युटोपियन सोशालिस्ट; रॉबर्ट ओवन

एकोणविसाव्या शतकात युरोपातील स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नेपोलियनसोबत नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ सर्वदूर पोहोचली होती. सामान्य नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते. त्यातच माल्थसने भाकीत केलेली जागतिक आर्थिक मंदी खरोखरच सुरू झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यासोबत हिंसाचाराच्या घटनासुद्धा. औद्योगिक क्रांतीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादरम्यानच भांडवलदारांनी स्वतःचा फायदा वाढविण्याकरिता नवनवे कायदे आणले ज्यामुळे कामगारांचे जगणे अधिकच दयनीय बनले. अगदी १० वर्षांची लहान मुले- मुली सुद्धा या कामात गुंतवली जात होती. आणि मग अशांवर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे कधीही न संपणारे सत्र सुरू व्हायचे. विरोध करणाऱ्यांवर उपासमारीची पाळी यायची. अनेक ठिकाणी यंत्रांनी कामगारांची जागा घेतली होती. कामगारवर्गात या सर्वांचा प्रचंड रोष होता. या रोषापायी असे अनेक यंत्रसामुग्री- युक्त कारखाने कामगारांनी जाळून राख केले. स्थानिक पोलिस यंत्रणा हा उद्रेक रोखण्यास असमर्थ ठरत होती. आणि सैनिकांच्या मोठमोठ्या तुकड्या लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याच्या कामातच पूर्णपणे गुंतल्या होत्या.

ॲडम स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा व्यापार-उदीम वाढायला लागेल तेव्हा अर्थशास्त्रीय नियमानुसार समाजातील प्रत्येक वर्ग भरभराटीला येईल. त्याने मांडलेले सर्वांसाठीचे समृद्धीचे स्वप्न लोकांना आशा दाखवत होते. परंतु सामान्य नागरिकांची ही अवस्था पाहूनच माल्थस व रिकार्डो यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी ‘सर्व काही आलबेल नाही’ हे अनेक पद्धतींनी सुचवले आणि हे सुद्धा अर्थशास्त्रीय नियमांच्या आधार घेऊनच. या निराशामय वातावरणात युटोपियन सोशॅलिझमने प्रचंड आशावादाला जन्म दिला.

राबर्ट ओवन यात पहिले नाव घेता येईल ते रॉबर्ट ओवनचे. प्रचंड गरिबीवर मात करून त्याने खूप कमी वयातच मोठे नाव आणि संपत्ती कमावली. रॉबर्ट ओवनचा जन्म १७७१ मध्ये न्यू टाउन, मोंटगोमेरीशायर येथे झाला. वयाच्या दहा वर्षांपर्यंत प्रारंभिक शिक्षण घेऊन त्याने लंडन येथे कापडाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली.

वयाच्या १८ व्या वर्षी तो मँचेस्टर येथे पुढील नशीब आजमावण्यासाठी आला. येथे त्याच्यातील आत्मविश्वास बघून त्याला एका कापड मिलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली. पुढे तीनच वर्षांत स्वतःच्या परिश्रमामुळे या मिलचा तो भागीदार झाला. या कालावधीत तो अनेक क्लबचा सदस्य होता. १७९३ मध्ये त्याला Manchester Literary and Philosophical Society चे सभासदत्व बहाल करण्यात आले. Manchester Board of Health चासुद्धा तो सदस्य होता. यात प्रामुख्याने कामगारांचे आरोग्य व त्यांचे राहणीमान सुधारण्याचे काम केले जाई. या दोन्ही संस्थांत त्याला भरपूर अनुभव मिळाला आणि त्याच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीवर याचा बऱ्याच अंशी प्रभाव पडला.

न्यु लनार्क येथे आगमन एकदा ग्लासगो येथे करोलीना डेल या तरुणीशी त्याची भेट झाली व पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला. त्याचवेळेस न्यू लनार्क येथे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एक कापड मिल बघण्यासाठी तो तेथे आला. मिलचा मालक हा आपल्याला आवडत असलेल्या मुलीचे वडील डेविड डेल आहेत ते बघून त्याने निश्चय केला की मिल आणि मुलगी दोन्ही मिळवायची. तो त्याच्या भागीदाराला घेऊन सरळ डेविड डेल यांच्या कडे गेला आणि मिल खरेदी तर केलीच पण सोबतच करोलीनाचा हातसुद्धा मागून घेतला. त्यानंतर त्याने अत्यंत प्रभावीपणे मिलची सर्व सूत्रे हाती घेतली व मिलला चांगला नफा मिळवून दिला.

