महाभारत आणि कॉस्मॉस

माझी अगदी लहानपणाची टीव्ही पाहायची पहिलीवहिली आठवण म्हणजे महाभारतमालिका. त्याकाळात रंगीत टीव्ही खूप कमी असायचे. आमच्या घरी रंगीत टीव्ही असल्यामुळे शेजारीपण महाभारत पाहायला घरी यायचे. आमची बैठकखोली लोकांनी भरून जायची. महाभारतमालिकेच्या आधी आलेली रामायणमालिका मला फारशी आठवत नाही तेव्ही मी वयाने फार लहान होतो पण महाभारत मात्र मी आवर्जून पाहात असे. नवरससंपूर्ण पौराणिक कथा, अप्रतिम अभिनय आणि त्याच्या जोडीस असलेले भव्यदिव्य सादरीकरण, लोकांना टीव्हीला खिळवून ठेवायला लागणारे सगळेच पैलू त्यामध्ये होते. साहजिकच रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाल्या आणि नकळत लोकांच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनल्या. या देदीप्यमान पौराणिक कथा टीव्ही तर्फे आपल्या बैठकीतून थेट मनात घर करून गेल्या. आपल्या सार्वजनिक आयुष्याचाही भाग बनल्या आणि घराघरातील चर्चेत त्यांचा शिरकाव झाला.

महाभारताची गोष्टीची सुरुवात ही एका धीरगंभीर आवाजात व्हायची ‘मैं समय हूँ’ असे म्हणत जणू काळच ती पौराणिक कथा सांगायचा.

आणि १९८० च्या दशकातील घटना या काळालाही गंभीर करतील अश्याच होत्या. ह्या वादळी दशकाने पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकाने केलेली हत्या आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीत अगणित निरपराध शीखांचे दिल्लीच्या रस्त्यांवर सांडले गेलेले रक्त पाहिले. ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुसलमान स्त्रियांना दिलासा दिला असता असा शहाबानो प्रकरणातील निर्णय लोकसभेत फिरवला गेला. ऐंशींच्या दशकाच्या अखेरीस काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात काश्मीरमधून निष्कासन झाले, रामजन्मभूमीच्या वादात हिंदू धार्मिक संघटनेच्या आक्रमक भूमिकेचा अंत हा १९९२ मध्ये बाबरी मशिदीच्या पतनात झाला आणि ह्या काळात उत्तर भारतात उसळेलल्या दंगलीत अगणित निरपराध लोकांचा रक्तपात, ‘बच्चा बच्चा राम का, जन्मभूमि के काम का’ हे त्या काळातील एक प्रचलित घोषवाक्य मला लहानपणी ऐकल्याचे आठवते.

थोडा वेळ ह्या भारतातील घटनांपासून दूर जाऊया, भारतापासून, किंबहुना आपल्या जगापासून दूर. १९९० च्या सुमारास, पृथ्वीपासून अंदाजे ६०० कोटी किलोमीटर्स दूर अंतरावर एक अद्भुत घटना घडत होती. वोयेजर १ नावाचे अंतराळ यान सूर्यमालेची सीमा ओलांडून त्यापलीकडच्या विराट विश्वात प्रवेश करीत होते. ह्या अंतराळयानात एक सुवर्णविलेपित दृक्-श्राव्य तबकडी होती, जी Golden Record या नावाने ओळखली जाते. तीमध्ये पृथ्वीची अनेक छायाचित्रे, वैज्ञानिक माहिती आणि जगभरातील प्रसिद्ध कलाकारांचे आवाज तसेच निरनिराळ्या प्राण्यांचे आवाज जतन करून ठेवले होते. ती आपली एक कालकुपी होती. अनंतत्वाकडे घेतलेली झेप होती. आपले एक अमरत्वाकडे पाऊल असेच म्हणावे लागेल. आपण सोडलेले अंतराळयान हे प्रचंड विश्वात प्रवास करील आणि कधीकाळी जर सुदैवाने ते परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीच्या हाती लागलेच तर त्यांना ते पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती देईल अशी ते सोडण्यामागील भूमिका होती. विश्वात वेगवेगळ्या ताऱ्यांमधली अंतरे प्रचंड आहेत. शिवाय पृथ्वीशिवाय अजून कोठे प्रगत जीवसृष्टी असल्याचे पुरावेही अद्याप आपल्याला मिळालेले नाहीत. ह्या सर्वांमुळे आपले अंतराळयान खरेच कुठल्या प्रगत जीवसृष्टीच्या हाती पडायची शक्यता फारच कमी आहे. पण कर्मधर्मसंयोगाने तसे घडलेच तर, आपल्या चुकांमुळे आपण नामशेष झाल्याच्या बराच काळानंतर, त्या परग्रहवासीयांना आपल्या अस्तित्वाबद्दल माहीत झाले असते.

