‘शब्दानंदोत्सव’

[इंग्रजी शब्दांचे हिंदी-मराठी अर्थ तपासत असताना, त्या शब्दांच्या व्युत्पत्तीच्या अनुषंगाने कोशकाराला कित्येक रंजक गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यांविषयी हा लेख आहे. सामंतबाईंच्या निधनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमिताने त्यांची आठवण करण्यासाठी हा लेख प्रकाशित करीत आहोत. कार्यकारी संपादक]

कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकात शकुंतलेची सासरी पाठवणी करण्याचा एक प्रसंग आहे. निसर्गसुंदर आश्रमात वाढलेल्या आपल्यासारख्या निरागस युवतीचा राजधानीसारख्या गजबजलेल्या शहरात आधुनिक सभ्यतेत मुरलेल्या राजवाड्यात कसा निभाव लागणार अशी चिंता करणारी शकुंतला म्हणते – कथमिदानीं मलयतटोन्मूलिता चंदनलतेव देशांतरे जीवितं धारयिष्ये? पण माहेराहून सासरी जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ होणाऱ्या मुली ज्याप्रमाणें थोड्याच दिवसांत सासरीं रमतात आणि तिथल्याच होऊन जातात त्याप्रमाणें कित्येक वनस्पतीदेखील एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाल्या तरी अनेकदा त्या देशांतरींच्या वातावरणाशीं एकरूप होऊन जातात. या प्रक्रियेला naturalisation म्हणजे ‘ससृष्टीकरण’ असे म्हणतात. वेगवेगळ्या भाषांतील शब्दांचंही तसंच आहे. संस्कृतची ‘चंदनलता’ ही शब्दसुंदरी अशीच देशांतराला गेली व तिने Santalum हें प्रजातिनाम धारण केलं व त्यावरूनच इंग्रजी sandalwood नामक वृक्षपुरंध्रीत तिचं रूपांतर झालं. याउलट, इंग्रजी sandal चं ‘संदल’ असं पुन्हा (Webster) देशीकरण केल्यामुळे हिंदी व इंग्रजी यांचं साटंलोटं जमलं आहे.

संस्कृत ‘क्षीर’ या शब्दातील ‘क्ष’ चं विभाजन होऊन, फारसीमध्यें तो ‘शीर’ (खुरमा) झाला, तर हिंदी-मराठीत तो ‘खीर’ रूपाने अवतरला. संस्कृतमध्ये पूर्वी ‘कृमिजा’ म्हणजे ‘लाखी’ किड्यांपासून मिळणारी ती ‘लाख’ (lac म्हणजे देखील संस्कृत ‘लाक्षा’च) असा अर्थ असला तरी, पुढेंपुढें ‘कृमी’चं ‘किरम’ वा ‘किरीम’ असं रूपांतर होऊन, हळूहळू तो ‘किरमिज’ वा ‘किरमिजी’ रंग म्हणून ओळखला जाऊं लागला. कारण cochineal insect नांवाच्या मेक्सिकन किड्यांच्या शुष्क शरीरांपासून तयार होणारा तो cochineal रंग होय. एका विशिष्ट जातीच्या मांजराच्या गुह्यांगाजवळ ‘जबाद’ नांवाच्या सुगंधी पदार्थाची पिशवी असते, त्यावरून त्याला ‘जबादी’ (मराठीत ‘जवादी मांजर’) असं म्हणतात. त्यावरूनच इंग्रजीतला civet (cat) हा शब्द परिणत झाला अशी व्युत्पत्ती दिली आहे. कधीं कधीं forged वरून हिंदी “फरजी’, तर washer वरून मराठीत ‘वायसर’, तर हिंदी ‘वरंडा’वरून इंग्रजी veranda अशी भाषाभाषांमध्यें उलटसुलट देवाणघेवाण होत असते.

