अमेरिकेचे राष्ट्रगीत

‘सूर्याच्या पहिल्या किरणांसवे, धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतर अजूनही दिमाखाने झळाळतो आहे. अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे. जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत ह्या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू. (अमेरिकन राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ)

एखाद्या देशाचे राष्ट्रगीत हे जणू त्याच्या इतिहासाचे प्रतिबिंबच असते. देशासाठी आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रगीतात केला जातो. राष्ट्रगीतांत जाणते- अजाणतेपणे ज्या घटकांचा उल्लेख केला जात नाही ते घटकही महत्त्वाचे असतात, नाही असे नाही. परंतु, एखाद्या परक्या देशाला काय महत्त्वाचे वाटत असावे ते आपण राष्ट्रगीताच्या सहाय्याने जाणून घेऊ शकतो.

भारताच्या राष्ट्रगीतात महत्त्वाचे प्रदेश, पर्वतरांगा, नद्या यांचा उल्लेख आहे हे वाचल्यावर आपल्याला असे वाटू शकते की अमेरिकेच्या राष्ट्रगीतातही रॉकी, आपलेचिअन अश्या महत्त्वाच्या पर्वतरांगांचा अथवा मिसोरी, मिसिसिपी अशा महत्त्वाच्या नद्यांचा उल्लेख असायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांच्या राष्ट्रगीतात अग्निबाण, तोफांचा मारा व भयंकर युद्धाचे वर्णन आहे.

मी सर्वप्रथम जेव्हा अमेरिकन राष्ट्रगीत ऐकले होते तेव्हा मला त्यातल्या युद्धाच्या वर्णनाने चकित केले होते. अमेरिकेला माणसाच्या अथक परिश्रमाने उभारलेली भव्यदिव्य शहरे व निसर्गाचे परिपूर्ण दान मिळाले असूनही त्यांचा उल्लेख न होता त्यांच्या राष्ट्रगीतात भयंकर युद्धाचा उल्लेख का केला असेल हा प्रश्न मला पडला. ह्या प्रश्नाबाबतचे कुतूहल मला अमेरिकेच्या उदयापासूनच्या इतिहास-प्रवासावर घेऊन गेले. जशी जशी माझी अमेरिकन इतिहासाशी ओळख झाली, तशी मला अमेरिकन राष्ट्रगीताची एक नवीन ओळख पटली. अमेरिकन राष्ट्रगीत हे युद्धगीतासारखे वाटणे स्वाभाविक आहे कारण हे राष्ट्रगीत एका युद्धातच लिहिले गेले होते. त्याला ‘१८१२ चे युद्ध’ असे म्हणतात. तर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी लक्षात घेऊ.

सन १७७६ मध्ये, अमेरिका खंडातील १३ वसाहतींनी इंग्रज सरकारच्या बेबंदशाही करव्यवस्थेला कंटाळून, इंग्रजी साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. ह्या वसाहतींच्या बंडखोरीला चिरडण्यासाठी इंग्रज त्यांच्यावर पूर्ण बळानिशी सामोरे गेले. इंग्रजी साम्राज्यापुढे वसाहतींचा निभाव लागणे अवघड होते. परंतु वसाहतींच्या मदतीला फ्रान्स व स्पेन ही साम्राज्ये पुढे आली. त्यांच्या मदतीमुळे वसाहतींना इंग्रजांशी यशस्वी लढा देता आला व ८ वर्षांच्या लढतीनंतर अखेरीस इंग्रजांनी अमेरिकेचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले. अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला मानणारा तह १७८३ मध्ये पॅरिसला इंग्रजांनी मान्य केला. अश्या पद्धतीने युद्धाच्या धुमश्चक्रीतूनच अमेरिकेचा उदय झाला. नव्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यघोषणेत, जीवन, स्वातंत्र्य व सुखाचा शोध हे माणसाचे अविभाज्य अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ह्या घोषणेचे महत्त्व, ती ज्या काळात केली गेली त्यावरून लक्षात येते. ज्या काळात राजांचा प्रजेवर अनिर्बंध अधिकार असे, त्या काळात व्यक्तिगत अधिकारांची नोंद घेतली जाणे ही क्रांतिकारक घटना होती.

