जातिव्यवस्था आणि न्यूनगंड

भारतीय समाजामध्ये जातिव्यवस्था खूप खोलवर रुजली आहे. त्याचे दूरगामी परिणाम आपल्या व्यावहारिक जगण्यावर तसेच मानसिकतेवरही झाले याहेत. जातिनिर्मूलनाचे अनेक प्रयत्न व चळवळी ह्या देशात झाल्या, त्याने थोडाफार फरक पडला, पण निर्मूलन झाले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी ज्या ज्या संघटना उभारण्यात आल्या, त्यांचे स्वरूप वरकरणी जरी जातिभेद न मानणारे दिसत असले, तरी जातिव्यवस्थेने घडविलेल्या मानसिकतेतूनच त्या मुळातून काम करीत असतात. ह्या मानसिकतेचे एक व्यक्त रूप म्हणजे तथाकथित खालच्या जातींना येणारा न्यूनगंड. ह्या न्यूनगंडाची कारणमीमांसा व परिणाम आपण ह्या लेखात पाहणार आहोत. परिवर्तनवादी संघटनांची मजबूत बांधणी करून त्या दीर्घकाळ टिकवून ठेवायच्या असतील तर आपल्याला हा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.
जातिव्यवस्था आपल्याकडे रुजली असली तरी तिच्यात कालानुरूप बरेच बदल झाले आहेत आणि त्या बदलांचा – किंबहुना वेगवेगळ्या स्वरूपांचा विचार करावा लागेल. जातिव्यवस्थेच्या स्वरूपात मुख्य बदल झाला तो शेतीव्यवस्थेतून भांडवलशाहीकडे येताना. अशा रीतीने व्यवस्थांतर होताना राजकीय सत्ताकेंद्रे तर बदलतातच. म्हणजे एका वर्गाच्या हातांतील सत्ता दुसऱ्या वर्गाकडे हस्तांतरित होतेच. पण व्यवस्थांतर म्हणजे केवळ राजकीय सत्तांतर नव्हे. व्यवस्था, म्हणजे संपूर्ण समाजाला, संपूर्ण आयुष्याला वेढून टाकणारी गोष्ट आहे. त्यामुळे एक व्यवस्था दुसरीत ढाळली जात असताना बरेच काही बदलावे लागते. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ज्ञानसत्ता. अतिशय दुर्लक्षित अशा ह्या घटकाकडे मला, ह्या लेखाद्वारे वाचकांचे लक्ष वेधायचे आहे.
ज्ञानसत्ता म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी युरोपचे उदाहरण घेऊ या. युरोपमध्ये सरंजामशाहीमधून भांडवलशाहीत व्यवस्थांतर झाले. युरोपमधील भांडवलशाहीची प्रक्रिया अठराव्या एकोणिसाव्या शतकात आपल्याला एकदम गतिमान झालेली दिसते. ही गती तिला औद्योगिक क्रांतीतून मिळाली असाही आपला समज होतो. पण थोडेसे खोलवर डोकावून पाहिले तर लक्षात येते की व्यवस्थांतराची ती प्रक्रिया औद्योगिक क्रांतीतून नव्हे तर तेराव्या-चौदाव्या शतकात ज्ञानसत्तेला आह्वान देतच सुरू झालेली आहे. त्याची राजकीय परिणती भांडवलशाहीच्या स्थापनेत झालेली दिसते. त्यानंतर ती कष्टकरी-कामगारवर्गाच्या सत्ता मिळण्यात परिणत होईल असे भाकीत कार्ल मार्क्स ह्याने केले होते. परंतु ही सत्ता काबीज करण्यासाठी कामगारवर्गाला स्वतःची ज्ञानरचना करावी लागेल ह्याचे मार्क्सला चांगले भान होते. भांडवलशाहीने प्रस्थापित केलेल्या ज्ञानसत्तेला आह्वान देत मार्क्सने कामगारवर्गाचे ज्ञान अशी संकल्पना जाणीवपूर्वक प्रस्थापित केली आहे.
