पुरुष: एक वाट चुकलेला मित्र

स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष?”
हा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव आहे. सुजाण पुरुषांची संख्या अजाण पुरुषाच्या तुलनेनं कमी आहे हे त्यांना यातून सुचवायचं होतं हे उघड आहे. आणि त्याचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. समाजात मोठा वर्ग अजाण असेल तर त्याच्या अजाणपणाला आपण हसणं, त्याची रेवडी उडवणं किंवा त्याच्यावर सातत्यानं टीका करत राहाणं हे मात्र सुजाणपणाचं लक्षण नाही.
मुस्लिम समाजात जो अप्रागतिकपणा आपल्याला जाणवत राहातो तो आपण समाजशास्त्रीय आणि आर्थिकद्दष्टया समजून घेतो. त्या समाजात शिक्षणाचा अभाव असल्यानं हे घडतं, जसजसा ज्ञानप्रसार होईल तसतसा तो समाज प्रागतिक बनत जाईल असं समाज-कार्यकर्ते आणि सुधारक नेहमी म्हणत असतात. झोपडपट्टयातील गलिच्छ वातावरणाला केवळ दारिद्र्य हे कारण नसून त्या वर्गातलं आरोग्यविषयक अज्ञान हेही आहे हे आपण सर्वांनी मान्य केलं आहे. ग्रामीण भागातलं अंधश्रद्धांचं प्रस्थ हेही अज्ञानातून निर्माण झाल्याचं आपण बोलतो. जिथं जिथं अज्ञान दूर करण्याचे प्रयत्न झाले तिथं तिथं अंधश्रद्धा मोठया प्रमाणावर कमी झाल्याची उदाहरणंही सांगतो. गुन्हेगाराच्या गुन्ह्यामागील कारणं देखील आपण त्याच्या अशिक्षितपणात, त्याच्या संस्कारात शोधतो आणि त्याचं मानसिक पुनर्वसन घडवून आणायला धडपडतो. पुरुषांना आरोपी किंवा गुन्हेगार ठरवताना मात्र स्त्रीवादी अशाप्रकारे वैज्ञानिक आणि समाजशास्त्रीय भूमिका घेताना दिसत नाहीत. हे असं का होतं?
स्त्रीवादी चळवळीतील एक मोठा वर्ग पुरुषांचा द्वेष करत आला आहे. पुरुषांविषयीच्या व्यक्तिगत कडवट अनुभवातून या स्त्रीवादी गटाची ही मानसिकता घडली असावी. दलित चळवळीतले कार्यकर्ते आणि स्त्रीवादी संघटनेतला हा अतिरेकी गट दोन्ही समाजाच्या एका समूहाबद्दल द्वेषमूलक मानसिकता घेऊन वावरताना दिसतात. ब्राह्मण समाजानं शंभर वर्षापूर्वी दलित वर्गावर भीषण अत्याचार केले; त्याला अत्यंत हीनपणे वागवलं म्हणून त्या वर्गातले बहुसंख्य नागरिक समाजातल्या आजच्या ब्राह्मणवर्गाविषयी सरसकट द्वेषभावना बाळगून आहेत. जातीय भावना न बाळगणारे ब्राह्मण त्यांना अवतीभोवती दिसत नसतील असं नाही पण ते त्यांचा अपवाद करत नाहीत. अगदी याच पद्धतीचं धोरण स्त्रीवादी अवतीभोवतीच्या पुरुषांबाबत अवलंबताना दिसतात. सरसकट पुरुषवर्गाकडे त्या द्वेषभावनेनं पाहाताना आढळतात. स्त्री चळवळीत अशा अतिरेकी स्त्रियांची संख्या दलितवर्गातल्या ब्राह्मणद्वेषी लोकांइतकीच आहे.
सुजाण पुरुष ही संकल्पनाच या स्त्रीवादी गटाला फँण्टसी वाटते. सुजाण पुरुषांचं प्रमाण समाजात कमी असलं तरी ते फँण्टसी वाटावं इतकं अस्तित्वहीन निश्चित नाही. या भावनेतून स्त्री-मुक्ती चळवळीला अकारण युद्धाचं रूप प्राप्त झालं आहे. या युद्धात स्त्री-पुरुष शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकल्याचं चित्र निर्माण झालं आहे. स्त्रीमुक्ती चळवळीनं पुरुषांविरूद्ध रणशिंग फुंकल्याचा आभास काही स्त्रीवादी लेखिकांच्या लेखनातून, जाहीर भाषणातून आणि एकूण अभिनिवेशातून जाणवत राहातो.