आज अमेरिका पूर्वेला अटलांटिक समुद्रापासून पश्चिमेला पॅसिफिक समुद्रापर्यंत पसरलेला आहे. परंतु सुरुवातीच्या काळात मात्र अमेरिकन वसाहतींचा व्याप फक्त उत्तर व पूर्वेकडेच होता. त्यानंतर ती हळूहळू पश्चिमेकडे पसरत गेली. जमिनीविषयीच्या तिच्या वाढत्या भुकेमुळे ह्या भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींचा मात्र बळी गेला. प्रथम त्यांच्या मूळ जागेवरून व नंतर वारंवार त्यांच्या वसतीच्या जागेवरून त्यांचा उच्छेद करण्यात आला. आदिवासी जमातींच्या प्रमुखांशी अमेरिकेने जागेच्या वाटपावरून अनेक तह केले परंतु नंतर, आपलाच स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून ते वेळोवेळी मोडलेही. अमेरिकेच्या वर्धनात स्थानिक जमातींचे, प्रजातींचे व निसर्गाचे नुकसानच झाले.

इकडे अमेरिका पश्चिमेकडे पसरत असताना युरोपमध्ये मात्र राजकीय परिस्थिती बिघडत होती. अमेरिकन क्रांती होताना फ्रान्सने अमेरिकेस मदत केली पण युद्धखर्चामुळे फ्रान्सवर प्रचंड कर्जाचे ओझे झाले होते. कर्जात बुडालेल्या फ्रान्समध्ये राजकीय उद्रेक झाला. फ्रान्स राज्यक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात सरंजामशाही पद्धती नष्ट करून लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये प्रस्थापित करण्यात आली. परंतु फ्रान्समधील राजकीय परिस्थिती चिघळत गेली व परिणामी जनउन्मादाचा उद्रेक हा प्रचंड हिंसेमध्ये झाला. हा काळ ‘दहशतीचा काळ’ म्हणून ओळखला जातो. ह्या राजकीय परिस्थितीतून नेपोलिअन बोनापार्तेचा उदय झाला. नेपोलिअनच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या वादळात संपूर्ण युरोप ओढले गेले. त्यानंतर युरोपात झालेली युद्धे ही ‘नेपोलिअन युद्धे’ म्हणूनच ओळखली जातात. ह्या युद्धांची छाया एक तप युरोपवर राहिली व तीत नवोदित राष्ट्र असलेली अमेरिकाही ओढली गेली.

ह्या युद्धांच्या काळात इंग्रजांनी फ्रान्सच्या समुद्र-वाहतुकीवर बंधने टाकणे व नौकांवर हमले करणे सुरू केले. ह्या घटनांचा परिणाम हा अमेरिकन समुद्र-वाहतुकीवरही झाला. शिवाय अमेरिकन घुसखोरीच्या विरोधात इंग्रजांचा स्थानिक जमातींना पाठिंबा होता. त्यामुळे अमेरिकेची नाराजी होती. ह्या व अशा आणखी काही कारणांमुळे, अमेरिकेने १८१२ मध्ये इंग्रजांशी युद्धाची घोषणा केली.

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रज युरोपातील युद्धांमध्ये अडकले असल्यामुळे अमेरिकेतील युद्धात त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. इ.स. १८१४ मध्ये नेपोलिअनची हार झाल्यानंतर मात्र इंग्रजांनी अमेरिकेत आक्रमक भूमिका घेतली व मोठ्या प्रमाणात सैन्य अमेरिकेत पाठवले. अमेरिकेत हळूहळू इंग्रजांचे पारडे भारी झाले व एकामागून एक अमेरिकन शहरे इंग्रजांच्या आक्रमणाला बळी पडू लागली. प्रथम त्यांनी अमेरिकेची राजधानी असलेले वॉशिंग्टन शहर जिंकले व त्याला आग लावून बेचिराख केले. पाठोपाठ अलेग्झेन्द्रिया व बाल्टिमोर ह्या महत्त्वाच्या बंदरावर विजय मिळवला. बाल्टिमोर शहराचे रक्षण करायला मॅकहेन्री नावाचा किल्ला होता. तो सर करता आला असता तर बाल्टिमोर शहराची हार पक्की होती. इंग्रजांनी ह्या किल्ल्यावर हमला करायचे ठरविले.

