पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण ह्याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘तुमचा, तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी एक हूल उठवून गेली आहे व त्या आवईला आमचे भाबडे देशबान्धव बळी पडत आहेत.

हिन्दू कोण नाही हिन्दू कोण नाही असा मला पडलेला प्रश्न मी पुढे एका पद्धतीने सोडवून अशी दाखवीत आहे. (मला तो सोडविता आलेला नाही तो प्रस्तुत चर्चेतून सुटावा माझी इच्छा आहे हे आधीच सांगतो.) तसे करण्यासाठी हिन्दूंचे वर्ग पाडावे लागतील.

हिन्दूंचा पहिला वर्ग – ह्या वर्गातला हिन्दू भारतभूमीमध्ये जन्मलेला आहे अथवा त्याचे पूर्वज ह्या भूमीचा वारसा सांगणारे आहेत. हिन्दू म्हणून ज्यांना बाहेरचे जग ओळखते अशांच्या ज्या बहुविध उपासनापद्धती आहेत त्यांपैकी कोणत्यातरी एका उपासनापद्धतीवर ह्या हिन्दूंचा पक्का विश्वास आहे आणि भारताबाहेर जन्मलेल्या उपासनापद्धतींविषयी त्याला तिटकारा आहे. हा आपल्या उपासनापद्धतीविषयी आग्रही असून तिला तो इतरांच्या उपासनापद्धतीपेक्षा ‘श्रेष्ठ मानतो. अखिल भारतवासीयांना आदरणीय असलेल्या अनेक दैवतांपैकी बहुसंख्याकांना मान्य असलेले दैवत सर्वांनीच मान्य करायला हरकत असू नये असे त्याला वाटते. बहुसंख्याकांच्या राजकीय हक्कांविषयी हा जागरूक आहे. आपल्या उपास्यांपेक्षा वेगळी उपास्ये ज्यांची आहेत आणि ज्यांची पितृभू आणि पुण्यभू भारतभूमीच्या बाहेर आहे ते हिन्दुधर्मीय (religion ह्या अर्थाने) नाहीत असे मानणारा हा आहे. हिन्दू नावाचा जो religion आहे त्याचे पालन करणारा हा वर्ग आहे. (हिन्दू नावाचा religion च नाही असे मला वाटत नाही. दैवतांवर विश्वास किंवा श्रद्धा म्हणजेच religion चे पालन होय, असे मला वाटते.) ही श्रद्धा त्याची खाजगी किंवा वैयक्तिक बाब आहे. तिचा राजकीय सवलतींशी काही संबन्ध नाही.

इस्लाममध्ये हजरत महंमद यांस शेवटचे पैगंबर मानले आहे; आणि त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या धर्मगुरूंची वा पैगंबराची एक यादीच कुराणात दिलेली आहे. भगवान् रामचन्द्र हे जर महमंदाच्या पूर्वी होऊन गेलेले थोर पुरुष होते आणि भारतीय मुसलमान जर पूर्वी हिन्दूच होते तर हिंदुस्थानातील मुसलमानांनी मर्यादापुरुषोत्तम रामचंद्राविषयी आदरभाव का बाळगू नये हे त्याला समजत नाही. हा हिन्दू आपल्या धर्माला (religion) श्रेष्ठ मानणारा आहे. त्यामुळे अन्य धर्मीयांनी हिन्दुधर्माचा विधिवत् स्वीकार केल्यास त्याला हिन्दुधर्माचा आणि त्याविषयीच्या अभिमानामुळे स्वत:चा गौरव झाल्यासारखे वाटते. हा आपल्या धर्माच्या (religion च्या) अनुयायांची संख्या घटल्यास व्यथित होतो व अन्यधर्मीयांवर हुकूमत गाजविल्याने अथवा बहुसंख्येच्या जोरावर तशी हुकूमत आपल्याला गाजविता येईल अशा कल्पनेने आनंदित होतो. हा, आपला देश हा हिन्दुराष्ट्र म्हणून ओळखला जावा अश्या इच्छेने भारलेला आहे व त्याचमुळे अल्पसंख्याकांच्या अनुनयामुळे संतप्त होणारा आणि अखंड भारत पुनश्च निर्माण करण्याची कामना करणारा आणि तशी स्वप्ने पाहणारा आहे..त्याच्या कल्पनेतील हे हिन्दुराष्ट्र हिन्दू religion चे राष्ट्र नाही. पण पुढे वर्णिलेल्या चौथ्या वर्गातील हिन्दूंचे हिन्दुराष्ट्र आहे. वेदोपनिषदांसारखे वा श्रीमद्भवद्गीतेसारखे जे ग्रन्थ आहेत त्यांचे प्रामाण्य मानणारा हा आहे.

