताच्या अभिमानाशिवाय क्वचित् कोणी हिन्दू होऊ शकतो; मात्र त्याच्या ठिकाणी भारतीयत्वाचा अभिमान असेल तर! अर्थात् हिन्दू होण्यासाठी हिन्दुसंस्कृतीमध्ये वा भारतीय परंपरेमध्ये जे जे आदरणीय, उज्ज्वल व अनुकरणीय आहे, श्रेष्ठ आहे त्याचा अभिमान असणे अत्यावश्यक आहे.

(11) हिन्दू धर्म हा उपासनापद्धतींना गौण मानणारा आणि मुख्यतः चार शाश्वत मूल्ये किंवा विश्वातील अस्तित्वे (व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्टी) आणि जे तत्त्व समाजाला ह्या चार मूल्यांतील सामंजस्यांच्या साहाय्याने धरून ठेवते व त्यास धारण करते ते ‘धर्म’ ह्या संज्ञेस पात्र होते, असे मानणारा आहे. अशी काहीशी ही हिन्दुत्ववाद्यांची मला समजलेली मुख्य विचारसरणी आहे. माझ्या समजुतीत चूक नसावी अशी मला आशा आहे. ह्या विचारसरणीच्या आधारावर हिन्दुनेतृत्व हिन्दुधर्माभिमाचे पुनरुज्जीवन करीत आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे आपणास समजून घ्यावयाचे आहे. धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचाच अर्थ जर लोक वेगवेगळा करीत असतील, करणार असतील तर विचारामधला गोंधळ वाढेल. म्हणून आधी ‘धर्म’ समजून घेण्याचा हा प्रयत्न, ‘हिन्दु’त्वाचे आणखीही काही पैलू असू शकतील पण त्या साऱ्यांचा विचार तूर्त आवश्यक नाही, आणि मला मुख्य चर्चा अगदीच वेगळ्या मुद्द्याची करावयाची इच्छा आहे.

धर्मनिरपेक्षतेचा विचार करता ‘हिन्दू’ना ( हिन्दू हा शब्द कोठे कोठे हिन्दुत्वनिष्ठ, हिन्दुत्ववादी, हिन्दुत्वाभिमानी ह्यांच्यासाठी संक्षेपाने वापरला आहे. अखिल हिन्दुमात्रांसाठी नाही.) त्याचा अभिप्रेत असलेला अर्थ आणि भारताची घटना (संविधान) बनविणारांना अभिप्रेत अर्थ ह्यांत महदन्तर आहे हे उघड आहे. Secular ह्या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून तो हिन्दीमराठीमध्ये रूढ झाला आहे. त्याचा हिन्दूंना अभिप्रेत अर्थ काय असावा ते आता येथे लिहिण्याचा प्रयत्न करू या. हिन्दूंना धर्म हा शब्द उपासनापद्धती ह्या अर्थाने वापरावयाचा नसल्यामुळे आणि तो अत्यन्त व्यापक अर्थाने जे समाजाची धारणा करते ते अमूर्त, विशाल, समाजघटकांमध्येच (म्हणजे व्यष्टी आणि समष्टी ह्यांमध्येच नव्हे तर सृष्टी आणि परमेष्टी ह्यांमध्येही सामंजस्य निर्माण करणारे तत्त्व; उपासनांच्या पलीकडे जाणारी एक जीवनपद्धती अशा अर्थाने वापरावयाचा असल्यामुळे कोणीही मानव जो समाजामध्ये राहतो तो त्याच्या मते निधर्मी असू शकत नाही. तो कोणत्या तरी आचारतत्त्वांनी बांधलेला असणार म्हणजेच तो धर्मपालन करीत असणार! म्हणजेच थोडक्यात काय तर समाजामध्ये राहणाऱ्यांसाठी धर्मनिरपेक्ष असे जीवन असंभव आहे. समाजात राहावयाचे असेल तर कोणालाही ‘धर्मा’कडे दुर्लक्ष करता येत नाही. पंथाकडे, उपासनापद्धतीकडे दुर्लक्ष करता येते. आणि ते तर हिन्दुधर्म पूर्वीपासून करीतच आला आहे. पंथोपपंथांचे अस्तित्व आणि त्यांचे सहजीवन हे हिन्दुधर्माचे सनातन वैशिष्ट्य आहे. (एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति ।) त्यामुळे हिन्दूंना त्या अर्थाने धर्मनिरपेक्षता शिकविणे व्यर्थ आहे. धर्मनिरपेक्षता ही त्यांच्यामध्ये स्वतः सिद्ध आहे. हिन्दूंना ‘धर्मा’चे राज्य आणावयाचे आहे, कोणत्याही एका पंथाचे नाही. त्यांना theocratic state म्हणजे पुरोहितांचे राज्य आणावयाचेच नाही ! हे हिन्दुविचाराचे मी काढलेले सार आहे. माझ्या समजुतीप्रमाणे वरील विधान हिन्दुविचाराचे यथार्थ दर्शन घडवील. ह्याला मुख्याधार श्री मा. गो. वैद्य ह्यांच्या पुस्तकांचा असला तरी ते कोणा हिन्दुत्ववाद्याचे वा त्याच्या प्रवक्त्याचे शब्दशः अधिकृत विधान नाही, हे मला येथे सांगितले पाहिजे.

