भोंदू ‘भगवान’, भोळे भक्त!

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर एक निरागस बाल्य विलसत असते. डोळ्यांत मायेचा अपार सागर दडलेला दिसतो. त्यांनी हात उचलताच तेजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्यांच्या हास्यातून प्रेमाचे झरे ओसंडू लागतात. तोच विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे असे भासू लागते. त्याच्या चमत्कारांनी असंख्य आजार बरे होतात, त्याच्या कृपाप्रसादाने निपुत्रिकांना संतानप्राप्ती होते, निर्धनांना धनलाभ होतो. भौतिक समस्यांचे सारे डोंगर भुईसपाट होतात. त्याच्या दैवी शक्तीचा सर्वत्र बोलबाला सुरू होतो आणि संसारतापाने पोळलेल्यांची त्यांच्या दारी मुक्तीसाठी रीघ लागते. त्यांचा एक कृपाकटाक्ष व्हावा, यासाठी ताटकळण्याचीही त्यांची तयारी असते. त्यांचा सहवास लाभला, मस्तकावर त्यांचा हस्तस्पर्श फिरला, प्रसादाचा लाभ झाला, की भौतिक जगातील सारी दु:खे जणू झटक्यात दूर होऊन जातात आणि स्वर्गीय सुखाच्या अनुभूतीने मन आत्मानंदी रंगू लागते. या अनुभूतीचे दाखले इतरांनाही दिले जातात आणि समस्यामुक्तीच्या शोधात भरकटणारे हजारो आत्मे बाबांच्या चरणी लीन होतात. आपल्याजवळ असलेले सारे काही बाबांच्या पायाशी ओतण्याची त्यांची तयारी असते. एकदा अशा समर्पणभावाने भारलेल्या भक्तांची फौज तयार झाली, की बाबांच्या आश्रमाभोवती नवनवे उपक्रमही सुरू होतात. एखादा बाबा रुग्णालय सुरू करतो, कुणी योगशिक्षणाचे वर्ग सुरू करतो. कुणी आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करतो आणि बाबांच्या समाजोपयोगी कामाने भक्तगण आणखीनच भारावून जातात.
अशा रीतीने, आधुनिक युगातील एक एक स्वयंप्रकाशी महापुरुषाचा उदय होऊ लागतो आणि भक्तसमुदायाच्या पाठिंब्यावर हा आधुनिक देव महान होऊ लागतो. त्याचा जन्म, जगणे हा जणू चमत्कार होऊन जातो. बाबाच्या आयुष्याला चमत्काराच्या कहाण्या चिकटू लागतात.
अशा बाबांचा आता सुळसुळाट झाला आहे. भक्तांच्या तिजोरीच्या चाव्या पायाशी खेळविणाऱ्या अनेक बाबांचे पितळ उघडे पडू लागले तरीही भक्तपरिवाराची त्यांच्यावरील श्रद्धा अभंगच आहे. ‘भगवंतालाही आत्मक्लेश सहन करावे लागतात’, असा भोंदू संदेश देत हे भुक्कड भगवंत आपल्या साम्राज्याचे दगड मजबूत ठेवण्यासाठी गजाआडूनही धडपडताना दिसताहेत. देवत्वाचा शिक्का कपाळावर मिरवत पशूलाही लाजविणारी कृत्ये करणारे हे बाबा असतात तरी कोण? महापुरुष, माफिया, लिंगपिसाट, देव, की देवदूत? ही सारी रूपे बेमालूमपणे वठवत, ‘आपण केवळ निमित्तमात्र’ असल्याचा आव आणणाऱ्या या भोंदूबाबांची साम्राज्ये उघडउघड उभी राहात असताना, त्यांच्या कारनाम्यांचा साधा सुगावादेखील सरकारी यंत्रणांना का लागत नाही? किंबहुना, सरकारी यंत्रणांमधील उच्चपदस्थांची मांदियाळीच अशा बाबांच्या चरणाशी लीन होऊन कृपायाचना करताना का दिसू लागते? अशी कोणती शक्ती या बाबा-बुवांच्या अंगी असते, जिच्यापुढे साऱ्या यंत्रणा ढिल्या पडू लागतात?
याचे सरळ उत्तर एकच आहे. ते म्हणजे, ज्या बाबा-बुवाच्या मठ-आश्रमांच्या दारी भाविकांची अखंड वारी, तो बाबा महान. त्याची कीर्ती पसरू लागते आणि त्याच्या चरणाशी साऱ्या यंत्रणाही लोळण घेऊ लागतात, कारण त्याला दुखावणे म्हणजे त्याच्या असंख्य अनुयायांच्या भावनांना थेट हात घालणे, त्यांची नाराजी ओढवून घेणे. असे केले, तर बाबा-बुवांचा रोष ओढवणार आणि त्यांची अवकृपा झाली, तर त्यांचे असंख्य भक्तदेखील दूर होणार. त्याचा थेट परिणाम मतपेटीवरच होणार, या साध्या गणितापायी बाबा-बुवांची साम्राज्ये सुखाने फोफावत चालली आहेत.