सूर्यमालेच्या पलीकडे जायच्या आधी वोयेजर १ अंतराळयानाने पृथ्वीचे त्या प्रचंड अंतरावरून एक अखेरचे छायाचित्र घेतले. त्यावरून पृथ्वी जेमतेम दृष्टीस पडते आहे. एका पूर्ण आकाराच्या कागदावर बारीकसा ठिपका एवढेच तिचे अस्तित्व आहे. ह्या छायाचित्राने खभौतिकशास्त्रज्ञ कार्ल सगान ह्यांना फार प्रभावित केले. त्याच्या लक्षात आले की त्या कागदावरचा तो चिमुकला ठिपका म्हणजेच आपले सारे काही आहे. आपले घर, आपली पृथ्वी, प्रचंड विश्वामधली आपली छोटीसी जागा. ह्या छोट्याश्या बिंदूवर किती काही घडले – अभिमान वाटण्याजोगी आपली संस्कृती, इतिहास, उत्क्रांती, साम्राज्यांचा उदय आणि अस्त, धर्माच्या नावाने झालेला रक्तपात, आपल्या सुखदुःखाची गोळाबेरीज, हजारो बलवान धर्म, विचारप्रवाह, प्रत्येक शिकारी आणि पाठलाग करणारा, अर्थशास्त्राची तत्त्वे, प्रत्येक धैर्यशाली व भेकड पुरुष, सृष्टीचा निर्माणकर्ता व संहारक, आपल्या इतिहासातील प्रत्येक राजा आणि शेतकरी, प्रेमात पडलेले प्रत्येक जोडपे, प्रत्येक आई व बाप, त्यांना आशेचा किरण दाखविणारे त्यांचे मूल, नवशोध लावणारा, शोध घेणारा, नीतितत्त्वे शिकविणारा प्रत्येक शिक्षक, प्रत्येक भ्रष्ट राजकारणी पुरुष, प्रत्येक सुपरस्टार, प्रत्येक सर्वोच्च नेता, प्रत्येक संत आणि पापी माणूस हा सूर्याच्या किरणांमध्ये दिसून येणाऱ्या एका धूलिकणाच्या एका अतिसूक्ष्म भागावर राहत होता.

पण ह्या क्षणभंगुर अस्तित्वातही आपण किती हिंसा केली. राजांच्या, सेनापतींच्या महात्त्वाकांक्षेपोटी किती निरपराध्यांचे बळी गेले, धुळीच्या या छोट्याश्या कणावर साम्राज्य करण्यासाठी किती सिकंदरांनी अगणित युद्धे पुकारली. किती आपला परस्परांवर द्वेष ! किती आपला धर्मांधपणा!

विश्व – एक वैयक्तिक प्रवास (Cosmos – A Personal Voyage) ह्या नावाची एक मालिका १९८० च्या दशकात अमेरिकेत प्रदर्शित झाली व प्रचंड लोकप्रिय ठरली. ह्या मालिकेचे संचालन कार्ल सगान ह्यांनी केले. कॉस्मॉस मालिकेत विज्ञानाच्या इतिहासापासून ते जीवसृष्टीची उत्क्रांती, मानवाचा इतिहास आणि अनेकविध विषय हाताळले गेले. शेवटी माणसाच्या मतलबीपणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, जीवसृष्टीची हानी आणि पर्यावरणाचा ढासळणारा समतोल हे विषयही दाखवण्यात आले. उत्तम सादरीकरण आणि सोपी भाषा ह्यामुळे जणू विज्ञानाचे भांडारच ह्या मालिकेमुळे सामान्यांपर्यंत पोचले व ह्यात दाखविलेले विषय घराघरातील चर्चेचा भाग बनले.

विज्ञानाचा प्रसार करणे इतके आवश्यक का वाटले? जागतिक तापमानवाढ, प्रचंड वेगाने नष्ट होणाऱ्या प्रजाती आणि पर्यावरणाचा ढासळलेला तोल ह्या साऱ्यामुळे जेव्हा आपल्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अश्या वेळेला लोकांचे वैज्ञानिक दृष्ट्या अडाणीपण हे फार मोठी किंमत वसूल करू शकते.