ह्याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्रगीत लिहिले गेले आहे. दुसरे असे की भारतीय राष्ट्रगीत हे भारताच्या सर्वश्रेष्ठ कवीने लिहिले आहे पण अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणारा मात्र व्यवसायाने वकील असलेला एक नवखा कवी होता. त्याचे नाव फ्रान्सिस स्कॉट की असे होते. इंग्रजांचा मॅकहेन्री किल्ल्यावर हमला करायचा बेत ठरत असताना फ्रान्सिस युद्धकैद्यांची अदलाबदल व सुटकेचे प्रस्ताव घेऊन वकील या नात्याने इंग्रजांच्या भेटीस आला होता. ह्या वाटाघाटी करण्यासाठी तो इंग्रजांच्या नौकेवर थांबला होता. अथक प्रयत्नानंतर फ्रान्सिसच्या वाटाघाटींना यश आले परंतु इंग्रजांच्या नौकेवरील वास्तव्यात त्याला मॅकहेन्री किल्ला व बाल्टिमोर शहरावरील हमल्याच्या योजनेबद्दल कळले असल्यामुळे त्याला इंग्रजांनी किल्ला सर होईपर्यंत बंदी बनवायचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे इंग्रजी नौसेनेने किल्ल्यावर दारूगोळा व क्षेपणास्त्रांनी मारा करण्यास सुरुवात केली. फ्रान्सिस इंग्रजी नौकेवरून हा मारा पाहत असताना किल्ल्यावर एक छोटासा अमेरिकन ध्वज फडकताना फ्रान्सिसला दिसला. जोपर्यंत तो ध्वज फडकतो आहे तोपर्यंत किल्ला लढा देतो आहे. एकदा का किल्ल्याने समर्पण केले की तो ध्वज खाली घेतला जाऊन त्याऐवजी समर्पणाचा श्वेत ध्वज फडकाविला जाईल असे फ्रान्सिसने मनात ताडले. सकाळी सुरू झालेला मारा हा दिवसअखेरपर्यंत सुरूच होता. संधिप्रकाशात क्षेपणास्त्रांच्या व गोळ्यांच्या लाल तांबड्या प्रकाशात अजूनही नेटाने फडकणारा ध्वज पाहून फ्रान्सिसचे मन भरून आले. तोफगोळ्यांच्या माराचा आवाज रात्रभरही थांबला नाही. फ्रान्सिसच्या मनात जी काही घालमेल होत असेल त्याचा आपण फक्त अंदाजच करू शकतो.

पुढल्या दिवशी पहाटे फ्रान्सिसने जेव्हा अस्वस्थ मनाने किल्ल्याकडे पाहिले तेव्हा त्याला एक अद्भुत दृश्य दिसले. किल्ल्यावर तोफगोळ्यांचा मारा सुरूच होता पण कालच्या छोट्या ध्वजाऐवजी एक भलामोठा अमेरिकन ध्वज तिथे लावलेला दिसला. त्याचा आकार ४२ फूट लांब व ३० फूट रुंद इतका अवाढव्य होता) व तो ध्वज मानाने फडकत होता.

हे दृश्य पाहून फ्रान्सिस भारावून गेला व त्यावेळेला त्याच्या मनात आलेले विचार त्याने तेथल्या तेथे कवितारूपात, एका पाठकोऱ्या कागदावर लिहून काढले. अग्निबाण, बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही डौलाने झळकणाऱ्या राष्ट्रध्वजाची ती तारीफ होती. तो राष्ट्रध्वज अवघड परिस्थितीतही आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी चिकाटीने झुंज देण्याच्या अमेरिकन वृत्तीचे प्रतीक होता.

मॅकहेन्री किल्ल्याने हार पत्करली नव्हती. अमेरिकेने हार पत्करली नव्हती. ह्या युद्धानंतर पारडे फिरले. अमेरिकेने इंग्रजांना हिंमतीने तोंड दिले. युद्धात जय मिळवून अमेरिका नव्या जोमाने पुढे आगेकूच करू लागली.