भारतीय समाजात मात्र ह्या मुद्द्याबाबत फारशा चर्चा झालेल्या नाहीत. एका शोषक ज्ञानसत्तेचा पराभव करून शोषितांची ज्ञानसत्ता प्रस्थापित करणे, हे परिवर्तनवादी चळवळींचे उद्दिष्ट म्हणून मांडले गेलेले नाही. एकोणिसाव्या शतकात महात्मा जोतिराव फुले ह्या द्रष्ट्या क्रांतिकारकाने मात्र त्याच्या गुलामगिरी ह्या ग्रंथातून ह्या मुद्द्यावर चर्चा केली होती. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया ह्यांनी आपले प्रति ज्ञान उभे करावे ह्यासाठी त्यांनी मूलगामी प्रयत्न केला होता. फुले जेव्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सत्तेचा विचार करतात, तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी ते सत्तेच्या ब्राह्मणी आशयाला, भांडवली आशयाला आणि त्या आशयाच्या आधाराने उभ्या राहिलेल्या रचनेला नाकारत असतात. त्यानंतर महात्मा गांधींनी काही प्रमाणात प्रति-ज्ञान उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कामकरी वर्गाच्या मुलांसाठी बुनियादी शिक्षणाचा प्रयोग केला, तर महागडे अॅलोपॅथी (त्यांच्या भाषेत इंग्रजी) औषध देणाऱ्या डॉक्टरला शह देण्यासाठी निसर्गोपचाराचा उद्घोष केला. त्यानंतर मात्र तो धागा तुटला तो तुटलाच. खरे सांगायचे तर फुल्यांनंतरच्या काळातील अब्राह्मणी सुधारकांनी ब्राह्मणांना शिव्या देण्याचा उद्योगच तेव्हढा मोठ्या प्रमाणावर केला.
प्रति ज्ञान न निर्माण केल्याचा सगळ्यात वाईट परिणाम असा झाला की जातिनिर्मूलनाचा विचार, सत्तेतील ब्राह्मणांना हटवून त्यांची जागा आपण घेणे एवढ्याच संकुचित रूपात शिल्लक राहिला. आणि ब्राह्मणांची जागा घेणे म्हणजे काय, तर आपणच ब्राह्मण बनणे असा सोयीचा अर्थ साऱ्यांनी घेतला. ह्या व्यवस्थेतील ब्राह्मण्य नष्ट करण्याचे भान कुणाला आलेच नाही. म्हणजे, ज्यांना दूर सारायचे, त्यांच्यासारखेच स्वतः बनण्याचा अंतर्विरोध येथे निर्माण झाला.
ह्याचे दूरगामी परिणाम आज सर्वच क्षेत्रांत झालेले आहेत. म्हणजे फुल्यांनंतरच्या प्रत्येक पिढीतील तथाकथित अब्राह्मणी नेतृत्वाने सत्तेशिवाय इतर अंगाच्या ब्राह्मणी आशयाचा मुद्दा विचारात न घेतल्यामुळे जे अब्राह्मणी प्रति – ज्ञान निर्माण व्हायला हवे होते ते होऊच शकलेले नाही. ते निर्माण न झाल्यामुळे इथला बहुजनसमाज शिकण्याच्या नावाखाली केवळ साक्षर होत राहिला. ही साक्षरता ग्रहण करताना त्याने मूल्य म्हणून जे घेतले ते सगळे ब्राह्मणीच राहिले. कळत नकळत या ब्राह्मणी मूल्यांना स्वीकारल्यामुळे त्यातील बहुसंख्य लोकांना असे वाटू लागले की, मी एवढे सर्व शिकलो आहे तरीपण हा कुळकर्णी मला मानत का नाही? मग हटवा त्याला. असा हा अंतर्विरोध आहे.
भारतातील भांडवलशाहीपूर्वकाळात शेतीकेंद्रित उत्पादन व जातिव्यवस्था होती. तीत शेतीच्या गरजांनुसारच गावांच्या रचना होत्या. सामूहिकता हे या शेतीकेंद्रित उत्पादनव्यवस्थेचे चांगले वैशिष्ट्य होते. त्यात एका बाजूला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये महानुभाव पंथीय, वारकरी पंथीय, लिंगायत पंथ, सूफी, नाथ पंथीय ही सगळी संतमंडळी त्या जातिव्यवस्थेमध्ये प्रति ज्ञान (काऊंटर नॉलेज) उभे करीत. ही सर्व मंडळी बहुजनांची अब्राह्मणी ज्ञानकेंद्रे आहेत व त्यांच्यात न्यूनगंड नाही.
पुढे ब्रिटिश आले आणि त्या काळात अनेक गोष्टी घडल्या. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की बहुजन समाज आपल्या उत्पादनांच्या साधनांपासून हळूहळू तुटत गेला. ह्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले व त्यानंतर महात्मा गांधी ह्या दोघांनी संतमंडळींचा प्रति-ज्ञानाचा तुटलेला वारसा आणि धागा पुन्हा पकडून एकोणिसाव्या शतकामध्ये भांडवली आणि ब्राह्मणी ज्ञानसत्तेला आव्हान देत प्रति-ज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला.
