औरस- अनौरसत्व, जनुकशास्त्र वगैरे…

(औरस-अनौरसाचा जगाच्या प्रारंभापासून नसला तरी तो खूप खूप जुना आहे. आणि फक्त भारतातच नाही, तर जगात सर्वत्र आहे. हा गुण करणाऱ्यांना चिकटत नाही, निरागस, नवजात अर्भकाला मात्र चिकटतो. एका नोबेल विजेत्याने आपल्या जन्माची कहाणी कशी उघड करून सांगितली आहे, ते पहा. अशी गोष्ट एखाद्याच्या बाबतीत घडावी ह्यात काहीच आश्चर्य नाही. वर म्हटल्याप्रमाणे असे खूप खूप पूर्वीपासून होतच आले आहे. आश्चर्य आहे ते त्याने ती एवढी मोकळेपणाने सांगावी ह्याचे. पॉल नर्स ह्यांना त्यांच्या जन्माची गोष्ट तशी कर्मधर्मसंयोगानेच कळली. तेव्हा तर त्यांना धक्का बसलाच. पण नंतर त्यांनी ती स्वीकारली आणि कुणाही बद्दल कटुता न बाळगता ती पचवलीसुद्धा. नकोसेपणाचे जोखड फेकून देऊन आपल्या विषयात खूप प्रगती त्यांना करता आली. द गार्डियन ९ ऑगस्ट २०१४ वरून अनुवादित, संपादित, साभार. कार्य. संपा.)

मी एक जनुकतज्ज्ञ. विभागलेल्या पेशींमधील गुणसूत्रे कशी पुढील पिढीकडे सोपवली जातात त्याचा अभ्यास करतो. पण माझी स्वतःची गोष्ट मात्र माझ्याच जनुकशास्त्राशी संबंधित आहे. मी इंग्रज आहे. १९५० व १९६० च्या दशकात लंडनमध्ये माझा मी लहानाचा मोठा झालो. मी काही धनवान कुटुंबात जन्माला आलो नव्हतो. मला दोन भाऊ आणि एक बहीण अशी तीन भावंडे होती. माझे वडील साधे कामगार होते. आई सफाई कामगार होती. माझ्या सर्व भावंडांनी १५ वर्षांचे असताना शाळा सोडली. मी मात्र वेगळा होतो. मी परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि मोठ्या कष्टानेच, विद्यापीठात दाखल झालो. पुढे मी शिष्यवृत्ती मिळवली आणि पीएच्डीही केली. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा वेगळा का आहे हा प्रश्न मला नेहमी सतावत असे. मला त्याचे उत्तर कधीच सापडले नाही. हा विचार मनाच्या एका कोपऱ्यात ठसठसत असला, तरी मी आपला पुढे जात राहिलो. मला विद्यापीठात नोकरी मिळाली. माझा विवाह झाला. मला एमिली व सारा अशी दोन अपत्येही झाली. आणि तुम्हाला काय सांगू, त्यानंतर जे काही घडले ते…..

माझे आईवडील निवृत्त होऊन गावात स्थायिक झाले. आम्ही त्यांना नियमितपणे भेटत असू. एकदा असेच आम्ही त्यांना भेटायला गेलो असताना साराने माझ्या अकरा वर्षांच्या मुलीने शाळेतील तिच्या एका प्रकल्पाबद्दल सांगितले. तिला त्यामध्ये वंशवृक्ष काढून द्यायचा होता. मी म्हटले, त्याबद्दल तू तुझ्या आजीशीच का बोलत नाहीस? मग ती आजीकडे गेली. पाच मिनिटांनी आई जेव्हा आली, तेव्हा ती पांढरीफटक पडली होती. ती म्हणाली, सारा मला वंशवृक्षाबद्दल विचारत होती. खरे तर मला तुला काहीतरी सांगायचे आहे, जे मी तुला आजवर कधीच सांगितलेले नाही. तेव्हा मी माझ्या तिशीत होतो. ती म्हणाली, “मी तुला कधीच सांगितले नाही, की मी अनौरस आहे.

