मजेत

पद्मजा फाटक वारल्या. अनेक व्याधी, ‘रोपण’ केलेले मूत्रपिंड, त्या मूत्रपिंडाला शरीराने स्वीकारावे यासाठीची औषधयोजना, त्या औषधांचे दुष्परिणाम टाळायला (किंवा सौम्य करायला) आणखी औषधयोजना; अशा साऱ्यांशी बावीस-तेवीस वर्षे झगडून सत्तरच्या वयात ६ डिसेंबर २०१४ ला पद्मजांनी ‘देह ठेवला’
‘आजचा सुधारक’चा आणि त्यांचा जुना स्नेह. दि. य. देशपांडे, प्र. ब. कुलकर्णी, मी, साऱ्यांशी तसाच जुना स्नेह.
शिक्षणाने समाजशास्त्रज्ञ असलेल्या पद्मजांना खरे तर कोणताच विषय वज्र्य नव्हता. ‘शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक’ आणि (माधव नेरूरकरांसोबतचे) ‘बाराला दहा कमी’ ही त्यांच्या ग्रंथसंपदेतली रत्ने.
ताराबाई मोडक पद्मजांच्या आजी. त्यांचे वादळी व्यक्तिगत आयुष्य; आणि शिक्षणक्षेत्रातली अत्यंत सर्जकतेने, निष्ठेने केलेली कामगिरी; या दोन्हींना पूर्ण न्याय देत पद्मजांनी सुंदर चरित्र रेखाटले.
अणुविज्ञान आणि अणुबाँबचे तंत्रज्ञान हा विसाव्या शतकातला महत्त्वाचा मानवी व्यवहार खूप सहृदयतेने पद्मजांनी तपासला. एकीकडे माणसाची ज्ञानलालसा आणि दुसरीकडे ज्ञानवापरातले नैतिकतेचे प्रश्न, यांतले ताणतणाव त्यांनी अत्यंत सुरस आणि वाचनीय रूपात वाचकांपुढे मांडले.
पण पद्मजांचा मूळ पिंड ललितलेखांचा. पण हे जागाभरू, फुरसतीच्या काळात वाचायचे लेख नव्हेत. सज्जड प्रश्न विचारणे, ज्ञानपिपासा आणि तिचे शमन वाचकापुढे मांडणे, हा पद्मजांचा लक्षणगुण. खरे तर १९७५-९० या काळातल्या विवेकी, विचारी, सुशिक्षित मध्यमवर्गाच्या बौद्धिक कमाईचा आलेख रेखत, त्या वर्गाचे प्रश्न त्यांच्यातर्फे मांडत पद्मजा वावरत होत्या. त्यांच्या मनांतल्या, विचारांतल्या उत्कृष्ट अंगाला पद्मजा भिडत होत्या.
हो, त्या ब्राह्मणी संस्कृतीतून आलेल्या होत्या. पण त्या संस्कृतीने एकूण मराठी-भारतीय समाजाला खूप काही दिले आहे. म्हणूनच त्या, ‘‘हो, प्रश्न साडेतीन टक्क्यांचा (ब्राह्मणांचा!) आहे, पण म्हणून काय त्या प्रश्नानं असूच नये?”, असे न लाजता विचारत असत. जातिभेदाला संपवू पाहणाऱ्यांमध्ये जी ‘रिव्हर्स स्नॉबरीङ्क असते, उच्चवर्णी ते सगळेच निरर्थक किंवा घातक, असा अविवेकी भाव असतो, त्याला पद्मजा सक्षम उत्तर देत असत. म्हणूनच त्यांच्या, त्यांच्या लिखाणाच्या चाहत्यांमध्ये वा. वि. भट (त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक), ग्रंथाली परिवार (ज्या पुरोगामी गटाला पद्मजांचे एकही पुस्तक काढता आले नाही!) इथपासून ते श्री. पु. भागवत (साहित्यातल्या उच्चवर्णीयांचे मेरुमणी) यांसारखे विविधरंगी लोक आहेत.
त्यांच्या लेखनाची सात्त्विक, वाचनीय, सहृदय वृत्ती अधोरेखित करणारा उतारा खाली देत आहोत. (सोनेलुमियेर, सुपर्ण प्रकाशन, पुणे, ‘शिक्षणङ्क या लेखातून)
थोडाफार अ‍ॅब्स्ट्रेक्ट विचार करता यायला लागल्यापासून मला सतत एक प्रकारची अनिश्चितता, असुरक्षितता वाटत असायची आणि हा भांबावलेपणा खूप वर्षं टिकून होता. जणू मला कुणी तरी डोळे बांधून या नव्या परिसरात जाणून सोडलेलं असावं तशी भोवतालची बरीच नावं, पाट्या, संस्था आणि संबंध मला अनोळखी वाटायचे.कुठे एखाद्या रात्रीपुरता मुक्काम करायची वेळ आली तरी आपण त्या घराचा – निदान खोलीचा – किमान भूगोल माहीत करून घेतो आणि मला तर जन्मभर ज्या पाण्यात सपासप हात मारायचे होते त्याचं कांपोझिशनही समजत नव्हतं.
हे आपले वडील. हे सरकारी हायस्कूलचे प्रिन्सीपॉल आहेत तर सरकारी म्हणजे नक्की काय? वाटेत लागणारा तो नळ, म्युनिसिपालिटीचा-म्युनिसिपालिटी म्हणजे नक्की काय? आईला सारखं ‘मर्जर’ झालं म्हणून वाईट वाटत असतं. ते वाटणं म्हणजे नक्की काय? आपला मामा मुंबईला ‘एशिया एलेक्ट्रिक’ मध्ये आहे; हे जे आपण कुणी विचारलं तर सांगता यायला हवं म्हणून लक्षात ठेवलंय, ते तरी? आणि त्याच्या घरी निळ्या, निळ्या ज्योतींचा ‘गॅस’ असतो तो?
थोडक्यात म्हणजे आपल्या भोवताली हे सगळं काय चाललंय काय?
प्रश्न अनंत होते आणि त्यातले बहुतेक भौतिक होते. आणि बाकीची सगळी माणसं पाहिली तर ती याच अनाकलनीय जगात-जणू इथेच जन्मल्यासारखी-बिंधास्तपणानं वावरत असायची!
माझा बुद्धिप्रवास सुरू झाला तो भोवताल समजून घेण्याच्या या टोकाच्या गरजेतून, रोकड्या उपयुक्तवादातून – विशुद्ध ज्ञानलालसेतून नव्हे.
आमची, माझी मैत्रीण गेली. आम्हाला, मला दरिद्री करून गेली. पण तिची गप्पिष्ट, प्रेमळ विवेकी वृत्ती जिवंत राहीलच. माणूसप्राणी खूप लवचीक, शहाणा, टिकावू आहे! त्याला जगाकडे मजेत पाहणे आवडते. आणि पद्मजांचे तर स्वतः निवडलेले नावच ‘मजेत’ असे होते!

vidya_nand@hotmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.