बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजाची नीतिमत्ता

आमच्या बुद्धिजीवि मध्यमवर्गीयांच्या संस्कृतीची स्थिति आज शीड नसलेल्या तारवाप्रमाणें झाली आहे. स्वार्थाच्या आणि अहंकाराच्या भोवऱ्यांत ती सांपडल्यानें बाहेर पडण्याचा मार्ग तिला आज दिसत नाही. पारतंत्र्य जाऊन स्वातंत्र्य आलें, द्विभाषिक जाऊन संयुक्त महाराष्ट्र आलें, बाहेरचें जग अशा तऱ्हेनें कितीतरी बदललें, तरी या बदलत्या जगाचे पावलावर पाऊल टाकून स्वत: बदलणें बुद्धीच्या घमेंडीमुळें या संस्कृतीला अपमानाचें वाटतें. मेथ्यु अर्नॉल्ड या आंग्ल टीकाकारानें अशा जातीच्या लोकांना ‘Philistines’ असें संबोधून खऱ्या सांस्कृतिक गुणांचा अभाव असलेल्या अशा लोकांमुळें समाजांत अराजक माजतें, असें म्हटलें आहे. अशा तऱ्हेचें अराजक सध्यां महाराष्ट्रांत माजलें आहे. कोणत्याच गोष्टींत कांहींहि चांगलें न पहातां इतरांच्या चांगल्या कार्यावर टीका करणें, हा प्रकार आपल्या समाजांत आज वाढत्या प्रमाणांत रूढ होत आहे. समाजावर अशी टीका करणारे हे लोक स्वत: मात्र ‘उपनगर संस्कृतीचे’ दासानुदास बनत आहेत. प्लॉट, बंगला, मोटार, रेडिओ, सोफासेट या गोष्टींमध्यें हा वर्ग वाढत्या प्रमाणांत दंग आहे. भोंवतालच्या जगांत आपल्याच लोकांचे खून पडले, जाळपोळ झाली, लूटमार फैलावली, तरीहि या वर्गाची मन:शांति ढळत नाहीं, सुखलोलुपपणा यत्किंचितहि कमी होत नाहीं.
महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेच्या अवनतीची समस्या व्यासपीठावरील उपदेशानें, अथवा व्याख्यानबाजीनें सुटूं शकेल असें मला प्रामाणिकपणें वाटत नाहीं. कायदे करून अथवा शाळाकॉलेजांतून बौद्धिकें घेऊनहि या प्रश्नाची सोडवणूक होण्यासारखी नाहीं. नीतिमत्ता हा विषय मूलत: परंपरा, आदर्श आणि अंत:प्रेरणा यांच्या कक्षेंत येणारा विषय आहे. हे आदर्श, परंपरा अथवा अंत:प्रेरणा समाजमनांत निर्माण व्हावयाच्या तर आमच्या बुद्धिवादी आणि सुशिक्षित समाजांत त्या प्रथम निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे या लोकांच्या उदाहरणावरून झिरपत झिरपत त्या समाजाच्या खालच्या थरांपर्यंत येऊं शकतील.”

त्र्यं. शं. शेजवलकर

(1895-1963)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.