हिन्दूंचा दुसरा वर्ग – ह्यामधील हिन्दू हा भारतभूमीमध्ये जन्मलेला व त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीमुळे हिन्दू दैवतांचा पूजक असला तरी त्याच्या ठिकाणी त्यांच्याविषयी अभिमान नाही. त्याने धर्म म्हणजे काय ह्याचा फारसा विचारच केलेला नाही. हा स्वतःला हिन्दू म्हणवत असला तरी त्याला अन्यधर्मीयांबद्दल तिटकारा नाही. हा धर्माच्या बाबतीत एकूणच उदासीन आहे. बहुसंख्याकांचा अपमान होत आहे असे त्याला मनापासून वाटत नाही. पुनरुज्जीवनवादी ह्या दुसऱ्या वर्गातील हिन्दूला पहिल्या वर्गात ओढण्याचा यत्न करीत आहेत.

हिन्दूंचा तिसरा वर्ग- एक असाही हिन्दू आहे की जो हिन्दुदैवतांचाही पूजक नाही. तो कोणत्या देवतेची उपासना करतो ते मला माहीत नाही. तो अंदमानसारख्या बेटावरील किंवा दुसरीकडच्या दुर्गम अशा अरण्यामधील वनवासी आहे. ह्याला हिन्दू का म्हणावयाचे ते मला समजत नाही, कारण संस्कृती, परंपरा व अभिमान ह्या बाबतीत तो हिन्दूंच्या मुख्य प्रवाहापासून अगदी वेगळा आहे.

हिन्दूचा चौथा वर्ग – हा हिन्दू जातिपंथादींच्या पलीकडच्या सर्वसमावेशक तत्त्वांना हिन्दूंनी मानावे असे मानणारा आहे. तो व्यापक अर्थाने धार्मिक म्हणजे धर्माचरण करणारा आहे म्हणजे नीतीने वागणारा आहे. तो सर्व धर्म (religions) हिंदुत्वाच्या निम्न स्थानी आहेत असे मानणारा व हिन्दुधर्मीयत्व (Hindu religion ) व हिन्दुत्व यांमध्ये फरक करणारा आहे. साहजिकच तो आपल्या स्वतःच्या उपासनापद्धतींविषयी आग्रही असू नये असे मानणारा आहे. त्याच्या ठिकाणी आसिंधुसिंधु पसरलेल्या ह्या भूमीवर आजवर जे जे चांगले, गौरवास्पद, अभिमानास्पद; (केवळ मानवजातीच्याच नव्हे तर अखिल प्राणिमात्राच्या, आपल्या सकल सृष्टीच्याच कल्याणाचे, वा हिताचे) घडले त्या इतिहासापासून प्रेरणा घेण्याची इच्छा आहे. आपल्या संस्कृतीविषयी त्याला वाटणारा अभिमान हा विद्वेषमूलक नाही. तो त्याच्यासाठी स्फूर्तिदायक आहे. ती संस्कृती, ती परंपरा त्याच्यासाठी प्रेरणास्रोताचे काम करते. अथवा ती तशी स्फूर्तिदात्री ठरावी अशी त्याची धारणा आहे. कारण ‘पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भाविकाळ, बोध हाच इतिहासाचा सदासर्वकाळ’ ह्या वचनावर वा ह्या सिद्धान्तावर म्हणा, त्याची श्रद्धा आहे. भारतवर्षाचा प्रत्येक नागरिक आपापला religion पाळत राहून असा हिन्दू घडावा अशी हिन्दूनेतृत्वाची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर भारताबाहेर राहणारा प्रत्येकजण आज व उद्या असा हिन्दू होऊ शकेल, किंबहुना तसा तो (संभाव्य) हिन्दू आहेच असेही हिन्दुनेतृत्व मानते. त्यामुळे जगातले सारेचजण हिन्दू/संभाव्य हिन्दू ठरतात. कारण कोणालाही असा हिन्दू होण्यासाठी प्रायश्चित्त किंवा दीक्षा घेण्याची गरज राहत नाही.

