सृष्टिक्रम

जातिसंस्थेच्या उपपत्तीविषयी मी जी मांडणी केली आहे, ती अपुरी आहे असे माझ्या वाचकांशिवाय मलाही वाटत होते. माझ्या मित्रांचा माझ्या लिखाणावर आणखी एक आक्षेप आहे; तो आक्षेप असा की मी ब्राह्मणांना झुकते माप दिले आहे. त्यांनी जो अन्य जातींवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर न टाकता मी सृष्टिक्रमावर किंवा कालचक्रावर टाकीत आहे. त्यामुळे आता ब्राह्मणांना कुठलेही प्रायश्चित्त घेण्याची गरज उरली नाही व हे माझे करणे योग्य नाही.

भारतात उच्चवर्णीयांनी अन्य जातींवर अन्याय केला, हे खरेच आहे. ते मी मुळीच नाकारत नाही. ब्राह्मणांनी जसा दुसऱ्या जातींना आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लेखून त्यांचे शोषण केले तसेच त्यांनी आपल्या स्वत:च्या जातीतील स्त्रियांवरही (ज्या ब्राह्मण होत्या) अनन्वित अत्याचार केले आहेत. त्यांच्या बायकांना त्यांनी एका परीने गुलामगिरीतच ठेवले. घरातल्या कुठल्याही संकटासाठी त्यांनी बायकांना जबाबदार धरले आहे. ‘ही पांढऱ्या पायाची, आपल्या नवऱ्याला खाऊ न बसली’ ‘ही अपशकुनी, हिचे दर्शन नको’, ही वांझोटी, – हिला मुलीच होतात आणि ह्यांसारखे अनेक आरोप तिच्यावर केले व तिला जगणे नकोसे केले आहे. विधवांना सती जायला भाग पाडले आहे. एखाद्या विधवेचे तिच्या तारुण्यसुलभ भावनांमुळे ‘वाकडे पाऊल’ पडले तर तिला जीव नकोसा केला आहे. अजून ह्या 21व्या शतकात त्यांना त्यांचा नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. तो दुसऱ्या जातीचा असला तरी त्यांचे प्राण संकटात असतात. अन्यायपरंपरा अखंड चालू आहे.

भारतात ब्राह्मणांनी जसे अन्याय केले तसेच गोऱ्यांनी काळ्यांवर केले आहेत. गुलामगिरीची प्रथा किती शतकांपूर्वी सुरू झाली ह्याचा अंदाज नाही. प्राचीन काळी काही देशांमध्ये राजपुरुषांच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकांना व दासदासींना त्याच्याबरोबर मारून पुरून टाकीत असत. वेठबिगारीची पद्धत अजून पुष्कळ ठिकाणी चालूच आहे. आपला धर्म श्रेष्ठ समजून तो तलवारीच्या बळावर इतरांवर लादला आहे. त्यासाठी घनघोर युद्धे, ती सुद्धा शतकानुशतके केली आहेत. आमचीच जमात श्रेष्ठ आहे, तीच राज्य करण्यास योग्य आहे, असे म्हणून इतर जातींनी आपली पायरी ओळखून वागावे अशा अपेक्षा केवळ भारतातच नव्हे तर इतर खंडांतही ठेवल्याचे आढळते. दक्षिण आफ्रिकेचा गेल्या 300 वर्षांचा इतिहास मी म्हणतो त्याची साक्ष देणारा आहे.

आदिवासींची लूट करणारे, त्यांचे भयानक शोषण करणारे, केवळ ब्राह्मणच नव्हते. सावकारांनी आपल्या ऋणकोंकडून वसुली करण्यासाठी कोणते अन्याय केले त्यांची गणती नाही. इंग्रजांचे राज्य येथे येण्यापूर्वी जितके राजे होऊ न गेले त्यांत काही अपवाद सोडले तर बाकीच्यांनी प्रजेचे भयंकर शोषण केले. नागपूरकर भोसल्यांनी बंगालपर्यंत स्वाऱ्या केल्या त्यात त्यांनी केवळ लूटमार केली असा लोकप्रवाद आहे. अजून तिथे लहानमुलांना बागुलबुवाची जशी भीती दाखवतात तशी ‘मराठा बारगीरांची’ दाखवली जाते.

एका जातीने दुसऱ्या जातीच्या लोकांना, एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांना कमी लेखणे हा प्रकार जसा परशुरामाने 21 वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केली त्यात आढळतो तसाच तो हिटलरने केलेल्या ज्यूंच्या शिरकाणातही दिसून येतो.