चळवळीच्या प्राथमिक अवस्थेत लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारची तंत्रं अवलंबण्याची गरज होती यात शंका नाही. पुरुषांच्या अनिष्ट वर्तनाकडे संपूर्ण समाजाचं, आणि खास करून स्त्री-वर्गाचं लक्ष वेधण्याची आवश्यकता होती. स्त्रीवर्गाच्या वाट्याला दुय्यम स्वरूपाचं जगणं आलं आहे ते पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हा मुद्दा स्त्री चळवळीनं सुरवातीच्या काळात अधिक जोरकसपणे अधोरेखित केला. यातही आक्षेपार्ह किंवा चुकीचं काही नव्हतं. किंबहुना हे वास्तव भेदकपणे समाजापर्यंत पोचवायची गरज होती. चळवळीतल्या अतिरेकी गटानं याचा विपर्यास केला. चळवळ पुरुषसंस्कृतीप्रधान समाजरचनेच्या विरोधात होती, पुरुषांच्या विरोधात नव्हती. समाजरचनेतील पुरुषी वर्चस्व नष्ट व्हावं अशी चळवळीची मागणी होती.
पुरुषप्रधान संस्कृती नष्ट करून स्त्रीप्रधान संस्कृती स्थापन करावी असं उद्दिष्ट चळवळीतल्या नेत्यांसमोर कधीच नव्हतं. स्त्री-पुरुष दोघांच्याही भावभावना, स्वातंत्र्य आणि आशा आकांक्षांची बूज राखणारी समाजव्यवस्था या मागणीचा ही चळवळ सतत पुरस्कार करत आली आहे. समाजात विषमताशून्य न्याय व्यवस्था निर्माण होण्यासाठी हे आवश्यक असल्याचं स्त्री-मुक्ती चळवळीच्या प्रणेत्यांचं म्हणणं होतं. आजही चळवळीतल्या मुख्य विचारधारेचं धोरण हेच आहे. पुरुषप्रधान संस्कृती नष्ट होऊन समाजात उभयवर्गाला समानतेनं जोखणारी व्यवस्था आकाराला यावी यासाठी स्त्री-मुक्ती चळवळवाल्यांचा लढा आजही चालू आहे.
पण प्रत्येक चळवळीत जहाल गट आपल्या आक्रमकतेनं माध्यमांचं लक्ष अधिक वेधून घेतो. या जहाल गटाच्या अतिरेकी विधानांनी आणि व्यवहारांनी चळवळीविषयी अकारण गैरसमज पसरत जातात. उभय वर्गात एक दरी निर्माण होते. दोन्ही गट एकमेकांकडे वैरभावनेनं बघू लागतात.
वास्तविक स्त्री-मुक्तीचा लढा स्त्रीवर्गानं एकट्यानं लढायचा लढा नाही. ती स्त्री-पुरुषांनी संयुक्तपणे लढायचा हा लढा आहे. विषमतेविरूद्धचा दलितांचा लढा दलित एकटे लढत नाहीत. समाजातल्या मध्यमवर्गी सवर्ण बुद्धिमंतांची साथ या लढ्याला वेळोवेळी मिळत आली आहे. स्त्री-मुक्तीचा लढा देखील विषमताहीन समाज निर्माण करण्यासाठी लढला जात असल्यानं त्यालाही समाजातल्या मानवतावादी, शहाण्या आणि सहिष्णु, समंजस पुरुषांच्या साथीची गरज आहे. चळवळीच्या नेत्यांना याची जाणीव आहे. लढ्याची व्यापकता ओळखून स्त्री-चळवळीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी विविध टप्यांवर आणि विविध पातळ्यांवर पुरुषवर्गाला सहभागी करून घेतलं आहे. स्त्रीवाद्यांमधल्या अतिरेकी गटानं या गोष्टीची जाणीव बाळगायला हवी.