हरियाणातील हिसार जिल्हय़ातील बाबा रामपाल नावाच्या स्वयंघोषित भोंदूला अटक झाली आणि अशा कथित महापुरुषांनी व्यवस्थेला केवढा जबरदस्त विळखा घातला आहे, त्याचे वास्तव पुन्हा उजेडात आले. सरकारी नोकरीत कनिष्ठ अभियंता असलेल्या या रामपालबाबाला आपण कबीराचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला आणि नोकरी सोडून 1999 मध्ये त्याने सतलोक आश्रमाची स्थापना केली. तेव्हापासून त्याच्याभोवती गूढ वलय दाटत गेले. आज 12 एकरांवरील त्याच्या पंचतारांकित आश्रमात एक लाख लोक महिनाभर जेवण करू शकतील एवढा धान्यसाठा सापडला आहे. त्याच्या आलिशान आश्रमात सापडलेल्या गर्भनिरोधकांचे गूढ उकलण्यात आता तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सुमारे 25लाख लोक त्याच्या भजनी लागले असावेत, असा अंदाज आहे. भजनी लागलेल्या भाविकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवत स्वत:च्या लैंगिक विकृतीचे उदात्तीकरण हा अनेक बाबांच्या धंद्याचा मूलमंत्र असल्याचे काही प्रकरणांत दिसून आले आहे. तरीही रामपालबाबावरील कारवाईच्या वेळी हजारो लोकांनी त्याच्याभोवती संरक्षक कवच उभे करून प्रतिकार केला. हे त्याचे भक्त होते, की बंदिवान होते, याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे.
पुण्यसंचयासाठी ज्याच्या दारी हजारोंची रीघ लागते, तो बलात्कारी असतो, बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा डाग त्याच्या कपाळावर दडलेला असतो, महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि हत्या, अपहरणासारख्या गुन्हय़ांचा ठपकाही त्याच्या स्वयंघोषित दैवी आयुष्याला लगडलेला असतो. रामपालला अटक झाली, त्याच्या काही महिने अगोदर, आसाराम बापू नावाच्या एका स्वयंघोषित आध्यात्मिक बाबाला गजाआड जावे लागले. त्याच्या ‘कृष्ण’लीला उजेडात येऊनही, त्याच्या भजनी लागलेल्या भक्तांसाठी आसाराम हा कृष्णावतारच आहे. लैंगिकतेचा खुला पुरस्कार हेच जणू त्याचे अवतारकार्य होते. एका 15 वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणातून आसारामाच्या लीला उजेडात आल्या आणि तो गजाआड गेला. त्याआधी त्याच्या गुजरातमधील आश्रमातील दोन मुलांचे कुजलेले मृतदेह साबरमतीच्या तीरावर आढळले होते. या गूढ मृत्यूमुळे आसाराम भोवतीचे संशयाचे ढग गडद झालेच होते. तरीही, आसाराम हा असामान्य संत असल्याचा डांगोरा त्याचे भक्तगण पिटतच आहेत. देशभरात जवळपास सव्वाचारशे आश्रम आणि 50 हून अधिक गुरुकुल शाळांचा पसारा असलेल्या आसारामबापूवर आणि त्याच्या मुलावर संपत्ती आणि मालमत्ता हडप केल्याचाही आरोप आहे.
आसारामसारखाच एक स्वयंघोषित अवतार कर्नाटकातील बंगलोरजवळील बिदादी येथे उदयाला आला होता. स्वत:ला स्वामी नित्यानंद म्हणविणारा हा भोंदू 2010 मध्ये एका स्थानिक टीव्ही वाहिनीवर एका तमीळ अभिनेत्रीसोबत नको त्या स्थितीत लोकांना दिसला आणि त्याचे कारनामे उजेडात येऊ लागले. आरती राव नावाची एक भारतीय वंशाची अमेरिकन महिला त्याच्या जाळ्यात फसली होती. तिने त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे जाहीर आरोपही केले होते. मात्र नित्यानंदने हे आरोपही फेटाळून लावले. तिच्या तक्रारीवरून नित्यानंदला अटक झाली; पण 53 दिवसांनंतर तो बाहेरही आला. आपल्या ‘भगवंतमुखा’तून निघणाऱ्या प्रवचनवाणीने भक्तांवर मोहिनी घालणाऱ्या या स्वामीला, ‘माइंड बॉडी स्पिरिट’ नावाच्या नियतकालिकाने ‘जगातील सर्वात प्रभावशाली 100 आध्यात्मिक गुरूं’च्या मालिकेत बसवून गौरविले होते. 27 भाषांमध्ये 300 पुस्तके लिहिणारा हा ‘स्वामी’ वास्तव जीवनात मात्र ‘भिकार चाळे’ करणाराच निघाला.
