आश्वासक सहजीवन कशातून शक्य होऊ शकेल?

जगाच्या परिस्थितीचे आकलन करून घेताना त्यातल्या अनेकानेक लोकसमूहांना आश्वासक सहजीवनाची शक्यता निर्माण झाल्याचे कितपत जाणवते किंवा हे जाणवण्यासारखी परिस्थिती आहे असे म्हणता येऊ शकते, हे अर्थातच उलगडायला हवे आहे. कारण जागतिक परिस्थितीतल्या लोकसमूहांनी ज्या तऱ्हेच्या व्यवस्थांचे व त्याच्या राजकीय स्वरूपांचे अनुसरण केले व त्यांचा अनुभव घेतला, अर्थात तो अनुभव अद्याप घेतला जातोहो आहेच, त्यातून आश्वासक सहजीवनाची परिपूर्ती करता आली किंवा काय, हा प्रश्न उपस्थित झालेलाच आहे.
जगातल्या कोणत्याही व्यवस्थेत राजकीयतेचे जे प्रमाण वाढले आहे व त्याचे महत्त्व निर्माण झालेही आहे, ते अपरिहार्यतेतलेच जरी मानले जात असले, तरी राजकीय व्यवस्था आश्वासक सहजीवनाची पूर्तता करण्याच्या पात्रतेची झाली आहे, किंवा ती त्या पात्रतेची होऊ शकेल, असे सर्वच व्यवस्थेतले अंतर्विरोध ज्या एका प्रमाणात उफाळून वर येताना दिसते आहे, त्यावरून तरी वाटत नाही. याला कदाचित मानवीय स्वभावातले गुणदोष कारणीभूत असूही शकतील, पण गुणदर्शनापेक्षा दोषदर्शनच सर्वाधिक प्रमाणात उघड होताना दिसते आहे. तेव्हा मानवीय स्वभावातले गुणदोष सहजीवनाच्या आश्वासकतेतलेच कसे करता येऊ शकतील व ते तसे ठेवताही येऊ शकतील, हे अर्थातच जाणून घेता यायला हवेच आहे. पण हे जाणून घेता येणारच नाही, असाच काहीसा आग्रह राजकीय व्यवस्थेच्या आस्थेतून केला जातो व म्हणूनच राजकीय व्यवस्थेची अपरिहार्यताही यामुळेच प्रतिपादिली जात असावी, असे वाटते. तेव्हा राजकीय व्यवस्थेची अपरिहार्यता मनावर बिंबवण्यासाठी त्यातून सहजीवनाची आश्वासकता दृष्टिआड केली जात असावी, असाच काहीसा याचा अर्थ लावला जातो आहे, व तो प्रतिष्ठित करण्याचा अट्टहासही केला जातोच आहे.
अशी ही मनाची विचलित अवस्था हतबलतेच्या भोव-यात आजवर गटांगळ्या खात आलेली आहे व अपरिहार्य अशा राजकीय व्यवस्थेच्या बाबतीतही हीच मनाची अवस्था झालेली असते व आहे, हे लक्षात घ्यायला हवे. याची निखळ लक्षणे लक्षात घेण्यासाठी (स्व.) मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारताना ते वक्तव्य केले होते, ते जगाच्या नव्या संदर्भात पुन्हा एकदा जाणून घ्यायला हवे आहे.
१: आळसावलेली माणसाची बौद्धिकता
(स्व.) मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांनी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट केले होते की, माणूस आकाशात पक्ष्यासारखा उडू शकतो, पाण्यात माशांसारखा तरंगूही शकतो; पण पृथ्वीवर माणसांशी माणसासारखा वागू शकत नाही. या व्यक्तव्यातून त्यांनी जगाच्या मूलभूत समस्येचे दिग्दर्शन केले होते, हेच म्हणायला हवे. मानवीय भूमिकेला तडा जाईल अशी कोणतीही व्यवस्था माणसाने स्वीकारूच नये, हे देखील यातूनच दर्शवले गेले आहे, असे मानावे काय? जर हे दर्शवले गेलेच असेल असे मानले, तर मानवीय भूमिकेला तडा देणारी कोणतीही व्यवस्था माणूस का स्वीकारत असावा, याचा शोध घ्यायला हवा.