विविध कला, वाचन लेखन, सामाजिक चळवळी यात रस घेणारा एक पुरुषवर्ग आहे. तो अल्पसंख्य असेल. पण स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-मुक्ती चळवळ यामागील संकल्पना त्याला तत्त्वत: मान्य आहे. थोडेफार मतभेद असले तर ते या संकल्पना व्यवहारात कशा उतरवायच्या यावर आहेत. या पद्धतीचे मतभेद स्त्रियांच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटना दरम्यानही आहेत. या अल्पसंख्य पुरुषगटाचा चळवळीला थेट हातभार नाही. पण आवश्यक तेव्हा स्त्री-संघटना त्यांची मदत घेतात. काही जणांनी एकत्र येऊन स्त्री चळवळीला पूरक असं कार्य करणाऱ्या पुरुष संघटनाही स्थापन केल्या आहेत. पुरुषांचा हा गट स्त्री संघटनांना वेळोवेळी साहाय्य करण्यासाठी पुढं सरसावतो. विशेष म्हणजे तेवढयावर समाधान न मानता स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्ररित्या कामही करतो.
स्त्रियांचं समाजातलं एकूण योगदान ज्यांना ठाऊक आहे ते पुरुष चळवळीतल्या स्त्रियांकडे स्नेहपूर्ण भावनेनं आणि कौतुकानं पाहात आले आहेत. ही मैत्रीपूर्ण भावना महत्त्वाची आहे. स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या चळवळीत आणि आंदोलनात हा मैत्रीभाव अनेकदृष्ट्या उपयोगी पडणारा आहे. पुरुषांचा एक गट अशा प्रकारच्या सहकार्याच्या भावनेनं स्त्रियांकडे, त्यांच्या चळवळींकडे पाहातो आहे हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे.
स्त्री-मुक्तीची चळवळही आज एका लहानशा वर्तुळात सीमित आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात या चळवळीचं म्हणावं तसं प्रतिबिंब पडलेलं नाही. ग्रामीण भागातली निरक्षर स्त्री आज पुरुषी व्यवस्थेला आवाज देत असलेली काही प्रमाणात तरी आढळते. शहरी भागात सगळा आनंद आहे. आज महाराष्ट्रातली मध्यमवर्गी स्त्री, तिच्या जाणीवा, तिच्या आवडीनिवडी, तिची मानसिकता जाणून घ्यायची असेल तर टीव्हीवरला “होम मिनिस्टर“ कार्यक्रम पाहावा. महाराष्ट्रीय स्त्रीची खरोखरीची प्रतिमा या कार्यक्रमातल्या स्त्रियांच्या बोलण्यावागण्यातून, पोशाखातून यथार्थपणे उभी राहाते.
हारून-अल-रशीद ज्याप्रमाणे वेषांतर करून शहरात हिंडायचा आणि लोक पश्चात आपल्याविषयी काय बोलतात हे जाणून घ्यायचा. त्याप्रमाणे स्त्री-मुक्ती चळवळीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले समाजसेवी गणवेष उतरवून सिल्कच्या झगमगीत साडया नेसून या समाजात मिसळलं पाहिजे; ‘होम मिनिस्टर“ कार्यक्रमाच्या शूटींगला हजर राहिलं पाहिजे, मंगळागौर समारंभात सामील झालं पाहिजे. आपण कुठं आहोत आणि समाज कुठं याचं भान त्यांना या प्रयोगातून येईल. आपली चळवळ समाजात कुठवर पोहोचली आहे ते कळेल.
वास्तव फार निराशाजनक आहे. फार मोठा समाज स्त्री-मुक्ती आणि स्त्रियांच्या इतर चळवळींपासून आलिप्त आहे. यात पुरुष तर आहेतच पण स्त्रिया देखील मोठया संख्येनं आहेत. सर्वसाधारण पुरुषात स्त्रियांच्या चळवळींविषयी फार चित्रविचित्र समज आहेत. चळवळी संदर्भात पुरुषवर्गात सरसकटपणे ऐकायला येणाऱ्या प्रतिक्रिया कशा आहेत तर . .