कांहीं ठिकाणी ह्या व्युत्पत्तिमार्गाला पुढें पुढें तर इतके फाटे फुटले कीं, ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधण्याच्या फंदात पडूं नये म्हणतात त्याचं मला प्रत्यंतर आलं. ‘मृग’ याचा अर्थ ‘हरिण’ किंवा ‘पशु’ असा असताना, एका पक्ष्याला ‘शहामृग’ कां म्हणतात असा मला कित्येक दिवसांपासून प्रश्न पडला होता. कोशकार्याच्या ओघात माझ्यापुढें जेव्हा ‘शाहमुर्ग’ (पक्ष्यांचा राजा) असा हिंदी शब्द आला तेव्हा मला त्याचं रहस्य कळलं. हिंदी ‘मुर्ग’ चा वर्णविपर्यय होऊन मराठीत तो ‘(शहा)मृग’ झाला हे माझ्या लक्षात आलं. डॉ. के. एन. दवे नांवाच्या एका संस्कृत विद्वानाने Birds in Sanskrit Literature असा एक शोधप्रबंध लिहिला असून, त्यात त्यांनी संस्कृत साहित्यातील सर्व पक्ष्यांचीं नांवं व त्यांची वर्णनं यांवरून आधुनिक काळातले ते पक्षी कोणते याचा वेध घेतला आहे. एके ठिकाणीं त्यांना ‘उष्ट्ररथ’ नांवाचा पक्षी सांपडला (‘बृहत्संहिते’वरील भट्टोत्पलटीका) व लक्षणवर्णनावरून तो ost rich होय असा त्यांचा निष्कर्ष आहे. दोघांतील नामसादृश्यदेखील लक्षणीय नव्हे काय ? योगायोग असा कीं, ostrich या पक्ष्याच्या शास्त्रीय नांवात (Struthio camelus) देखील ‘उंट’ आहेच. ‘उंटसदृश पक्षी’. हिंदीतही ‘शुनुर’ म्हणजे ‘उंट’ असा अर्थ असल्याने ह्या पक्ष्याला ‘शुतुसमुर्ग’ असें म्हणतात. ‘संगजिरें’ किंवा ‘शंखजिरें’ हें कोणत्यातरी प्रकारचें ‘जिरें’ असावें असा माझा कित्येक दिवस भ्रम होता. प्रत्यक्षात तो soapstone नांवाचा दगड आहे असं मला जेव्हा समजलं तेव्हा मीं आश्चर्यानं तोंडांत बोट घातलं. मात्र लगेच जेव्हा त्याचा हिंदी भाईबंद ‘संगजराहत’ (संग = दगड) सांपडला तेव्हा ‘संगजिरें’ किंवा ‘शंखजिरें चं मूळ कशात आहे हें लक्षात आलं आणि मी तोंडातलं बोट काढलं!

हिंदी व मराठी भाषांना संस्कृत शब्दांची परंपरा असल्याने, बहुतेक वेळां एकच प्रतिशब्द दोन्ही भाषांत चालूं शकतो. असं असलं तरी कांही अपवादात्मक बाबतींत खूप सावधगिरी बाळगावी लागते. ‘पेशी’ हा एकच शब्द मराठीत cell या अर्थाचा, तर हिंदीत muscle ह्या अर्थाचा द्योतक आहे. ‘तंत्र’ हा मराठी शब्द technique या इंग्रजी शब्दाशी निगडित असला तरी हिंदीत त्याला ‘अभिचारविद्या’ किंवा ‘जादूटोणा’ असा अर्थ आहे. ‘वहम’ ह्या फारसी शब्दाचा मूलार्थ ‘संशय’ असा आहे. पण त्यावरून हिंदीत आलेल्या ‘वहमी’ या शब्दाला ‘संशयखोर’ सा, तर मराठीतील ‘वहिमी’ शब्दाला ‘संशयित’ असा अर्थ प्राप्त झालेला आहे.