ISTOLE TOHÉ PISH SHERE TO INTE सध्याच्या जगात माणसांच्या परिणामकारी व्यवस्थापकीय गरजा जर नीट न्याहाळून पाहता आल्या तर लक्षात येईल, की व्यवस्थापकीय- नियोजनावर व आयोजनावर माणसाने विसंबून राहण्याचे प्रमाण वाढतच गेलेले आहे व ते सतत वाढतेही आहे. म्हणून व्यवस्थापकीय गरजा मानवीय गरजेतल्याच जर ठरल्या व ठरवता आल्या तर त्यावर विसंबून राहणे स्वाभाविक व अपेक्षितच म्हणावे लागेल. म्हणूनच आश्वासक सहजीवनाची गरज व उपयुक्तता माणसाला वा मानवीय समूहांना वाटत नसेल तर व्यवस्थापकीय आयोजन- नियोजन स्वीकारावेच लागते, हे स्पष्टच आहे; पण यामुळे मानवीय आश्वासक सहजीवन या पृथ्वीतलावर अस्तित्वात असणारच नाही किंवा असू शकणारच नाही व असूही नये, असेच ठरवावेही लागेल. कारण सर्व त-हेच्या व्यवस्थापकीय आयोजन – नियोजनातून हेच निष्पन्न होते आहे, असे सकृतदर्शनी तरी वाटतेही आहे. अर्थात असे हे वाटणे काल्पनिक नसून वस्तुस्थितीचे निदर्शकही आहे हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात यातूनच स्पष्ट होते हे की, माणसांचे आश्वासक सहजीवन त्याच्या स्वतःच्या उत्स्फूर्त प्रेरणेतून शक्य होणार नसल्यामुळे व्यवस्थेच्या परिणामकारकतेतून ते व्यवस्थेला हवे तसे शक्य होणारही आहे, असेच मानावे लागेल.
राजकीय व्यवस्था अपरिहार्य मानूनच माणसाने व जगातल्या सर्वच मनुष्यसमूहांनी जशी राजकीय व्यवस्था स्वीकारली आहे, तशाच राजकीय व्यवस्थेचे अनुशासनबद्धतेमुळे येऊ शकणा-या व आलेल्या अनिवार्य अशा जाचकतेचा किंवा शोषणाचा स्वीकारही केलेलाच आहे. व्यवस्थेच्या अनुशासनबद्धतेमुळे अपरिहार्य अशा परिस्थितीत येणाऱ्या जाचकतेतूनचे शोषणाची प्रक्रिया अस्तित्वात आलेली असते, व यामुळे शोषणातच जगण्याची अपरिहार्यता माणसाची व मनुष्यसमूहाची झालेली असावी, असाही निष्कर्ष यातूनच काढताही येऊ शकतो. किंबहुना हाच निष्कर्ष काढला जाणे अपरिहार्य ठरतेही आहे.
माणूस माणसांशी माणसासारखा का वागत नसावा, हे न उलगडणारे कोडे म्हणायचे की अज्ञानमूलकतेचा हा अपरिहार्य ठरलेला परिणाम म्हणावा, यापैकी काहीही एकच जाणिवेत सामावून घेता येण्यासारखे आहे, कारण एवढेच शक्य आहे. पण व्यवस्थापकीय आवरणात वावरणारी व त्याच्या प्रभावात गेलेली आळसावलेली माणसाची बौद्धिकता हे जाणिवेत येण्याच्या शक्यतेला अव्हेरत आलेली असावी, असे वाटते. अर्थात हा एक प्रकारचा जाणवणारा मागासलेपणा किंवा म्हटलेच तर मठ्ठपणाही म्हटला जाईल. अर्थात यातून मुक्त होऊन बाहेर पडता यायला हवे आहे. कारण यामुळेच माणूस बौद्धिक पात्रता बाळगून आहे, असे म्हणता येऊ शकेल. याला अनुसरूनच मार्टिन ल्यूथर किंग यांच्या वक्तव्याचा अर्थ लावणे या ठिकाणी अभिप्रेतही आहे.
