नेहरू नसते तर

(अनुवाद: रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) इ.स. 2014 हे वर्ष जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यस्मरणाचे पन्नासावे वर्ष आहे. योगायोग असा की यंदा 14 नोव्हेंबरला त्यांची 125 वी जयंती आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महान् व्यक्तींपैकी इतक्या प्रेमादराने ज्यांची अजूनही आठवण काढली जाते असे नेहरूंसारखे महापुरुष विरळाच!

अर्थात आपल्याला हेदेखील विसरून चालणार नाही की त्यांच्या प्रदीर्घ व उज्ज्वल राजकीय कारकीर्दीत त्यांना बहुसंख्य देशवासीयांचे अलोट प्रेम मिळाले असले तरी आज मात्र देशातील अनेकजण भारतातील बहुसंख्य समस्यांबद्दल नेहरूंनाच जबाबदार धरतात. आता तर त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले आहे. कधीकधी तर जाणीवपूर्वक त्यांची खलप्रतिमा रंगविण्याचे प्रयत्न केले जातात. सध्या एव्हढेच सांगणे पुरे की नेहरूंची कोणी कितीही बदनामी केली तरी त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान ह्या नात्याने 17 वर्षे जी अखंडित सेवा करून ह्या नवस्वतंत्र देशाचा पाया रचला, ते श्रेय व त्यांची जनमानसातील अलोट लोकप्रियता कोणालाही इतिहासाच्या पानांवरून पुसता येणार नाही.

थोडक्यात सांगायचे तर महात्मा गांधी ह्या देशाचे मुक्तिदाता होते, तर नेहरू आधुनिकतेचे जनक व सांसदीय लोकशाहीचे संवर्धक, धर्मनिरपेक्षता, कायद्यासमोर सर्व समान ही भावना, संसदेला आदरणीय व कार्यक्षम बनविणे, सर्व लोकशाही परंपरांचे कटाक्षाने पालन (अपवाद एकच, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष इंदिरा गांधींच्या दडपणामुळे 1959 साली त्यांनी केरळातील लोकनिर्वाचित कम्युनिस्ट सरकार बरखास्त केले), विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने येथील वासाहतिक अर्थव्यवस्था व सरंजामी समाजव्यवस्था ह्यांचे केलेले आधुनिकीकरण, तसेच नियोजनबद्ध विकासाची संकल्पना ही सर्व नेहरूंची देणगी आहे. त्यांच्या अलिप्त राष्ट्र धोरणामुळे भारताला व त्यांना स्वतःला संपूर्ण जगाच्या मंचावर महत्त्वाची भूमिका बजावता आली, जी भारताच्या आर्थिक व सैनिकी क्षमतांच्या तुलनेत खूप व्यापक होती. कोरिया, इंडोचायना व काँगो येथील युद्धे थांबविण्यात त्यांना मिळालेल्या यशामुळे त्यांची जगभर वाहवा झाली. एप्रिल 1950 मध्ये नेहरू-लियाकत करार अंमलात आला, त्यानुसार भारत व पाकिस्तान ह्या देशांनी आपापल्या देशात अल्पसंख्याकांना कशी वागणूक द्यायची हे ठरले. त्यामुळे ह्या दोन देशात दीर्घकाळ चालून दोन्ही देशांना नष्ट करू शकेल असे युद्ध टळले. तब्बल एक आठवडाभर चाललेल्या ह्या उभयपक्षीय वाटाघाटीत कराराचे तब्बल 11 मसुदे बनविण्यात आले होते, ही बाब लक्षणीय आहे.