हे जे सगळे इतिहासात घडले ते त्या त्या व्यक्तींनी किंवा समाजगटांनी जाणीवपूर्वक किंवा हेतुपूर्वक केले असे मला वाटत नाही. अशा घटनांमध्ये कालचक्राचा सृष्टिक्रमाचासुद्धा काही प्रभाव होता असे मला वाटते. आज आम्हाला भेडसावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या बाबी ह्या श्रद्धेमुळे निर्माण झाल्या आहेत. मुस्लिमधर्मीयांनी इतरांना कालबाह्य वाटणाऱ्या ‘शरीयातील’ नियमांचा आग्रह धरणे, शीखांनी कृपाण धारण करण्याचा आग्रह धरणे, व तसे करण्याने ते ज्या प्रदेशांत राहतात तेथील प्रचलित कायद्यांचा भंग करणे ह्यांसारख्या न सुटणाऱ्या समस्या निर्माण होतात. येथे काही उदाहरणे देतो. एका चौदा वर्षाच्या मुस्लिम मुलीने इंग्लंडमध्ये लग्नाला नकार दिला तेव्हा बर्मिंगहॅम येथील सेंट्रल जामिया मशिदीचा इमाम मो. शाहीद अख्तर ह्याने ती ‘शरीया’प्रमाणे विवाहयोग्य आहे असे सांगून तिला लग्न करावेच लागेल असा निर्णय दिला. तेथील कायद्याप्रमाणे लग्नाचे वय मुलींसाठी 16 वर्षे असे आहे. आता इमामाच्या फतव्याला बेकायदा म्हणून फेटाळून लावता येईल काय हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. आपल्या देशात देखील जात पंचायतीचे ‘खाप’ पंचायतीचे निर्णय हे बहुधा स्त्रियांनाच अत्यंत जाचक असे असतात. स्त्रियांना, तसेच शूद्र मानल्या गेलेल्या जातींना, कोणत्या अन्यायाला तोंड द्यावे लागते त्यांच्या कथा न संपणाऱ्या आहेत. पण मला येथे पुन्हा सांगायचे आहे की हा अन्याय बुद्धिपुरस्सर जाणून-बुजून केला जातो की मनुप्रभावामुळे होतो ह्याबद्दल मी साशंक आहे.
माझ्या आतापर्यन्तच्या प्रतिपादनावरून असे वाटण्याचा संभव आहे की माणसे त्या सृष्टिक्रमाच्या हातातील बाहुले आहेत. पण ते तसे नाही. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याला सारासारविवेक करता येतो. योग्य काय अयोग्य काय हे त्याला समजते किंवा त्याने प्रयत्न केल्यास त्याला समजू शकते असे म्हणणे जास्त उचित होईल. तक्रार अशी आहे की तो त्याची विवेकबुद्धी वापरत नाही. त्याचा ‘महाजनो येन गत: स पन्था:’ ह्या वचनावर दृढ विश्वास आहे. त्याच्या पूर्वजांनी जी वाट चोखाळली त्या वाटेवरून जाताना त्याला कसे सुरक्षित वाटते आणि त्या सुरक्षिततेच्या मोहापायी की काय, तो त्याच्या हातून होणारे अन्याय चालू ठेवतो. किंवा असे म्हणू या की त्याला आपल्या हातून काही अन्याय घडत आहे ह्याची जाणीवच होत नाही. आणि सर्वच समाज तसा अन्यास करीत असल्यामुळे, ज्या एक दोघांच्या मनात ह्या अन्यायाची जाणीव असते त्यांना त्याची टोचणी पुरेशी लागत नाही. सासवा सुनांना सासुरवास करतात. त्या सगळ्या दुष्ट किंवा क्रूर नसतात. सगळे सावकार, गुलामांचे मालक हे संवेदनशून्य नसतात पण जे समाजमान्य आहे त्याच्या विरोधात जाण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. आणि एक दोघे गेले तरी त्याचा फारसा फरक समाजावर पडत नाही. न्या.मू. महादेव गोविंद रानडे ह्यांना त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर एखाद्या विधवेशी विवाह करावा अशी तीव्र इच्छा होती. पण ते तसे करू शकले नाहीत. ह्या घटनेमागे त्यांच्या वडिलांचा आग्रह कारणीभूत असला तरी एकूण समाजाची वृत्ती ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं न करणीयं नाचरणीयम् ‘ अशी असते. सृष्टिक्रमामुळे ज्या समजुती मनामध्ये निर्माण झालेल्या असतात, त्यांना नष्ट करणे, त्यांचे निर्मूलन करणे अशक्यप्राय असते. ह्या अश्या समजुतींमध्ये देवावरचा विश्वास, आपलाच धर्म श्रेष्ठ ह्याचा विश्वास जसा असतो तसाच तो खाजगी मालकीविषयीही असतो. ‘हे माझे, हे तुझे’ ही भावना फार जुनी नसावी. मानवजातीचा इतिहास पाहता. काही जनावरांना माणसाळवता येते ही भावनासुद्धा सार्वत्रिक नाही. आजच्या आदिवासी समाजात गाय, बैल, घोडे, गाढवे ह्यांचा आपले श्रम कमी करण्यासाठी वापर झालेला आढळत नाही ह्याचे कारण ती मंडळी अजून निराळ्या मनूमध्ये आहेत, असे असले पाहिजे.

