माझी विचारसरणी

विविध विषयांवर माझे विचार काय आहेत, माझी मते कोणती आहेत ते या लेखात मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. विविध विषय म्हटले तरी ते देव-धर्म-श्रद्धा-विवेकवाद यांच्याशी संबंधित आहेत. तसेच लेखातील विषय काही एका विशिष्ट क्रमाने मांडले आहेत असे नाही. जसे सुचेल तसे लिहिले आहे. मला जे मन:पूर्वक वाटते तेच लिहिले आहे.

  1. हे विश्व कशातून निर्माण झाले? कसे उत्पन्न झाले? कोणी केले? प्रारंभी काय होते? हे विश्व शून्यातून निर्माण झाले का? याविषयी मला निश्चित असे काही ठाऊक नाही. अजून मतमतांतरे आहेत असे दिसते. महाविस्फोट, बिगबॅंग, हिग्सबोसोन् कण यांसंबंधी प्रसंगपरत्वे वाचतो. पण ते मला आकळते(समजते) असे नाही. हे विश्व एवढे अफाट, एवढे अमर्याद आहे की त्याच्या तुलनेत आपला पृथ्वी ग्रह अगदीच नगण्य आहे. हे मला समजते. माझा संबंध या पृथ्वी ग्रहाशी आहे. म्हणून विश्वाच्या उत्पतीविषयी मी अधिक विचार करीत नाही. अवकाश, वस्तुमान, काळ (स्पेस-मास-टाईम) या गोष्टी अनादि कालापासून अस्तित्वात आहेत , निसर्गनियमही अनादि कालापासून आहेत असे मी मानतो. या घटकांवर निसर्गनियमांनुसार विविध प्रक्रिया होऊन तारे, ग्रहमाला, आकाशगंगा, नेब्यूला, क्वासार, कृष्णविवरे, इत्यादि सर्व काही निर्माण झाले असे मी मानतो. माझे हे अज्ञान असेल. माझ्या आकलन क्षमतेची ही मर्यादा आहे.

मात्र हे विश्व कोण्या एका अलौकिक ईश्वराने निर्माण केलेले नाही. ते निसर्गनियमांनुसार उद्भवले असे माझे ठाम मत आहे. याविषयी अधिक वाचन,मनन, चिंतन करण्याची माझी क्षमता नाही. तसे करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. त्यातून काही उपयुक्त घडेल असेही वाटत नाही. माझे आयुष्य काही वर्षांचे आहे. माझे विश्व लहान आहे.

  1. “या अमर्याद विश्वाविषयी अधिक सखोल विचार करावा असे मला वाटत नाही. ” असे म्हटले असले तरी या विश्वाविषयी शक्य होईल तेवढे सत्यज्ञान आपण मिळवायला हवे असे मला वाटते. आपली ग्रहमाला(प्लॅनेटरि सिस्टिम) कशी अस्तित्वात आली याचे विश्वासार्ह आणि सर्वमान्य ज्ञान विज्ञानाला आहे. साधारणपणे ४६० कोटी वर्षांपूर्वी एक अजस्र तारा सूर्याजवळून गेला. त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावर मोठी भरती आली. (सूर्य वायुरूप आहे.) ती फुटून लहान-मोठे पुंजके तयात झाले. ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्राच्या बाहेर गेले नाहीत. सूर्याच्या केंद्रगामी गुरुत्वाकर्षण बलामुळे(सेंट्रिपेटल फोर्स) ते सूर्याभोवती फिरत राहिले. ही झाली आपली ग्रहमाला. म्हणजे पृथ्वीचे वय ४६० कोटी वर्षे आहे.