२ : हृदयंगम अवस्थेतून शासन अस्तित्वात येत नसते
माणूस स्वातंत्र्यप्रिय आहे, असे म्हटले जात असले तरीही पारतंत्र्याची प्रदीर्घ परंपरा निर्माण झालेलीही आहेच. अर्थात पारतंत्र्याची बंधने तोडून स्वतंत्र होण्यीच धडपड केली जाते व यासाठीच स्वातंत्र्याच्या चळवळी होतही असतात व झालेल्याही आहेत. याच्या परिणामातूनच स्वातंत्र्य लाभते व लाभलेलेही आहे, असे खरेच म्हणता येईल काय? कारण एका राजकीय व्यवस्थेतून मुक्त होऊन दुस-या राजकीय व्यवस्थेत प्रवेश केला गेला, एवढेच प्रत्यक्षात दिसते व दिसलेही आहे. म्हणून कोणतीही राजकीय व्यवस्था मानवीय आश्वासक सहअस्तित्व मनुष्यसमूहांना लाभावे, या दृष्टीने उपयोगी ठरतच नसावी, असाच याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. तेव्हा हा निष्कर्ष अनेकानेक स्वातंत्र्याच्या चळवळी होऊनही कायमच राहिला असेल किंवा राहणारच असेल, तर खरोखरच माणसाला व जगातल्या मनुष्यसमूहांना स्वातंत्र्य हवेच आहे किंवा काय हा प्रश्न देखील उपस्थित होतो. म्हणूनच म्हणावे लागते की, राजकीय व्यवस्था स्वीकारून माणसाने व जगातल्या सर्वच मनुष्यसमूहांनी जाणीवशून्य अवस्थेतच जगत राहण्याची परंपरा जपलेली असावी व ही परंपराच कदाचित माणसाला व मनुष्यसमूहांना जगण्यास पात्र ठरवणारी नसेलही; पण यामुळे जगात आश्वासक सहजीवन शक्यच होणार नाही, असाच एक निष्कर्ष यातून काढलाही जाईल. पण हे माणसाच्या व जगातल्या मनुष्यसमूहांच्या पराभूत मनोवृत्तीतलेच म्हणावे लागेल.
३ : आयोजन – नियोजन व कौटुंबिकतेतली सहजावस्था
माणूस ही व्यक्ती आहे ती ज्यांच्यापुढे व्यक्त होते किंवा जशी व्यक्त होते ती समष्टी आहे. व्यक्त होण्याच्या वृत्ती व पद्धतीत समष्टीचा स्वीकार करणेच जर व्यक्तीला अपरिहार्य वाटत असेल, तर त्याची कारणे लक्षात घ्यायला हवीत. कारण समष्टीचा स्वीकार निश्चित अशा कारणातूनच केला जाऊ शकतो व केला गेलाही असावा, असे व्यक्तीची वृत्ती लक्षात घेऊन निश्चितच ठरविता येऊ शकते. अर्थात व्यक्ती एकाकीपणे राहू शकत नाही व जगूही शकत नाही. कारण ते त्याला शक्य होतच नसते. म्हणून एकाकीपणाचा अभाव ज्यातून नाहीसा केला जातो किंवा तो नाहीसा होतो, त्यातूनच समष्टीची गरज निर्माण होते व ती अस्तित्वातही येते. अर्थात ती अस्तित्वात आलीही आहे. ही गरज फक्त बौद्धिक व भावनिक पातळीवरचीच म्हणता येत नाही, व तसे म्हणूही नये. कारण ऐहिकतेतच जगण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या पातळीवरचीही ती असते व आहेच. तेव्हा समष्टी ही माणसाच्या अभिव्यक्तीतूनच म्हणजे याच्या गरजेतूनच अस्तित्वात येत असल्यामुळे व्यक्ती आणि समष्टी अभिन्नच असतात व आहेत. पण व्यक्ती आणि समष्टी या दोहोंचे संबंध ज्यातून अस्तित्वात येतात, ते हृदयंगमतेतलेच असतात व असू शकतात. म्हणजे हृदयाच्या प्रक्षेपणातल्या आदान-प्रदानतेतले व स्पंदनातले ते असतात व ते तसेच असूही शकतात.
अशी आत्मीयतेची अभिव्यक्ती उत्स्फूर्त व सहजतेतलीच असल्यामुळे कोणत्याही नियम व आयोजनातली नसते व नाही. यामुळे ती कोणत्याही अनुशासनातील म्हणताही येत नाही. आत्मीयतेत आयोजन- नियोजन, अनुशासन असे काहीच नसल्यामुळे यातून कोणतेही शासन अस्तित्वात येत नसतेच व नाही.