ज्या विश्वासाच्या मागे तर्कशुद्ध विचार नाही त्याला श्रद्धा म्हणतात. आणि ह्या श्रद्धा अत्यंत बळकट असतात. ज्यांना थोडे पलीकडचे दिसते, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही श्रद्धांना झळ पोहोचत नाही. आणि त्या श्रद्धांमुळेच की काय, एकमेकांविषयी संशय निर्माण होतो. हिंदूना मुसलमानांविषयीं, मुसलमानांना हिंदूविषयी विश्वास वाटत नाही. कितीही खटपट केली तरी तो विश्वास निर्माण होत नाही. हा अविश्वास फक्त भिन्न धर्मीयांमध्येच असतो असे नाही. तो वेगवेगळ्या जातींमध्ये असतो. सासूसुनांमध्ये असतो, नणदाभावजयांमध्ये असतो, नवराबायकोमध्ये किंवा बाप आणि मुलांमध्ये असतो, एका धंद्यातील भागीदारंमध्येही असतो. पुष्कळदा तो संशय निष्कारण असतो पण तो श्रद्धासदृश असल्याने त्याचे निराकरण करणे अशक्य असते.

श्रद्धा म्हणजे न ढळणारा विश्वास. अश्रद्धा म्हणजे श्रद्धेचा अभाव. ह्या अभावामुळे मन पुष्कळ मोकळे असते. कुठल्याही विधानाची दुसरी बाजू समजून घेण्याची येथे तयारी असते; जी श्रद्धेमध्ये नसते. ‘तुम्ही काहीही म्हटले तरी मला तुमचं म्हणणं पटत नाही, पटू शकणार नाही. देव आहे म्हणजे आहे’. अश्या श्रद्धेमध्ये वृत्ती असते तेथे मनाचे दरवाजे बंद असतात. ह्यापेक्षा आणखी निराळा एक वर्ग असतो किंवा घडू शकतो. तो नि:श्रद्धांचा. हे श्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडलेले असता. पहिल्याने सश्रद्ध पण मागाहून ते अश्रद्ध बनलेले असतात. त्यांच्या मनातील श्रद्धांचा निरास झालेला असतो. ही अत्यंत अवघड वाटचाल आहे ती त्यांच्या मनाने केलेली असते. ह्यालाच विवेक करणे असे म्हणतात. असे होणे कष्टसाध्य आहे असाध्य नाही.

माझ्या पहिल्या लेखावर जी टीका झाली तिच्यात मी जो मनुप्रभावाचा मुद्दा मांडला आहे त्याचे खंडन कुणी केलेले नाही. मी केलेल्या मांडणीमुळे उच्चवर्णीयांना झुकते माप दिले गेले व त्यांच्या अपराधांवर दुर्लक्ष केले गेले असे म्हटले आहे. मला एवढेच सांगायचे आहे की असे अपराध जगभरात सर्वत्र घडले आहेत आणि घडत आहेत. जे घडून चुकले आहेत त्याबद्दल आता ते कितीही दण्ड असले तरी कोणालाही शिक्षा करता येत नाही. कारण ते घडवणारे आता हयात नाहीत. आज जे हयात आहेत त्यांनी अपराध केल्यास, त्यांना अवश्य दण्ड करावा. पण तो सौम्य असावा – कारण अपराधामागे मनुप्रभाव असू शकतो.

मला वाटते त्यासाठी आजचे कायदे पर्याप्त आहेत. पण सतत इतिहास मनात बाळगून पूर्वजांच्या पापांचे प्रायश्चित्त कोणाला भोगावे लागू नये. कारण पूर्वजांची पापे आपण शोधायला गेलो तर त्यातून कोणत्याच वर्णाचे लोक सुटणार नाहीत. आपल्यापेक्षा दुबळे आहेत त्यांना बरोबरीने न वागवण्याचा व त्यांचे शोषण करण्याचा अपराध सगळ्याच काळात व सगळ्यांकडूनच घडत आलेला आहे. त्याचा एकाधिकार कोणत्याही एका वर्णाकडे किंवा जातीकडे नाही. आज मानवजातीत जगामध्ये जितक्या काही समस्या आहेत, (ज्यामुळे दु:ख (misery) निर्माण झाले आहे) त्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. त्या मानवांच्या गटातील अहंकारामुळे किंवा अज्ञानामुळे म्हणजे ह्या समस्येचे सम्यक आकलन न झाल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. किंवा असे म्हणता येईल की त्या मनुप्रभावामुळे किंवा सृष्टिक्रमामुळे निर्माण झाल्या आहेत; विवेकाभावामुळे निर्माण झाल्या आहेत. माणसाच्या प्रवाहाबरोबर वाहत जाण्याच्या स्वभावामुळे त्या समस्या सोडविण्यासाठी आम्हा साऱ्यांना विवेकाची साथ धरावी लागणार आहे म्हणजेच इतिहासाकडे आणि वर्तमानाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोण बदलावा लागणार आहे. आमच्या विचारविश्वाच्या मर्यादा ओलांडाव्या लागणार आहेत हे वेगळ्या तऱ्हेने पाहणे म्हणजेच मनाला decondition करणे हे अवघड आहे पण ते केलेच पाहिजे कारण हाच खरा पुरूषार्थ आहे असे मला वाटते.

भ्र. ध्व. : 981990608

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.