ईश्वर – एक मुक्त चिंतन

“आस्तिक विरुद्ध नास्तिक” असा एक कायमचा घोळ समाजाच्या वैचारिक विश्वात चालू असतो. हा घोळ आस्तिकांनी घातला आहे. नास्तिकांची विचारसरणी सुस्पष्ट असते. निरीक्षण-परीक्षण-प्रत्यक्ष प्रयोग-गणितीय पडताळणी ह्या वैज्ञानिक प्रक्रियेतून निष्पन्न झालेले सत्य विवेकाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत असल्यामुळे नास्तिकांच्या मनात कुठलाही संदेह नसतो. आस्तिकांजवळ मात्र काल्पनिक गृहीतकांशिवाय कोणतेच साधन नसते. निराधार परंपरांवर डोळे मिटून श्रद्धा ठेवीत ते अंधारात चाचपडत असतात. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे आस्तिकांना विलक्षण आकर्षण असते. सुबोधतेपेक्षा दुर्बोधतेकडे ओढा असणे, स्पष्टतेपेक्षा धूसरता अधिक आवडणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, ज्ञानाऐवजी अज्ञानात सुख वाटणे , आकारापेक्षा निराकारात रमावेसे वाटणे हा वैचारिक जगतातील मोठा विरोधाभास आहे.

वास्तविक एखादी गोष्ट अस्तित्वात आहे (अस्ति) असे मानणारा त्या गोष्टीपुरता आस्तिक मानता येतो. तसेच ती गोष्ट अस्तित्वात नाही (न अस्ति) असे मानणारा त्या गोष्टीपुरता नास्तिक म्हणता येईल. तथापि सामान्यपणे ह्या संज्ञा ईश्वराच्या अस्तित्वासंदर्भात वापरतात. परंतु आस्तिक जगतात ईश्वर ह्या संकल्पनेविषयीं मोठा गोंधळ आहे. ईश्वरा(देवा)ची निश्चित अशी व्याख्या ते करू शकत नाहीत. असंख्य धर्मग्रंथ, आध्यात्मिक तत्त्वज्ञाने, दर्शने, पुराणे इत्यादि साहित्य जगात उपलब्ध आहे. पण ईश्वर म्हणजे नेमके काय हे कुठेच सापडत नाही. कोणत्याही दोन मतांत एकवाक्यता आढळत नाही.”तर्कोsप्रतिष्ठ: श्रुतयोर्विभिन्ना नैको मुनिर्यस्य मतं प्रमाणम्। धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्।” असेच शेवटी सामान्य जिज्ञासूला म्हणावे लागते.

ईश्वर किंवा देव ही संकल्पना आस्तिक जगतात अनेक पातळ्यांवरून मांडली जाते. त्यांतील दोन प्रमुख पातळ्या (प्लेनस्) अशा:
एक म्हणजे सृष्टिनिर्मितीचे तत्त्व व त्याचा अभ्यास आणि दुसरी म्हणजे आराध्य (उपासनेचे) तत्त्व. वास्तविक ह्या दोन संपूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यांचा परस्परांशी काही संबंध असायला नको. आणि तसा तो नाहीही. पण या दोहोंना “ईश्वर” हे समान नामाभिधान मिळाल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आहे. खरे तर या दोन्ही गोष्टींना (तत्त्वांना, संकल्पनांना) वेगवेगळी नावे असती तर सर्वच गोंधळ टाळता आला असता. पण आस्तिकांनी आपल्या सोयीसाठी तो घातला.

सृष्टिनिर्मितीचे तत्त्व व त्याचा अभ्यास ही संपूर्णपणे विज्ञानाच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. हा अभ्यास त्या क्षेत्रात अविरत चालू आहे. विश्वनिर्मितीचे कोडे अजून सुटलेले नाही हे खरे आहे. पण वैज्ञानिकांनी त्याबाबतीत खूप प्रगती केली आहे. ती चालूच राहाणार आहे.(अध्यात्माने उगीचच ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे.)