अशा संबंधात राज्य शासनाचे आयोजन नियोजन नसणेच स्वाभाविकही असते. याचा केंद्रबिंदू माणसाचे हृदय आहे. म्हणजे हृदयंगम अवस्थेत संबंधांत आयोजन- नियोजन व शासन आदि काहीच नसल्यामुळे संबंधात शासन अथवा राज्यशासन अस्तित्वात येतच नाही. फक्त एक सहजावस्थेतली कौटुंबिकताच अस्तित्वात येत असते. तेव्हा राज्यशासनाचे आयोजन – नियोजन व सहजावस्थेतली कौटुंबिकता या दोहोत हृदयंगमतेमुळे व्यक्ती आणि समष्टीलाही शासनाचे आयोजन- नियोजन किंवा राज्यशासनाची गरज नसते व नाही असेच मानले गेले आहे.
४: कुटुंबवत्सलतेपासून वंचित राहता कामा नये
व्यक्ती-व्यक्तीतले संबंध समष्टिरूपातले असतात, व याचा पाया कौटुंबिकतेतूनच घातलाही जातो. कारण कौटुंबिकतेतूनच तो पाया घातला जाऊ शकतो. यामुळेच कौटुंबिकता जपण्यातून व विकसित अथवा घट्ट करण्यातून व्यक्ती- व्यक्तीमधले व समष्टीतले संबंध फुलतही असतात. ते फुलावेत व फळावेत हीच व्यक्ती आणि समष्टीची गरज असते व आहे. म्हणून कौटुंबिकता संस्था म्हणून नव्हे, तर परस्पर संबंधातून समष्टीला आकार देण्याची निखळ प्रेरणा यात असते व आहे. म्हणूनच मनुष्य व मनुष्यसमूह आश्वासक सहजीवनाला प्रेरक व पोषक असतात व असू शकतात, हे खात्रीपूर्वक म्हणता येऊ शकते.
ऐहिक सुखाच्या भ्रामक गतिमानतेतून आश्वासक सहजीवनाची शक्यताच अस्तित्वात येईनाशी झाली आहे. याचा प्रत्यय क्षणोक्षणी येतच असतो व यातून वैफल्यग्रस्त मानसिकता अस्तित्वात आलेलीही आहे. सर्व प्रकारचे गुन्हे, हत्या- आत्महत्या व वाढता उग्रवाद तसेच दहशतवाद हे सर्व अरिष्ट यातूनच वृद्धिंगत झाले आहे व होत असते. अर्थात राष्ट्रजीवनात अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार करूनच जो सम्राज्यवाद व विस्तारवाद अस्तित्वात येतो व आलेला आहे त्याच्या परिणामासूनच युद्धांची शक्यता वाढतच जाते. याचेच पर्यवसान जागतिक युद्धात होत असते. या आधी दोन महायुद्धे झालेली आहेत. ती यातलीच होती. आता तिस-या जागतिक महायुद्धाची शक्यता बोलून दाखवली जाते आहे. याची अपरिहार्यता साम्यवादाच्या प्रसारासाठी माओत्से तुंग या चीनच्या क्रांतिकारी नेत्याने त्याच्या लाल पुस्तकात (रेड बुक) नमूद करून ठेवलेलीच आहे. पण अमेरिकेच्या साम्राज्यवादी प्रसारणातूनही इराक-अमेरिका युद्ध झाले असले तरी अशी युद्धे यापुढेही होतच राहतील. अफगाणीस्तानलाही याची झळ लागलेलीच आहे. तेव्हा ही सर्व वैफल्यग्रस्त मानसिकतेतलीच लक्षणे म्हणायला हवीत.