हिन्दूंचा पाचवा वर्ग – हा ‘जन्माने, ‘परंपरेने’ वा ‘संस्कृतीने’ (भारतामध्ये जन्म व वाढ ह्यामुळे) हिन्दू असला तरी तो श्रद्धेच्या व धर्माभिमानाच्या पलीकडे जाण्याची इच्छा करणारा व इतिहासामधून किंवा पूर्वजांच्या दिव्यामधून प्रेरणा घेण्याची कोणालाही गरज पडू नये, प्रत्येकाने आपली कर्तव्ये संस्कृतीच्या अभिमानाच्या नव्हे तर विवेकाच्या साह्याने ठरवावी असे मानणारा आहे. धर्माच्या व श्रद्धेच्या अभिमानाच्या अभावी तो राष्ट्रकार्यातूनच नव्हे तर व्यक्तिगत जीवनातून religion चे उच्चाटन करण्यास व सर्वत्र समता आणण्यास उत्सुक असलेला असा आहे.

गंमत अशी की तिसऱ्या आणि पाचव्या वर्गाचे हिन्दू सोडून बाकीचे हिन्दू बहुतेकांच्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणात एकाच वेळी विद्यमान असतात. किंवा काही कधी एका वर्गातील हिन्दू असतात व लगेच तळ्यातून मळ्यात उडी मारावी तसे चौथ्या वर्गात मनाने उडी मारतात. मला जो ह्या पाच प्रकारच्या हिन्दूंमध्ये स्थूल व सूक्ष्म भेद आढळला तो विशद करण्याचा हा यत्न आहे. इतक्या विविध प्रकारच्या एकमेकांच्या विरोधी तत्त्वांचा अवलंब करणारे भिन्न निष्ठांचे लोक हिन्दू म्हणविले जात असल्यामुळे हिन्दू कोण नाही, हा प्रश्न कायमच राहतो व ते ठरेपर्यन्त अल्पसंख्याक कोण व अपमान कोणाचा हे ठरविणे मला अशक्य होते. हिन्दू हिन्दूचा अपमान करू शकत नाहीत असे मला वाटते कारण कोणीही स्वतःचा अपमान करू शकत नाही. मोहनी मोहनीचा अपमान करीत नसतो. अ मोहनी ब मोहनीचा करतो. म्हणजे मोहनींमध्ये आपसात अ ने ब चा अपमान केला असे होते. त्याचप्रमाणे हिन्दूंमध्ये अ हिन्दू ब हिन्दूचा अपमान करतो असे म्हटले पाहिजे. त्यासाठी अ हिन्दू हा ब हिन्दूपासून वेगळा ओळखता आला पाहिजे. तशी त्यांची वेगवेगळी ओळख पटण्यासाठी त्यांच्या व्याख्या केल्या पाहिजेत. किंवा अमक्या कारणासाठी हिन्दू नसलेले लोक हिन्दू असलेल्यांचा अपमान करतात असे म्हटले पाहिजे.