‘ तिचा जन्म १९१० सालचा. तिच्या आईचा विवाह झाला नव्हता. तो एका भिक्षागृहात झाला. तिच्या आजीने तिचा प्रतिपाळ केला. तिच्या आईने अन्य कोणाशी विवाह केला होता, ज्याला मी माझा आजा मानीत असे, परंतु ते तसे नव्हते. माझे आजोबा कोण ते माहीत नव्हते. मी आजोबा गमावले होते. “आणि तुझ्या बापाचीही तीच कथा आहे.” ती पुढे म्हणाली. अशा रीतीने दोन वाक्यांत मी माझे दोन आजोबा गमावले. मला चांगलाच धक्का बसला. मला असे वाटले की कदाचित त्यामुळेच माझ्यामध्ये काही वेगळी जनुके आली असतील, जी एकत्र झाल्यामुळे मी माझ्या कुटुंबापासून काहीसा वेगळा बनलो असेन. त्यानंतर मला आठवले की माझे मधले नाव मॅक्झिम असे आहे, जे मला माझ्या वडिलांकडून मिळाले आहे. त्यांचे नाव मॅक्झिमं विल्यम जॉन असे होते. ते नॉरफोल्क येथे शेतकरी होते. वास्तविक हे फ्रेंच-रशियन सरदार घराण्यातले असावे तसे नाव आहे. मग मला असे वाटू लागले की मला एक आगळे आजोबा होते आणि माझे वडील फ्रेंच- रशियन सरदार घराण्यातले होते, म्हणून मी असा (वेगळा ) बनलो असेन.

ह्या स्पष्टीकरणाने माझे समाधान झाले. “मग ठीक आहे तर.” मी मनाशी म्हटले. माझे काम, करियर पुढे चालू ठेवले. त्यात मी प्रगती केली व पुढे ऑक्सफोर्ड येथे प्रोफेसर झालो. त्यानंतर विभागप्रमुखही. मला नाइटहुड हा मोठा सन्मान मिळाला. तर अशी सगळी गंमत जंमत आहे. इ. स. २००३ मध्ये मी न्यूयॉर्क शहरात जाण्याचे ठरवले. माझे आईवडील दोघेही तेव्हा मृत्यू पावले होते. मी रॉकफेलर विद्यापीठाचा अध्यक्ष म्हणून रुजू झालो. त्यापूर्वी एकदा, ग्रीन कार्ड घेण्याचा विचार माझ्या मनात आला होता. मी प्रयत्न सुरू केला. खंडीभर कागद. नमुने. हे भरा, ते भरा, कागदपत्रे जोडा, फोटो चिकटवा. न संपणारे, कंटाळवाणे काम. शेवटी एकदाचे ते सर्व पूर्ण करून पाठवले. त्यानंतर अनेक महिने मी वाट पाहिली. मग त्यांचे उत्तर आले माझी निवड झाली नव्हती.

मला वाटले, असे कसे झाले मी तर नाईटहूड सन्मान प्राप्त, नोबेल पुरस्कार विजेता माणूस आहे. रॉकफेलर विद्यापीठाचा अध्यक्ष आहे मी. काय बरे झाले असेल तर असा विचार करताना, मी पाठविलेली कागदपत्रे त्यांना पसंत पडली नसल्याचे मला आढळून आले. विशेषतः माझे जन्म प्रमाणपत्र. ते मी काढून पाहिले, तर ते अगदीच त्रोटक प्रमाणपत्र होते. तुम्ही कोण आहात, तुमचा जन्म कुठे, केव्हा, व किती वाजता झाला, तुमचे नागरिकत्व, आणखी बरेच बरेच काही. ‘त्यामध्ये तुमच्या आईवडिलांचे नाव नाही.’ अशी त्यांनी हरकत घेतली होती. मी विचार केला, ‘त्यात काय मोठेसे?’ मी ते मोठे प्रमाणपत्र सादर करतो. नोंदणी कार्यालयाकडे असेलच ते. मी लंडनला त्या कार्यालयाकडे फोन लावला. ते प्रमाणपत्र टपालाने ताबडतोब पाठवावे म्हणून. मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले, की ते प्रमाणपत्र इकडे पोहोचल्यावर ग्रीन कार्डवाल्या मूर्खाकडे ते पाठवून दे.

दोन आठवड्यांसाठी मी सुटीवर गेलो होतो. परत आल्यावर मी तिला विचारले, तू ते काम पूर्ण केलेस का? तेव्हा माझ्याकडे वळून पाहून ती म्हणाली, मी ते पाठवले नाही, कारण ते आपल्याकडे आल्यावर मी उघडून पाहिले तर मला वाटले, की त्यातील तुमच्या आईचे नाव कदाचित चुकीचे टाकलेले आहे.

मी ताडकन म्हणालो, अरे, असे तर शक्यच नाही. काहीच्या काही नको बोलू. त्यावर तिने ते माझ्या हातात दिले. सगळे जण माझ्याकडे पाहू लागले. त्यामध्ये माझ्या आईचे नाव नर्स हे तर होतेच. मी हुश्श केले. मी पुन्हा त्याकडे बारकाईने पाहिले, तर ते नाव होते, मिरियम नर्स.