ह्या कोशकार्याच्या ओघात इंग्रजी शब्दांचीं स्पेलिंग्ज वा अर्थ तपासताना, कित्येक रूढ समजुतींना धक्का बसण्याचे प्रसंग आले. बहुसंख्य मराठी माणसं ‘फुलस्केप’ कागद असं म्हणतात. पूर्ण आकाराचा ताव’ म्हणजे fullscape असा तो शब्द असावा असा अनेकांचा (गैर) समज आहे. प्रत्यक्षात ‘fool’s cap’ असा तो शब्द आहे. जुन्या काळी पूर्ण आकाराच्या तावावर ‘विदूषकाची टोपी’ असा वॉटरमार्क असे. त्यावरून ‘फूल्स कॅप American Indian अश्या दोन अर्थच्छटा आहेत आणि संदर्भानुसार त्या तपासून घ्याव्या लागतात. Work हा शब्द स्वतंत्रपणें वा जोडून आला तरी पुष्कळदा त्याचा अर्थ ‘बांधकाम’ असा असतो. पण bul- wark ह्या शब्दात मात्र त्याचं स्पेलिंग (… )wark असल्याचं पाहून मी चकितच झालें.

खगोलदर्शन घेण्यासाठीं निघालें तेव्हा अकस्मात् आकाशात मला पृथ्वीतलावरील कांही प्राणी सांपडले. ‘हस्ताचा पाऊस’ तर सर्वज्ञात आहे. शेतकरीवर्ग ‘हस्त नक्षत्रा’ला ‘हत्ती’च म्हणतो. त्याहीपेक्षा एक मजेशीर गोष्ट प्रत्ययाला आली. विशाखा नक्षत्र लागलं असतां, सूर्य त्याच्या जवळ असतांना पडणाऱ्या पावसामुळें उंदरांसारखे उपद्रवी प्राणी उत्पन्न होतात, तर अनुराधा नक्षत्र लागल्यावर ते विनाशक प्राणी नाहीसे होतात. म्हणून भोळेभाबडे शेतकरी ‘विशाखा – अनुराधा’ यांना अनुक्रमें ‘उंदऱ्या-मांजऱ्या’ असं म्हणतात. वनश्रीसृष्टीतही ‘उंदीरकानी’ सांपडते, तर खडकाळ भूभागावर ‘मांजऱ्या पाषाण’ आढळतो.

पुष्पवाटिकांतून विहार करताना, वाटेत ‘नर्गिस’ भेटली. तिची कुलपरंपरा शोधल्यावर, ग्रीक पुराणातील Narcissus ची गोष्ट कळली. स्वतःच्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडून झुरणाऱ्या ह्या युवकाचं अखेरीस फुलात रूपांतर झालं. फारसी भाषेत युवकाची युवती झाली तरी तीही झुरतच राहिली- हजारों साल नर्गिस अपनी बेनूरी पे रोती है । बड़ी मुष्किल से होता है चमन में दीदावर पैदा ।। (सर महंमद इकबाल ) वृक्षराजींतून संचार करताना ज्या प्रचंड वटवृक्षाखालीं गुजरातचे बनिये तळ ठोकून आपला व्यापारधंदा करीत तो banyan tree दिसला. Poplar या झाडाला नि. बा. रानडे यांच्या इंग्रजी-मराठी कोशात मला ‘हिवर’ असा प्रतिशब्द सापडला, तर हिंदीत ‘हूर’ हा तत्सदृश प्रतिशब्द मिळाला. पण ‘मराठी विश्वकोशा’त white valem bark याही वृक्षाला ‘हिवर’ हाच प्रतिशब्द दिला आहे. या दोहोंची सांगड कशी घालायची हा माझ्यापुढें प्रश्न होता. मी जेव्हा जुने शब्दकोश पाहिले तेव्हा तेथें मला ‘हिंवर’ असा सानुस्वार शब्द आढळला. ‘हिंवर’ या शब्दात ‘हिम’वाचक अनुस्वार असून ‘हिंवरतरूची शीतल छाया’ असा शब्दप्रयोग पूर्वी रूढ होता. या वृक्षाची सावली शीतल व दाट असली तरी त्याखाली बसल्यास कुबुद्धी निर्माण होते असा समज होता व म्हणून त्याखालीं बसूं नये असा एक संकेतही रूढ होता. (पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली – ज्ञाने. ) या वृक्षाची सालही पांढरट असते व तोच white valem bark होय असं मला वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांच्याकडून कळलं. पण ‘मराठी विश्वकोशा’त तो ‘हिवर’ असा निरनुस्वार कां लिहिला याचं उत्तर मला नवीन शुद्धलेखन पद्धतीत सांपडलं, शेवटी मी poplar ला ‘हिवर’ आणि white valem bark ला ‘हिंवर’ असे प्रतिशब्द घेतले. ‘पंकालुका’वरून ‘पांकोळी’ (swallow) हा शब्द आला, तर निरनुस्वार ‘पाकोळी’ हा शब्द tern या पक्ष्यासाठी राखतां आला.