अपमान मुसलमानांचे तुष्टीकरण केल्यामुळे आमचा अपमान होतो असेही हिन्दुनेतृत्वाचे म्हणणे आहे. आपण अपमान होतो हे तूर्त मान्य करू या. हा अपमान भेदभावामुळे होतो. काही लोकांना कोणतेही सबळ कारण नसताना सवलती दिल्यामुळे हा अपमान होतो. मग प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या देशात काही लोकांना विष्ठेचे टोपले डोक्यावर वाहावयाला लावले. पिढ्यानुपिढ्या हे ओंगळवाणे काम जन्माच्या आधारावर एका जातीवर लादणे ही गोष्ट आम्हाला अपमानास्पद आहे की ती अभिमानास्पद आहे? कोणतेही सबळ कारण नसताना उच्चर्णीयांना दिलेली ती सवलत नाही? का भेदभाव नाही? पण त्यामुळे हिंन्दूचा आपमान झाला नाही! काही लोकांना हीनच नव्हे तर उच्चवर्णीयांनी अस्पृश्य लेखले त्यामुळे कोणाचाही अपमान झाला नाही. आदिवासींना पिढ्यानुपिढ्या वेठबिगार करावयाला लावून हिंन्दूंचा त्यांच्या कोणत्याही गटाचा अपमान झाला नाही. तथाकथित उच्चवर्णीयांच्या विधवांच्या केशवपनादि विटंबनांमुळे हिन्दूंचा अपमान झाला नाही. उलट ती त्यांनी आपली वर्णश्रेष्ठता सिद्ध करणारी बाब मानली. जितकी विधवांची विटंबना जास्त, तितका त्यांचा वर्ण श्रेष्ठ असे समीकरण त्यांनी मानले. ह्या गोष्टींनी हिंन्दूंचा अपमान झाला नाही कारण ह्या साऱ्यांना हिन्दूंनी कधी आपले मानलेच नाही असे म्हणावयाचे काय? त्यांना आम्ही हिंन्दूंनी आपले मानले असते तर त्यांच्या अपमानाचे शल्य आम्हाला बोचले असते! आपलेपणा असता तर अपमान वाटला असता. आम्ही ते अपमान होऊ दिले नसते. परक्या माणसांच्या अपमानाचे शल्य आम्हाला जाणवत नसते. आमच्याच येथली जिवन्त माणसे आम्ही इतकी परकी मानली; सखेदाश्चर्य ह्या गोष्टींचे की जिवन्त माणसांच्या अपमानामुळे आम्ही जितके व्यथित झालो नाही तितके आमच्या दगडामातीच्या मंदिराला चारशे वर्षांपूर्वी पाडल्याचे लक्षात आल्यामुळे आम्ही एकाएकी व्यथित झालो. त्यामुळे हिंन्दूंचा असह्य अपमान झाला! ही हिन्दुमुसलमानांमधील आपपरभावनेची परमावधी नव्हे काय?