मग मात्र मी एक दीर्घ उसासा सोडला. नक्कीच हे माझ्या आईचे नाव नव्हते. नोंदणी कार्यालयातील लोकांनी पुन्हा काहीतरी घोटाळा केला बहुतेक. जेव्हा मी फिरून त्यावर नजर टाकली, तेव्हा आणखी एक गोष्ट मला आढळून आली. ‘वडिलांचे नाव’ चा रकाना कोरा होता. तेथे फक्त एक आडवी रेघ काढली होती. वडील – इल्ले. माझी पत्नी मला विचारते, पॉल, ह्याचा अर्थ कळतो का तुला? पण माझ्या डोक्यात लवकर काही प्रकाश पडेना. मी खाली बसलो, दोन घोट पाणी प्यालो आणि एक मोठा श्वास घेतला. पुन्हा एकदा कल्पनाशक्ती व तिची बहीण स्मरणशक्ती दोघींना ताण दिला. मग मात्र संभ्रमाचे ढग हळूहळू दूर होऊ लागले. एकदाचा लख्ख प्रकाश पडला. माझी सर्वात मोठी बहीण मिरियम ही माझ्यापेक्षा अठरा वर्षे एक महिन्याने मोठी होती. माझे आईवडील, जे आता माझे आजीआजोबा बनले होते, ते कधीच इहलोक सोडून गेले होते. तशीच मी बहीण मानलेली माझी खरी आईदेखील. स्क्लेरॉसिसच्या आजाराने ती तर लवकरच मृत्यू पावली होती. मग आता ही कथा खरी की खोटी ते मी कुणाला विचारणार?

थोडा विचार केल्यावर एक युक्ती सुचली. प्रमाणपत्रावर माझे जन्मस्थान नॉरविच असे नोंदविले होते. तिथे माझी मावशी आजी रहायची. तिची मुलगी माझी मावशी, जी माझ्या जन्माच्या वेळी अकरा वर्षांची होती, ती अजून हयात होती. तिला मी फोन लावला. तुला ह्याबद्दल काही माहीत आहे का? म्हणून विचारले. ती म्हणाली होय. मग तिने मला खरी गोष्ट कथन केली. तुझ्या ताईला ती सतरा वर्षांची असतानाच दिवस राहिले. मग तिला तिच्या मावशीकडे नॉरविचला पाठविण्यात आले. हे म्हणजे अगदी डिकन्सच्या कादंबरीसारखेच झाले, नाही का? तर तिथे तिने तुला जन्म दिला. नंतर तिची आई, म्हणजे तुझी आजी, हिने ते मूल स्वतःचे असल्याचा बनाव निर्माण केला. तिने प्रथम तुझ्या आईला घरी परत पाठविले व नंतर बऱ्याच महिन्यांनी ती आपले मूल म्हणून तुला घेऊन घरी परत गेली.

त्यानंतर अडीच वर्षे आम्ही त्या दोन खोल्यांच्या लहानशा घरात एकत्र राहिलो. आणि मग माझी खरी आई लग्न करून त्या घरातून निघून गेली. तिच्या लग्नातला माझा एक फोटोदेखील आहे. माझ्या आईने एक हात तिच्या पतीच्या हातात दिला असून दुसऱ्या हाताने मला घट्ट धरले आहे, असा तो फोटो. जणू काही ती मला तिच्या आईवडिलांजवळ कायमचे सोडून जाणार असल्यामुळे माझा निरोपच घेत होती. हे गुपित तिने तिच्या नवऱ्याला कधीच सांगितले नाही. आणखी एक गम्मत सांगतो. त्या लग्नात ज्यावर केक ठेवला होता, त्या मोठ्या टेबलाच्या खाली मी घुसलो आणि त्या टेबलाच्या एका पायाला जोरात धक्का लावला, ज्यामुळे केक खाली पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. माझी आई माझ्यापासून हिरावून घेतल्याबद्दल मी, निषेध करीत होतो का?

पण हे काहीही असले तरी मी मात्र आनंदात वाढलो. आजीआजोबांना थोडे कंटाळवाणे झाले असेल म्हणा, पण तेवढेच. खरे कठीण गेले, ते माझ्या मातेलाच. तिला आणखी तीन मुले झाली. ती चार लहान बाळांचे फोटोज तिच्या उशाशी ठेवायची म्हणे. म्हणजे हे मला तिच्या मृत्यूनंतरच समजले. तीन तिची औरस अपत्ये, आणि चौथा मी. अनौरस. आता शेवटची गंमत ऐका. मी काही अगदी गयाबीता जनुकशास्त्रज्ञ नाही. तसा बऱ्यापैकी आहे. पण माझ्या साध्यासुध्या कुटुंबाने माझे स्वतःचेच जनुकीय गुपित माझ्यापासून अर्धशतकभर लपवून ठेवले. आता ह्याला काय म्हणावे?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.