मी orange म्हणजे ‘संत्रें’ आणि lime म्हणजे ईडलिंबू असंच काहीसं शिकलें होतें. पण कोशलेखनाच्या निमित्तानं सखोल वाचन केलं तेव्हा, संत्र्याला sour orange आणि मोसंब्याला sweet orange किंवा sweet lime म्हणतात असं निदर्शनाला आलं. आपल्या शालेय अभ्यासक्रमात आजवर custard apple म्हणजे ‘सीताफळ’ असं आपण शिकत आलों. पण ह्या कोशलेखनाच्या निमित्तानं मला असं ज्ञान झालं कीं, custard apple ही एक समावेशक संज्ञा असून, ‘सीताफळ’ म्हणजे sugar apple हा तिचा एक प्रकार आहे. पुन्हा मला ‘सिताफळ’ आणि ‘सीताफळ’ अशीं दोन्ही वर्णलेखनं (spellings) सांपडली. यांतलं बरोबर कोणतं हा प्रश्न उभा ठाकला. अधिक संशोधनांतीं असं कळलं कीं एकतर हें फळ भारतात रामायणाइतकं प्राचीन नाही, तर तें परदेशांतून आलेलं आहे. फिरंग्यांनी दक्षिण अमेरिकेतून आणलेल्या ह्या फळझाडाचं रोपटं प्रथम बंगालमधील बांदेल गांवातल्या एका चर्चच्या आवारात रुजलं आणि फळलं. मोंगल अमदानीत व त्यानंतर ब्रिटिशांच्या जमान्यात भारतात त्याचा अधिक प्रसार झाला. प्रारंभीच्या काळात केव्हातरी कोणीतरी इंग्रजी नांवाचं sugara apple ‘सिताफल’ (संस्कृत ‘सिता’ अर्थात् sugar – म्हणजे ‘पांढरी’) असं भाषांतर केलं असावं. पुढें कोणालातरी “सिता’ हा शब्द चुकीचा वाटला, म्हणून त्यानें ‘सीताफल’ अशी दुरुस्ती केली. मग इतर तत्सम जाती आल्या तसतशी त्यांना ‘रामफळ’, लक्ष्मणफळ’, ‘मारुतिफळ’ अशीं नांवं मिळत गेलीं. तर असं हैं फळरामायण ! चिंचेचं झाड कोणालातरी “चिनारवृक्षापरी’ वाटलं तरी, जुन्या काळी एका परदेशी पांथस्थाला तें ‘तमर- इहिंद’ (हिंदुस्थानचा खजूर) असावं असं भासलं. त्यामुळे इंग्रजीला tamarind चा लाभ झाला आणि मला ‘तमर’ (dry date = खारीक) हा हिंदी प्रतिशब्द मिळाला.

मोझांबिक देशातून आलें तें ‘मोसंबें’ झालें, तर हिंदी भाषकांनी इलाहाबादी पेरूला ‘अमृता’ची उपमा दिल्याने तो “अमरूत’ व नंतर ‘अमरूद’ झाला. इंग्रजीतलं हें फळ संस्कृत ‘नागरंग’ चा अपभ्रंश आहे हें सांगून कोणाला खरं वाटेल का? पण तसं आहे खरं कारण ‘नारंग/नारिंग उर्फ संत्रे हें भारतातून परदेशात गेलं अशी ज्ञानकोशांची साक्ष आहे. ‘नागरंग नारंग नारिंग orange’. Camphor हा पदार्थ व शब्ददेखील संस्कृत ‘कर्पूर’ (कपूर, कापूर)चाच वंशज आहे.

