सांस्कृतिक राष्ट्रवादाची दुधारी तलवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर आहेत. इतक्या उंच, की त्यांच्या जवळपासदेखील आज कोणताही भारतीय नेता नाही आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कमालीचा आत्मविश्वास, जनतेशी थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि लोकांमध्ये आश्वासकता जागवण्याचे सामथ्र्य या गोष्टी लोकप्रियतेचा पाया आहेत. या अफाट लोकप्रियतेमध्ये प्रचंड आशादायी घडण्याची क्षमता अर्थातच आहे; पण या लोकप्रियतेचा एक तोटादेखील आहे. तो असा की, माध्यमे पंतप्रधानांकडून घडणाऱ्या चुकांबाबत अतिउदार वागू शकतात. विशेषत: या चुका उघड उघड राजकीय स्वरूपाच्या नसतील, तर ही शक्यता जास्तच असते. अलीकडेच असे एक उदाहरण महाराष्ट्रात घडले. अंबानी उद्योगसमूहाने बांधलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन करताना पंतप्रधान बोलत होते. श्रोत्यांमध्ये अर्थातच डॉक्टरांची संख्या मोठी होती. पंतप्रधान म्हणाले- ‘पुरातन भारतीय वैद्यकशास्त्र किती प्रगत होते याचे दोन मोठे पुरावे म्हणजे गणपती आणि कर्ण. माणसाच्या शरीराला हत्तीचे तोंड लावता येण्याची क्षमता त्या काळच्या वैद्यकशास्त्रात होती, याचा गणपती हा पुरावा आहे. पुरातन काळी प्लास्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान आजच्यापेक्षा किती प्रगत होते याचाच हा पुरावा.’ कर्णाचेही तसेच. पंतप्रधान म्हणाले की, ‘महाभारतात आपण वाचतो की, कर्ण हा त्याच्या आईच्या पोटी जन्माला आला नाही. याचाच अर्थ त्या वेळी जनुकशास्त्र एवढे प्रगत झाले होते.’ अशा तऱ्हेची विधाने अर्थातच इतरांकडून नेहमीच केली जातात. आजचे अनेक शोध आपल्या पूर्वजांनी आधीच कसे लावलेले आहेत, असे अनेक जण अभिमानाने सांगतात. बऱ्याचदा त्यातील तर्कविसंगती स्पष्ट असते.
अशा विधानांतील एक मुख्य विसंगती अशी की, आपल्या पूर्वजांनी एवढे मोठे शोध लावले, मग ते लिहून ठेवण्याचे तंत्रज्ञान कसे काय निर्माण केले नाही? मोदींच्या विधानांतील हास्यास्पदताही उघड आहे; पण इथे महत्त्वाचा मुद्दा तो नाही. कदाचित पंतप्रधानांचा हेतू, खोल आणि विधायक अर्थाने राजकीय असेल. त्यांना फक्त आपल्या तंत्रज्ञांचा आत्मविश्वास जागवायचा असेल. त्यांनाही आपले विधान तर्कावर टिकणारे नाही याची जाणीव असणार (अशी आशा करू या). त्यामुळे पंतप्रधानांच्या ‘आत्मविश्वास’ जागवणाऱ्या उद्देशाचीच आपण समीक्षा करू या.
कोणत्याही संस्कृतीमध्ये मिथकांना महत्त्व असते. आपल्या संस्कृतीत गणपती ही विद्येची देवता मानण्यात येते. गणपती हा प्रत्यक्षात अस्तित्वात होता की नाही, हा गैरलागू प्रश्न आहे; पण अशा मिथकांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न अनेकदा होतो. येथे ही मिथके माणसांची मानसिक गरज भागवतात हे विसरले जाते. तुळशीमुळे हवा शुद्ध होते किंवा तुळशीचे औषधी गुणधर्म आहेत, हे आधुनिक विज्ञानाच्या आधारेही म्हणता येते; परंतु अंगणात वा बाल्कनीत तुळशी वृंदावन ठेवण्यामागे या हेतूंपेक्षा अधिक भावनिकतेला महत्त्व असते. अंगणातील तुळस आपली खोलवरची मानसिक गरज भागवत असते. माझी पणजी तुळशीची पूजा करत होती, आजीही करत होती, आई देखील करत होती, म्हणून मलाही अंगणात तुळस असावीशी वाटते. कोणत्या तरी गोष्टींचे सातत्य असणे याचा मानसिक आधार माणसाला हवा असतो. त्यात आठवणी असतात, भावना असतात आणि काही जणांसाठी तो श्रद्धेचा विषय असतो. या वैयक्तिक भावनांत गैर काही नाही; पण त्याचे स्पष्टीकरण हे त्याला शास्त्रीय आधार देऊन देण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या आत्मविश्वासाचे द्योतक नसते, तर ते आपल्या न्यूनगंडाचे द्योतक असते. पंतप्रधानांचा हेतू जरी भारतीयांचा आत्मविश्वास जागवण्याचा होता असे मानले तरी प्रत्यक्षात अत्यंत अतर्क्य आणि हास्यास्पद उदाहरणामुळे आपली अगतिकताच जगासमोर येते. उलट, आत्मविश्वास जागवण्यासाठी कुठकुठली साक्ष काढून दाखवण्याच्या प्रयत्नांमुळे आपल्या न्यूनगंडालाच बळकटी मिळते, कारण आपण ओढूनताणून काही तरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहोत याची आपल्याला जाणीव असतेच.