‘आध्यात्मिक गुरू’ म्हणवून घेणाऱ्यांच्या पंथातील ज्या काही बाबांनी राजकारणावरही आपल्या प्रभावाची मोहिनी घातली होती, त्यामध्ये बाबा रामदेव या योगगुरूचेही नाव घेतले जाते. योग प्रसारकार्य करणारा हा गुरू, राजकीय भाष्य करण्यातही नेहमी आघाडीवर असतो. देशविदेशात पसरलेल्या ‘हाय प्रोफाइल’ भक्तगणांचा मोठा परिवार पाठीशी असल्याने रामदेव बाबा हे राजकारणातील ‘बडे प्रस्थ’ ठरले असून अलीकडेच या संन्याशाला सरकारी ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्यात आली आहे. जून 2011 मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावरील त्यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसी फौजा दाखल होताच साडी नेसून बाबांनी पळ काढला होता, याची आठवण अजूनही अनेकांच्या मनात ताजी आहे. काळ्या पैशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या रामदेव बाबांनी करचुकवेगिरी केल्याचा, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आणि वीजचोरी केल्याचा आरोप ‘तहलका’ या नियतकालिकाने केल्यानंतर रामदेव बाबांच्या व्यवहारांभोवती गूढ वलय निर्माण झाले. रामदेव बाबांच्या ट्रस्टमार्फत चालविल्या जाणाऱ्या दिव्य फार्मसी’ या औषध कंपनीतील उत्पादनांमध्ये मानवी आणि प्राण्यांच्या हाडांचा वापर केला जात असल्याचा आरोप करून माकपच्या वृंदा करात यांनी खळबळ माजविली होती.
बाबा रामपालचे अनुयायी आणि आर्य समाजचे कार्यकर्ते यांच्यातील संघर्षांतूनच रामपालचे कारनामे उघड होत गेले. याच आर्य समाजचे एक विचारवंत नेते म्हणून स्वामी अग्निवेश यांचा राजकारणातही प्रभावी उदय झाला. हरियाणातील आमदारकीपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या या स्वामींनी चित्रवाणीवर गाजलेल्या ‘बिग बॉस’च्या घरातही काही दिवस घालविले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अण्णांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेल्या या स्वामींचे पुढे काही बिनसले आणि त्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासूनच फारकत घेतली. हजारे यांच्यावर कारवाई करावी असे सरकारमधील एका वरिष्ठ व्यक्तीस सुचवितानाच्या त्यांच्या व्हिडीओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. हा व्हिडीओ बनावट असल्याचा बचाव अग्निवेश यांनी केला; पण त्यांना चौफेर टीका झेलावी लागली.
राजकारण्यांचे ‘तांत्रिक गुरू’ म्हणून ख्याती मिळविलेले चंद्रास्वामी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व होते. आर्थिक गैरव्यवहारांचा शिक्का कपाळावर बसलेल्या चंद्रास्वामी यांचे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. परकी चलन कायद्याच्या भंगप्रकरणी त्यांना सुमारे नऊ कोटींचा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. लंडनमधील एका व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी त्यांना 1996 मध्ये अटक झाली होती. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात चंद्रास्वामी यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या जैन आयोगाने आपल्या अहवालात चंद्रास्वामींवर काही पाने खर्ची घातली; पण अद्यापही त्यांच्या सहभागाबाबतचा कोणताच निश्चित निष्कर्ष निघू शकलेला नाही. या कटाच्या आर्थिक बाजूमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून तपास सुरूच आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यापासून कुख्यात शस्त्रास्त्र तस्कर अदनान खशोगीपर्यंत अनेकांचे तांत्रिक गुरू म्हणून त्यांची ख्याती आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या पंतप्रधानपदाचे भाकीतही त्यांनी अगोदरच वर्तविले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते नटवर सिंह यांनी केला आहे. मध्यंतरी काही काळ काहीसे मागे पडलेल्या चंद्रास्वामींचा दरबार आता पुन्हा सजू लागला असून अनेक पक्षांचे नेते आपली कुंडली घेऊन चंद्रास्वामींच्या दरबारात हजेरी लावत असल्याचे बोलले जाते.