मनि सोबतच त्याने न्यू लनार्क येथील कामगारांच्या जीवनात एक सुसूत्रता आणायचा त्याने प्रयत्न केला. तत्कालीन पाशवी कारखाना कायदे रद्द करून कामगारांना त्याने नवे स्वातंत्र्य दिले. त्याकाळी ‘ट्रक पद्धती’ अनुसार कामगारांना कामाच्या बदल्यात ‘टोकन’ दिले जात. त्या टोकनाचे कारखान्याच्या बाहेर काहीच मूल्य नव्हते.. कारखान्याचे मालकच मग आवारात एका ट्रकमध्ये जेवणाचे, कपड्याचे आदि दुकाने लावून अवाजवी किंमतीत टोकनांच्या बदल्यात हे सर्व द्यायचे. लहानलहान मुलांना कारखान्यात जुंपले जायचे. ओवनने कामगारांना टोकनऐवजी तत्कालीन चलन देण्यास सुरुवात केली.

सोबतच त्याने कामगारांसाठी वेगळे दुकान काढले, ज्यात ठोकभावाच्या किमती किंचित जास्त असायच्या. मिळणारा नफा हा परत कामगारांसाठी वापरला जायचा. याच सूत्रातून पुढे इंग्लंडमध्ये Co-operative Society चा जन्म झाला. तसेच त्याने लहान मुलांना कधी काम करायला बाध्य केले नाही. उलट त्यांच्यासाठी शाळा काढून त्यांना चांगल्या संस्काराचे धडे दिले. लहान मुलांचे कारखान्यात काम करण्याचे तास कमी व्हावे यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. Infant Childcare नावाची संस्था त्याने लहान मुलांच्या विकासासाठी सुरू केली. ओवनने त्या खेड्यात जणू एक छोटीशी प्रयोगशाळाच निर्माण केली होती. तेथे कामगारांना स्वातंत्र्य होते. कामाच्या स्वतंत्र वेळा होत्या, जे कामगार उत्कृष्टरीत्या काम बजावत होते त्यांच्या छातीवर वेगवेगळ्या रंगांचे बिल्ले लावण्यात आले होते. कारखान्यातच बाग, मुलांच्या खेळण्याचे ठिकाण, शाळा आदी सर्व सोयी उपलब्ध होत्या. दारूच्या विक्रीवर त्याने विशेष मर्यादा आणला होती. त्यामुळे तेथे चोरी, दारू पिऊन दंगा करणे आदि प्रकार होत नसत. कामगारांच्या हिताच्या कायद्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. शेवटी टोकन देणे हे कायद्याने गुन्हा ठरविले गेले.

विचार आणि कार्य ओवनने त्याच्या शिक्षणावरील संशोधनातून मांडले की कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, हे तो ज्या परिस्थितीत राहिला आहे व जसे वातावरण त्याला मिळाले आहे त्यावरून घडत असते. त्यामुळे लहान मुलांना शिक्षण देतानाच त्यांच्या भोवती अशी वातावरणनिर्मिती केली पाहिजे की सर्व चांगले संस्कार ते तेथूनच शिकतील. “A Man is the product of his Environment” असे त्याचे आग्रहपूर्ण मत होते.. या विषयावर त्याने भरपूर लिखाण केले आहे. सोबतच तेथील लहान मुलांसाठी त्याने केलेले शिक्षणाचे प्रयोग हे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण होते.

समाजसत्तावादाचे प्रयोग ओवनने मग हा प्रयोग अनेक लोकांसाठी करायचे ठरविले. त्याने अमेरिकेतील New Harmony, Indiana येथे हा प्रयोग करायचे ठरविले. तेथे त्याने ३० हजार एकरांची जागा ४० हजार पौंडात विकत घेतली. त्यात त्याने पहिल्याच दिवशी सर्वांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असल्याचे जाहीर केले. चौकोनी आकाराच्या एका वास्तूत अनेक चौकोनी खोल्या होत्या. लोकांना राहायला स्वतंत्र खोल्या होत्या, परंतु सर्वांचे एकच स्वयंपाकघर होते व बैठकीची खोलीसुद्धा एकच होती. सर्वांनी रोज समान काम करायचे (शक्यतो शेतीचे) आणि सर्वांना मिळणारा पगार सुद्धा समान राहील असा नियम त्याने बनवला. हा प्रयोग काही काळ चांगला चालला. परंतु नंतर नियमांचे पालन यथोचितरीत्या न झाल्यामुळे तेथे अनागोंदी माजली. अखेरीस तो प्रयोग बंद करावा लागला. यात ओवनला त्याच्या जमापुंजीच्या ८० टक्के भाग गमवावा लागला.

त्यानंतरही त्याने परत हे प्रयोग सुरू करण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याच्या विचाराप्रमाणे अशा ठिकाणी ५०० ते ३००० लोकांनी राहावे. सर्वांना वेगवेगळ्या खोल्या असतील परंतु स्वयंपाकघर बैठकीची खोली एकच असेल. या संस्था शक्यतो सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असतील. प्रामुख्याने येथे शेतीची कामे केली जातील परंतु इतर जीवनावश्यक वस्तूंचेही तेथे उत्पादन केले जाईल. त्याने लिहिलेल्या New View of Society मध्ये त्याच्या अश्या कम्युनिटी बद्दलच्या मतांचे स्पष्ट रेखाटन केले आहे.

