अनश्व-रथ, पुष्पक विमान व आपण सर्व – लेखांक दुसरा

(मागील लेखात आपण पहिले की नरेंद्र मोदी ह्यांच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय जितके हिंदुत्ववाद्यांच्या अथक परिश्रमाला आहे, तितकेच ते भारतीय परंपरेचा अन्वयार्थ लावू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे. हिंदू राष्ट्रवादाचा व राहदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण हिंदू धर्मातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांनाहा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. हिंदुराष्ट्रवादाचामुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध ‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे. म्हणूनच भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून त्यांना इतिहासाची मोडतोड करावी लागते. गांधींच्या दृष्टीने ‘हिंदू’ हा संप्रदाय नसल्यामुळे, त्यांना इतिहासाची मोडतोड करण्याची गरज भासत नाही. त्यांचा राम रहीमसोबत व ईश्वर अल्लासोबत सुखाने नांदू शकतो.)

रा. स्व. संघाचे राजकारण समजून घेताना अनेकदा आपली गफलत होते. सर्वसामान्य जनतेला संघ ही केवळ हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारी, राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी धावून जाणारी शिस्तप्रिय, सांस्कृतिक संघटना आहे, असे वाटते. डावी मंडळी संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे, असे मानतात. पण त्यांचे विश्लेषणही फॅसिझमच्या पाश्चात्य संकल्पनेपुढे जात नाही. भारतीय मातीतून उगवलेला संघ समजून घ्यायचा, म्हणजे मुदलात भारतीय परंपरा काय आहे, हे समजायला हवे. त्या विषयातले डाव्यांचे आकलन अपुरे आहे, एव्हढे म्हटले की पुरे. संघ ही ब्राह्मणी विचारांची छावणी आहे, हाही संघाकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. पण ब्राह्मण्य म्हणजे काय, ह्याविषयी सर्वत्र असलेला गोंधळ संघाच्या पथ्यावर पडतो. कारण अब्राह्मणी छावणीतील थोर मंडळीही अनेकदा ब्राह्मण्याच्या नावावर ब्राह्मणांना बडवत राहतात. जोपर्यंत संघ हा सर्वार्थाने शेटजी- भटजींचा होता, तेव्हा ही गफलत खपून जात असे. पण १९९२ साली बाबरी मशीद उद्धवस्त करण्याचे ‘पुण्यकर्म’ कल्याणसिंग, साध्वी ऋतंभरा व उमा भारती ह्यांच्या नेतृत्वाखालील बहुजनांनी संपादन केले. त्यानंतर २००२ च्या मुस्लिमांना धडा शिकविण्याच्या महाप्रकल्पात दलितांसोबत आदिवासीही सहर्ष सामील झाले. २०१४ च्या निवडणुकीत दलित व आदिवासींच्या बहुसंख्य राखीव जागांवर भाजप निवडून आला व मोदींच्या रूपाने बहुजन समाजातला पंतप्रधान संघ परिवाराने देशाला दिला. एव्हढे झाल्यावर संघाला ‘ब्राह्मणी’ म्हटल्याने संघाचे काही एक नुकसान होत नाही. उलट बहुजनातील विचारवंत आता ‘बहुजन’ पटेलांऐवजी ‘ब्राह्मण’ नेहरूंना देशाचे पंतप्रधान केल्याबद्दल काँग्रेसला दूषणे देत आहेत. असा वैचारिक गोंधळ माजणे ही बाब संघाच्या नेहमीच पथ्यावर पडली आहे. एरवीसुद्धा मतामतांचा गलबला उडवून गोंधळ निर्माण करायचा व त्या पडद्याआड आपल्या सोयीचे राजकारण करायचे अशीच संघाची कार्यशैली राहिली आहे.

‘संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, तिचा राजकारणाशी संबंध नाही.’ ‘आम्ही हिंदुत्वाचे राजकारण केले, करतो व करत राहू.’

‘भाजप ही आमची राजकीय आघाडी नाही. संघाचा स्वयंसेवक कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. आमचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’, “हिंदू हा धर्म नाही, ती एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे ह्या देशात हिंदू हिंदू, हिंदू मुस्लिम व हिंदू ख्रिश्चन राहतात असे आम्ही मानतो.