आता या पार्श्वभूमीवर हिन्दुत्वनिष्ठांना सोडून इतरांना धर्माचा (religion) व त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेचा कोणता (secular व secularism) अर्थ अभिप्रेत असावा त्याविषयी माझे अनुमान सांगतो.

धर्म म्हणजे विशिष्ट पंथ वा उपपंथ नव्हे, उपासना पद्धतीही नव्हे तर श्रद्धा; व त्या श्रद्धेशी निगडित असलेला आचारव्यूह. ही श्रद्धा ईरश्वरावर, त्याच्या गूढ, अनाकलनीय, अलौकिक, कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् सामर्थ्यावर किंवा परलोकाच्या अस्तित्वावर, कर्मफलावर, आत्म्याच्या मरणोत्तर अस्तित्वावर, भूतप्रेतयक्षकिन्नर गंधर्वविद्याधरराक्षरादि मानवेतरयोनींवर, पापपुण्यावर, बह्म, मोक्ष किंवा निर्वाण ह्यांवर, काही विशिष्ट विधींच्या अलौकिक सामर्थ्यावर अथवा पैगंबराच्या (प्रेषिताच्या) शब्दावर, म्हणजे ह्यांपैकी ती कधी एकावर, अनेकावर वा सर्वांवर असते. श्रद्धेशिवाय धार्मिक माणूस संभवत नाही. (श्रद्धाहीन सदाचारी माणूस नीतिमान् असतो, धार्मिक नसतो.)

श्रद्धेशी निगडित असलेला विशिष्ट आचारव्यूह वा तदानुषंगिक तत्त्वज्ञान हा विशिष्ट धर्म होय. उदा. इस्लाम, बौद्ध, खैस्त्य, हिन्दू इ. (religion) ची ही कोशगत व्याख्या आहे.)

धर्मनिरपेक्ष (secular) ह्या शब्दाची कोशगत व्याख्या : धर्मनिरपेक्ष (secular) म्हणजे इहवादी, ऐहिक, परलोकाशी व उपरोल्लिखित धर्माशी संबन्धित नसलेले. धर्मनिरपेक्षता (secularism) म्हणजे शिक्षण व नीतिनियम ह्यांना ‘धर्म- वर्चस्वापासून दूर, अलिप्त ठेवणे इष्ट आहे असे मानणारा विचार. oxford Ad- vance Leatner’s Dictionary Webster’s d New World Dictionary)