पण ह्यातून एक गंभीर प्रश्न पुढे येतो की अगदी सुशिक्षित लोकही वैज्ञानिक दृष्ट्या अज्ञानी का असतात? वैज्ञानिक माहितीच्या प्रसारात बाधा का येते ? ह्या प्रश्नांचे सर्वात सोप्या भाषेतील उत्तर म्हणजे – धर्म. धर्म विज्ञानाच्या विरोधात गेल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. वैज्ञानिक सत्य सांगितल्यामुळे किती गॅलिलीओंना छळण्यात आले, किती डार्विन धर्माच्या आडून नाकारले गेले, त्याला काही सीमाच नाही. अगदी आजही काही शिक्षित लोक निव्वळ बिनबुडाच्या धार्मिक कारणांमुळे उत्क्रांतीसारख्या निर्विवाद वैज्ञानिक सत्याला विरोध करतात.

आपण अश्या जगात राहतो. जेथे फल ज्योतिषासारख्या धादांत खोटेपणाला प्रत्येक वृत्तपत्रात जागा देण्यात येते. परंतु धर्म व धर्मग्रंथ हे १५००-२००० वर्षे किंवा त्याहूनही अधिक जुन्या काळात विकसित झाले. त्यातले बरेच विचार व संकल्पना ह्या आताच्या काळातील तर्कनिष्ठेच्या चौकटीत बसत नाहीत. काही लोक असे म्हणतील की धर्माला नाकारण्यापेक्षा धर्मातील कालबद्ध गोष्टींना नाकारता येईल. सर्व धर्मांची मूलतत्वे चांगलीच आहेत पण लोकांनी आपल्या मतलबासाठी त्याचा चुकीचा अर्थ लावला. ह्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ काही लोक धर्मशास्त्रांमधील आजच्या कालानुरूप अशा श्लोकांचा किंवा लिखाणाचा संदर्भ घेतात. परंतु असा संदेश देणाऱ्या श्लोकांबाबत सुद्धा आपल्याला सावध असावे लागेल कारण ते जातिव्यवस्थेचा किंवा स्त्रीला दुय्यम लेखण्याचा पुरस्कार करणारे असू शकतात. धर्मामधील चांगले असे निवडक काही शोधण्याचा दुःखद प्रयत्न हा धर्माने दुरितांपासून मुक्त असावे ह्या चुकीच्या गृहीतकावर आधारलेला आहे. धर्मशास्त्रामधील प्रस्तुत – अप्रस्तुत भागाची जर आपण विवेकीपणे पारख करणार असलो तर तेच काम आपण धर्मशास्त्राच्या अनुपस्थितीतही नाही का दाखवू शकणार? धर्म अस्तित्वात नसताना वाईट गोष्टींचा प्रभाव असेल असे म्हणणारे लोक हे वाहतूक पोलिसाचे लक्ष नसताना सिग्नलला न जुमानता वाहन चालवणारेच लोक असतात. योग्य व अयोग्य वर्तनाची चिकित्सा करण्याकरता आपल्याकडे राष्ट्राचे अधिकृत लेखी संविधान आहे. मग त्यासाठी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आर्ष भाषेतील धर्मशास्त्राची का बरे गरज पडावी?

आपल्या अवतीभवती धार्मिक प्रतीकांचा बुजबुजाट आहे. प्रत्येक घरामध्ये मूर्ती, प्रत्येक रस्त्यात देऊळ, प्रत्येक महिन्यात धार्मिक उत्सव. त्याऐवजी प्रत्येक घरात पुस्तकाचे कपाट, प्रत्येक रस्त्यावर पुस्तकाचे दुकान किंवा ग्रंथालय का असू नये? गणेशोत्सव किंवा होळीच्याच उत्साहात आपण विज्ञान वा पर्यावरण दिवस का साजरा करू नये? आपण आपल्या परंपरेचा अभिमान आहे असे म्हणतो, परंतु किती लोक आपल्या जवळपासच्या वस्तुसंग्रहास भेटी देतात? आपल्या देशात दर्जेदार ऐतिहासिक संग्रहालये इतकी कमी का? प्रजातींचा नष्ट होण्याचा दर नैसर्गिक दराच्या १००० ते १०,००० पटीने अधिक का आहे. अशा परिस्थितीत, भारतातील किती प्राणिसंग्रहालये नष्ट होऊं पाहणाऱ्या प्रजातींना सांभाळण्यास, त्यांना आश्रय देण्यास व त्यांच्याविषयी जनमत बनविण्यास तयार आहेत?