‘ ह्या व अशा असंख्य निरर्थक, धादांत खोट्या किंवा अर्धसत्याधारित विधानांतून एकच खकाणा उडवून देण्यात संघ परिवार वाकबगार आहे. त्याचबरोबर पुरोगाम्यांच्या दुखऱ्या जागा ओळखून त्यांना उचकवून नको त्या वादात गुरफटून ठेवण्यातही त्यांना यश मिळत आले आहे. ह्या खेळीचे ताजे उदाहरण म्हणजे ‘लव्ह जिहाद’.

खरे तर संघाने लव्ह जिहादचा धुरळा उडवून दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे हाच योग्य उपाय होता. कारण कोणत्याही राज्यात कोणत्याही सामजिक थराला बोचणारा हा विषय नव्हता. हिंदूंची झोप उडावी, इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम पुरुष व हिंदू स्त्रिया ह्यांचे विवाह पार पडल्याची हवादेखील कोठे पसरली नव्हती. अशा वेळी संघ परिवारातील माजी लोहपुरुष माननीय लालकृष्ण अडवाणी व त्यांचा जावई असलेला भाजपचा अल्पसंख्य चेहरा श्री. शहानवाज खान ह्यांच्या तसविरींची वाजतगाजत मिरवणूक काढणे व अंतरधर्मीय विवाहांना आपल्या कुटुंबात स्थान दिल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करणे असा कार्यक्रम घेणे सेक्युलर मंडळीना शक्य होते.(त्यात शर्मिला पतौडी, सैफअली- करीना, सुनील दत्त नर्गीस ह्यांच्या तस्वीरीही लावल्या असत्या, तर नव्या-जुन्या चित्रपट शौकिनांचा पाठिंबाही त्यांना मिळाला असता.)

आताही विचार व प्रतिमांच्या सरमिसळीचा खेळ संघ परिवार खुबीने खेळतो आहे. सत्तेवर आल्यानंतरचे मोदीही निवडणूक पूर्व मोदींची ‘स्किझोफ्रेनिक’ आवृत्ती म्हणावी लागेल, इतक्या त्या दोन्ही मोदींच्या प्रतिमा वेगळ्याच नव्हे, तर चक्क परस्परविरोधी आहेत. नवे मोदी चीन-पाकिस्तानला धमकावीत नाहीत. ग्रामसफाई व मुस्लिमांचे राष्ट्रप्रेम ह्याविषयी आवर्जून बोलतात. पण त्याच वेळी ‘लव्ह जिहाद’चा प्रचार किंवा उ.प्र. च्या निवडणुकी डोळ्या समोर ठेवून खेळला जाणारा दंगलींचा खेळ ह्याविषयी तेअवाक्षरही उच्चारत नाहीत. गांधींचे नाव घेताना विकासाच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांना संपविण्याचे राजकारण करण्यास ते कचरत नाहीत. भाजप राज्यावर आल्यावर घडलेल्या काही घटना खाली दिल्या आहेत, त्यात तुम्हाला काही सुसंगती आढळते का हे पहा-

मंगळावर यान पाठविणे, गुजरातच्या शाळांमधून दिनानाथ बात्रांच्या भाकड पुराणकथांना पाठ्यपुस्तकांचा दर्जा देणे, ‘साईबाबा हे देव नाहीत, ते मुस्लिम होते व म्हणून त्यांची पूजा बंद करा’ असे फतवे धर्म संसदेने काढणे (अशी काही संस्था आहे व ती हिंदूंच्या धर्माचरणाचे नियोजन करते असे ह्यापूर्वी कोणाला माहीत तरी होते का?), विकासाच्या कामासाठी देशातील शेतजमीन ताब्यात घेणे सुलभ व्हावे, म्हणून उरलेसुरले कायदेशीर अडसर तातडीने दूर करणे, हिंदीच्या सार्वत्रिक वापराचा आग्रह धरणे इ. इ.