धर्मांची मराठी विश्वकोशातील व्याख्या : ‘निसर्गातील, अत्यन्त पवित्र, संपूर्ण मानवी भवितव्याशी संबद्ध, जीवन व विश्व यांची नियन्त्रक अशा अलौकिक शक्तीवर किंवा अशा शक्तींवर माणसाची श्रद्धा असते; त्या शक्तीचा (वा शक्तींचा) अनुकूल, पवित्र आणि घनिष्ठ संबन्ध स्थापित करणारी वैयक्तिक किंवा सामाजिक मनःप्रवृत्ती व त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म (religion) होय आणि त्या शक्तीशी (वा शक्तींशी) प्रतिकूल मनःप्रवृत्ती वा आचरण म्हणजे अधर्म होय…. थोडक्यात असेही म्हणता येईल की मानवाचे इष्टप्राप्त्यर्थ व अरिष्टनिवारणार्थ केलेली अलौकिक शक्तींची साधना वा आराधना म्हणजे धर्म होय. दोन व्याख्यांमधला फरक स्पष्ट असल्यामुळे अधिक विवेचनाची गरज नाही.

हिन्दूंच्या व्याख्येची छाननी मी जी वर हिन्दूनेतृत्वाला अभिप्रेत असलेली हिन्दुत्वाची, हिन्दुधर्माची व तदुद्भूत धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली आहे ती बरोबर असेल आणि तिच्यामध्ये कोणताही भाग घालावयाचा राहिला नसेल, म्हणजेच ती परिपूर्ण असेल व त्यामुळे ती अधिकृत व्याख्या होत असेल तर आता तिची छाननी करू या.

हिन्दुनेतृत्वाने धर्मनिरपेक्षतेच्या अनुषंगाने जी धर्माची व्याख्या केली आहे तिच्यामध्ये व हिन्दूच्या धर्माच्या अगोदरच्या व्याख्येमध्ये एका ठिकाणी थोडा फरक आहे. हिन्दू हेच खरे धर्मनिरपेक्ष असे म्हणताना त्यांच्या ठिकाणी भारतीयत्वाची, हिन्दुसंस्कृतिविषयक अभिमानाची अपेक्षा ठेवलेली नाही. ती व्याख्या हिन्दुत्वाच्या व्याख्येपेक्षाही अधिक व म्हणून अत्यन्त व्यापक आहे. हिन्द्वितरधर्मीयांनी धर्मयुद्धे केली आणि हिन्दुधर्मीयांनी ती केली नाहीत; आणि आज ज्यांना तशी धर्मयुद्धे करावयाची नसतील ते सारे हिन्दु असा अभिप्राय त्यामध्ये व्यक्त झालेला आहे. पंथभेद हा हिन्दुत्वाला मारक नाही असे त्यामध्ये म्हटले आहे.

पंथ म्हणजे काय ? पंथ म्हणजे रस्ता, मार्ग, एकाच ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्यांचे जे भिन्नभिन्न मार्ग असू शकतात ते ‘पंथ’, मार्गभिन्नत्व हे हिन्दूंचे वैशिष्ट्य आहे; इतकेच नव्हे तर तो त्यांच्या सहिष्णुतेचा पुरावा आहे असे हिन्दुनेतृत्व म्हणते. हिन्दुधर्म जर खरोखर पंथनिरपेक्ष असेल व इस्लाम व खैस्त्य हेही जर हिन्दुधर्माचे पंथ होऊ शकत असतील तर हिन्दूंचे ‘धर्मान्तर’ हे खरे धर्मान्तर नव्हेच, ते पन्थान्तर आहे असे मानले पाहिजे. आणि ते जर पंथान्तर आहे असे आपण समजलो तर हिन्दूंची संख्या फक्त मृत्यूनेच कमी होईल, ‘धर्मान्तराने’ ती कधीच कमी होऊ शकणार नाही. हिन्दुधर्म हा समाजधारणेसाठी जे तत्त्व आवश्यक आहे ते व जे व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्टी ह्यांना एका सूत्रात बांधून ठेवणारे पृथ्वीवरच्या यच्चयावत् मानवांना कवळणारे अत्यन्त व्यापक असे व खरोखरच सर्व उपासनापद्धतींना ओलांडून जाणारे तत्त्व असेल तर ह्या पृथ्वीवर हिन्दूंचे धर्मान्तर घडूच शकत नाही.