तुष्टीकरणाच्या बाबतीत शहाबानोच्या प्रकारणाचा हमखास उल्लेख होतो. शहाबानोच्या प्रकरणी न्यायालयाने एक निर्णय दिला. तो ज्या कायद्याच्या आधारे दिला ते कलम (Cr.P.C.125) हे सर्व भारतीय नागरिकांना (त्यांचा धर्म कोणताही असो) सारखेच लागू व्हावयाला पाहिजे हेही मान्य. ते कलम अनाथाला पोटगी देण्यासंबंधीचे आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय सरकारने फिरवला; म्हणजे शहाबानोला सरकारने पोटगी नाकारली नाही, तर ती देण्याची जबाबदारी जी तिच्या नवऱ्यावर होती ती वक्फबोर्डावर टाकली; आणि Cr.P.C. कलम १२५ च्या बाबतीत मुसलमानांचा अपवाद केला. सरकारचे हे कृत्य चूक आहे. हा सरकारने न्यायसंस्थेचा अपमान केला असे माझे मत आहे. न्यायालयाचा निर्णय अमलात येण्याच्या अगोदर तो कायदा बदलणे हा न्यायालयाचा नव्हे तर न्यायसंस्थेचा अपमान होय असे मला वाटते. विद्यमान कायद्यांच्या अंमलबजावणीत कोठे अन्याय होत नाही हे पाहण्यासाठी न्यायालये असतात. कायदे बदलले की न्यायालयाचे निर्णय बदलतात हे मान्य केले तरी कोणत्याही न्यायालयाचे निर्णय झाल्यावर त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. नाहीतर न्यायसंस्थेच्या पावित्र्याला अर्थच राहत नाही. अपील मागाहून होत राहील. ती अंमलबजावणी होण्याच्या अगोदरच मुसलमानांच्या दबावाखाली सरकार आले हे फार वाईट झाले. पण ह्या प्रकरणी हिन्दूंचा अपमान कसा झाला ते मला नीट समजले नाही. मुसलमान अल्पसंख्य असूनसुद्धा सरकार त्यांना दबते आणि हिन्दू बहुसंख्य असून ते रामजन्मभूमीच्या बाबतीत हिन्दूंच्या दबावतंत्राला बळी पडत नाही ह्याचे जे दुःख आहे त्याला तर हिन्दु अपमान समजत नाहीत? त्यामध्ये पुन्हा अल्पसंख्याक-बहुसंख्याक हाच विचार आहे काय? न्यायाचा संबन्ध बहुसंख्येशी नाही. कोणी बहुसंख्याक म्हणून त्याला एक न्याय व कोणी अल्पसंख्याक म्हणून त्याला दुसरा न्याय असावा हे योग्य नाही. पण कायदा वेगवेगळा असू शकतो. तो मनाच्या प्रगल्भतेच्या पातळीवर अवलंबून असतो. माझा एक नागरी कायद्याला मुळीच विरोध नाही. फक्त अपमानाचा त्याच्याशी संबन्ध काय हा प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्या देशात मागासवर्गीयांसाठी नागरी कायदे वेगळे आहेत. जे कायदे ब्राह्मणांना लागू होतात ते गोंडांना लागू होत नाहीत. हिन्दुमुसलमानांचे ते वेगळे आहेत तसेच ते ब्राह्मणगोंडांचेही वेगळे आहेत. पण मुसलमानांसाठी असलेला वेगळा कायदा आम्हाला खटकतो. मला जगात सर्वत्र समान नागरी कायदा हवा. सर्व मानव जर समान तर जगभर एक कायदा असावयाला काय हरकत आहे? प्रश्न तो नाही. माझ्यापुढचा प्रश्न अपमान कशामुळे होतो एवढाच आहे. स्त्रीपुरुषांच्या रजेचे कायदे वेगळे असतात. असावेच लागतात. ज्यांच्यामध्ये मुळात शारीरिक वा अन्य फरक आहे त्यांच्यात कृत्रिमपणे एक दर्जा निर्माण करण्यासाठी हे वेगळे कायदे करावे लागतात. दर्जाच्या समानतेसाठी काहींना handicap स्वीकारावा लागतो; जे socially handicapped आहेत – (जातिभेदामुळे किंवा धर्मभेदामुळे) त्यांचा handicap नष्ट होईपर्यंत त्यांना वेगळे वागवावे लागते. संरक्षणनीतीचा एक फार मोठा दोष आहे. संरक्षण (Reservations) ठेवावे तर जुनी समाजरचना – जातिभेद कायम टिकविल्यासारखे होते. कारण संरक्षणामुळेही भेदभाव होतोच; परस्परांविषयीचा मत्सर वाढतो. न ठेवावे तर मूळ भेदभावाची परिस्थिती कायम राहते; ती बदलण्यासाठी शासनाने काहीच केले नाही असा त्यावर बोल येतो. Reservations चा उपयोगही मते मिळविण्यासाठी केला जातो. समता आणण्याची खरी इच्छा मनात नसताना दिखाऊ समता आणण्याचे जे उपाय केले जातात त्यामुळे खरी समता दुरावण्याचीच शक्यता फार असते. तो साराच दांभिकपणा असतो. Reservations चा फायदा समाजातला दर्जा बदलण्यासाठी जरी झाला नाही तरी फार थोडा आणि काही लोकांच्या बाबतीत आर्थिक दर्जा सुधारण्यामध्ये होतो, व त्याचा सर्व समाजाला अत्यन्त मंदगतीने लाभ होतो. समता आणावयाची म्हणजे दर्जामधली समता आणावयाची असते. व ती कोणत्याही कृत्रिम उपायांनी आणणे दुरापास्त असते. समतावाद्यांचा सर्वात कठीण प्रश्न सर्वांच्या समान दर्जासाठी माणसाचे मन तयार करणे हा आहे. त्यासाठी अत्यन्त चिकाटीने केलेले विविध प्रकारचे प्रयत्न अत्यावश्यक आहेत, कारण. ही नागरित समाजात आजपर्यंत कधीही न घडलेली गोष्ट आहे. बहुसंख्य नागरित माणसे अशा समतेची कल्पना करूच शकत नाहीत. आणि जोवर ती तशी कल्पना करू शकत नाहीत तोवर तशी त्यांची कृती घडू शकत नाही.