नेहरूंचा सर्वात मोठा पराभव त्यांच्या सर्वाधिक क्षमतेच्या क्षेत्रात- परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत व्हावा हा केवढा दैवदुर्विलास ! नेहरूंच्या चीनविषयक चुकीच्या धोरणामुळे आपल्याला 1962 मध्ये चीनकडून युद्धात अपमानजनक हार पत्करावी लागली. त्यामुळे नेहरू व्यक्तिगत दृष्ट्या व राजकीय दृष्ट्या पार खचले. दुर्दैवाने त्यांच्या नागरी किंवा सैनिकी सल्लागारांपैकी कोणीही त्यांना ह्या संदर्भात सावधगिरीचा इशारा दिला नाही, कारण पंडितजींना सारेच कळते’ असा त्या सल्लागारांचा समज होता.

ह्या विषयावर पुढे जाण्यापूर्वी नेहरूंचा संबंध नसलेल्या, पण आता त्यांच्या वंशजांच्या ताब्यात असलेल्या काँग्रेसपक्षाने ज्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला हवी आहे, अशा एका गोष्टीची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. दहा वर्षापूर्वी, नेहरूंच्या चाळिसाव्या पुण्यतिथीच्या 11 दिवस अगोदर आठ वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर काँग्रेसने देशाची सत्ता पुनरपि काबीज केली होती. ह्या वर्षी 16 मे रोजी परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. पाचशे त्रेचाळीस सदस्यांच्या लोकसभेत काँग्रेसचा वाटा फक्त 44 जागांचा आहे. ह्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला नसून नरेंद्र मोदी हेच त्या विजयाचे एकमेव शिल्पकार आहेत.

नरेंद्र मोदी ह्यांना जबरदस्त जनादेश लाभला, ह्यात शंका नाही. त्यांनी आपल्या प्रचारात संघ परिवाराच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यातील कोणताही विषय न निवडता विकास व सरकार चालविण्याची क्षमता ह्यावर भर दिला हेही स्पष्ट आहे. त्यांच्या कारकीर्दीवर आजच टिपणी करणे योग्य ठरणार नाही. पण त्याच वेळी आपले डोळे व कान बंद करून ह्या देशाच्या बहुविध व वैविध्यपूर्ण समाजाचे मोदी सरकारच्या राज्यात काय होऊ शकेल ह्याविषयी अनेक लोकांना वाटत असलेली भीती नजरेआड करून चालणार नाही. हे कसे विसरता येईल की ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बिहारच्या गिरिराज सिंग सारख्या भाजपा नेत्यांनी मोदींच्या विरोधकांसाठी ह्या देशात जागा नाही व त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे’ असे अनेकदा जाहीरपणे सांगितले होते व त्याबद्दल त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नेहरूंबद्दलच्या चर्चेत हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण नेहरूंची बदनामी करणाऱ्या दोन स्रोतांपैकी एक आहे जहाल हिंदुत्ववादी. नेहरूंचा वारसा नाकारण्याचे, त्यांची बदनामी करण्याचे त्यांचे प्रयत्न आतापर्यंत तरी असफल झाले आहेत व त्यामुळे ते कमालीचे संतापले आहेत. आता त्यांच्या हातात सत्ता आल्यावर ते काय करतात बघू.

त्याच वेळी हेदेखील सांगितले पाहिजे की नेहरूंचे वारस म्हणविणाऱ्यांनी सत्तेत असतानाही तोंडाने धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा केल्या, पण प्रत्यक्षात सांप्रदायिक शक्तींशी हातमिळवणी केली ह्यामुळे नेहरूंच्या आत्म्याला खचितच क्लेश झाले असतील. इ.स. 1980 च्या दशकात जर्नेल सिंग भिंद्रनवाले नावाच्या भस्मासुराची झालेली निर्मिती हे त्याचे एक बोलके उदाहरण आहे. राजीव गांधींनी शाहबानो खटल्याच्या निमित्ताने केलेली घटनादुरुस्ती ही एक महाभयंकर चूक, व तिच्यावर पांघरूण घालण्यासाठी राममंदिरसमर्थकांच्या हातात दिलेले कोलीत ही आणखी एक घोडचूक. त्यामुळे त्यांची स्थिती ना घर का, न घाट का अशी झाली ह्यात काय नवल? डिसेंबर 1992 मध्ये सेना-भाजपचे गुंड बाबरी मशीद जमीनदोस्त करीत होते, तेव्हा तात्कालिक पंतप्रधान नरसिंह राव हे दिल्लीत झोपले होते, किंवा पूजा करीत असल्यामुळे उपलब्ध नव्हते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ह्यांनी जामा मशिदीच्या इमामांची घेतलेली भेट देखील धर्मनिरपेक्षतेची शान वाढविणारी नव्हती.