भारतीय परंपरेचा संघप्रणीत अर्थ खरे तर असा अर्थ लावणे ही फार कठीण बाब नाही. मात्र त्यासाठी मागील लेखात दिलेल्या पूर्वपीठिकेच्या संदर्भात संघ काय आहे, हे नीट समजून घ्यावे लागेल. इंग्रजांनी भारत ताब्यात घेऊन येथे आपला जम बसवल्यानंतर येथील समाजातील विविध घटकांनी त्या परिस्थितीचा वेगवेगळा अर्थ लावला. आंग्लविद्याभूषित अभिजनांतील एक वर्ग आपल्या समाजातील अन्याय्य रूढी-परंपरांविषयी सचेत होऊन विचार करू लागला. आपले दास्य हे आपल्या सामाजिक मागासलेपणातून उद्भवले आहे, असे मानणारा वर्ग सामाजिक सुधारणा करण्यासाठी कार्यरत झाला. ह्याउलट ज्यांच्याकडून इंग्रजांनी राज्य ताब्यात घेतले, अशा एकेकाळच्या राज्यकर्त्या वर्गातील एक गट पुनरुज्जीवनवादी बनला, ज्यातून पुढे मुस्लीम लीग व रा. स्व. संघ जन्माला आले. ‘आमची परंपरा थोर आहे. गोऱ्या साहेबाने येऊन ती भ्रष्ट किंवा नष्ट केली. म्हणून पुन्हा एकदा त्याला हाकून लावून आपल्या राज्याची पुनर्स्थापना करणे हे आपले परम कर्तव्य आहे’, असे ह्या समूहांना वाटले. ह्यापैकी हिंदू पुनरुज्जीवनवादी आपली नाळ पेशवाई, तसेच १८५७ च्या समरातील नानासाहेब पेशवे, तात्या टोपे इ. मंडळींशी जोडत असत. उच्च जातीत जन्मल्यामुळे येथील सामाजिक विषमता, त्यामुळे जातीजातींत विभागलेला समाज, अंधश्रद्धा व कमालीची रूढीप्रियता ह्या बाबी आपल्या सद्यस्थितीला जबाबदार आहेत, असे ह्या वर्गाला वाटले नाही. उलट आपली समाजरचना, संस्कृती हे सर्वश्रेष्ठच आहे, असा त्याचा दृढ विश्वास होता. अर्थात, एव्हढा महान समाज इंग्रजांसमोर पराभूत कसा झाला, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे त्याला भाग होते. तेव्हा त्याने एक साधे सोपे उत्तर शोधले- ते म्हणजे – ‘परधर्मीयांचा प्रभाव’. पूर्वी सारे काही आलबेल (ऑल इज वेल?) होते. येथे सोन्याचा धूर निघत होता. स्त्रिया वेद लिहीत होत्या. रस्त्यावरून अनश्व रथ व आकाशातून पुष्पक विमाने विहरत होती, ज्ञानविज्ञानात आम्ही प्रगती केली होती. पण हे म्लेंच्छ आले! त्यांच्या रानटीपणापासून बचाव व्हावा म्हणून आमच्या स्त्रिया गोषात गेल्या. आम्हाला आमचे ज्ञान दडवून ठेवावे लागले. असा सोयीस्कर युक्तिवाद पुढे आला. शिवाय मुळात आम्ही क्षात्रतेजमंडित होतो. पण बौद्ध धर्माने आम्हाला ‘हतवीर्य’ केले. आम्ही ‘ठोशास ठोसा’ देणारे होतो, पण ह्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने आमचे नुकसान झाले, अशीही मखलाशी करण्यात आली. ह्यात सर्वांत कळीचा मुद्दा होता- ‘आम्ही म्हणजे कोण?’ ह्यात ‘आम्ही’ म्हणजे पूर्वीचे सत्ताधीश, म्हणजेच समाजातील उच्चजातीय अभिजन असेच अनुस्युत होते. पुनरुज्जीवन कशाच्या आधारावर करायचे, ह्या प्रश्नाचेही हेच उत्तर होते. हिंदू राष्ट्रवाद्यांची जीवनदृष्टी जी उच्च वर्ग-जातीय आहे, त्यामागील हा इतिहास आहे.