कालांतराने पृथ्वी थंड झाली. पाणी पृथ्वीच्या पोटातून वर येऊन समुद्र निर्माण झाले. समुद्राच्या पाण्यातील विविध रासायनिक द्रव्यांचे क्रमपर्यायी संयोग (परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स) अविरत घडत राहिले. या सततच्या प्रक्रियेतून सुमारे साठ कोटी वर्षांनी सजीव पेशी यदृच्छया निर्माण झाल्या. अगदी प्रथमिक स्वरूपाचे जीव तयार झाले. नंतर स्वैर गुणबदल (रॅंडम म्युटेशन) आणि निकष लावून झालेली नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वांच्या आधारे उत्क्रांती होत होत या पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झाली. माणूसही त्याच प्रक्रियेतून उत्क्रांत झाला.

  1. या पृथ्वी ग्रहावरील मानव प्रजातीत माझा जन्म झाला हे माझे महद्भाग्य मानतो. मला लाभलेले हे एकमेव जीवन आहे – पहिले आणि शेवटचे. माझा गतजन्म नव्हता. पुनर्जन्मही असणार नाही. कुणाचाच नसतो. पुनर्जन्म ही भ्रामक कल्पना आहे. “जातस्य हि ध्रुवो मृत्यु: ।” हे गीतावचन सत्य आहे. मृत्यू अटळ आहे. माझा मृत्यू झाल्यावर माझे जीवन संपुष्टात येणार.
  2. मी कुटुंबात राहातो. समाजात राहातो. म्हणून जी काही माझी कौटुंबिक कर्तव्ये आहेत, सामाजिक कर्तव्ये आहेत ती सर्व मी यथाशक्ती, यथामती आनंदाने आणि निष्ठेने पार पाडणार. कर्तव्य म्हणजे अवश्य करायला हवे असे स्वकर्म. ज्ञानेश्वरीतील “तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा ।पूजा केली होय अपारा तोषालागी।” हे वचन मी मानतो.
  3. मरण अटळ आहे. मृत्युनंतर पुन्हा जीवन नाही. म्हणून या सृष्टिविषयीचे आणि विश्वासंबंधीचे शक्य होईल तेवढे सत्यज्ञान मिळविण्याचा मी आमरण प्रयत्‍न करणार. जीवनाचा आनंद उपभोगणार. कुटुंबाचे, समाजाचे आणि पुढील पिढ्यांचे जीवन अधिक सुखकर ,अधिक सुरक्षित होईल यासाठी शक्य होईल ते काम करणार. समाजातील अज्ञान आणि माणसांचे दु:ख दूर होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्‍न करणार.
  4. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मला पटते. म्हणून मी ते मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे असे मला विचारान्तीं वाटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैधमार्गांनी परोपरीने सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे, भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