कौटुंबिकता व कुटुंबवत्सलता या दोहांचा स्वतंत्रपणेच विचार करायला हवा. कारण कुटुंबालाच कुटुंबसंस्था म्हणण्याची प्रथा पाडली जाते आहे. पण ती अतिशय धोक्याची आहे. कुटुंबात वत्सलता असावीच लागते ती असली तरच कुटुंब-वत्सलता अस्तित्वात राहू शकते. पण ती जर कुटुंब संस्थाच होणार असेल तर कोणत्याही संस्थेत जशी वत्सलता नसते, तशीच कुटुंबसंस्थेतही नसूच शकते व नाही, हे लक्षात घ्यावेच लागेल. हल्लीच्या कुटुंबांना व्यवस्थेचे रूप दिले असल्यामुळे त्यातून कौटुंबिक वत्सलता नाहीशी झालेली दिसते आहे. याची अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. अमेरिका व युरोपीय राष्ट्रांत प्रगती साधण्यासाठी भारतातल्या कुटुंबातले काही जेव्हा जाऊन राहतात, तेव्हा ते कुटुंबवत्सलतेपासून वंचित होतात व त्यांच्या कुटुंबाविषयीची त्यांची प्रेरणा व संवेदनाच नाहीशी होताना दिसून येत आहे. भारत, अमेरिका व युरोपातल्या अनेक राष्ट्रात हे प्रत्ययाला येत आहे.
व्यक्तींमधल्या संबंधातून जर कुटुंबातल्या वत्सलतेला उजाळा देता आला व तो विकसित करता आला तरच जगात आश्वासक सहजीवनाला भविष्य असू शकेल. पण या दृष्टीने निश्चित असे काहीही ठरवून पुढे जायचेच असेल, तर सध्या म्हणवल्या जात असलेल्या भ्रामक प्रगतीला कसे नियंत्रित करायचे यावरच विचार करायला हवा. कारण भ्रामक प्रगतीतून मनुष्यसमूहातले संबंधविच्छेद होत जाऊन जो एक भावनिक कोरडेपणा येत आहे व बऱ्याच प्रमाणात तो आलेलाही आहे, त्याचे निरसन केवळ कौटुंबिक वत्सलतेतूनच परस्पर संबंधांत जिव्हाळा निर्माण करता येणे शक्य झाले तरच करता येऊ शकेल. यासाठी भ्रामक प्रगतीच्या उपभोगवादी मानसिकतेला ही अशी प्रगतीच नाकारण्याचे मनोधैर्यही निर्माण करावेच लागेल. अर्थात याचे आचरण करण्यासाठी प्रयोगशील होण्याची गरज निर्माण झालीही आहे. विनोबांनी याच दृष्टीने असेल कदाचित त्यांच्या अंतिम काळात स्त्रियांच्या उन्नत अवस्थेची कल्पना करून ब्रह्मविद्येचा पुरस्कार करण्याऱ्या स्त्रियांचा एक उपक्रम वर्ध्याजवळ पवनारच्या त्यांच्या आश्रमात सुरू केला व तो अव्याहतपणे कोणतीही अनावश्यक प्रसिद्धी वा जाहिरातबाजी न करताच चालू ठेवला गेलाही आहे.
उपसंहार
या सर्व बाबतीत सुचवायचे ते एवढेच की मार्टिन ल्यूथर किंग यांनी आश्वासक सहजीवनाच्या संदर्भात पृथ्वीतलावर माणूस माणसाच्या निकट माणसासारखा राहत नाही वा वावरतच नाही, ही जी संवेदना व्यक्त केली होती, त्याचा विचार करताना वाटते की, या दृष्टीने विचारमंथन जगात सर्वत्रच केले जात असून त्याचे काही उपक्रमही राबवले जात आहेत. तेव्हा जगातल्या लोकसमूहांना आश्वासक सहजीवन घडवण्याच्या दृष्टीने अद्याप बरीच मजल गाठायची आहे. पण मजल गाठण्याच्या दृष्टीने माणसाला राजकीयतेत अडकवून ठेवण्याच्या राज्यवादी मानसिकतेतून कसे मुक्त करायचे व ठेवायचे हा एक प्रमुख प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे माणसाचा मुक्ति- मार्ग हा राजकीय आयोजनाला व नियोजनालाही हेतुतः टाळून अथवा त्याला अव्हेरूनच पुढे जातो किंवा जायला हवा हे लक्षात घ्यावेच लागेल. अर्थात जागतिक पातळीवरच याची एक मानसिरता निर्माण करायला हवी आहे. सुखद मानवीय भवितव्य जे आश्वासक सहजीवनाचेच मानले जाऊ शकेल, ते अर्थातच शक्यही होऊ शकेल, याचीच आशा व अपेक्षा करायला हवी.
साईनगर, २ डी-१
फ्लॅट-१३, सिंहगड रोड, पुणे- ४११०३०
दूरभाष- ०२०-२४२५०६९३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.