‘ही स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली चळवळ आहे. त्यांचं काय ते त्या बघून घेतील. आपल्याला या भानगडीत पडायचं कारण नाही.“
‘ज्यांना कामधंदा नाही त्या स्त्रिया अशा चळवळी चालवताहेत.“
‘या मंडळींचे संसार मोडले आहेत त्या आता दुसऱ्यांच्या संसारात विष कालवू पाहताहेत.“
‘टाळी एका हातानं वाजत नाही. स्त्रियाही स्वार्थी असतात. त्याही नवऱ्यावर आणि कुटुंबातल्या इतरांवर अत्याचार करतात. स्त्री-मुक्तीवाल्यांना फक्त स्त्रियांवरले अत्याचार दिसतात.“
‘असमानता ही निसर्गातच आहे. निसर्गानंच स्त्रियांवर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. तुम्ही निसर्गाच्या विरूद्ध जाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.“
पुरुषांच्या या अज्ञानमूलक विधानांना घरातल्या सर्वसाधारण स्त्रीवर्गाचा दुजोरा असतो. रूढी, परंपरा आणि पुरुषी वर्चस्वातून निर्माण झालेली मानसिकता यातून त्यांची जडणघडण झाल्यानं त्याही अंधपणे पुरुषांनी निर्माण केलेली विचार संस्कृती स्वीकारतात. पुरुषांची द्वेषमूलक भूमिका अज्ञानातून जन्माला आली आहे हे ज्यांना मान्य आहे त्यांनी पुरुषांवर दोषारोप करण्यात वेळ न गमावता अज्ञानाचा हा अंधकार कसा हटवता येईल हे पाहिलं पाहिजे. स्त्रियांना शिक्षित करण्यावर आजवर स्त्री चळवळींचा भर राहिला आहे, आता पुरुषांना शिक्षित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. मैत्रीभावनेची गरज इथंच भासते. शिक्षणाच्या प्रभावी प्रसारासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मैत्रीचं नातं असण्याची गरज आहे, असा विचार आता पुढं येऊ लागला आहे. आणि इथंच मोठा पेच आहे.
स्त्री-पुरुषात लग्नं होत असली, प्रेमं घडत असली तरी मैत्रीचा चांगलाच अभाव आहे. पती-पत्नीत दीर्घ सान्निध्य आहे; व्यावहारिक जवळीक आहे पण मैत्रीचं नातं नाही अशाही चमत्कारिक गोष्टी आता लक्षात येऊ लागल्या आहेत.
स्त्री-वर्गाविषयी असलेल्या गैरसमजांना वास्तवाचा आधार नाही; अशाप्रकारे गैरसमज बाळगणं हे अंतिमतः आपल्याच हिताच्या आड येणारे आहे हे जेव्हा पुरुषांना समजेल; स्त्री-हिताच्या चळवळी मूलत: मानवहिताच्या मानवतावादी चळवळी आहेत हे जेव्हा त्यांना पटेल तेव्हा स्त्री चळवळीत पुरुषांचा मोठा गट सामील होईल. आपण एकट्यानं हे जग बदलू हा अभिनिवेश चळवळीतल्या ज्या स्त्रियांपाशी आहे त्यांना कदाचित हे निरीक्षण कदाचित पटणार नाही.
तू मुँह खोलेगी तो जमाना बदलेगा…या सारखी विधानं स्त्रीवर्गात जागृती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ठीक आहेत. पण चळवळीला पुढं नेण्यासाठी या रोमॅंटिक अवस्थेतून स्त्री नेतृत्वाला बाहेर यावं लागेल. वीरश्री निर्माण करण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा उपयोग होत असेल. पण लढाई जिंकण्यासाठी ती उपयोगी पडत नाहीत हे सर्वांना ठाऊक आहे. आज स्त्री-मुक्ती, स्त्री-समस्या यावर अनेक स्त्रिया आपापल्या परीनं अनेक ठिकाणी लिहिताहेत. स्त्री समस्यांना, स्त्री विचारांना वाहिलेली मासिकं, साप्ताहिकं आहेत. विभावरी शिरूरकरांपासून ते गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे, मंगला आठलेकर, अंबिका सरकार, सुकन्या आगाशे, कविता महाजन यासारख्या कितीतरी लेखिका आहेत, ज्यांनी अत्यंत समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यातून स्त्री-प्रश्नांची सर्जनशील मांडणी केली आहे. थोडक्यात: स्त्रियांनी तोंडं उघडली आहेत, लेखण्याही सरसावल्या आहेत. पण वाचतो कोण?