पंजाबमध्ये 1949 साली ‘डेरा सच्चा सौदा’ नावाच्या एका आध्यात्मिक संघटनेची स्थापना झाली. समाजसेवा आणि धर्मप्रसार या उद्दिष्टाने ही संघटना काम करते, असे सांगितले जाते. संघटनेचे सध्याचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह यांना या पंथाचे अनुयायी ईश्वराचा अवतार मानतात. डोळे दिपविणारी सांपत्तिक स्थिती असलेल्या या धर्मगुरूने अवैध मार्गाने 300 कोटींहून अधिक मालमत्ता जमविल्याचाही आरोप आहे. आसाराम बापूंवर बलात्काराचा आरोप झाल्यावर त्यांच्या बचावाकरिता धाव घेणाऱ्या संतावरही महिला अनुयायांच्या लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. मुंबईतील मुलुंड उपनगरातील गोळीबार प्रकरणानंतर डेरा सच्चा सौदा हे नाव मुंबईतही चर्चेत आले. राम रहिम सिंह यांच्या अनुयायांनी हा गोळीबार केल्याचा आरोप केला जातो. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.
देशात बहुचर्चित असलेल्या आधुनिक संतांच्या मांदियाळीत श्री श्री रविशंकर यांचे नाव अग्रक्रमावर आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’- म्हणजे जगण्याची नवी शैली शिकविणारे श्री श्री रविशंकर ‘योगी’ म्हणविले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचा उल्लेख ‘श्रीमान योगी’ असाच करावा लागेल.500 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक असलेला हा गुरू, जनतेला जगण्याची कला शिकवितो. पौराणिक कथाकथन करून धर्मभावाचा प्रसार करणारे मोरारी बापू यांच्याकडेही 300 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे बोलले जाते. ही सारी संपत्ती दानाच्या स्वरूपात प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
माणसाच्या अंगी दैवी शक्ती कुठून येते?. आपल्या भक्तांची मती हा मानवी भगवान चमत्काराने कशी गुंग करून टाकतो? असे चमत्कार खरेच शक्य असतात का? अशा प्रश्नांवर वादविवाद होत असले, तरी पुट्टापर्थीचे सत्य साईबाबा हे साक्षात साई अवतार आहेत आणि त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. सत्य साईबाबा यांच्या आश्रमावरही अशीच श्रीमंतीची झळाळी दाटलेली दिसते. ते हयात असतानाच्या त्यांच्या चमत्कारांच्या अनेक कथा अजूनही रंगवून वर्णन केल्या जातात. राजकीय वर्तुळातील अनेक बडय़ा नेत्यांचे गुरू असलेले सत्य साईबाबा यांच्या राजकीय गुरूचे रूप माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या पाद्यपूजा सोहळ्यामुळे महाराष्ट्राला अनुभवता आले. सत्य साईबाबांच्या निधनानंतर त्यांच्या आश्रमातील संपत्तीची मोजदाद करताना अनुयायी थकून गेले होते, असे सांगतात. सत्य साई ट्रस्टची मालमत्ता 40 हजार कोटींच्या घरात असावी, असा अंदाज वर्तविला जातो.
धर्म हा भारतीय जनजीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. जनतेच्या धार्मिक भावनांचे आणि अंधश्रद्धांचे भांडवल करून अनेक बाबा-बुवांनी आपापली दुकाने थाटली आणि गोळा केलेल्या मायेच्या जोरावर राजकारणापासून अन्य अनेक क्षेत्रांवर आपली हुकमतही गाजवली. धर्म आणि अध्यात्माच्या नावावर, ईश्वराचे नाव घेत जनतेची फसवणूक करणाऱ्या बाबा-बुवांनी आध्यात्मिक क्षेत्र आणि श्रद्धाळू जनतेचे जगणेही गढूळ करून टाकले. केवळ संपत्तीच्या जोरावर बसविलेले बस्तान आणि जनतेच्या श्रद्धांचे भांडवल करून थाटलेल्या साम्राज्याच्या तेजाने राजकारणही दिपून गेले आहे. जनजीवन सुरळीत चालण्यासाठी अनेक बाबी आवश्यक असतात. या बाबींची घडी बसावी आणि दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी काम करणाऱ्या व्यवस्थांना अधिकृतपणा असतो. आजकालच्या बाबा-बुवांच्या व्यवस्थेने मात्र जनजीवनात अनावश्यक आणि अनधिकृत लुडबुड सुरू केली असूनही, या व्यवस्थेला वेसण का घातली जात नाही, हा प्रश्नच आहे. उलट, वादाची वलये स्वत:भोवती मिरविणारे तथाकथित साधुसंत आणि बुवा-बाबा राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात आणि राजकारणी नेते त्यांच्यासमोर विनम्रतेने नतमस्तक होतात, तेव्हा खरे काय, याचा संभ्रम समाजात बळावतो. अनधिकृतपणे समाजव्यवस्थेत वावरणाऱ्या या शक्तीची योग्य ती घडी बसविण्याची वेळ आता आली आहे. रामपालबाबा प्रकरणानंतर हे स्पष्ट झाले आहे.

– ‘लोकसत्ता’च्या सौजन्याने

dinesh.gune@expressindia.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.