आताच्या काळात ब्राह्मणी सत्तेशी भांडण्याचा अब्राह्मणांचा कितीही दावा असला तरी ब्राह्मणांना बाजूला करून त्यांची जागा घेण्याचाच हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे, बहुजनांतली यशस्वी व्यक्ती कोण? तर जी ब्राह्मणी सत्तेमध्ये यशस्वीपणे आपले स्थान निर्माण करू शकली ती. या प्रक्रियेमध्ये ब्राह्मण्य या गोष्टीला धक्काही लागत नाही. कारण श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या सगळ्या संकल्पना आणि मूल्ये ही मूलतः ब्राह्मणी आहेत. म्हणजे जन्माने बहुजन वा ब्राह्मणेतर आणि वृत्तीने ब्राह्मण असा हा अंतर्विरोध आहे. हा अंतर्विरोध न्यूनगंडाची भावना निर्माण करतो, मग हा न्यूनगंड सूक्ष्म पातळीवरून क्रियाशील राहतो. एकीकडे ब्राह्मण्य अंगी बाणून मोठे बनण्याच्या प्रयत्नात असलेले मी मी म्हणणारे लोक आतून मात्र न्यूनगंडाने पछाडलेले असतात. उदा. महाराष्ट्रातील स्वतःला दादा समजणारे सगळे राजकारणी, दिल्लीत गेले की तेथे मनसबदार होऊन जातात. छत्रपती शिवाजीमहाराज मनसबदार झाले नाहीत; परंतु इथून दिल्लीत गेलेले सगळे आधुनिक शिवाजी दिल्लीच्या सत्तेचे मनसबदार झालेत. मग ते यशवंतराव असोत, शरद पवार असोत, विलासराव असोत किंवा गोपीनाथ मुंडे असोत. त्यांनी या व्यवस्थेमध्ये यशस्वीपणे ब्राह्मणांच्या ऐवजी आपले स्थान निर्माण केलेले आहे; पण ते करताना कळत नकळत ब्राह्मणी मूल्ये उधार घेतलेली आहेत. त्यांच्याकडे स्वतःचे मौलिक असे काही नसल्यामुळे, दिल्लीच्या सर्वोच्च सत्तेसमोर ते नतमस्तकच होतात. त्यामुळे ह्यांच्यातला कोणी चुकून उद्या पंतप्रधान झाला, तरी त्या पंतप्रधानकीचा जो आत्मविश्वास नेहरू परिवाराला आहे, लालबहादूर शास्त्री, नरसिंह राव ह्यांना होता तो ह्यांना असेलच असे नाही.
न्यूनगंडांची उगमस्थाने समजून घेतली नाहीत, तर या व्यवस्थेच्या विरोधातला लढाच उभा करता येत नाही. दुसरे असे की ही न्यूनगंड नावाची गोष्ट जर आपण मान्य केली नाही, तिला ओळखले नाही तर तिचा दुसरा आविष्कार अत्यंत उथळ- उर्मट – अरेरावीच्या अहंगंडामध्ये होतो. अहंगंड ही न्यूनगंडाचीच एक वेगळी अभिव्यक्ती आहे. आणि ब्राह्मणी व्यवस्था अशा उथळ उर्मट अहंगंड असलेल्यांना नीट मोठे करते. प्रसिद्धिमाध्यमेही त्याला साथ देतात. प्रति-ज्ञाननिर्मितीसाठी चळवळ उभारणाऱ्या प्रामाणिक लोकांना झाकण्यासाठीही अशा उथळ उर्मटांची प्रसिद्धी मुद्दाम केली जाते. ती व्यवस्थेची गरज असते. कारण अशा प्रसिद्धीमधून त्यांचा आक्रोश बाहेर पडतो, जो सेफ्टी व्हॉल्व म्हणून काम करतो. या सगळ्या प्रकारात व्यवस्थेच्या नावाने कंठशोष केला जातो, परंतु व्यवस्थेवर ओरखडाही उमटत नाही.