परधर्मियांचा द्वेष: धार्मिक राष्ट्रवादाची गरज पण इंग्रजांच्या विरोधात सारा समाज उभा करायचा, तर मग ‘आम्ही’ अधिक व्यापक करणे अपरिहार्य होते. इंग्रजांविरुद्ध कोणी लढायचे? जो थोर वारसा आम्हाला पुनरुज्जीवित करायचा आहे, तो मुळात कोणाचा? आमचे राज्य म्हणजे कोणाचे राज्य ? ह्या प्रश्नाला उत्तर पुरविले तेही इंग्रजांनी. मागील लेखात आपण पाहिले की इंग्रजांच्या आगमनापूर्वी ह्या देशात कोणीच हिंदू नव्हता – होत्या त्या असंख्य जाती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी इंग्रजांनी त्याला नाव दिले- ‘हिंदू’- जे मुसलमान किंवा ख्रिश्चन नाहीत ते सारे ‘हिंदू’. खरे तर येथील भटके विमुक्त, आदिवासी, म्हणजे गावगाड्यापासून मुक्त समाजघटक हे चालीरीती, देवदेवता, उपासनापद्धती ह्या कोणत्याही बाबतीत सवर्ण हिंदूंसारखे नव्हते. पण त्यांना अशी ओळख देण्यात आली. त्याचबरोबर १८५७ च्या फसलेल्या बंडामुळे सावध झालेल्या इंग्रजांनी जाणीवपूर्वक ह्या दोन्ही समाजगटांमध्ये वैमनस्य पसरविले, ‘फोडा आणि झोडा’ नीती वापरली. पण त्यामुळे लाभ झाला हिंदू पुनरुज्जीवनवाद्यांना. त्यांना स्वतःची एक ओळख मिळाली व त्याचबरोबर एक शत्रूही. ‘आपण सारे हिंदू व आपले शत्रू म्हणजे मुसलमान (व थोड्या प्रमाणात ख्रिश्चन)’ असे समीकरण निर्माण झाले. म्हणजे हिंदुत्वाची निर्मितीच मुस्लिमद्वेषाच्या पायावर झाली आहे.

अर्थात ही प्रक्रिया दोन्ही अंगांनी चालली. उत्तर भारतातील मुस्लिम राज्यकर्ते देखील सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ होते. त्यांनाही त्यांचा वैभवशाली भूतकाळ (जो फार पलिकडचा नव्हता) खुणावत होता. त्यांनीही मुस्लिम पुनरुज्जीवनवादाची कास धरली. ‘हिंदू आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत’ असे मुसलमानांना सांगणे ही त्यांची गरज बनली. म्हणजे हिंदू राष्ट्रवाद व मुस्लिम राष्ट्रवाद दोघेही परस्परांच्या आधाराने, परस्परांना पुष्ट करत ह्या देशात उभे राहिले. त्यांचे राजकारणच नव्हे, तर अवघे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे, कारण दुसऱ्याचा द्वेष हीच पहिल्याच्या अस्तित्वाची निजखूण आहे. हिंदुराष्ट्रवादाचे जनक सावरकर व मुस्लिम राष्ट्रनिर्माते जिना ह्या दोघांचे व्यक्तिमत्व, राजकारण, आधुनिकतेचा आग्रह ह्यात कमालीचे साम्य आहे! हिंदुत्वनिष्ठांनी लिहिलेला भारताचा इतिहास व पाकिस्तानातील इतिहासाची पाठ्यपुस्तके ह्या परस्परांच्या आरशातील प्रतिमाच होत. हिंदुत्वनिष्ठांच्या पुस्तकांतील इतिहासात संस्कृतीचे निर्माते म्हणजे हिंदू व मुस्लिम म्हणजे फक्त लुटारू असे वर्णन असते, तर पाकिस्तानातील पुस्तकांत ह्याचा व्यत्यास मांडलेला असतो. ही दोन उदाहरणे हिंदू व मुस्लिम राष्ट्रावादातील साम्य व त्यांचे परस्परपूरकत्व सिद्ध करण्यास पुरेशी आहेत.