उपासनेचा देव ही मात्र वेगळी संकल्पना आहे. त्याला व्यक्तिसापेक्ष देव (पर्सनल गॉड) असे म्हणतात. हा देव भक्तांच्या प्रार्थनांना प्रतिसाद देतो. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, अभिषेक-अनुष्ठाने आदींनी संतुष्ट होतो. जप-तप, उपास-तापास, आदींनी प्रसन्न होतो. नवसाला पावतो. पापविमोचन करतो. थोडक्यात म्हणजे चमत्कार घडवितो. अशी आस्तिकांची कल्पना आहे. ह्या कल्पनेला ते “श्रद्धा” असे नाव देतात. परंतु जगात चमत्कार घडत नसतात. प्रत्येक घटनेमागे कुठलातरी निसर्गनियम असतोच. हे वैज्ञानिक क्षेत्रातील मार्गदर्शक तत्त्व मान्य असणाऱ्या नास्तिकांना असा “चमत्कारी” देव मान्य नसेल तर त्यात नवल नाही. सृष्टिनिर्मितीशी अशा देवाचा संबंध नाही. पण आध्यात्मिक लोक तो जोडतात. कारण ते त्यांच्या सोयीचे असते. चमत्कार करणाऱ्या देवावर नास्तिकांनी अविश्वास दर्शविला की, “मग जग कुणी निर्माण केले ते सांगा.” ह्या आव्हानाची ढाल त्यांना पुढे करता येते. आणि, “हे कोडे सोडवायचे प्रयत्न वैज्ञानिक करीत आहेत.” असे प्रामणिक उत्तर देण्याचा प्रयत्‍न करताच, पुढचे काही ऐकून न घेता, “म्हणजे अजून सुटले नाही ना? मग आम्ही म्हणतो ते मान्य करा. हे जग देवाने निर्माण केले आहे. तोच जगन्नियंता आहे. तो काहीही करू शकतो. त्याला संतुष्ट ठेवण्यासाठी सर्व कर्मकांडे करावी लागतात.” असा आग्रह धरीत ईश्वराच्या अस्तित्वावर आपल्याच मनाने शिक्कामोर्तब करतात. आणि लगेच न्यूटन, आर्किमिडीज आदींच्या सिद्धांताना वाकुल्या दाखवीत साधुवाण्याच्या नौकेचे बुडणे वा तरंगणे, प्रसाद न खाणे वा खाणे यावर अवलंबून ठेवणाऱ्या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतात. गुरुचरित्राची पारायणे करतात. शिर्डी-शेगावच्या वाऱ्या करतात. आस्तिकांच्या दैनंदिन व्यवहारातही देव ही संकल्पना पूर्णतया मिसळून गेली आहे. सर्व ऐच्छिक इच्छापूर्तीसाठी त्या काल्पनिक देवाची उपासना ते सतत करीत असतात. इच्छापूर्ती न होऊनसुद्धा.

आस्तिकांपैकी जवळपास पंचाण्णव टक्के लोक हे असे उपासनेचे भक्त असतात. उपासनेची कर्मकांडे केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपले मनोरथ पूर्ण करील अशी त्यांची श्रद्धा असते. आपण ईश्वराचे प्रतिनिधी आहोत असा दावा करणारी, बाबा-बापू, बुवा-महाराज, ताई-देवी-माताजी अशी भोंदू मंडळी ह्याच आंधळ्या व भाबड्या श्रद्धेचा लाभ उठवतात. आपल्या अशा श्रद्धा, तर्काच्या, विवेकाच्या कसोटीवर खऱ्या उतरणार नाहीत हे त्यांच्यापैकी काही जणांना, विशेषत: सुशिक्षितांना जाणवत असते. पण त्या श्रद्धा सोडवतही नाहीत. मग त्यांना बळकटी आणण्यासाठी ते उरलेल्या पाच टक्क्यांचा आधार घेतात.