आपण अशा समाजात राहतो जिथे धार्मिक प्रवृत्ती असणे हे कौतुकास्पद समजले जाते. हजारो वर्षे जुन्या आणि बऱ्याचशा कालबाह्य परंपरांचे डोळे झाकून अनुकरण करणे ह्यात काय कौतुकास्पद आहे? आपल्या जगात बहुतांश लोक हे क्षुल्लक वैयक्तिक कारणांसाठी शेकडो मैल दूर धार्मिक स्थळांना भेट द्यायला जातात पण पृथ्वीवरच्या संपूर्ण जीवसृष्टीच्याच अस्तित्वाला ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्याबद्दल मात्र आपण अनभिज्ञ असतो.

धार्मिक लोकांचा हा अनुदार दृष्टिकोन पाहून कार्ल सगान एकदा असे म्हणाले, ‘आमच्या धर्मग्रंथात लिहिल्यापेक्षा व आमच्या धर्मगुरूंनी विचार केल्यापेक्षा विश्व हे खूप विराट, खूप सूत्रबद्ध व खूप विस्मयकारी आहे अशा निष्कर्षाला जगातला एकही धर्म अजून कसा पोचला नाही ? बहुतांश धर्म तर आजही ‘नाही’ नाही. आमचा धर्म व आमचा देव हे अत्यंत संकुचित आहेत आणि ते तसेच राहावे अशी आमची इच्छा आहे’ असेच म्हणण्यात धन्यता मानतात.

आपले विश्व हे अतिशय गुंतागुंतीचे आहे व त्यामध्ये प्राधान्याने हाताळण्यासारख्या अनेक समस्या आहेत. ह्या समस्या पृथ्वीवर आपण आखलेल्या कृत्रिम सीमा पार करून जातात. त्या सोडविण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल.

पृथ्वीवरील जीवसृष्टी ही ३०० कोटी वर्षाहून अधिक जुनी आहे. जी प्रदीर्घ उत्क्रांतीच्या प्रवासातून येथपर्यंत पोचली आहे. त्याच्या तुलनेत हजारो वर्षांची मानवी प्रगती, आपली थोर संस्कृती आणि सांस्कृतिक प्रबोधन ही अगदी मोजक्या काळाचीच गोष्ट आहे. परंतु तेवढ्या कमी काळातही आपण कला, विज्ञान, साहित्य आणि वास्तुरचना ह्यांच्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे.

रामायण, महाभारत हे अश्याच सांस्कृतिक प्रगतीचे पैलू आहेत. पण तसेच उत्क्रांतिवाद, सापेक्षता सिद्धान्त (General theory of relativity) पुंजयामिकी सिद्धान्त (quantum mechanics) हे शेकडो वर्षांच्या संशोधनानंतर आलेले व माणसाच्या जिज्ञासेचे देदीप्यमान पैलू आहेत. ज्याचा सर्व मानवजातीला गर्व असला पाहिजे. जर आपण आजच्याही काळात हजारो वर्ष जुन्या पोथी-पुराणांचे अर्थ लावत बसलो तर ज्ञानाच्या संवर्धनात आपण मागे पडू.

अलीकडे पुन्हा एकदा महाभारत आणि कॉस्मॉस मात्र विज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व नवीन शोध व प्रगतीचा सांगावा घेऊन नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आली. नव्या जमान्याचे खभौतिकशास्त्रज्ञ नील देग्रास टायसन ह्यांनी आमच्या वैज्ञानिक ज्ञानात भर घातली.

रामायण व महाभारताचा आपला वाटा आपल्याला पुरेपुर मिळाला परंतु कॉस्मॉसबद्दल कुतूहल दाखविण्यात मात्र आपण कमी पडलो. कॉस्मॉस हा कार्यक्रम विज्ञानाच्या क्षेत्रात आपली उत्तुंग भरारी चित्रित करतो. आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वातील राहण्यायोग्य अशा ह्या एकमेव ग्रहावर सजीव सृष्टीचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकतो.

सी ४०४ पॅरामाउंट मधुबन सोसायटी साईनगर, लेन नं. १ खंडोबा मंदिराजवळ कात्रज-कोंढवा रोड, पुणे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.