स्त्रीपुरुषांना रजेचे वेगळे कायदे असावा असे आपण वर पाहिले. असे वेगळे कायदे अन्यायकारक होत नसतात. कारण कायदे हे देशकालपरिस्थित्यनुरूप घडवावे लागतात. ह्यामधला परिस्थिती हा शब्द महत्त्वाचा आहे. स्त्रीपुरुषांचा देशकाल जरी एक असला तरी त्यांची परिस्थिती भिन्न आहे. आपल्या संविधानामध्ये तीन याद्या आहेत. 1. Union list, 2. State list व 3. Concurrent list. त्यायोगे एकाच विषयासंबन्धी राज्यसरकारे एकमेकांपेक्षा व संघराज्यापेक्षा वेगवेगळे कायदे करू शकतात. कारण त्या त्या ठिकाणी परिस्थितिभिन्नता असते.

एकाच देशकालामध्ये सवर्ण आणि दलित, हिन्दू आणि मुसलमान ह्या लोकांची परिस्थिती जर खरोखरच फार भिन्न असेल, काही लोकांच्या मनाच्या प्रगल्भतेची पातळी जर वेगवेगळी असेल तर सर्वांसाठी समान कायदे करणे अन्यायकारक होण्याची शक्यता आहे. मला येथे काही कायदे वेगळे असले तर त्यामुळे बहुसंख्याकांचा अपमान होत नाही एवढाच मुद्दा मांडावयाचा आहे. आणि कायदे करून जादूची कांडी फिरविल्यासारखी परिस्थिती बदलत नसते हेही आपण जाणले पाहिजे.

मुसलमानांना कायद्याप्रमाणे चार बायका करण्याची परवानगी दिल्याने त्यांच्यावर प्रत्येकाने चार बायका करण्याचे बन्धन येऊन पडत नाही. आणि हिन्दूना एकपत्नीकत्वाचा कायदा एकापेक्षा अधिक बायका करण्यापासून परावृत्त करू शकत नाही. एकापेक्षा अधिक बायका असलेले पुरुष आपल्या अभिनेत्यांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये कितीतरी दाखवून देता येतील. त्यांच्या काही बायकांना रखेलीच्या दर्जापासून वाचवावयाचे असेल तर हिन्दूंनाही एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी तसा कायदा बदलून द्यावी लागेल.

एकतर्फी तलाक हा मुस्लिम बायकांना अन्यायकारक होतो कारण त्यांचे नवरे मेहेर देण्याविषयी टाळाटाळ करू शकतात. त्याच्याविषयीच्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे आणण्यास वकील आणि न्यायालये नवऱ्यांना मदत करतात. तलाकमुळे जर स्त्रियांच्या ठिकाणी कोणतेही लांच्छन निर्माण होणार नसेल, त्यांना पुरेसा मेहेर जर सहज प्राप्त होणार असेल तर अनेक मुस्लिम स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांना खुशीने तलाक देतील. कारण त्यामुळे नवराबायकोमधील प्रीती नष्ट झाल्यावरही त्यांना धरून बांधून एका ठिकाणी नांदण्याची आणि नवऱ्याचे बलात्कार सहन करण्याची गरज पडणार नाही.