संस्कृत व इंग्रजी या दोहोंतला व्युत्पत्तिसंबंध लक्षात घेऊनच मी widow bird याला ‘विधव पक्षी’ असा प्रतिशब्द दिला. अभयारण्यातून भ्रमंती करत असताना, लहानपणापासून fox म्हणजे ‘कोल्हा’ हें पाठ केलेलं समीकरण चुकलं असं लक्षात आलं. Fox म्हणजे ‘खोकड’ व. (golden) jackal म्हणजे ‘कोल्हा’ हे ज्ञान झालं तेव्हा सुरुवातीला धक्का बसला नसला तरी नवीन ज्ञानप्राप्तीचा आनंद मिळालाच. Jackal म्हणजे तरी काय? शृगाल सृगाल शगाल jackal.

वाघोबाच्या पाऊलखुणांचा माग काढताना, अचानक मला pugmark हा शब्द सांपडला. एरव्हीं, ‘पदचिह्न’ किंवा ‘पावलाचा ठसा’ या अर्थाने footprint हा शब्द प्रचलित आहे. मग ह्या वन्यसृष्टीत हा वेगळा शब्द कसा आला याचाही मागोवा घेतला तेव्हा ‘पग’ (पाऊल) हा हिंदीतील शब्द ब्रिटिश वनाधिकाऱ्यांनी स्थानिक हिंदी वाटाड्याकडून उचलला असं लक्षात आलं. Boar हा इंग्रजी शब्द हा संस्कृतचा ‘वराह’ अवतार असावा अशी मला दाट शंका आहे, कारण ‘वराह’चा हिंदीत ‘बरोह’ होतो.

योगायोगानं इथं मला कित्येक धंदेवाईक प्राणी भेटले. इंग्रजीत mason bee/wasp, carpenter ant/bee/wasp, tailorbird, butcherbird, weaverbird असे विविध व्यावसायिक जीव आहेत. मराठीतही कुंभार (कावळा), सुतार, सोनार, धोबी वा परीट, शिंपी, विणकर, सुगरण, पाणकोळी (pelican), खाटिक, तांबट, शिपाई (बुलबुल), डोंब (कावळा) असे बरेच बलुतेदार पक्षी आहेत. इंग्रजीतल्या secretary bird ह्या आफ्रिकी पक्ष्याच्या कल्ल्यांच्या जवळ एक तुरा असतो व त्यामुळें तो कानामागें लेखणी अडकवून ठेवणाऱ्या कारकुनासारखा दिसतो. ह्या पक्ष्याला नांव काय द्यावं अशा विचारात असताना मला अचानक ‘कारकुंड्या’ हें नांव सुचलं.

डॉ. दवे यांच्या ग्रंथानुसार ‘शारंग’ व ‘सारंग’ हे एकमेकांचे पर्यायवाची असून ( little) bustard व (grey heron असे त्याचे दोन अर्थ आहेत. मी त्या दोहोंमध्यें भेद करून, ‘शारंग’ म्हणजे (little) bustard व (grey) heron असे त्याचे दोन अर्थ आहेत. मी त्या दोहोंमध्यें भेद करून, ‘शारंग’ म्हणजे ( little) bustard व ‘सारंग’ म्हणजे (grey) heron अशी सोईस्कर व्यवस्था केली. ‘भरद्वाज’ आणि ‘भारद्वाज’ या दोन शब्दांच्या वापरांत बराच ढिलेपणा व स्वैरपणा आहे. सर्वसाधारणपणें पक्षीतज्ज्ञ मंडळी greater coucal किंवा crow-pheasant म्हणजे ‘कुक्कुडकुंभा’ याला उद्देशून ‘भरद्वाज’ व ‘भारद्वाज़’ असे दोन्ही शब्द वापरतात. मराठी काव्यसृष्टीत मात्र वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या वेळीं कधीं ‘कुक्कुडकुंभा’ म्हणून तर कधीं skylark या पक्ष्याला अनुलक्षून हे शब्दप्रयोग केले आहेत. ‘कुक्कुडकुंभा’ हा पक्षी शुभशकुनाचा मानला जातो. ‘माझ्या भारद्वाज राजा’ या कवितेत बा. भ. बोरकर म्हणतात ……. खुणाविसी शब्दाविणें शुभसूचक शकुन… तर ‘भारद्वाजास’ या शीर्षकाच्या कवितेत बालकवी म्हणतात – भारद्वाजा विहगा माझ्या, धन्य जगीं तू मज गमसी फुलल्या बागा या तरुरांगा त्यांवरतीं भरभर फिरसी, हे वर्णन निःसंशय कुक्कुडकुंभ्यालाच लागू पडतें; पण तेच बालकवी ‘फुलराणी’च्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने– …………..नाचुं लागले भारद्वाज, —-वाजविती निर्झर पखवाज’ — असं वर्णन करतात. तसंच, त्यांच्या ‘अरुण’ कवितेंतला ‘भारद्वाज’ हा lark सारखा गायक पक्षी दिसतो ऊठ कोकिळा! भारद्वाजा! ऊठ गडे आतां मंगल गानीं टाकी मोहुनी जगताच्या चित्ता !