हिंदू राष्ट्रवाद व मुस्लिम राष्ट्रवाद ह्या दोन्हीच्या बाबतीत आणखी एक बाब समान आहे. दोन्ही विचारधारांचे पुरस्कर्ते जरी परंपरावादी असले, तरी त्यांचे नेतृत्व आंग्लविद्याविभूषित वर्गाने केले. दोन्ही नेतृत्वांना असे वाटत होते की त्यांच्या समाजाची अवनती इंग्रजांच्या तुलनेत त्यांची ‘मर्दानगी’ कमी पडल्यामुळे झाली आहे. त्यामुळे इंग्रजांप्रमाणे बलशाली होणे, आपल्या स्त्रैण समाजात पुन्हा मर्दानगी जगविणे, हे त्यांना महत्त्वाचे वाटले. संघात स्त्रियांना स्थान नसणे, राष्ट्र सेविका समिती किंवा दुर्गा वाहिनीची भूमिका संघ परिवारातील अन्य संघटनांच्या तुलनेत दुय्यम असणे, संघाचा राम ‘सीतापतिं सुंदरम्, करुणार्णव, गुणनिधि नसून सीतेशिवायचा, आक्रमक, स्टीरॉईडसभक्षी वाटावा इतका बलदंड असा असणे, ह्यामागील कारणमीमांसा अशी आहे.

बाहुबलावर अतिरिक्त विश्वास, तसेच ‘हतवीर्य’ होण्याची भीती ह्या दोन गोष्टी हिंदू राष्ट्रवाद व त्याचा वाहक रा. स्व. संघ ह्यांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. सामर्थ्य म्हणजे काय, पुरुषार्थ काय आहे, ह्याबद्दल भारतीय तत्त्वपरंपरेत बरेच चिंतन केले गेले आहे. हिंदू दर्शनांनीही ह्या प्रश्नांचा सखोल विचार केला आहे. पण गम्मत अशी की त्यापैकी कोणीही बाहुबल, म्हणजेच व्यापक अर्थाने शस्त्रबलाला महत्त्व दिले नाही. तिथे सारा भर आहे तो मनोबलावर, मनाच्या कुरुक्षेत्रावर रंगणाऱ्या षड्रिपूंविरुद्धच्या सामन्यावर. दुसरीकडे संघाचा भर मात्र नेहमीच शक्तिसंपादनावर राहिला आहे. आजही भारत मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत तळाचे स्थान गाठण्यात मागास आफ्रिकन देशांशी स्पर्धा करीत असताना, संघ परिवार व मोदी सरकार मात्र भारताला सुपर पॉवर बनविण्याच्या गोष्टी करतात; ह्यावरून त्यांची बलाची व्याख्या लक्षात येते.

हिंदू धर्म विरुद्ध हिंदुत्व हे शीर्षक पाहून वाचक बुचकळ्यात पडतील. हिंदू तत्त्वज्ञान व संघप्रणीत हिंदुत्व ह्या मुळात वेगळ्या बाबी आहेत की काय?

आपण शांतपणे विचार केला तर आपल्या ध्यानात येईल की ह्या केवळ भिन्नच नव्हेत, तर परस्परविरोधी संकल्पना आहेत. म्हणजे संघाला खऱ्या हिंदुधर्माचे पुनरुत्थान करावयाचे नाही, तर त्या नावाखाली वेगळ्याच धर्माला जन्म द्यायचा आहे. ज्याचा आत्मा हिंदू धर्माच्या प्राणतत्त्वाशी पूर्णतः विसंगत आहे, अशा धर्माला. मी वाचकांना आवाहन करतो, की त्यांनी माझ्या किंवा कोणत्याही लहानमोठ्या माणसाच्या मांडणीवर विश्वास ठेवू नये. त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे की हिंदुधर्माचा गाभा काय आहे, म्हणजे हिंदुत्व व हिंदुधर्म ह्यातील साम्य-फरक त्यांच्याच ध्यानात येईल.

हिंदू हा मुळात धर्म नव्हताच, हे आपण पूर्वीच पहिले. पण शेकडो वर्षांपासून भारतात अस्तित्वात असलेल्या ह्या विविध जाती-जमाती-पंथांच्या कडबोळ्याला काहीतरी नाव द्यायचे, म्हणून त्याला ‘हिंदू’ म्हटले गेले. त्याची व्या’या करणे खूप कठीण आहे. त्यात शेकडो देव-देवता-अवतार- पूजा पद्धती. ढीगभर तत्त्वज्ञाने, तीही परस्परविरोधी. समान बाब एकच- श्रम व श्रमिकांचे विभाजन करणारी जातिव्यवस्था. अशा धर्माचे थोडक्यात वर्णन करायचे तर त्यासाठी भालचंद्र नेमाडे ह्यांचे शब्द उसने घ्यावे लागतील- ‘हिंदू धर्म एक समृद्ध अडगळ.