  5. या लेखात मी ज्या अंधश्रद्धा सांगितल्या आहेत, ज्यांना भंपक शास्त्रे (स्यूडो सायन्सेस ) म्हटले आहे, त्यांतील कोणत्याही गोष्टीचा त्याग न करता ती खरी मानून चालणाऱ्या श्रद्धाळूंना मी दोष देत नाही. त्यांच्याविषयी माझ्यामनात किंचितही राग नाही. पण त्यांनी स्वबुद्धीने विचार करावा. श्रद्धेची चिकित्सा करावी. असे माझे मत आहे. समाजात काही धूर्त, लबाड माणसे असतात. सर्वकाळी असतात. श्रद्धाळूंना फसवून लुबाडणे, त्यांचे आर्थिक शोषण करणे हाच त्यांच्या उपजीविकेचा धंदा असतो. प्रसारमाध्यमांतून जाहिराती करून ते सतत अज्ञान पसरवीत असतात. तसेच भाडोत्री प्रचारक नेमून आपल्या धंद्याचा प्रचार करतात. एखाद्या समस्येमुळे अपरिहार्यपणे अगतिक झालेले श्रद्धाळू या धूर्तांच्या प्रचाराला बळी पडतात. आधीच अगतिक झालेल्या आणि श्रद्धेने लिप्त असलेल्या लोकांना आपली आर्थिक फसवणूक होत आहे हे कळतही नाही. माझा विरोध आहे तो या कावेबाज धूर्तांना. राग येतो तो त्यांचा. ते भोळ्या श्रद्धाळूंना अज्ञानात ठेवून निर्दयपणे फसवत असतात. वर शहाजोगपणाचा आव आणतात.
  6. जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा असा कोणी अलौकिक ईश्वर अस्तित्वात नाही. कितीही आर्ततेने धावा केला तरी देव धावून येत नाही. “देव भक्ताघरीं धावला” हे केवळ काल्पनिक पुराणकथांत असते. व्यवहारात नसते. माणसाने वास्त्ववादी असावे. कुठल्याही भ्रमात राहू नये.
  7. “या विश्वात एक अलौकिक, अद्भुत शक्ती आहे. ती विश्वाचे संचलन करते. विश्वातील यच्चयावत् सर्व घटना ती शक्ती घडवते. ” हे पूर्णतया तथ्यहीन आहे. अशी अलौकिक शक्ती कुठेही अस्तित्वात नाही. विश्वातील सर्व घटना निसर्गनियमांनुसार घडतात.
  8. जगात कुणाकडे कसलीही दैवी शक्ती नसते. आपल्या कृपेने, प्रसादाने, अनुग्रहाने, आशीर्वादाने कुणाचे भले करण्याचे सामर्थ्य कुणाजवळ नसते. मग तो कितीही मोठा, सुप्रसिद्ध असो. तसे सामर्थ्य असल्याचा दावा करणारे गुरु-बाबा-स्वामी-बापू हे सर्व लबाड, ढोंगी, ठकसेन असतात अथवा मनोविकृत भ्रमसेन असतात.
  9. आत्मा, पुनर्जन्म, परमात्मा, मोक्ष या सर्व भ्रामक संकल्पना आहेत. त्या उपनिषदांत आहेत, गीतेत प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखी आहेत, शांकरभाष्यात आहेत, संतसाहित्यात आहेत, तरी त्या सत्य मानता येत नाहीत. त्या प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. लोकप्रसिद्ध अनुमान प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. तार्किक युक्तिवादाने तसेच मानवाच्या अधिकृत ज्ञान संग्रहातील तत्त्वांच्या आधारे वरील संकल्पनांची सत्यता प्रस्थापित करता येत नाही. त्या संकल्पना केवळ श्रद्धेने खऱ्या मानायच्या. श्रद्धेला तर