हे पाच टक्के आस्तिक बुद्धिमान, ज्ञानी, प्रतिभासंपन्न, विचारवंत असतात. मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. चिंतन असते. मानवहिताची तळमळ त्यांना लागलेली असते. ते धर्माची शिकवण देतात. पण त्यांचा धर्म “धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा:।” ह्या व्याख्येतला असतो. सांप्रदायिक कर्मकांडाशी त्याचा काहीएक संबंध नसतो. हे ज्ञानी, प्रज्ञावंत, विचारवंत मानवधर्माच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतात. त्यामुळे ते सर्वांनाच आदरणीय असतात. नास्तिकांनासुद्धा. कारण ते विवेकाची कास धरून आपले विचारविश्व उभारत असतात. ते देव मानतात हे खरे असले तरी त्यांची ईश्वरकल्पना व्यापक आणि विशाल असते. पण ते आस्तिक आहेत एवढ्याच काडीचा आधार घेऊन पंचाण्णव टक्के उपासना आस्तिक हे नास्तिकांवर दडपण आणतात. “म्हणजे तुम्ही शंकराचार्यांना मानता ना? ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्याविषयी तुम्हाला आदर आहे ना? विवेकानंदांचे तुम्ही प्रशंसक आहात ना?” अशा प्रश्नांचा मारा सुरू करतात. नाही म्हणायची सोय नसते. “हो” म्हणताच, आस्तिकतेचा दुसरा अर्थ माहीत नसल्यामुळे “मग तुम्ही आस्तिकच आहात. ते देव मानतात. तुम्हीही माना. बसा पूजेला म्हणा केशवाय नम:।” अशी कर्मकांडी आस्तिकांची रीत असते. “शंकराचार्यांनी कधी लघुरुद्र करण्याचा आदेश दिला नव्हता की ज्ञानेश्वरांनी शिवलीलामृत वाचायला सांगितले नव्हते; की विवेकानंदांनी शनिमाहात्म्य वाचाण्याचा सल्ला दिला नव्हता.” असा युक्तिवाद त्यांच्यापुढे व्यर्थ ठरतो. उलट, “नवसे करोनी पोरे होती ।तरी का करणे लागे पती?।”असा रोकडा सवाल करणाऱ्या संतांच्या अंगी “भक्तिविजया”सारखे ग्रंथ लिहून चमत्कार चिकटविले. ज्ञानियांच्या राजाची नेमणूक भिंत चालविण्याच्या कामी केली. संत आणि उपासनेचे आस्तिक ह्यांच्यात “देवाला मान्यता” (तीही केवळ शाब्दिक) एवढेच साम्य आहे. संत त्यांच्या विश्वात्मक देवाजवळ “जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥” असे पसायदान मागतात तर पोथिनिष्ठ आस्तिक पोथीच्या “फलश्रुती”तील आश्वासने खरी करण्यासाठी देवाला साकडे घालतात. ऐहिक स्वार्थ साधणे एवढाच त्यांचा हेतू असतो.

खरी गोष्ट अशी आहे की आपला समाज स्थितिशील आहेत. गती त्याला मानवत नाही. शारीरिक आळसासोबतच वैचारिक आळसही त्याच्यात भिनला आहे. सखोल विचार करणे, चिकित्सा करणे, शंका उपस्थित करणे, प्रश्न विचारणे अशा वैचारिक “क्रियां”चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. त्यामुळे पूर्वसूरींकडून आयत्या मिळालेल्या विचारधनावर तो गुजराण करतो. शिवाय ह्या आळसाची सतत सोबत करीत असते ते भय. पोथीत सांगितल्याप्रमाणे आचरण न केल्यास, नवस न फेडल्यास, ग्रहशांती न केल्यास देवाचा वा ग्रहांचा कोप होईल ही भीती सतत पाठीशी असते. त्याचबरोबर विचारांना विवेकाची बैठक देण्यासाठी जे धाडस लागते त्याचा पूर्ण अभाव आस्तिकांमध्ये असतो. नाहीतर एरव्ही शंकराचार्यांचे गुणगान करणाऱ्या आस्तिकांनी त्याच आचार्यांच्या, “नहि श्रुतिशतमपि शीतोग्निरप्रकाशो वेति ब्रुवन् प्रामाण्यमुपैति।” (अग्नि हा शीतल आणि प्रकाशरहित आहे असे शंभर वेदांनी सांगितले तरी त्याला विश्वासार्हता प्राप्त होत नाही.) ह्या विवेकपूर्ण विधानाकडे दुर्लक्ष केले नसते. ही एक वैचारिक दुर्बलताच आहे.