स्त्रियांनी तोंड उघडलं तरी तिची वेदना ऐकू येण्यासाठी समाजापाशी संवेदनशील कान हवेत; तिच्या मानसिकता जाणण्याची इच्छा असणारं मन हवं. मोजके अपवाद वगळता पुरुषवर्गात या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. कायदा करून, वटहुकूम काढून पुरुषवर्गात या गोष्टी निर्माण करता येतील का?
समंजसपणा निर्माण करण्याचं काम समंजसपणेच करावं लागेल. पुरुषाशी मित्रत्वाचं नातं जोडणं हाच त्यावर उपाय दिसतो. पुरुषांविरूद्ध तलवारी उपसून, ‘हल्ला बोल“ चे नारे देऊन, सर्वंकष बंडाची भाषा उच्चारून दहशत निर्माण करता येईल, समाजाचं ( आजच्या काळात प्रसार माध्यमांचं ) लक्ष वेधून घेता येईल. पण त्यानं पुरुष प्रबोधनाचा हेतू साध्य होईल का? स्त्रियांमधल्या जहाल गटांनी आणि त्यामागे फरफटत जाणाऱ्या इतर स्त्री संघटनांनी याचा विचार करावा.
काचोळ्या जाळून स्त्रीवादी संघटनांनी आपल्या चळवळीची सुरवात नाट्यपूर्ण केली. त्यावेळी अशा धक्कादायक कृतीची गरजही होती. आज पस्तीस वर्षानंतर खूप काही बदललं आहे. पुरुष मानसिकतेत मात्र म्हणावा तसा फरक पडलेला नाही. स्त्री-समस्यांविषयी पुरुष-समाज अजून बेफिकीर आहे. यात वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, राजकीय विश्लेषक, समीक्षक अशा सगळ्या उच्च विद्याभूषितांचा समावेश आहे. स्त्रिया आणि स्त्री-चळवळी यांच्याविषयी या मंडळींचे द्दष्टिकोन धक्कादायक आहेत. शिक्षण माणसांना विशिष्ट विषयाचा तज्ज्ञ बनवतं, सर्वज्ञ बनवत नाही आणि सुशिक्षित, आदर्श मानवही बनवत नाही. परस्पर आदरभावना, मानवतावादी मूल्याविषयी आस्था, संवेदनशीलता यांच्याशी आजच्या शिक्षणाचा काही संबंध उरलेला नाही.
या बुद्धीकुशल पुरुष जमातीला एका कविनं आपल्या एका कवितेत सुनावलं आहे. तो म्हणतो:
कशासाठी हे लोलक लावताय आकाशात दूरवर पाहण्यासाठी?
साध्या जवळच्या बायका न त्यांची मनं पाहू शकत नाही तुम्ही.
आपल्या आसपास काय आहे, पायाखाली काय आहे हे पाहायचंच नाही असं ठरवलेली ही परंपरावादी पुरुष मंडळीं. शालेय मुलांना नव्हे तर त्यांच्या या बुद्धिमंत पालकांना मूल्यशिक्षण देण्याची आज गरज आहे. स्त्रियांना सक्षम करण्याविषयी बरंच बोललं जातं. ते ठीकच आहे. पण पुरुष सक्षम असल्याचं आपण कोणत्या आधारे गृहीत धरलं आहे हे कळायला मार्ग नाही. स्त्रीवादी संघटनांनी आता या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे.
पुरुष मानसिकतेवर दोषारोप करत राहिल्यानं काही साध्य होईल असं वाटत नाही. या मानसिकतेमागील समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय कारणं सोधून काढण्याचे प्रयत्न स्त्रियांना करावे लागतील. पुरुषांचं वैज्ञानिक रसायन अभ्यासावं लागेल. मानवी उत्क्रांती-विज्ञानात यासाठी उतरावं लागेल. जेनेटिक्सच्या अंगानंही पुरुष जडणघडणीचा वेध घ्यावा लागेल. पूर्वग्रहदूषित द्दष्टी या कामाला उपयोगी नाही. संशोधकाच्या निष्ठेनं हे काम करावं लागेल. स्त्री-पुरुष दोन्ही घटकांनी संयुक्तपणे हाती घ्यायचा हा उपक्रम आहे. खरं तर स्त्रियांचे सर्व लढे स्त्री-पुरुषांनी एकत्र लढण्याची वेळ आज आली आहे.