विज्ञानात तसेच तर्कशास्त्रात मुळीच स्थान नाही. म्हणून आत्मा, परमात्मा इ. संकल्पना मी खऱ्या मानीत नाही. पूर्वापार , पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या या संकल्पनांची कोणतीही चिकित्सा न करता व्यासमहर्षी, आद्यशंकराचार्य, ज्ञानेश्वर, अन्य साधुसंत यांनी त्या शब्दप्रामाण्याच्या आधारे खऱ्या मानल्या. पण आधुनिक विज्ञानाच्या आधारे चिकित्सा केल्यास त्या भ्रामक ठरतात.
  10. स्वर्ग, नंदनवन, अप्सरा, अमृत, नरक-कुंभिपाक-रौरव-यमयातना या सर्वच्या सर्व गोष्टी केवळ काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीत, हे उघड आहे.
  11. संचित, क्रियमाण, प्रारब्ध, कर्मविपाक, या तथ्यहीन कल्पना आहेत. नियती, ललाटलेख, ब्रह्मलिखित, या सर्व गोष्टी निरर्थक आहेत.
  12. कोणतेही धार्मिकविधी (पूजा-अर्चा-व्रतवैकल्ये-होम-हवन इ.)करून कोणताही हेतू साध्य होत नाही. (जो विधी करायचा असे योजिले असेल तो विधी पार पडतो एव्हढेच.) केवळ मानसिक समाधान लाभू शकते. अशा कर्मकांडांच्या वेळी जे संस्कृत भाषेतील मंत्र म्हणतात त्या मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते.
  13. गुरुमंत्र, ॐ नम: शिवाय।, गं गणपतये नम:। ॐ नमो भगवते वासुदेवाय।, मृत्युंजय महामंत्र, गायत्री मंत्र, असल्या कुठल्याही मंत्रात कसलेही सामर्थ्य नसते. हे मंत्र आणि “ओले मंतर कोले मंतर फू: मंतर छू: मंतर ” यांत मूलत: काही भेद नाही. सगळे सारखेच निरुपयोगी!
  14. पुराणात शाप-उ:शाप, वर-वरदान, देण्याच्या अनेक कथा आहेत. त्या सर्व काल्पनिक आहेत. एखाद्याला शाप देऊन त्याचे काही वाईट करण्याचे सामर्थ्य कुणाजवळही नसते. पूर्वीसुद्धा कुणाजवळ नव्हते. तथाकथित सिद्धयोगी, तपस्वी, ऋषी, अशा कोणीही कुणाला शाप दिला तरी त्या शापाचा कोणताही परिणाम शापित व्यक्तीवर हो्ऊ शकत नाही. पूर्वी कधीही झालेला नाही. भविष्यात कधी होणार नाही. मात्र, “मला त्या साधूने शाप दिला आहे. आता माझे काहीतरी वाईट होणार ” असा धसका त्या शापित व्यक्तीने घेतला तर त्या भीतीने मानसिक परिणाम होईल. त्याचे पर्यवसान काही शारीरिक आजारात होऊ शकेल. कुण्या तापट साधूने रागीट मुद्रा धारण करून, डोळे खदिरांगारांसारखे लालबुंद करून , “तुला भस्मसात करतो.” अशी शापवाणी उच्चारली तरी वाळलेल्या गवताची काडीसुद्धा पेट घेणार नाही.
  15. कितीही योगसाधना केली, ध्यान-धारणा करून समाधी लावली, तरी अष्टसिद्धींतील एकही सिद्धी कुणालाही प्राप्त होणे शक्य नाही. अशी सिद्धी मिळणे हे निसर्ग नियमाचे उल्लंघन आहे. ते कोणीही करू शकत नाही.