गणपतीच्या अस्तित्वाला वैधानिक आधार देण्याचा प्रयत्न गणपतीचे मिथकत्व, देवत्वच संपवतो. येथे संघर्ष श्रद्धा आणि विवेक यांच्यातील नसतो. श्रद्धेवर विवेक मात करत नाही. श्रद्धेवर न्यूनगंड मात करतो. या न्यूनगंडाचे मूळ सांस्कृतिक राष्ट्रवादात आहे. नरेंद्र मोदींची भूमिका सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारी आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाची तलवार ही दुधारी असते. ती आत्मविश्वास आणि न्यूनगंड एकाच वेळी जागे करते, कारण सांस्कृतिक राष्ट्रवाद आपल्या आत्मविश्वासाची मुळे शेकडोच नव्हे, तर हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या ‘पूर्वजांच्या’ कर्तृत्वात शोधतो.
आज जगातील बहुतांश ज्ञाननिर्मिती ज्या देशात होते, त्या देशाशी आपली तुलना याबाबत आपण करायला हवी. जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभावान लोक या देशात – अमेरिकेत – जातात, तेथील नागरिक होतात. अमेरिकनांच्या काही गटांना सांस्कृतिक राष्ट्रवादाची गरज असूही शकेल, पण एकूण अमेरिकी समाजाला आत्मविश्वास जागवण्यासाठी सांस्कृतिक राष्ट्रवादाची गरज लागत नाही, कारण त्यांचा वर्तमानच इतका नवोन्मेषशाली असतो, की त्याला भूतकाळात बघायची गरज नसते.. पण हे एकच कारण नाही. मुळात अमेरिका हे राष्ट्र जगातील विविध भागांतून आलेल्या लोकांनी वसलेले असल्यामुळे त्यांचा राष्ट्रवाद हा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असूच शकत नाही. ज्याला अमेरिकन संस्कृती म्हणता येईल ती सतत बदलणारी संस्कृती आहे आणि व्हाइट हाऊसमध्ये साजरी होणारी दिवाळी हे त्याचे उदाहरण ताजेच आहे. मुद्दा हा की, ‘आपण मुळात कोण?’ हा प्रश्न अमेरिकेच्या बाबतीत गैरलागू असतो.
सांस्कृतिक राष्ट्रवादी माणसाला मात्र हा प्रश्न सतत छळत असतो. वास्तविक पाहता भारत आणि अमेरिकेत एक लक्षणीय साम्य आहे. अमेरिकेप्रमाणेच हा देशदेखील जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक वंश आणि धर्माच्या लोकांनी बनलेला आहे. आपण बऱ्याचदा असे म्हणतो की, जागतिकीकरण भारताला नवीन नाही; पण आज तंत्रज्ञानामुळे वेगवान झालेल्या जागतिकीकरणाच्या काळातदेखील आपण सांस्कृतिक राष्ट्रवादी भूमिकेच्या प्रभावातून मुक्त व्हायला तयार नाही आणि म्हणून उथळ अभिनिवेश आणि अनावश्यक न्यूनगंडाच्या पाशातूनही बाहेर पडत नाही. हा न्यूनगंड ‘अनावश्यक’ अशासाठी की, आज अमेरिकेत होणाऱ्या ज्ञाननिर्मितीमध्ये भारतीयांचे मोठे योगदान असते. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात जगभर अनेक भारतीय आहेत.
आज जगात होणाऱ्या संशोधनावर (उदाहरणार्थ, हिग्ज बोसॉन ऊर्फ ‘देवकणा’चा शोध) कोणा एका राष्ट्राची छाप नसते. आपल्यापुढील खरा प्रश्न असा आहे की, भारतीय लोक अमेरिकेत वा अन्यत्र जे कर्तृत्व दाखवतात ते येथे भारतात का नाही दाखवत? हा प्रश्न भारतातील संस्थांच्या उभारणीशी निगडित आहे. संशोधनाला आवश्यक असे प्रोत्साहन व्यक्तीला देण्यात आपल्या संस्था अयशस्वी का ठरतात? या प्रश्नाला भिडण्याची गरज आहे आणि असे करण्यासाठीदेखील सांस्कृतिक राष्ट्रवादाने आजवर दाखविलेले अभिनिवेश हा एक मोठा अडथळा ठरेल, कारण त्यामध्ये व्यक्तीच्या स्वायत्ततेच्या मूल्याचा संकोच करणाऱ्या आपल्या संस्कृतीचे परखड विश्लेषण आवश्यक ठरेल. ते आपण सततपणे केले पाहिजे; पण न्यूनगंडाला शरण जाऊन पुराणांवर प्लास्टिक सर्जरी करण्याची मात्र अजिबात गरज नाही.

‘लोकसत्ता’च्या सौजन्याने

milind.murugkar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.