ह्या ‘भरद्वाज / भारद्वाज’ संभ्रमामुळे माझ्या मनाची द्विधा स्थिती झाली. त्यावेळी दोन शास्त्रीय कोशांचं मला साहाय्य झालं. जैन मुनी हंसदेव-विरचित ‘मृगपक्षिशास्त्र’ या ग्रंथात (संपा. मारुती चितमपल्ली- प्रका. साहित्य संस्कृती मंडळ) आणि ‘अमरकोशात ‘हि ‘भरद्वाज’ म्हणजे ‘कुक्कुडकुंभा’ असा अर्थ दिलेला असून, कै. वा. शि. आपटे यांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात ‘भारद्वाज’ म्हणजे skylark असा अर्थ दिलेला आहे. म्हणून अखेरीस मीं ‘भरद्वाज’ crow-pheasant अथवा greater coucal आणि भारद्वाज = skylark असे अर्थ निश्चित केले.

chiffchaff नांवाच्या पक्ष्याला मला कुठेतरी. ‘पाणफुटकी’ असा प्रतिशब्द सांपडला. ‘फुटकी’ म्हणजे चिमणीसारखा पक्षी. पण हा पक्षी जलचर नसतानाहि त्याला ‘पाणफुटकी’ असं कां म्हणतात असा विचार माझ्या मनात आला. पण ही बहुतेक अपसंज्ञा / चुकीची संज्ञा (misnomer) असेल असं म्हणून मीं माझं समाधान करून घेतलं आणि हिंदीत मला स्वतंत्र पर्याय सांपडला नाही म्हणून मीं ‘जलफुटकी’ असा प्रतिशब्द तयार केला. त्याच सुमारास कधींतरी सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ श्री. किरण पुरंदरे माझ्या घरीं आले होते. त्यांना मीं ती शंका विचारली. ते उत्स्फूर्तपणें उद्गारलें -अहो, ती ‘पानफुटकी’ असेल. क्षणभर मी स्तंभित झालें आणि काय आश्चर्य त्या पक्ष्याचं शास्त्रीय नांव (Phylloscopus collybita) पाहिल्यावर तर किरण पुरंदरेंच्या विधानात पुरेपूर तथ्य असल्याबद्दल माझी खात्रीच पटली. कारण ग्रीक Phyllo – ह्या उपसर्गाचा अर्थ ‘पान’ (leaf) असाच आहे. अक्षरशः मी घोडचूक करता करतां पुरंदऱ्यांमुळे बचावलें. अखेरीस मीं chiffchaff ला ‘पातफुटकी’ (हिं) व ‘पानफुटकी’ (म.) असे प्रतिशब्द घेतले. भाषिक व्याकरणाचा बाऊ कशासाठी करायचा असं म्हणणाऱ्यांची सध्या चलती आहे. पण ‘पाण’ आणि ‘पान’ या आवळ्याजावळ्यांमधलं महदंतर पाहिल्यावर तर मला व्याकरणमाहात्म्य: सांगणारं संस्कृत वचनच आठवलं- यद्यपि बहु नाधीषे पठ पुत्र तथापि व्याकरणम् । स्वजनः श्वजनो माऽभूत्सकलं शकलं सकृत् शकृत् (सकृच्छकृत्) ।। ह्या शाब्दिक वनसृष्टीतून हिंडत असताना अनेकदा पशुपक्ष्यांचे आवाज कानांवर पडत होते. ‘कावकाव’ करणारा कावळा व ‘चिवचिव’ करणारी चिमणी सर्वांनाच माहीत आहे. पण त्याहिव्यतिरिक्त ‘हुप्या वांदर’, ‘कारव’, ‘पेर्तेव्हा’, ‘घुमण’, ‘हुमण’ अशी काही नादानुकारी प्राणीनामं सांपडली, तेव्हा खूप मजा वाटली.

पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या संवेदना शब्दबद्ध करणं हा मानवी शब्दव्यवहाराचा प्रधान हेतू असतो. ‘बोलीं अरूपाचे रूप दावीन’ ही तर ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञाच होती. नादानुकारी शब्दांचा मागोवा घेत मी जेव्हा या शब्दसृष्टीत वावरलें तेव्हा इंग्रजी, हिंदी व मराठी ह्या तीनही भाषांतून मला विपुल शब्दसंपदा लाभली. त्यामुळे जिवंत प्राण्यांचे आवाज व निर्जीव वस्तूंचे ध्वनी हे दोन्ही दर्शवणारे दोन उपविभाग करतां आले. विशेष म्हणजे एखाददुसरा अपवाद वगळतां, मला तीनही भाषांतील नादानुकारी शब्दांत विलक्षण साधर्म्य आढळलं-. —

उदा. cooey (of jackal) : (सियार की) कूक : (कोल्ह्याची कुईकुई, gurgle (of hookah) (हुक्के की) गुडगुड : (हुक्याची) गुडगुड. एकंदरीत, मनुष्यस्वभाव आणि मानवी संवेदना ह्या जगाच्या पाठीवर सर्वत्र सारख्याच असतात म्हणायच्या! अनेक शब्दांचे इंग्रजी शब्दकोशांतले अर्थ तपासत असता व्युत्पत्तीच्या अंगाने मला कित्येक रंजक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इंग्रजीतले कित्येक शब्द हे हिंदी-मराठी वा संस्कृत शब्दांचेच दूरचे आप्त असल्याचं आढळलं. एक लक्षणीय बाब म्हणजे इंग्रजी शब्दांची खरी व्युत्पत्ती वा त्याचा मूलस्रोत कुठलाही असला तरी इंग्रजी कोशकारांनी तो मोकळेपणाने कबूल केला आहे. (उदा. jungle हा मूळचा संस्कृत शब्द आहे, तर nocturnal व ‘नक्तंचर’ हे तर सरळसरळ एकमेकांचे भाईबंदच आहेत हें उघड दिसतं.) talipot palm म्हणजे संस्कृतमधला ‘तालपत्र वृक्ष’ होय. ‘घरटें’ याचा इंग्रजी प्रतिशब्द nest हा nidus (नायडस) ह्या लॅटीन शब्दावरून आलेला असून, त्याचं संस्कृत ‘नीड’ म्हणजे ‘घरटें’ याच्याशीं नातं आहे. (‘वसुधैव कुटुंबकम्’च्या धर्तीवर रवींद्रनाथांनी स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’चं ध्येयवाक्य आहे – यत्र विश्वं भवति एकनीडम ।) व्यावहारिक इंग्रजीत nidus हा स्वतंत्र शब्द नसला तरी, त्यावरून nidicolous nidifugous असे शब्द सिद्ध झालेले आहेत. इंग्रजी equestrian म्हणजे ‘अश्वारोही’ हा संस्कृतच्या ‘अश्व’कुळातीलच आहे. फारसी ‘मुष्क’वरून इंग्रजी musk तयार झाला. संस्कृत ‘हस्त’ म्हणजे फारसी ‘दस्त’. (त्यावरूनच ‘दस्तकारी’ म्हणजे handicraft.) संस्कृत ‘आदर्शपाषाण’ हा ‘आरसपान’ कसा झाला? (‘आदर्श’ = आरसा व ‘पाषाण’ पाहन पान. ) ॥