फ्रान्सिसने लिहिलेली कविता ही त्यातल्या देशप्रेमाच्या भावनेमुळे अत्यंत गाजली. १९३१ मध्ये ह्या कवितेला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.

राष्ट्रगीतात अमेरिकेचे वर्णन ‘स्वतंत्र लोकांची भूमी’ असे केलेले आहे. परंतु ते संपूर्ण सत्य नाही. अमेरिकेच्या देदीप्यमान यशामागील कटु सत्य असे आहे की ह्या यशाच्या पाया गुलामगिरीच्या शापाने झाकोळलेला होता. अमेरिकेत दक्षिणेकडील वसाहतींमध्ये कापसाच्या शेतीवर काम करायला व इतर कामांसाठी आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात गुलाम आणले जात. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी प्रत्येक ५ माणसांमागे १ माणूस हा गुलाम होता. सूचकपणे बोलायचे तर अमेरिकन संसदेच्या शिखरावर विराजमान झालेली स्वातंत्र्यदेवतेची मूर्तीही एका गुलामानेच साकारलेली आहे.

फ्रान्सिस स्कॉट की हा स्वतः ही गुलाम राखून होता इतकेच नव्हे तर गुलामगिरी बंद करण्याच्या प्रयत्नांना त्याचा कट्टर विरोध होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा एक जनक म्हणून ज्याला ओळखले जाते व स्वातंत्र्याच्या घोषणेत ज्याने ‘सर्व मनुष्यगण समान म्हणून निर्माण केलेले आहेत हे स्वयंसिद्ध सत्य आहे’ असे नमूद केले होते त्या थॉमस जेफरसनकडे शेकडो गुलाम होते. एकीकडे स्वातंत्र्याचा पुरस्कार तर दुसरीकडे गुलामगिरीचा स्वीकार ह्या परस्परविरोधी तत्त्वांनी अमेरिकन घटनेला ग्रासले होते. अंतर्गत कलह व विचारभेद ज्या गृहात असतील त्याचे पतन अटळ असते असे उद्गार एकदा अब्राहम लिंकन ह्यांनी काढले होते. ही जणू भविष्यवाणीच ठरली. इ.स. १८६० च्या दशकात अमेरिकेचे गुलामगिरीच्या प्रश्नावर दोन भागांत विभाजन होऊन त्या दोहोंत तुंबळ युद्ध सुरू झाले. ह्या अंतर्गत युद्धात अंदाजे ६ लाख लोकांचा बळी गेला. अखेरीस राष्ट्रपती अब्राहम लिंकनच्या अथक प्रयत्नाने अमेरिकेला विभाजनाकडून परत एकत्रीकरणाकडे आणले व १८६३ मध्ये गुलामगिरी कायद्याने रद्द करण्यात आली.

अश्या पद्धतीने गुलामगिरीचा अंत झाला असला तरीही वर्णद्वेष व विषमता मात्र अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही कायम राहिली होती. ह्या विषमतेच्या विरोधात डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर, मालकॉम एक्स अशा अनेक नेत्यांनी, आफ्रिकन वंशाच्या अनेक लोकांनी व उदारमतवादी गोऱ्या अमेरिकन लोकांनी सर्वस्वाने लढा दिला.

‘हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन’ हे गीत त्यावेळेला आफ्रिकन वंशाच्या समाजाच्या मानवी हक्कांच्या लढ्यात फार गाजले.

अशा प्रदीर्घ लढ्याला अखेरीस यश मिळाले व वर्णद्वेषाचे विष समाजातून हळूहळू नष्ट होत गेले. अमेरिका हा देश त्याच्या इतिहासात अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या युद्धांमध्ये ओढला गेला किंवा अनेकदा युद्धांना कारणीभूत ठरला. दोन विश्वयुद्धांत अमेरिकेचा महत्त्वाचा वाटा होता. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर अमेरिका जागतिक महाशक्ती म्हणून पुढे आला आणि दुसरी जागतिक महाशक्ती म्हणून सोव्हियत युनिअन पुढे आला. ह्या महाशक्तींच्या शीतयुद्धात अनेक देश ओढले गेले व कोरिया, विएतनाम, अफगाणिस्तान येथे व इतर अनेक ठिकाणी शीतयुद्धाच्या छायेखाली खरीखुरी युद्धे झाली.