भूतलावरचे सारेच मानव हे हिन्दु, त्यांतले काही भिन्न उपासनापद्धतीमुळे मूळ हिन्दूंच्या मुख्य प्रवाहापासून थोडेफार दूर गेले असले तरी प्रायश्चित्तविधीने मुख्य प्रवाहात पुनश्च सामील होऊ शकणारे असे आहेत असे मानावे लागेल. पण मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे अशी अट नाही हीच तर खरी हिन्दूंची सहिष्णुता आहे असे हिन्दुनेतृत्वाच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येप्रमाणे आपण साऱ्यांनी मान्य केले तर ह्या तर्काचा परिणाम काय होतो ? सारेच हिन्दु होतात; आणि सारेच जर हिन्दु तर अल्पसंख्याक व बहुसंख्याक हा वादच कसा निर्माण होतो ते माझ्या अल्पमतीच्या आकलनशक्तीच्या बाहेर जाते. त्यामुळे तुष्टीकरण कोणाचे असाही मला प्रश्नच पडतो.

ज्यांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधात आहेत अशा गटांची तुलना करताना मात्र त्यांचे संख्याबल हा तुलनाविषय होऊ शकतो. (तो तुलनांविषय व्हावा की नाही हा मुद्दा विवाद्य आहे. त्याचा विचार पुढे कधी करू.) पण हिन्दुनेतृत्व सर्व मानवमात्राची गणना हिन्दूंमध्ये होईल अशी हिन्दुत्वाची व्याख्या करते व श्रद्धेमुळे किंवा श्रद्धाविषयामुळे जे गट वेगळे पडले आहेत त्यांचे हितसंबंध लक्षात घेते.

हिन्दुनेतृत्व ज्यावेळी हिन्दुत्व हा religion नव्हे असे ठामपणे सांगते त्यावेळी काय नाकारीत असते? ते उपासनापद्धतींचे ऐक्य नाकारीत असते इतकेच नव्हे तर एकूण श्रद्धाच नाकारीत असते असे लक्षात येते. कारण खरोखरच श्रद्धेमुळे व श्रद्धाविषयामुळे ‘धर्मा’च्या व्यापकतेला सीमा पडतात ह्याची जाणीव हिन्दुनेतृत्वाला आहे असे त्यावेळी दिसते. (हिन्दुत्वाच्या व्याख्यांमध्ये श्रद्धा हा शब्द एकाही ठिकाणी किंवा कोणत्याही संदर्भात आलेला नाही.

रामजन्मभूमीचा विवाद निर्माण करून हिन्दुनेतृत्वाने सामान्यजनांच्या श्रद्धाविषयाला आवाहन केले आहे; आणि हिन्दु संज्ञेच्या व्याप्तीचा संकोच केला आहे. एकाच वेळी एकीकडे धर्म त्या संज्ञेचा अर्थ अत्यन्त व्यापक आहे असे सांगावयाचे आणि दुसरीकडे मतलब साधण्यासाठी त्या व्याप्तीचा संकोच करावयाचा हा प्रकार माझ्या मते एकतर बुद्धिहीनतेचा किंवा दांभिकपणाचा व त्यामुळे शासनकर्त्यांकडून होणाऱ्या ‘अल्पसंख्याकांच्या तुष्टी’ सारखाच अश्लाघ्य आणि गहणीय आहे.

हिन्दूंचे बहुसंख्याकत्व (त्यामधून त्यांचे निर्माण होणारे अधिकार) हिन्दूंचे अपमान व हिन्दूंची परंपरा ह्याविषयी पुढच्या लेखांकात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.