त्यात फेकून द्यावे असे बरेच काही आहे, पण कशाचाही त्याग न करता, येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेत पुढे चाललेल्या प्रवाहाचे नाव आहे हिंदुधर्म. सर्वसमावेशकत्व हे त्याचे मर्मस्थान व तेच त्याचे शक्तिस्थानही. त्यामुळे त्यात द्वैतवादी आहेत, तसेच अद्वैतीही; वेद मानणारे आहेत, तसेच वेदांत समर्थकही . त्यापलिकडे जाऊन देव आहे की नाही ह्याविषयी साशंक असलेले अज्ञेयवादी व ईश्वराची संकल्पनाचना कारणारे जडवादी ह्या सर्वांना हिंदू त्यात स्थान आहे. असा हा हिंदुधर्म, गेली अनेक शतके, अनेक आक्रमणे पचवूनही टिकून राहिला, ह्याचे श्रेय त्याच्या ह्या लवचिकपणाला आहे. कारण ग्रीक, शक, कुशाण, हूण, मोगल, इंग्रज ह्या साऱ्यांना येथील रणभूमीवर यश मिळाले, येथे तळ ठोकता आला. पण कोणालाच ह्या आकारहीन धर्माला नष्ट करता आले नाही. हा धर्म केवळ टिकून राहिला नाही, तर स्थलकालपरिस्थितीनुसार बदलता गेला. हे बदल सहजासहजी झाले नाहीत, होत नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, मीरा ह्यांच्यापासून ते फुले, आगरकर, आंबेडकर व थेट दाभोलकर ह्यांना काय सहन करावे लागले ह्यावरून माझे म्हणणे स्पष्ट होईल. पण मुद्दा आहे तो हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या सर्वसमावेशकतेचा, ईश्वर किंवा प्रेषित ह्यांचे आदेश पालन करण्याचे बंधन नसण्याचा. हिंदू राष्ट्रवाद्यांना सुरुवातीपासून खटकते ती नेमकी हीच बाब . कारण त्यांच्या तथाकथित धर्मप्रेमामागे दडलाय तो स्वतःच्या धर्माबद्दल वाटणारा न्यूनगंड. त्यांचे इंग्रजांशी असलेले नाते विरोधभक्तीचे होते. त्यांना मनातून इंग्रज (ख्रिश्चन) परंपरा, सभ्यता ह्यांचे आकर्षण होते. आपण ‘त्यांच्यासारखे’ बलवान, पुरुषी व्हायला हवे, म्हणजे आपण मुसलमानांना ‘पुरून उरू’, असे त्यांना वाटत आले आहे. कारण सरतेशेवटी, त्यांच्यासमोर प्रतिमान आहे ते मुस्लिम, ख्रिश्चन ह्या एकेश्वरी पंथांचे. एकाच देवाला पुजणारा, ठरलेल्या दिवशी देवळात जाऊन ठराविक पद्धतीने उपासना करणारा पंथहा त्यांचा आदर्श आहे. त्यातही मुस्लिमांचा कडवेपणा व ख्रिश्चन चर्चची चिरेबंदी रचना ह्यांचे तर त्यांना विशेष आकर्षण आहे. म्हणून संघाने आधी स्वयंसेवकांना युरोपमधील अर्धसैनिकी दलाचा खाकी हाफपँट-शर्टचा गणवेश दिला, त्यांना धोतर किंवा लुंगी नेसायला लावली नाही. ‘एक धर्म, एक ध्वज, एक गणवेश, एक भाषा’ अशा एकजिनसीपणाचे संघाला अतीव आकर्षण आहे. एकचालकानुवर्तित्व हाही त्याच भावनेचा आविष्कार. हिंदूमहासभा आणि रा. स्व. सं. ह्या दोन्ही संघटनांचे जन्मस्थळ महाराष्ट्र असले तरी हिंदू राष्ट्रवादाच्या पहिल्या पुरस्कर्त्यांमध्ये उत्तर भारतीय व्यक्ती-संघटना मोठ्या प्रमाणावर होत्या. म्हणूनच ‘हिंदी हिंदू-हिंदुस्थान’ हे संघाचे सुरुवातीपासून घोषवाक्य राहिले आहे. हिंदी म्हणजे संस्कृताधिष्ठित हिंदी; उर्दूच्या संसर्गाने ‘विटाळलेली’ हिंदुस्तानी नव्हे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