हे भय आणि दुर्बलता लपविण्यासाठी आस्तिक लोक, विशेषत: शिकलेले, त्यांच्याभोवती भारदस्त अशा मोठमोठ्या शब्दांचे जाल विणतात. रंगीबेरंगी शब्दतंतूंचे हे जाल दिसायला सुंदर दिसते व त्याआड भय आणि विचारदौर्बल्य ही वैगुण्ये झाकली जातात. मोहक शब्दांच्या कोंदणात बसविलेला मूल्यहीन असा श्रद्धेचा खडा आकर्षक भासतो. शब्दांच्या ह्या भूलभुलैयाच्या आधाराने नास्तिकांवरही ते आस्तिकतेचा शिक्का मारण्याची जादू करून दाखवितात. पूजन, वंदन, आदर, प्रार्थना ह्या जणू देवासाठीच राखून ठेवलेल्या क्रिया आहेत अशी समजूत करून घेऊन (आणि इतरांचीही करून देऊन ) मग जे जे वंदनीय, पूजनीय, आदरणीय, प्रार्थनीय ते ते सर्व ईश्वरस्वरूप आहे असा आभास ते निर्माण करतात. सुंदर, रमणीय, आनंददायी, अशा प्रत्येक गोष्टीत (मग ते एखादे दृश्य असो, स्वर असो, स्पर्श असो वा सुवासिक पुष्प असो) त्यांना देवच दिसतो. त्यातूनच मातृदेवोभव, पितृदेवोभव, अतिथिदेवो भव, “देश हा देव असे माझा”, अशा काव्यमय कल्पना प्रसृत होतात. वास्तविक आईला देव मानले पाहिजे का? तिला आईच राहू दिले तर तिच्याविषयींचा पूज्यभाव, कृतज्ञता कमी होतात का? देशाला नुसतेच “देश” किंवा फार तर “माझा देश” म्हटले तर काय बिघडते? भगतसिंग पूर्णपणे नास्तिक होते. त्याने त्यांची देशभक्ती उणावली होती का? पण पूजा, भक्ती ह्या संकल्पना “देवा”शीच निगडीत करून ठेवल्यामुळे, आई-वडील, देश आदींना “देव”त्व प्राप्त होते. प्रत्येक ठिकाणी देव आणलाच पाहिजे का? पूज्यभाव देवाशिवाय इतरही ठिकाणी ठेवता येतो.

काही प्रतिभावंत उच्चशिक्षित ह्याहीपेक्षा वरची शाब्दिक झेप घेतात. भव्य, दिव्य, विराट आदि विशेषणांनी नटलेले भरजरी पदर त्यांच्या श्रद्धेला असतात. त्यांचा परमेश्वर निर्गुण-निराकार असतो. “म्हणजे नेमके काय?” असे विचारले असता, वेद, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, निरनिराळ्या स्मृती, ह्यांच्याकडे बोट दाखवितात. हे सर्व वाचण्याचा प्रयत्न केला असता सामान्य जिज्ञासूच्या हाती काही लागत नाही. ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा अशा संकल्पनांचा नीट बोध होत नाही. अशा ईश्वराला मानण्याने सामान्य व्यक्तीच्या जीवनात काय फरक पडतो, त्याचा उपयोग काय, अशा प्रश्नांची उत्तरे नाहीत. साधकांना मात्र आत्मसुख, ब्रह्मानंद, चिदानंद, मन:शांती, अशा गोष्टी प्राप्त होतात असे म्हणतात. सामान्य माणसाला अगम्य वाटणाऱ्या ह्या गोष्टी “साध्य” झाल्यानंतर साधक त्यांचे पुढे काय करतात हे कुणाला ठाऊक नसते. मुळांत असे साधक कितीसे असतात? त्यांच्यासाठी इतकी मोठी शब्दांची जंगले? तत्त्वज्ञानाचे डोंगर? त्यापेक्षा “बिकटवाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको।” हे साधे तत्त्वज्ञान काय वाईट?

आस्तिकांच्या एका वर्गातील लोक सदैव ऐहिकाकडे पाठ फिरवून पारलौकिक सुखांच्या कल्पनेत मग्न असतात. ती सुखे उपभोगायला मिळावीत यास्तव इहलोकी पुण्यकृत्ये करीत असतात. ही पुण्यकृत्ये म्हणजे अर्थातच जप-तप, व्रत-वैकल्ये,पंचाग्निसाधन इत्यादि. वस्तुत: सुखोपभोग हे इंद्रियांनी घ्यायचे असतात. आणि देह तर पृथ्वीवरच टाकून द्यायचा असतो. मग सुखे कुणाला मिळतात? आत्म्याला? पण त्याचे ध्येय तर मुक्ती आहे. मग सगळी धडपड कशासाठी? सगळाच वैचारिक गोंधळ.