तसेच आपल्या भक्तावर संतुष्ट होऊन कुण्या साधूने, तथाकथित योग्याने, त्या भक्ताला वर अथवा आशीर्वाद दिला तरी त्यामुळे त्याभक्ताचे काही कल्याण होणार नाही. काहीसुद्धा भले होऊ शकत नाही. (केवळ मानीव मानसिक समाधान मिळेल तेवढेच.)

शाप अथवा वर यामुळे काही प्रत्यक्ष घडून येणे हे निसर्गनियमाविरुद्ध आहे. तसे करण्याचे सामर्थ्य कुणालाही प्राप्त होत नाही. या संबंधीच्या सर्व पौराणिक कथा बाष्कळ आहेत.

  1. सर्व तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रयोग असतात. पदार्थांच्या रासायनिक गुणधर्मांचा उपयोग करून असे प्रयोग दखविता येतात की जे लोकांना चमत्कारसदृश वाटतील. विविध रासायनिक अभिक्रियांविषयी जनसामान्यांना काही ठाऊक नसते.
  2. आकाशातील ग्रह आणि राशी (तारकापुंज) माणसाच्या जीवनावर काही परिणाम होतो याला यत्किंचितही पुरावा नाही. असा कोणताच परिणाम होत नाही असे सर्व वैज्ञानिक नि:संदिग्धपणे सांगतात.म्हणून फलज्योतिष, त्यांतील ग्रह योग, युती-प्रतियुतीचे परिणाम, शनीची साडेसाती, इ. सर्व संकल्पना निरर्थक आहेत. थोडक्यात म्हणजे फलज्योतिष हे एक भंपक विज्ञान (स्यूडो सायन्स) आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. फलज्योतिषाचा अभ्यास इथेच संपतो. फलज्योतिष विषयावरील पुस्तके वाचणे, अभ्यास करणे हा केवळ कालापव्यय आहे.
  3. अंगठीत विशिष्ट रंगाचा खडा घातला की इथून कित्येक कोटी कि.मि. दूर असलेल्या ग्रहांची अशुभफळे टळतात ही समजूत अडाणीपणाची आहे. मुळात कुठल्याही ग्रहाचे कसलेच फळ नसते. स्वबुद्धीने थोडा जरी विचार केला तरी हे सहज समजते. तसेच बोटांत अंगठ्या, किंबहुना अंगावर कसले अलंकार घालणे हे मला ओंगळवाणेपणाचे वाटते.
  4. कोणताही दिवस, कोणतीही गोष्ट, शुभ-अशुभ, पवित्र-अपवित्र, पुण्यदायक-पापकारक नसते. ती चांगली -वाईट, योग्य-अयोग्य, हितकारक-अहितकारक असू शकते.
  5. वास्तु (दिशाभूल) शास्त्र, प्राणिक हीलिंग (प्राणशक्तिउपचार) , ब्रह्मविद्या, ओंकार गुंजन, अग्निहोत्र इ.सर्व भंपक (स्यूडो) शास्त्रे आहेत. त्यांतून हितकारक असे काहीही साध्य होत नाही.मात्र असल्या भंपक शास्त्रांच्या आधारे श्रद्धाळू गिर्‍हाइकांना फसवून काही लबाड माणसे भरपूर कमाई करतात.
  6. सुरक्षाकवचे, श्रीयंत्रे, रुद्राक्षे, पिरॅमिडस्, अशा सर्व वस्तु पूर्णतया निरुपयोगी असतात. त्या घरात आणून ठेवल्या असता आपल्या समस्या दूर होतील असे मानणे असमंजसपणाचे आहे.
  7. अंत्यसंस्कारांच्या संदर्भात हिंदुधर्मातील पुरोहितांनी जी कर्मकांडे रूढ केली ती सर्व त्यांच्या कमाईसाठी, अधिकाधिक लाभासाठी आहेत. हे अगदी स्पष्ट दिसते. अन्यथा पिंडदान, अकरावे, बारावे, तेरावे, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, सर्वपित्री अमावास्या, असले प्रकार का आले असते? या संदर्भात वैज्ञानिक सत्य काय आहे? मृत्युनंतर जीवन पूर्णतया संपते. अमर आत्मा, अतृप्त आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना भ्रामक आहेत. विद्युत् दाहिनीत दहन करावे. (देहदान केल्यास उत्तमच). नंतर कोणतेही कर्मकांड करू नये. मोठ्याप्रमाणात होणारा अनावश्यक खर्च वाचेल. आपल्या श्रमाचा, घामाचा, कष्टाचा पैसा व्यर्थ वेचू नये. या कर्मकांडांमुळे आजवर अब्जावधी रुपयांची लूट झाली. कित्येकजण कर्जबाजारी झाले. हे पैसे नुसते वाया जातात. हे विधी केले नाही तर कुणाचे काहीही वाईट होत नाही. हे स्वानुभवाने सांगतो. समाज काय म्हणेल याची चिंता नको. अनेकजण तुमचे अनुकरण करतील.
  8. निसर्ग हा पूर्णतया उदासीन आहे. भूकंप, वणवे, महापूर, वादळे, अशा घटना निसर्ग नियमांनुसार घडतात. त्यामागे कुणाचा कसलाही हेतू नसतो. कोणतीही नैसर्गिक घटना माणसांच्या, पशुपक्षांच्या, अन्य प्राण्यांच्या, वनस्पतिसृष्टीच्या हितासाठी अथवा हानीसाठी घडत नाही. पाऊस पडतो तो प्राणिमात्रांना, वृक्षवेलींना पाणी मिळावे म्हणून नव्हे. तो निसर्गनियमानुसार पडतो. त्यामागे कार्य-कारणभाव असतो तो केवळ निसर्ग नियमांचा. अन्य कशाचाही नाही.

 ynwala@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.