त्याच्याच शब्दात “What ideas individuals may attach to the term “Millennium” I know not; but I know that society may be formed so as to exist without crime, without proverty, with health greatly improved, with little, if any misery, and with intelligence and happiness increased a hunderdfold; and no obstacle whatsoever intervenes at this moment except ignorance, to prevent such a state of society from becoming universal.”

कामगारसंघटन ओवनच्या धर्मासंबंधी टीकात्मक अणि संशोधक वृत्तीमुळे अनेक लोकांना त्याचे विश्लेषण पटायचे नाही. अशा वेळी, तो इतर लोकांच्या मनातून उतरत असताना, कामगारवर्गाने मात्र त्याचे विचार डोक्यावर घेतले. अमेरिकेतून लंडनला परतल्यावर त्याला आता वेगळ्याच विषयाने पछाडले होते. त्याने कामगारांच्या हक्कांसाठी त्यांचे युनियन उभारणे सुरू केले. बघता बघता Grand National Consolidated Trade Union (GNCTU) याचे ५ लाखांच्या वर सभासद झाले. आता सरकारलाही या ताकदीची जाणीव होऊ लागली. त्यांनी मग वेगवेगळ्या मार्गाने शेवटी अत्यंत क्रूरपणे कामगारांची ही एकी संपविली आणि ही युनियन मोडीत काढली.

त्यानंतर ओवनने कामगारांचे स्वतः निर्मिती केलेल्या वस्तू व श्रम विकण्यासाठी Labour Exchange सुरू केले. त्याला आता खात्री झाली होती की समाजसत्तावादाचा उदय होत आहे आणि भांडवलशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. त्याने The Crisis नावाने एक साप्ताहिकसुद्धा सुरू केले.

१८३४ मध्ये त्याने मग या सर्वांपासून स्वतःला अलिप्त ठेवून पुढील शतकासाठी नीति-नियम ठरविण्यासाठी ‘The New Moral World (November 1834)’ नावाचे जर्नल सुरू केले.

पुढील आयुष्य १८४० ला परत ओवन ने Queenwood Farm, Hampshire येथे त्याच्या स्वप्ननगरातली नवी वस्ती निर्माण करायचे ठरविले. ५०० लोकांची राहण्याची व्यवस्था असलेल्या या वस्तीत या वेळेला ९० लोकच राहायला आले. १८४१ मध्ये त्याने लोकांच्या मदतीने ओवन वस्तीत राहायला येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी Harmony Hall नावाची मोठी वास्तू उभारली. परंतु खर्च करण्यासाठी मिळालेली सर्व रक्कम त्याने लगेच खर्च करून टाकली. त्यानंतर त्याला अध्यक्षपदावरून बाजूला सारण्यात आले. १९४३ ला परत तो निवडून आला. परंतु त्याही वेळी ‘normal school’ ची संकल्पना कुणालाच पटली नाही. १८४४ ला त्याच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून इतर सदस्यांनी बंड केले.

यानंतर सुद्धा ओवन अमेरिका आणि युरोपच्या वाऱ्या करत राहिला. १८५५ मध्ये त्याने अनेक ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करून नवे शतक आल्याची घोषणा केली. समाजवाद किंवा समाजसत्तावाद हा शब्दप्रयोग सुद्धा सर्वप्रथम त्यानेच केला.

ओवनला खात्री होती एक ना एक दिवस सरकारला त्याचे म्हणणे पटेल व ते त्याला मदतीला बोलावतील. त्याचे अनेक अनुयायी होते, ज्यांना त्याने एक नवे सर्वांसाठी समान, नीतिमत्तेचे स्वप्न दाखविले होते व पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याची प्रेरणा दिली होती.

दि. १७ नोव्हेंबर १८५८ रोजी त्याच्या जन्मगावातच त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात ३ मुली आणि ४ मुले होती. अशाप्रकारे एका अफलातून व्यक्तिमत्त्वाचा शेवट झाला. त्याच्या जीवनकाळात तो एक यशस्वी उद्योजक, एक शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, कामगार नेता, समाजवादी विचारांचा आद्य प्रवर्तक, अशा अनेक रूपांत लोकांसमोर आला. त्याने सुरू केलेले Co-operative, Infant Care Society, Labour Exchange, New Lanark New Harmony यांनी पुढच्या पिढीला जबाबदारी घेण्यासाठी आवाहन केले. संपूर्ण जगाबद्दलच्या प्रेमापोटी त्याने केलेले प्रयत्न हे कोणत्याही अंगाने कमी लेखता येणार नाहीत.

फ्रेडरिक एंगल्सच्या शब्दांतूनच ओवनची समर्पकता लक्षात येईल. “Every social movement and real advance in England on behalf of the workers, links with the name of Robert Owen.”

चलभाष – ९४०५६९१०२३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.