काही कविमनाचे आस्तिक विराट अशा निसर्गातच देव शोधत असतात. आपली वैचारिक उंची दाखविण्यासाठी “आपण कर्मकांडे वगैरे मानीत नाही. त्या पातळीवर आपण नास्तिक आहोत.” असे म्हणत, “निगुणाचा सगुण आविष्कार म्हणजेच हा विराट निसर्ग. असे आम्ही मानतो व त्या पातळीवर आपण आस्तिकच आहोत.” असे सांगतात. “प्रकाशाचा स्रोत असलेला, रोज पूर्वेला उगवणारा तेजोगोल हाच आमचा देव.” असे प्रौढीने उद्गारतात. बस्स? एवढाच त्यांचा देव? विश्वाच्या ह्या अनंत पसाऱ्यात , महासागराच्या तुलनेत बिंदुएवढाही नसणारा हा ठिपका नमस्काराला पात्र ठरतो? ह्यांच्या निसर्गाचे विराटपण पृथ्वीपुरतेच मर्यादित असते. निसर्गाकडे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहाता येत नाही. तो दृष्टिकोन त्यांच्याजवळ नसतो. तळ्यात-मळ्यात असणारे हे लोक नुसता शब्दांचा फुलोरा फुलवितात. त्यांचा भाषाविष्कार हा केवळ शब्दच्छल असतो. “निर्गुण” का होईना पण देव त्यांना हवा असतो. उपासनेच्या माध्यमातून मनांत ठाण मांडून बसलेला देव, ते माध्यम सुटले तरी, आपली जागा सोडायला तयार नसतो. हे असे अर्ध नास्तिक खरे उपासनेचेच भक्त असतात. फक्त ताकाला जाऊन भांडे लपवितात. केवळ आभासमय (फॅंटसी) असणारा देव जत्रेतल्या खेळण्याप्रमाणे लोकांपुढे मांडला जातो. यातील बहुतांश रूपे नवसाला पावणाऱ्या (चमत्कार घडविणाऱ्या) उपासनेच्या देवाचीच असतात. (पुजारी, पुरोहित, फलज्योतिषी, वास्तुशास्त्री, तीर्थक्षेत्रातील पंडे, प्राणिक हीलिंगवाले, वगैरेंची भरभराटलेली दुकाने ह्याची साक्ष देतात.) फक्त त्यांना भव्य, दिव्य, विराट, वंदनीय, पूजनीय अशा विशेषणांनी सजविले जाते. देवाच्या अस्तित्वाची सत्यता पटविण्यासाठी महापुरुषांची, संतांची वचने तोंडी लावली जातात.

आपल्या श्रद्धा आंधळ्या नसून डोळस आहेत असा डांगोरा पिटताना सुशिक्षित आस्तिक एका युक्तीचा अवलंब करतात. वैज्ञानिक सत्ये तर नाकारता येत नाहीत. तेव्हा “इफ यू कनॉट फाईट देम, जॉइन देम” ह्या न्यायाला अनुसरून आपल्या श्रद्धांना विज्ञानाचा पाठिंबा आहे असे दडपून सांगतात. ज्ञात-अज्ञात-अल्पज्ञात अशा वैज्ञानिकांची, सोयीपुरती वाचलेली, त्यांच्या ग्रंथातील वाक्ये संदर्भ वगळून (आऊट ऑफ कॉंटेस्ट) उद्धृत करतात. आणि विज्ञान व अध्यात्म समन्वय व्हावा अशी मागणीही करतात. अशा समन्वयाची गरज अध्यात्माला असेल, विज्ञानाला नाही. याविषयीं एक कळीचा मुद्दा मांडता येईल. तो म्हणजे आस्तिकांनी “देव” या संकल्पनेची एक निश्चित व कायमची अशी बहुमान्य व्याख्या करून टाकावी व तिलाच ठाम चिकटून राहावे. पुन्हा फाटे फोडू नयेत. तसे झाले तर गोंधळ कायमचा मिटेल. देवाला चिकटलेली लेबले, विशेषणे गळून पडतील. प्रामाणिक जिज्ञासूंची दिशाभूल थांबून त्यांना योग्य मार्ग दिसेल. आणि …..विधान धार्ष्ट्याचे वाटेल, पण शंकराचार्यांपासून ज्ञानदेव -तुकाराम-विवेकानंदांपर्यंतचे विवेकशील विचारवंत नास्तिकांच्या गोटात येऊ शकतील. कारण मग “देवा”ची व्याख्या नवसाच्या देवापुरतीच मर्यादित असेल.

भ्र. ध्व. 9975456587

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.