ह्या संदर्भात फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री आंद्रे मालरा ह्यांनी नेहरूंना विचारलेल्या एका प्रश्नाची आठवण होते. त्यांनी विचारले होते की स्वातंत्र्यानंतर तुमच्यापुढची सर्वात मोठी अडचण कोणती? त्यावर नेहरूंचे उत्तर होते- न्याय्य साधनांनी न्याय्य राज्याची उभारणी करणे. त्यानंतर थोडे थांबून ते उद्गारले एका धार्मिक देशात धर्मनिरपेक्ष राज्य निर्मिणे, विशेषतः जेव्हा तो धर्म कोणत्याही पवित्र पुस्तकावर आधारलेला नसतो तेव्हा.

नेहरूंवरील हल्ल्यामागील दुसरा स्रोत आहे ज्यांचे नेहरूंशी कसलेच नाते उरलेले नाही अशा तरुणांची वाढती लोकसंख्या. नेहरू ही त्यांच्यासाठी दूरच्या इतिहासातील एक अंधुक प्रतिमा फक्त आहे. ह्यातील बहुसंख्य अज्ञानी बालकांना असे वाटते की नेहरूंनी जर समाजवाद, समता व वितरणासह वृध्दी ह्या चुकीच्या धोरणांचा आग्रह तेव्हा धरला नसता तर ह्या पिढीला खुल्या अर्थव्यवस्थेचे व जागतिकीकरणाचे लाभ अधिक लवकर चाखता आले असते. ह्यावरून वासाहतीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची उडालेली दैना, फाळणीमुळे त्यात पडलेली भर, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाचे अर्थकारण ह्याबाबींशी त्यांची तोंडओळखही नाही हे लक्षात येते. नेहरूंच्या काही विरोधकांनी त्यांच्या आर्थिक धोरणाचे वर्णन स्टॅलिनवादी असे केले आहे; तो निव्वळ मूर्खपणा आहे. जानेवारी 1955 मध्ये आवडी येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात समाजवादी पद्धतीच्या समाजनिर्मितीचा ठराव पारित करण्यात आला, त्यास मी हजर होतो.

त्यात वर्णिलेला समाज म्हणजे सोव्हिएत रशियाचा कम्युनिझम नव्हे. अर्थकारणातील महत्त्वाच्या बाबींवर राज्याचे नियंत्रण हे नेहरूंचे धोरण त्या काळाच्या अनेक पाश्चात्य सरकारांनीही अवलंबिले होते. ते त्या काळाला सुसंगतही होते. भारतात ते आवश्यकतेपेक्षा अधिक काळ चालत राहिले, ही मात्र चूक होती. अगदी नेहरूंच्या काळातही राजाजींच्या शब्दातील लायसेन्स परमिट राज’ची लागण झाली होती. इ.स. 1970 नंतर त्या धोरणाला पूर्णविराम देणे आवश्यक होते. दुर्दैवाने, इंदिरा गांधींनी (आर्थिक नव्हे, तर) राजकीय कारणांसाठी ते धोरण ताणले, असे आय जी पटेल ह्यांनी बँक राष्ट्रीयीकरणाच्या बाबतीत नोंदवून ठेवले आहे.

