पत्रसंवाद

उत्पल वनिता बाबूराव आजचा सुधारकच्या मे अंकातील बाईमाणूस ह्या पुस्तकावरील लेख वाचला. लेखातील मुद्दे पटले. त्यांनी परखड परीक्षण केले आहे. (मी पुस्तक वाचलेले नाही) काही मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकेल असे वाटते. काही मुद्दे नव्याने समोर आले आहेत.

भारतात तरी वर्ग-वर्णाच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना एक होऊन समष्टिरूप धारण करता आलेले नाही. हो. हा मुद्दा इथल्या बऱ्याच शोषित घटकांना लागू होतो असे वाटते. स्त्री म्हणून एकमेकांशी जोडून घेण्याची प्रेरणाच कुठे दिसत नाही. हे पटले. आजच्या नवबौद्ध स्त्रिया हिंदू दलित स्त्रियांपेक्षा अधिक प्रगत व प्रगल्भ असतात असे पुस्तकात एके ठिकाणी म्हटले आहे. त्याचे श्रेय आंबेडकरांना दिलेही आहे. प्रत्यक्षात मात्र वंचितांच्या म्हणून ह्या दोन (स्त्रीमुक्ती व दलितमुक्ती) चळवळी हातांत हात घालून चालताना दिसल्या नाहीत.

मला वाटते हे चित्र थोडे बदलले आहे. दलित चळवळ आणि स्त्री चळवळ या अगदी पूर्णांशाने नाही तरी एकमेकांशी जोडून घेत आहेत असे वाटते.

हिंसा करून त्यांना खरोखर किती आनंद मिळतो व तो किती वेळ टिकतों ह्याचे कुणी मोजमाप केले आहे का? अपराधगंड त्यांच्या मनाला पोखरत नाही का?

न्यूनगंड आणि असुरक्षितता यांनी वेढलेल्या आयुष्यात त्यांना सुखाचा श्वास घेता येतो का? हा मुद्दा रोचक आहे. यावर संशोधन होऊ शकेल. मात्र हिंसेला मनातून ‘तात्त्विक मान्यता’ असेल (जी अनेकजणांच्या बाबतीत असते) तर टोचणी वगैरे लागत नाही असे मला वाटते.

खालच्या वर्गातील पुरुषाला वरच्या वर्गात प्रवेश नसतो. तेव्हा पुरुषाचे सारे आलबेल व स्त्रीच तेवढी दुःखाच्या खाईत, असेही मानण्याचे कारण नाही. हो. पण बाहेर दबला गेलेला पुरुष घरात आला की शोषक होतो याचीही नोंद घ्यायला हवी. मला वाटते की ही अखेरीस ‘दुःखाची तुलना’ आहे आणि त्यात स्त्रीचे पारडे जड आहे.

हे काही ठळक मुद्दे. इतरही मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकेल. पण एकूणात तुमची मांडणी पटली. पुस्तक वाचले तर अजून सविस्तर बोलता येईल कदाचित. खरे सांगायचे तर मला अलीकडे या विषयाचा काहीसा शीण आल्यासारखे झाले आहे. स्त्रीकडे स्त्री म्हणून आणि पुरुषाकडे पुरुष म्हणून न बघता दोघांकडे माणूस म्हणून बघितल्यास कसे असा काहीसा विचार येतो कधीकधी…….

चलभाष : ९८५०६७७८७५

लेखिका अनुराधा मोहनी यांचा प्रतिसाद नमस्कार, तुमचे पत्र वाचून आनंद झाला. तुम्ही लेख मनापासून वाचलेला दिसतो. काही मुद्दे तुम्हाला पटलेले आहेत. तेव्हा तुम्हाला जे पटले नाहीत, तेथपासून सुरुवात करू. दलित चळवळ व स्त्री चळवळ एकत्रपणे पुढे जात असली तर मला आनंद वाटेल. हिंसेला मनातून ‘तात्त्विक मान्यता’ असेल (जी अनेकजणांच्या बाबतीत असते) तर टोचणी वगैरे लागत नाही असे मला वाटते. माझ्या मते हा मुद्दा संस्कारांशी निगडित आहे. ज्यांच्यावर पुरुषीपणाचे संस्कार झाले आहेत असे पुरुष बिनधास्तपणे मारहाण करतात आणि त्याची टोचणी वगैरे लावून घेत नाहीत, हे खरे. पण त्याच्याही पलीकडे, थोडेसे जन्मजात व थोडेसे सामाजिक असे काहीतरी प्रत्येकामध्ये असतेच असते. जे त्यांना आपण केलेले कृत्य गैर असल्याची जाणीव करून देत असते. त्याला सदसद्विवेकबुद्धी म्हणतात. त्यासाठी शिक्षण, वाचन, थोर लोकांचा सहवास वगैरे कशाचीच गरज नसते. ती प्रत्येक मनुष्यप्राण्यात असते. ह्या टोचणीच्या कचाट्यातून कोणी मनुष्य सुटत असेल असे मला वाटत नाही. ती लागू नये म्हणून किंवा लागलेली निघून जावी म्हणून ते लोक सतत स्वतःचे समर्थन (मनात किंवा मोठ्याने) करत राहतात. स्त्रीच्या न झालेल्या चुका दाखवत राहतात. स्वत:वरच चिडतात. त्या संतापाच्या उद्रेकात स्वतःला किंवा इतरांना (स्त्रीला) पुन्हा पुन्हा मारझोड करतात. अशा रीतीने ते जास्त जास्त हिंसक बनतात, पण ते टोचणी नाही म्हणून नव्हे, तर ती आहे म्हणूनच.