संघाचा अजेंडा स्पष्ट आजच्या घडीला भारतात सुस्पष्ट अजेंडा कार्यक्रमपत्रिका असणारी एकमेव राजकीय शक्ती संघपरिवार हीच आहे. २०१४ च्या मोदी विजयामागे मोदींच्या व्यक्तित्वाचे वलय, त्याचे निवडणूक प्रचारात करण्यात आलेले उत्तम मार्केटिंग, काँग्रेसची ‘रणछोडदासी’ वृत्ती व त्याविरुद्ध मोदींची आक्रमक शैली अशी अनेक तात्कालिक कारणे असली, तरी गेली ७९ वर्षे संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी निरलसपणे ह्या ‘सोनियाच्या दिवसासाठी’ उपसलेले कष्ट हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे, हे आपण विसरून चालणार नाही. ह्यातील बहुतेक काळ संघ हा उपहासाचा विषय होता. सत्तेवर असण्याचे लाभ संघ कार्यकर्त्यांना मिळत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेगाने बदलत्या परिस्थितीत आपल्या धोरणांमध्ये यथायोग्य बदल करत, पण ध्येयाविषयी ठाम राहून संघाने हे मार्गक्रमण केले आहे. ह्या काळात दोन महायुद्धे, देशाचा स्वातंत्र्यलढा, फाळणी, स्वातंत्र्य, चीन-पाकिस्तान सोबतची युद्धे, कम्युनिझमचा अस्त व अमेरिकेची जगावरील वाढती दादागिरी, जागतिकीकरण – अशी कितीतरी महत्वाची स्थित्यंतरे व युगान्तरे घडली. गांधीवादै, समाजवाद, साम्यवाद प्रभावहीन झाले. काँग्रेसचा सूर्य अस्ताचलाला टेकला. संघ कालबाह्य झाल्याचा पुकारा अनेकदा झाला, पण संघ ह्या साऱ्या गदारोळात टिकून राहिला, नव्हे झपाट्याने वाढला. संघाने जीवनाच्या किती क्षेत्रांना कवेत घेतले आहे, ह्याच्या खाणाखुणा आता हळूहळू दिसतीलच. पण संघाच्या वाटचालीचा आढावा घेताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. गेल्या ८० वर्षात देशातील बहुतेक सर्व पक्ष, संस्था, संघटना तुटल्या किंवा नष्ट झाल्या; अपवाद फक्त संघ परिवार व त्याच्याशी संलग्न संस्था-संघटना. काँग्रेसचे दोन तुकडे आधी इंदिरा गांधीनी केले, त्यानंतर केंद्रीय पातळीवर ती एकसंध दिसत असली, तरी राज्यांच्या पातळीवर तिच्यात अनेकदा फूट पडली. काँग्रेस व समाजवादी पक्ष ह्यांच्या इतक्या चिरफळ्या उडाल्या आहेत की त्याचा हिशेब ठेवणे कठीण. आंबेडकरवादाला बरे दिवस आले असले, तरी आंबेडकरवादी भ्रातृघातात कम्युनिस्ट व समाजवाद्यांना सहज मात देतील, अशी परिस्थिती आहे. ह्या पार्श्वभूमीवर संघाचे यश डोळ्यात भरण्यासारखे आहे, ह्यात शंका नाही. संघावर सतत टीका होत होती, त्यातून संघ शिकला व त्याने आपल्या त्रुटी दूर केल्या. पहिली ५०-६० वर्षे शेटजी-भटजींचा पक्ष हीच ओळख असलेल्या संघाने आणीबाणीत खरेच आत्मचिंतन केले व कात टाकली. मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या संघाने त्यानंतरच्या काळात ओबीसींमध्ये मुळे रुजविली. आंबेडकरांच्या विचारांशी शत्रुत्व असलेल्या संघाने कामापुरते बाबासाहेब आत्मसात केले, गांधी- आंबेडकर द्वंद्वाचा संदर्भ देत ‘दलितांचे खरे शत्रू गांधी’ असे दलितांच्या मनात बिंबविले. एकीकडे दसरा संचालनाचे