नेहरूंच्या ह्या मर्यादा ध्यानात घेऊनही त्यांच्या योग्य धोरणांमुळेच अलीकडच्या काळात भारताला आधुनिक उद्योग व सेवा ह्यांची उभारणी करता आली असे आता अनेक तज्ज्ञ व्यक्ती मान्य करीत आहेत. नेहरूंनी विज्ञान-तंत्रज्ञानाचा घातलेला पाया व उच्च शिक्षणात इंग्रजीचा समावेश करण्याचा त्यांचा आग्रह ह्या दोन बाबींना त्याचे श्रेय द्यावे लागेल.

मला आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करायचा आहे. नेहरूंनी स्त्रियांच्या उत्थापनासाठी जे कार्य केले ते कोणा स्त्रीवाद्यांनाही कधी जमले नसते. ते कार्य म्हणजे काँग्रेसमधील मोठ्या वर्गाचा, व तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ह्यांचा विरोध डावलून त्यांनी हिंदू कोड बिल पारित करून घेतले. जेव्हा गार्डियन वृत्तपत्राच्या ताया झिन्कीन ह्यांनी नेहरूंना तुमची सर्वात महत्त्वाची कामगिरी कुठली ? असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले- मी हिंदू स्त्रियांसाठी काही करू शकलो. मुस्लिम स्त्रियांसाठी मात्र मी ते करू शकलो नाही, कारण त्यांचा समाज त्यासाठी तयार नव्हता.

सरतेशेवटी काही शहाण्या माणसांची नेहरूंविषयीची मते उद्धृत करण्याचा मोह मला आवरता येत नाही. नेहरूंच्या धोरणांचे एक महत्त्वाचे टीकाकार म्हणजे सुप्रसिद्ध लेखक नीरद सी चौधरी. त्यांनी 1952 साली नेहरूंबद्दल लिहिले- (नेहरू) ही भारताच्या ऐक्यामागील सर्वात महत्त्वाची नैतिक शक्ती आहे… ते केवळ पक्षाचेच नव्हे, तर सर्व देशातील लोकांचे नेते आहेत. ते गांधीजींचे सुयोग्य वारसदार आहेत. अनेक वर्षांनी, जेव्हा ते नेहरूचे टीकाकार बनले तेव्हाही त्यांनी नेहरूंवर केलेली सर्वात कडक टीका अशी होती ते एक निष्प्रभ देवदूत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रदूत, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व नेहरूंचे मित्र जॉन केनेथ गालब्रेथ ह्यांनी नेहरूंच्या कामगिरीबद्दल अतिशय मार्मिक उद्गार काढले आहेत. ते म्हणाले होते-गांधींसोबत जवाहर म्हणजे-भारतच. गांधी म्हणजे देशाचा इतिहास; नेहरू म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे वास्तव.

नेहरूंनी 1949 साली अमेरिकेला पहिल्यांदा भेट दिली. डीन एक्सन हे त्या सुमारास अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते. त्यांनी तेव्हाच्या आपल्या आठवणीत असे नमूद केले आहे की नेहरू हे उद्घट, टोचणारे व मला भेटलेल्या व्यक्तींमधील सर्वात कठीण माणसांपैकी एक असे होते. पण ते पुढे नमूद करतात की भारत हा जगासाठी इतका महत्त्वाचा आहे व भारतासाठी नेहरू इतके महत्त्वाचे आहेत की व्हॉल्टेयर देवाविषयी म्हणाला तसे जर ते अस्तित्वात नसले तर त्यांना निर्माण करावे लागेल. मला असे नम्रपणे सांगावेसे वाटे की आधुनिक भारतीय इतिहासाच्या विविधरंगी मिरवणुकीत जे चमचमते तारे सामील आहेत, त्यांच्यात नेहरूंचे स्थान त्यांचे गुरु व शिल्पकार गांधीजी ह्यांच्या काही पावले मागे पण इतरांच्या खूप पुढचे आहे.

( इंडियन एक्सप्रेस वरून साभार)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.