हरितक्रांतीमुळे जी रोख पिके घेण्याची पद्धत आली त्यामुळे मधल्या वीस- पंचवीस वर्षाच्या काळात प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या जातींना जो माज आला तोही जरा नीट समजून घ्या. तो पण अशाच न्यूनगंडाचा उथळ आविष्कार होता. अशा माज असलेल्या लोकांना व्यवस्थेने पद्धतशीरपणे मोठे केलेले आहे. उदा. वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक. शालिनीताई पाटील यांनी महाराष्ट्रात मराठाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी जी बाजू मांडली ती कशाच्या जोरावर ? तेव्हा फक्त चार टुक्के ऊस उत्पादक महाराष्ट्रातील ८०% पाणी पळवीत होता आणि ते पाणी पळविण्याची ताकद अंगामध्ये असण्याचा तो माज होता. फक्त जलसिंचित प्रदेशातच ऊस येतो. आजही महाराष्ट्रामधला तो प्रदेश ३०-३५% च्या वर गेलेला नाही. आता तर त्याच भागाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असल्यामुळे तो तसाही कमी होत चालला आहे.
या माज आलेल्या वर्गाची जागा आता जमिनी विकून पैसे मिळविलेला वर्ग घेत आहे. या दोन्ही वर्गाचे अहंकार आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचा अहंकार या तिन्हींमध्ये गुणात्मकदृष्ट्या फारसा फरक नाही. त्याचे खरे स्वरूप ज्ञानसत्तेबदद्दलचा न्यूनगंड हेच आहे. म्हणजे कालपर्यंत हरितक्रांतीमुळे मोठा झालेला माणूस शिकलेल्या माणसाला किमान, तू शिकलेला म्हणून नमस्कार तरी घालत होता. परंतु आता जमिनी विकून ज्याच्याकडे पैसा आलेला आहे तो असे मानतो की, अरे तू तर पैसे देऊनच शिकलास आणि शिकायला जेवढे पैसे दिलेस त्यापेक्षा जास्त पैसे माझ्याकडे आहेत. मी सोन्याचा शर्ट शिवतो की लेका. तू शिकून तरी असा शर्ट शिवू शकतोस का?
हरितक्रांतीने माज आलेल्या वर्गात जन्म घेतलेला व शेतीपासून तुटलेल्या तरुणाला कालपर्यंत किमान बापाने/सासऱ्याने काढलेल्या संस्थेत पैसे न देता शिक्षक/ प्राध्यापक तरी होता येत होते. त्यासाठी फार तर संस्थाचालकाच्या पोरीशी लग्न करण्याची तडजोड करावी लागत होती. मराठवाड्यात विशेषतः हा प्रकार खूप होता.
भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला प्रगती करण्यास थोडा तरी वाव होता. आता तो संपुष्टात आला आहे. कारण सगळीकडेच आज प्रचंड साचलेपणा आहे. शिक्षणाचे काय झाले आहे? उद्बोधन हा शिक्षणाचा हेतूच नष्ट झाला. शिक्षणाच्या उदात्त कार्याचा आज निव्वळ एक उद्योग बनून राहिला आहे. शिक्षण मोजावयाचे पहिले युनिट म्हणजे साक्षरता. लिहिता वाचता आले की चांगले राहणीमान प्राप्त करून घेता येईल असे पूर्वी मानले जात असे. पण आज ही साक्षरता संपन्नता देऊ शकत नाही. इतकेच काय, निव्वळ साक्षर असलो, तरी पैसे नसले तर आज आपण शाळा-कॉलेजचे तोंडही पाहू शकत नाही. साक्षरतेचे एक वेळ जाऊ द्या. पदवी घेतल्यानंतरही काय परिस्थिती आहे? सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित तरुणाला आज असे वाटते की मी एम.ए. झालो, पुढे काय? तर मी एम. फिल. झालो, पुढे काय? तर मी पीएच.डी. झालो, पुढे काय? सेट-नेट झालो, पुढे काय? नोकरी पाहिजे पण वीस लाख रुपये नाहीत, पुढे काय?.. म्हणजे माझ्याजवळ वीस लाख रुपये असतील तरच एमए, एमफिल, पीएचडी, सेट-नेट वगैरेला काही अर्थ आहे, आणि ते नसतील तर यू आर फिनिश्ड.. ह्या साऱ्यामधून आज एक हतबलता येते आहे. परिणाम काय? तर मुलातील न्यूनगंड गुणिले आजची हतबलता बरोबर पराकोटीचे वैफल्य.