तुम्ही आलात तर ठीक नाही आलात तर आम्ही एकट्या लढू असे हट्टी आवेशपूर्ण धोरण इथं उपयोगाचं नाही. अधिकाधिक पुरुष या चळवळीमागे उभे राहतील तर ते उभयतांच्याच फायद्याचे आहे. चळवळीतल्या स्त्रियांना पुरुषांबरोबरच्या व्यवहाराचा कटू अनुभव आहे कबूल; पण व्यक्तिगत अनुभवाचा राग त्यांनी तमाम पुरुष जातीवर काढू नये.
सगळे पुरुष अमानुष आहेत अशी स्थिती खरोखर आहे काय? आणि जे कोणी अमानुष वर्तन करताहेत, त्यांच्यापैकी बऱ्याचजणांना आपण अमानुष वागत आहोत याची जाण तरी आहे का? अमानुषतेची बीजं पुरुष प्रधान संस्कृतीत आहेत हे खरं मानलं तरी ही संस्कृती नावाची गोष्ट आजच्या एकट्यादुकट्या पुरुषानं निर्माण केलेली नाही. परंपरेनं ती समाजावर लादली आहे. आणि माणूस परंपरेचा गुलाम असतो. पण हे तरी खरं आहे का? कालबाह्य आणि वाईट परंपरा समाजानं वेळोवेळी धुडकावून लावल्याचं इतिहास सांगतो. आहेत. मग पुरुषप्रधान संस्कृतीची परंपरा पुरुषानं धुडकावून का नाही लावली असा प्रश्न निर्माण होतो.
याचं उत्तर माणसाच्या स्वार्थी आणि स्वकेंद्रित वृत्तीत सापडेल. ज्या परंपरांमुळे पुरुष जमातीला सोयी-सुविधा आणि वरचढपणा प्राप्त झाला आहे त्या टिकवण्याकडे तिचा कल असणारच. आज स्त्रीवादी चळवळीत समाजशास्त्र, संस्कृती, मानववंशशास्त्र याचा अभ्यास असलेल्या विदूषी आहेत. पुरुषी वर्चस्वाच्या या नैसर्गिक कारणमीमांसेवर त्यांनी विचार केला नसेल असं नाही. पण त्यांच्या लढ्यात, पुरुषवर्गाविषयीच्या सर्वसाधारण धोरणात त्याची छाया दिसून येत नाही. स्वार्थाचाच एक भाग म्हणून स्त्रीवादी चळवळीमागे उभं राहिलं पाहिजे हे त्या पुरुषवर्गाला नीटपणे पटवू शकलेल्या नाहीत.
स्त्री चळवळीचा उद्देश केवळ कुटुंबात नव्हे तर संपूर्ण समाजात निर्भय आणि निकोप वातावरण निर्माण करायचा आहे हेच अनेक पुरुषांना (आणि स्त्रियांना देखील) आज ठाऊक नाही. चळवळीबद्दलचे गैरसमज दोन्ही वर्गात आहेत. परस्पर स्नेहाचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय ते दूर होणार नाहीत. स्त्रिया आणि समाजातले शहाणे पुरुष यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडते. हळूहळू इतर पुरुष त्यांना साथ द्यायला पुढं सरसावतील; स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात पसरवू लागतील. समाजातल्या मुख्य-प्रवाहातील स्त्री-पुरुष सहभागी झाल्याशिवाय या कामाला वेग येणार नाही.
स्त्री-जागृतीच्या कार्यात आघाडीवर असलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकात सुनंदा कर्नाड यांचं एक पत्र प्रसिद्ध झालं आहे. त्यात त्या म्हणतात, “घरात बायकोला तुच्छतेनं वागवणारा माझ्या पुण्यातील मैत्रिणीचा नवरा मला कैकेयी म्हणतो, कारण मी कान फुंकल्यामुळे ती आज नवऱ्याचा माज उतरवण्याइतकी धीट झालीय आणि स्वतंत्रपणे आपला निर्णय घेते.” कान फुंकल्यामुळे असा बदल घडून येत असेल तर कान फुंकण्याचं हे काम लाज शरम न बाळगता मोठया प्रमाणावर हाती घेतलं पाहिजे. आणि केवळ स्त्रीनं स्त्रीचे कान फुंकण्यापुरती ही मोहीम मर्यादित ठेवून चालणार नाही. स्त्रीनं आपल्या पुरुष मित्राचे आणि त्या मित्रानंही त्याच्या मैत्रिणीचे कान फुंकायला हवेत.