आजच्या हिन्दू विवाह-अधिनियमाच्या रचनेमुळे ज्यांना विवाहविच्छेद अनेक कारणांमुळे अत्यावश्यक वाटतो अशा पुष्कळ हिन्दू स्त्रियांना त्यांच्या उमेदीची वर्षानुवर्षे आपापल्या नवऱ्यांशी न्यायालयात झगडण्यात निष्कारण वाया घालवावी लागतात हा माझा स्वानुभव आहे. म्हणून वरील अटी कायम असतील तर तलाक सोपा करणे तसेच पुरुषांसारखे स्त्रियांनाही एकतर्फी तलाक देण्याचा अधिकार देणे इष्ट ठरेल असे माझे त्यामुळे मत झाले आहे.

हिन्दुनेतृत्वाला अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण स्वतःला करावयाला नको आहे त्याचप्रमाणे ते दुसऱ्या कोणीही करू नये असा त्यांचा आग्रह आहे. ह्यामध्ये अल्पसंख्याकांच्या पुढे पुढे केल्याने बहुसंख्याकांची मानहानी होते असे त्याचे मत आहे. ही मानहानी टाळण्यासाठी ‘लोकहो तुम्ही संघटित व्हा. तुम्ही संघटित झालात की अल्पसंख्य तुमच्या पाया पडावयाला येतील. संघटनेचे बळ प्राप्त झाले की अल्पसंख्यांकाच्या वर्तनात प्रत्यक्ष बलप्रयोग न करताच तुम्हाला इष्ट ते परिणाम घडून येतील. तुम्हाला आत्मबळाचे भान नाही. संघटना केल्याबरोबर ते आत्मबळाचे भान तुम्हाला येईल. तेवढेच पुरेसे आहे. ते भान तुम्हाला यावे ह्यासाठी रामजन्मभूमीचा विवाद हे निमित्त आहे. हा बाह्योपचार आहे, हे साधनमात्र आहे. मुख्य साध्य हिन्दुसमाजाला आत्मबळाचे भान आणून देणे आहे. मुसलमानांची जीवितवित्तहानी करणे, त्यांचे हनन करणे हे आमचे उद्दिष्टच नाही. कुरापतखोर मुसलमानांचे धैर्यहनन करणे इतकेच आमचे उद्दिष्ट आहे.’ हे हिन्दुनेतृत्वाचे म्हणणे आहे असे मला जाणवत नाही असे नाही. पण तरीसुद्धा माझा आक्षेप कायमच राहतो. साध्ये व साधने ही दोनही शुचि असावी असे मानणारा मी असल्यामुळे धर्माच्या म्हणजेच जन्माच्या आधारावर आपपरभाव, नव्हे दुजाभाव, धर्माभिमानाचा गौरव ह्या साऱ्या गोष्टी मला त्याज्यच वाटतात. त्यांचे समर्थन ते साधन म्हणून वापरण्यासाठी सुद्धा मी करू शकत नाही. आणि माझा विरोध सहिष्णुता दाखविली म्हणजे समता आलीच असे स्वतःचे स्वप्नरंजन करून घेण्याला आहे.

हिन्दूंच्या परंपरा व त्यांचा अभिमान हिन्दूंच्या सगळ्या परंपरा काही गौरवास्पद नाहीत. हिन्दू परकीयांवर अन्याय करण्यासाठी परदेशात गेले नसतील, पण त्यांनी स्वकीयांवरच निर्मम अत्याचार केले आहेत. त्याचे घोर अपमान केले आहेत. आपल्यातल्याच काही लोकांना अस्पृश्य मानण्याइतके नीच कर्म कोणतेच नसेल. जेवताना अस्पृश्याचा शब्द कानावर पडल्यानेही येथे जेवणाराला विटाळ झालेला मी पाहिला आहे. आजही पूर्वास्पृश्यांविषयी तुच्छता उच्चवर्णीयांच्या मनात कायम आहे. आमचा इतिहास पाहिला तर येथेही अत्यन्त भयानक गोष्टी घडल्या आहेत. गुलामगिरी पेशवाईपर्यंत होती. वेठबिगार अजूनही चालू आहे. आमच्या महाराष्ट्रात चालू आहे!