हे असे व्हायला नको असेल तर संघटना उभारताना आपण ह्या सर्व बाबींचा काटेकोरपणे विचार केला पाहिजे. व्यक्तीपेक्षा संघटना श्रेष्ठ की संघटनेपेक्षा व्यक्ती हा जरी वादाचा मुद्दा असला, तरी न्यूनगंडाच्या संदर्भचौकटीत ह्याचा विचार केला तर काय आढळून येते? संघटना म्हणून सामूहिकता तर जपायची असतेच. त्यातून संघटनेचे नेतृत्व जर ब्राह्मणी असेल, तर सदस्यवर्ग दास (गुलाम) म्हणूनच राहतो कारण त्याने हे मान्य केले असते की ज्ञानकेंद्र ते आहे. त्यालाच सगळे कळते. आपल्याला कुठे काय कळते. इ. मग क्रांती ही प्रत्यक्ष व्यवहारामध्ये निव्वळ एक भावना बनते व ती व्यक्तीला अधिकाधिक पोथीनिष्ठ व असंवेदनक्षम बनवत जाते. खऱ्या क्रांतीपासून दूर नेत जाते.
आता दुसऱ्या बाजूचा विचार करू या. संघटनेचे नेतृत्व जर ब्राह्मणी नसेल तर काय करायचे? आता अ-ब्राह्मणी नेतृत्वाचेही दोन भाग पडतात. काउंटर नॉलेजवर म्हणजेच प्रति-ज्ञानावर निष्ठा असेलले नेतृत्व. तसे जर ते असेल तर व्यवस्थेतून येणाऱ्या न्यूनगंडापासून बरेचसे मुक्त असेल आणि मग संघटनांतर्गत व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला खरा अर्थ व वजन प्राप्त होईल. दुसरा प्रकार म्हणजे अब्राह्मणी, पण ब्राह्मणांकडूनच ज्ञान उधार घेतलेले नेतृत्व. हे मात्र वर म्हटल्याप्रमाणे जातिव्यवस्थेतून आलेल्या न्यूनगंडाला बळी पडलेले असेल. तेथे पोथीनिष्ठाच महत्त्वाची होऊन बसली असेल. अशा संघटना परिवर्तनवादी असल्याचा दावा करतात आणि कार्यकर्त्यांना सक्रिय व स्वतःला समाधानी ठेवण्यासाठी काही ना काही उद्योगही करत राहतात. त्यांची भाषा विरोधाची असते, पण त्यातून विरोध निर्माण होत नाही, फक्त विरोधाचा भास निर्माण होतो.
ह्या साऱ्यावर उपाय म्हणजे आता आपल्या काळातले प्रति ज्ञान निर्माण करणे, हेच आहे. मार्क्स, फुले आणि गांधी ह्यांनी त्यांच्या-त्यांच्या काळात हे कार्य केले होते. त्यांच्यानंतर तुटलेला धागा आता पकडून आपल्याला प्रति-ज्ञान निर्माण करावे लागेल. तसे करताना प्रति ज्ञान म्हणजे प्रतिबिंब नाही ह्याचे भान आपल्याला ठेवावे लागेल कारण ते तसे असल्याचा समज आपल्याकडे रूढ आहे.
वर उल्लेखिलेल्या तिघांचाही काळ आता संपला आहे. शेतीकेंद्रित उत्पादनव्यवस्था आता संपली आहे. त्या चौकटीतून जर आपण विचार करू लागलो, तर दोनशे वर्षे मागे गेल्यासारखे होईल. तेव्हा आज उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या चौकटीतून आपल्याला व्यवस्थेचा व सामाजिक पुनर्रचनेचा मुद्दा ऐरणीवर आणावा लागेल. तसे करताना आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे वैयक्तिकता आणि सामूहिकता ह्यांच्यातील समतोल सांभाळणे. सामूहिकतेची जपणूक करताना, व्यक्तीचे स्वातंत्र्य दडपले जाणार नाही ह्याची काळजी व हमी दोन्ही घ्यावी लागेल. अशी हमी घेतली जात असताना व्यक्तीनेही हे लक्षात ठेवले पाहिजे, की सामूहिकता जपणे आपल्या हिताचे आहे. सामूहिकतेपासून दूर गेल्यास आपल्या मनात तुटलेपणाची, आपण कुठलेच, कोणाचेच न राहिल्याची भावना येईल, जी सतत आपले अंतःकरण कुरतडत राहील व कधीच सुखाने जगू देणार नाही. सामूहिकत्व ही व्यक्तिस्वातंत्र्य जपण्याची पूर्वअट आहे.
हे सर्व साध्य करण्यासाठी त्या विचाराशी सुसंगत अश्या उत्पादनप्रक्रिया न रोखता त्यातील नफा नावाची गोष्ट वेगळी काढावी लागेल. मानवी समाजाला केंद्रस्थानी ठेवून ती गोष्ट निसर्गाला पूरक कशी होईल हे बघावे लागेल. ह्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग जगात शिल्लक राहिलेला नाही.

सी ८ कुणाल प्लाझा, चिंचवड जि. पुणे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.