प्राणिकी – उपविभागात केव्हातरी chorus frog असा शब्द आला. वेब्स्टरच्या शब्दकोशात मला पुढील अर्थ दिल्याचें आढळलें any of several small North American frogs of the genus Pseudacris having a loud call commonly heard in the spring. तो वाचल्यावर ऋग्वेदातील ‘मंडूकसूक्ता’तील बेडकांची आठवण झाली. पावसाळ्यात अनेक बेडकांचें सामूहिक डराँवगान ऐकून सूक्तकाराला यज्ञयागप्रसंगी सामूहिक ऋचापठण करणाऱ्या याज्ञिकांची उपमा द्यावीशी वाटली. त्यावरून सामगायन करणारे ऋषी आठवले आणि संस्कृत कोशात मला ‘सामग’ असा शब्द सांपडला. म्हणून मी chorus frog यासाठीं ‘सामग दर्दुर’ असा प्रतिशब्द तयार केला.

हिंदी व मराठी भाषांना संस्कृत शब्दांची परंपरा असल्याने, बहुतेक वेळां एकच प्रतिशब्द दोन्ही भाषांत चालूं शकतो. असं असलं तरी कांही अपवादात्मक बाबतींत खूप सावधगिरी बाळगावी लागते. ‘पेशी’ हा एकच शब्द मराठीत cell या अर्थाचा, तर हिंदीत muscle या अर्थाचा द्योतक आहे. ‘तंत्र’ हा मराठी शब्द technique या इंग्रजी शब्दाशी निगडित असला तरी, हिंदीत त्याला ‘अभिचारविद्या’ किंवा ‘जादूटोणा’ असा अर्थ आहे. ‘वहम’ ह्या फारसी शब्दाचा मूलार्थ ‘संशय’ असा आहे. पण त्यावरून हिंदीत आलेल्या ‘वहमी’ या शब्दाला ‘संशयखोर’ (शक्की) असा, तर मराठीतील ‘वहिमी’ शब्दाला ‘संशयित’ (suspect) असा अर्थ प्राप्त झाला आहे. (विविधतेतून एकता की एकतेतून विविधता ? )

विश्वामित्राने आपल्या तपोबलाने प्रतिसृष्टी निर्मिली अशी पुराणकथा सांगतात. मानवनिर्मित शब्दसृष्टी ही एक प्रतिसृष्टीच आहे. ‘आता वंदू कवेर्श्वर शब्दसृष्टीचे ईश्वर’ असं रामदासस्वामी म्हणतात. पण ह्या कवीश्वरांनी निर्मिलेली शब्दसृष्टी भावी पिढ्यांना पुरून उरावी म्हणून शब्दकोशाचं प्रयोजन असतं अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति । व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।। भाषिक कोशाचा लोकांनी वापर केला तर तो वृद्धिंगत होत जातो व तसा वापर केला नाही तर तो क्षय पावतो असा हा विलक्षण कोश (खजिना) आहे. अशाच एका कोशात मी गेली बारा वर्षं स्वतःला गुंतवून घेतलं होतं व प्रदीर्घ काळ मी त्या ‘शब्दानंदा’त डुंबत होते. पण कोशावस्था संपल्यावर मी बाहेर आले तेव्हा बाह्य जगाचं भान आलं आणि डॉ. सॅम्यूएल जॉन्सन ह्या कोशपितामहाचे शब्द आठवले – I am not yet so lost in lexicography as to forget that words are the daughters of the earth, and things are the sons of heaven. (Dictionary – Preface)

(दै. लोकसत्ता दि. 15 जुलै 2007 वरून साभार )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.