मुसलमानांनी ‘आमच्या’ स्त्रियांवर बलात्कार केले असे पुन्हापुन्हा सांगणारे हे लक्षात घेत नाहीत की कल्याणाच्या सुभेदाराची सून छत्रपतींनी ‘आमच्या मांसाहेब इतक्या सुन्दर असत्या तर ‘ असे म्हणून परत पाठविली ही गोष्ट त्यांच्या थोरवीबद्दल सांगताना आणि देशातले बाकीचे राजे किंवा राज्याधिकारी ह्यांच्या वर्तनाला शिवाजी राजांचे वर्तन अपवादात्मक होते असे म्हणताना, त्या काळातील संस्थानिक किंवा सरदार सुभेदार लुटीतील किंवा आपल्याच राज्यातील स्त्रियांना कसे वागवीत ह्याबद्दलचा नियमच सिद्ध होत असतो.

आमचे शीख बांधव आजही ते त्यांच्या प्रदेशात बहुसंख्य आहेत म्हणून इतरेजनांनी तेथून निघून जावे किंवा तेथे राहावयाचे असेल तर त्यांनी दुय्यम दर्जाचे नागरिकत्व स्वीकारावे असेच त्यांच्या उग्रवाद्यांच्या करवी आम्हाला सुचवत नाहीत काय?

किडामुंगीची हिंसा होईल म्हणून सूर्यास्तानंतर न जेवणारे आमचेच अहिंसक धर्मबांधव दिगंबर व श्वेतांबर जैन शिरपूरच्या अन्तरीक्ष पार्श्वनाथाच्या मंदिराच्या मालकीहक्कावरून एकमेकांची डोकी फोडतात. त्यात काहींचे प्राण जाईपर्यंत पाळी येते.

अखेर कोणत्या परंपरा योग्य आणि कोणत्या अयोग्य हे विवेकानेच ठरवावयाचे असेल तर विवेकाला संस्कार आणि परंपरा ह्यापेक्षा नेहमीच श्रेष्ठ का मानू नये असा मला प्रश्न पडतो.

आपली (हिन्दूंची काय किंवा मुसलमानांची काय) बांधिलकी धर्मभावनेशी, आपल्या इतिहासाशी, परंपरेशी, संस्कृतीशी असावी की विवेकाशी असावी असा हा साधा प्रश्न आहे. फक्त माझा आवाज मुसलमानापर्यंत मला अजून पोचविता आला नाही. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की माझ्या मते फक्त हिन्दूंनीच विवेक धारण करावा व मुसलमानांनी तो करू नये! एकाने अविवेक केला म्हणून दुसऱ्याला विवेक सोडावयाचा अधिकार प्राप्त होतो असे मात्र मी मानत नाही.

धर्म म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हिन्दू कोण, हिन्दू कोण नाही, अल्पसंख्याक कोण, बहुसंख्याक कोण व तसे मानल्याचे परिणाम काय; तुष्टीकरण, अपमान, समान नागरी कायदा व हिन्दूच्या परंपरा ह्या साऱ्यांचा माझ्या परीने शक्य तितक्या तटस्थपणे घेतलेला परामर्श येथे संपवीत आहे. ह्याच्याच दुसऱ्या पैलूंवर किंवा उणीवांवर जाणकारांनी आणि विचारकांनी प्रकाश टाकावा अशी त्यांना नम्र प्रार्थना आहे.

(पूर्ण)

मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर चलभाष : ९८११९००६०८

टिळक जर अस्पृश्य समाजात जन्माला आले असते तर ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे अगदी ओठाशी आलेले सूत्रवचन जरा बाजूला सारून ‘मानवतेची प्रतिष्ठापना हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अस्पृश्यतेचे निवारण हे माझे आद्य कर्तव्य आहे’ अशा प्रकारची घोषणा करण्याची निकड त्यांना भासली असती. … डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अग्रलेख, पृ क्र. १३०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.