जशी जशी ही युद्धे लांबली तशी तशी अमेरिकन लोकांची युद्धाबद्दल निष्ठा कमी होत गेली. विएतनाम युद्धाच्या वेळी तर तरुणाई युद्धविरोधी प्रदर्शन करायला रस्त्यावर उतरली.

इ.स. १९६९ मध्ये न्यूयॉर्क राज्यातील वुडस्टॉक नामक गावी तरुणाई जेव्हा संगीत महोत्सवासाठी जमली होती तेव्हा तेथे संगीताच्या माध्यमातून युद्धविरोधी भावना व्यक्त केल्या गेल्या. जिमी हेंड्रिक्स नावाच्या सुप्रसिद्ध गिटारवादकाने अमेरिकन राष्ट्रगीत गिटारवर वाजवले. परंतु ते नेहमीच्या लयीत न वाजवता त्याने राष्ट्रगीतात अनेक चढउतार व मध्येमध्ये कर्णकर्कश स्वर आणले. अशा प्रकारे एकही शब्द न बोलता, त्या काळाची अस्वस्थता जणू त्याने आपल्या वादनातून अभिव्यक्त केली.

वीररसाने परिपूर्ण असे युद्धभूमीचे वर्णन करणारे राष्ट्रगीत शांततेच्या मागणीसाठी वापरले गेले. अमेरिका हा शब्द अनेक लोकांसाठी अनेक स्वप्न घेऊन येतो. काही लोकांना अमेरिका हा त्यांच्या देशातील छळापासून सुटका करणारा स्वर्ग म्हणून दिसतो, काहींना धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून आपलासा वाटतो, तर काहींना श्रीमंत बनायचे स्वप्न दाखवितो. अमेरिकेच्या इतिहासात असंख्य लोक नव्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेच्या आसऱ्याला आले. जशी जशी अमेरिकेत येणाऱ्या देशांतरित लोकांची संख्या वाढत गेली तसतसा नवीन लोकांच्या प्रवेशाला विरोधही वाढला. देशांतरितांनी बनविलेल्या देशात नव्या देशांतराला थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी वाढू लागली. चीन, मेक्सिको इ. देशांतील लोक वर्णद्वेषाचे नवीन बळी ठरू लागले.

इ.स. २०१३ मध्ये एका खेळाच्या कार्यक्रमात जेव्हा मेक्सिकन वंशाच्या ११ वर्षाच्या अमेरिकन मुलाने राष्ट्रगीत म्हटले तेव्हा सामाजिक प्रसारमाध्यमांनी त्याला वर्णद्वेषाचे बळी केले. तरीही आज बऱ्याचश्या प्रमाणात अमेरिका देशांतरित लोकांचा स्वीकारच करते व त्यांच्यासाठी एक चांगल्या आयुष्याचे स्वप्न म्हणूनच पुढे येते.

केन बर्न ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या, अमेरिकेवरील एका माहितीपटातील गीताने मी माझ्या लेखाचा शेवट करीत आहे, जे माझ्या मताप्रमाणे अमेरिकेची संकल्पना सुरेख शब्दांत व्यक्त करते.

हा त्या गोताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ ‘जिथे स्वातंत्र्य जपले जाते त्या देशाचे स्वप्न शेकडो वर्षांच्या अथक प्रयत्नांतून व वाडवडिलांच्या कष्टांतून साकार झाले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला वारशाने मिळाल्या आहेत. ज्या आपल्याला नव्या पिढीला सुपूर्द करायच्या आहेत. माझे आयुष्य संपताना माझ्या मनात हीच भावना असावी की देशाबद्दल माझे कर्तव्य पुरे करताना मी कुठे कमी पडलो नाही. हे अमेरिका, मी माझे सर्वस्व तुला सुपूर्द करीत आहे’.

सी ४०४ पॅरामाउंट मधुबन सोसायटी साईनगर, लेन नं. १ खंडोबा मंदिराजवळ कात्रज-कोंढवा रोड, पुणे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.