जुन्या चाकोरीत फसलेली मनोवृत्ती

ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात, हे असते. विज्ञानाच्या अभ्यासाचा हा हेतू संकुचित असल्याने विज्ञान हा अभ्यासक्रमामधला महत्वाचा पण अर्थशून्य विषय होतो. विज्ञानाची बुद्धिनिष्टा विद्यार्थ्यांना सापडत नाही, व ते ती शोधीतही नाहीत.

विज्ञानाला अंधश्रद्धेचे वावडे आहे. त्याची ओळख तर्कशुद्ध विचाराने पटते. विज्ञान प्रत्येक गोष्टीबद्दल प्रमाण मागते – ग्रंथाने वा गुरूने निर्वाळा दिला तरी तो बिनचूक असल्याचा पडताळा प्रत्यक्ष प्रयोगाने घ्यावा असा विज्ञानाचा दंडक आहे. हे पथ्या न पाळताच विज्ञानाचा अभ्यास करून केवळ गुण मिळवले, चांगली नोकरी मिळवली, तरी विज्ञान हे जीवनाची शैली किंवा जीवनाचे तत्त्वज्ञान होत नाही. ती जीवनावर धरलेली पातळ साय मात्र असते. त्यामुळे निकाल चांगला लागला किंवा चांगली नोकरी मिळाली म्हणजे सत्यनारायणाच्या पूजा केल्या जातात. लग्नासाठी पत्रिका पाहाव्या लागतात. पुढे आयुष्यात अडचणी आल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी जुन्या तंत्रमंत्रांची कास धरली जाते. एकंदरीत, विज्ञानात प्राविण्य मिळवणाऱ्यांच्या मनोवृत्तीही जुन्याच चाकोरीत फसलेल्या असतात.

गीता साने
(भारतीय स्त्रीजीवन, 1986)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.