पत्रातल्या पुरुषाची प्रतिक्रिया आज पुरुष कोठे आहेत हे सूचित करणारी आहे. पुरुषाला प्रबोधन करणाऱ्या नियतकालिकांची किती निकड आहे हे यावरून स्पष्ट व्हावं. मात्र परस्परांविषयी आकस न बाळगता हसतखेळत हे प्रबोधन व्हायला हवं.
उभयतांनी शत्रूत्वाच्या भावनेला तिलांजली देणं ही आजची खरी गरज आहे. चळवळीचा पुढील प्रवास सुकर होण्यासाठी हे लवकरात लवकर घडून येणं आवश्यक आहे. तुच्छता, द्वेष, मत्सर, आकस यांनी मानवापुढील कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. स्त्री-पुरुषांना संघर्ष करायचा आहे तो स्वत:च्याच सनातन वृत्ती-प्रवृत्तींशी. चळवळी वरकरणी स्त्रियांच्या असल्या तरी त्या स्त्री-पुरुषांनी संयुक्तपणे चालवण्यावर भर देणं हे स्त्री-मुक्ती चळवळीचं पुढलं पाऊल का असू नये?
मित्रत्वाची साद म्हणून स्त्री संघटनांनी पुरुष कार्यकर्त्यांना आपल्या संघटनात ३३ टक्के आरक्षण द्यावं. आज जे शहाणे पुरुष चळवळीला बाहेरून पाठिंबा देत आहेत. ते संघटना कार्यात सहभागी झाले तर चळवळीला लाभदायकच ठरणार नाही का? स्त्री संघटनांनी स्त्रियांची चळवळ स्त्रियांची मानू नये ती संपूर्ण समाजाची मानावी. पुरुषांची साथ घेण्यात आपला पराभव मानू नये. हे अपयश नसून स्त्री चळवळीचा हा नवा अध्याय मानावा. सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून मायावतीनं ब्राह्मण समाजाला राजकीय आघाडीत सामावून घेतलं. यामागे मायावतीचं धूर्त राजकारण असेल. पण सैद्धांतिक पातळीवर तो एक चांगला प्रयोग होता हे मान्य करायला हरकत नाही. तेव्हा प्रयोग म्हणून तरी स्त्री वर्गानं आपल्या सामाजिक चळवळीत समविचारी पुरुषांना सहभागी करून घ्यावं.
‘दूरके कॉरले निकट बॉंन्धू पॉरके कॉरले भाई’ असं रवींद्रनाथांनी गीतांजलीत ईश्वराला उद्देशून म्हटलंय. आपण स्त्री-चळवळीतल्या आपल्या कार्यकर्त्या मैत्रिणींना या धर्तीचं आवाहन करूया. त्यांनी विचारानं दूर असलेल्या पुरुषांशी वैचारिक जवळीक साधावी. समविचारी नसणाऱ्यांना विश्वासात घेऊन समविचारी बनवायचा प्रयत्न करावा. समोरच्या पुरुषांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहावं. वाटल्यास त्यांनी त्याला वाट चुकलेला मित्र म्हणावं. अर्थात स्त्रियांच्या या मैत्रीपूर्ण हाकेला प्रतिसाद देण्यासाठी पुरुषाकडे किमान सुजाणपण हवं.
इथं स्त्रीवादी कार्यकर्तीनं सुरवातीला विचारलेल्या प्रश्नाची आठवण होते. ‘सुजाण पुरुष आहे तरी कुठे?“
असा पुरुष खरोखरच आसमंतात नसेल तर स्त्रियांना तो निर्माण करावा लागेल. म्हणजे आजच्या स्त्रीवर दुहेरी जबाबदारी आहे.
तिला पुरुषाला आपला मित्र बनवायचा आहे आणि त्याला सुजाणही करायचं आहे.

‘ऐसी अक्षरे’, दिवाळी अंक २०१४ सौजन्याने

awdhooot@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.