पण बाहेर बदला गेलेला पुरुष घरात आला की शोषक होतो याचीही नोंद घ्यायला हवी. मला वाटते की ही अखेरीस ‘दुःखाची तुलना’ आहे आणि त्यात स्त्रीचे पारडे जड आहे.

ह्याची नोंद घेतली गेलेलीच आहे. स्त्रीवाद्यांनी तर ती वारंवार घेतली आहे. प्रश्न असा आहे की ही नोंद घेऊन काय होणार आहे? त्याने शोषण कमी होते का? मला तर वाटते की दुःखाची तुलना करून व कोणाचे पारडे जड हे ठरवूनही काहीच उपयोग नाही. त्या दुःखातून मुक्त कसे होणार ते बघावे. आपल्या दबलेपणाची व्यवस्था कशी करावी हे पुरुषाला समजत नाही. ते समजून घेण्यासाठी (देण्यासाठी) स्त्री मदत करू शकेल का? त्यानेच दोघांनाही दुःखमुक्त होता येईल. शिवाय प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रसंगांत शोषक व शोषित असते, त्याचे काय? आपण जेव्हा शोषकाच्या भूमिकेत असतो, तेव्हा शोषिताशी कसे वागतो? दलित स्त्री ही डबल शोषित असते हे खरे. पण ती सरकारी अधिकारी बनते आणि तिच्याकडे कोणी प्रकल्पबाधित माणूस नुकसानभरपाई मागायला जातो तेव्हा ती त्याच्याशी कशी वागते?

खरे सांगायचे तर मला अलीकडे या विषयाचा काहीसा शीण आल्यासारखे झाले आहे. स्त्रीकडे स्त्री म्हणून आणि पुरुषाकडे पुरुष म्हणून न बघता दोघांकडे माणूस म्हणून बघितल्यास कसे असा काहीसा विचार येतो कधीकधी…..

हे वाटणे मात्र अगदी स्वाभाविक आहे. मलाही हेच म्हणायचे आहे. माझे मुख्य मत हे आहे की स्त्रीवाद हा प्रतिक्रिया म्हणून आला होता. प्रतिक्रियेमध्ये आपल्याला जास्त काळ राहता येत नाही. म्हणजे स्त्रीला स्त्री म्हणून व पुरुषाला पुरुष म्हणून न पाहता दोघांकडे माणूस म्हणून पाहणे हेच योग्य आहे. किंवा थोडे अधिक स्पष्टीकरण करू, कारण ‘माणूस म्हणून पाहणे’ ह्यातून काहीच निश्चित बोध होत नाही. पुरुषाकडे शोषक म्हणून नाही तर साधा, फक्त पुरुष म्हणून आणि स्त्रीकडे शोषित म्हणून नाही तर स्त्री म्हणून पाहणे आणि आपल्या मनात ह्या दोघांना समान दर्जा देणे हेच ह्या समस्येवरचे उत्तर आहे.

आता शेवटचा मुद्दा म्हणजे पुस्तक वाचलेले नसणे, हा मुद्दा बरोबर आहे, कारण पूर्वपक्ष समजून घेतल्याशिवाय उत्तरपक्षाची वैधता कशी ठरवणार? तरीही, त्यामध्ये मांडलेला अभिजात स्त्रीवाद तुम्हाला माहीत आहे म्हणून आणि माझ्यावर विश्वास ठेवून उत्तर दिले, म्हणून आभार.

४०/६५७, लोकमान्यनगर, पोस्ट ऑफीसजवळ, पुणे – ३०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.