शक्तिप्रदर्शन, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्य, तर दुसरीकडे आदिवासी, साहित्य-संस्कृती, विविध व्यावसायिक, ग्राहक इ. मध्ये गाजावाजा न करता पद्धतशीरपणे चालू ठेवलेला आपल्या विचारांचा प्रचार- प्रसार ह्यांतून, मुख्य म्हणजे सातत्याने व विचारांवर निष्ठा ठेवून केलेले कार्य, ह्यामुळेच संघाला हे यश मिळाले आहे. एकच प्रचार जाणीवपूर्वक व सातत्याने केल्यास तो लोक कसा आत्मसात करतात, ह्याचे धडे घ्यावे ते संघाकडून. ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ ह्या त्यांच्या मूलभूत समीकरणातच गडबड असली, तरीही लोकांना त्याबद्दल फारसे प्रश्न पडू नयेत, इतपत देशाची विवेकशीलता बधिर करण्यात संघाला यश आले आहे. ‘वास्तव काय असते हे अनेकदा महत्त्वाचे नसते; लोकांना ते कसे भासते हे महत्त्वाचे’ ह्या प्रमेयावर संघाची श्रद्धा आहे. त्यामुळे भारताच्या फाळणीवर अनेक महत्त्वाचे दस्तऐवज वेळोवेळी प्रकाशित होत असताना व त्यातून तिची ऐतिहासिक अपरिहार्यता व गांधींची विवशता अधोरेखित होत असतानादेखील त्यांची ‘फाळणीचे गुन्हेगार’ अशी प्रतिमा जनमानसात ठसविण्यात संघ यशस्वी झाला आहे. स्वातंत्र्य संग्रामात कुठेच नसलेला संघ आज स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व केल्याच्या थाटात वावरतो आहे. संघाला मिळालेले हे यश कितपत टिकेल, विकासाचे गाजर दाखवून बहुसंख्य जनतेला विस्थापित व नैसर्गिक संसाधनापासून बेदखल करण्याची काय किंमत चुकवावी लागेल, हे पुढचे प्रश्न झाले. आज तरी संघाचा रथ वेगाने निघाला आहे व रस्त्यात येणारा प्रत्येक अडथळा तोडून तो पुढे जाणार, असेच चित्र आहे. कारण सन १९२५ असो की २०१४, सरकार नेहरू-इंदिरेचे असो, मोरारजी- चन्द्रशेखरांचे असो की वाजपेयी अडवाणींचे. ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ निर्मिण्याच्या आपल्या प्रतिज्ञेपासून संघ कधीच ढळला नाही. संघ बदलला, सुधारला, त्याचा भगवा रंग फिका झाला इ. साक्षात्कार इतरांना घडले, ते संघाने घडविले, पण त्यांच्या नजरेसमोर ‘लाल किल्ल्यावर भगवा ध्वज’ हेच ध्येय होते. आजही त्या ध्येयापासून किंवा अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नापासून संघ विचलित झालेला नाही. मात्र ते स्वप्न (बहुसंख्यांसाठी दुःस्वप्न) अजून दूर आहे. कारण ह्या देशातील संस्कृती इतकी बहुविध, संमिश्र व समृद्ध आहे, की तिच्या ताण्याबाण्यातून हिंदू व मुस्लिम धागे वेगळे काढणे म्हणजे प्रयागच्या संगमानंतर गंगा-यमुनेचे प्रवाह पुन्हा वेगवेगळे करणेच होय. हे अनैतिहासिक, निसर्गविरोधी काम करण्यासाठी संघ परिवार कोणत्या क्लृप्त्या लढवीत आहे व ते निष्फळ ठरविण्यासाठी काय करता येईल ह्याचा आढावा पुढच्या व अंतिम लेखांकात घेऊ.

पत्ता : ‘अमलताश’, प्रहार शाळेसमोर, बँक ऑफ इंडिया कॉलनी, नालवाडी, वर्धा ४४२००१ चलभाष : ९८३३३४६५३४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.