नीतीची मूलतत्वे (पूर्वार्ध)

नीती आपल्याला समाजात कसे वागावे ते सांगते. नीतीचे नियम ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या विषयी असतात. असे नियम जो पाळतो तो/ती नीतीमान: अशा व्यक्तीची नीतिमत्ता चांगली आहे असे म्हटले जाते. समाजात सर्वांनी नीतीने वागावे अशी अपेक्षा असते. परंतु काय करावे वा करू नये हे ठरवायचे कसें ‘चांगले वागावे, वाईट वागू नये’ हे खरे, पण ‘चांगले’ काय हे नक्की कसे ठरवायचे? एखाद्याला जे चांगले वाटेल ते दुसऱ्याला तसे वाटेलच असे नाही.

वागणूक चांगली-वाईट, इष्ट-अनिष्ट,योग्य-अयोग्य हे ठरवण्याचा मक्ता धर्मसंस्थेने घेतलेला आहे. प्रत्येक धर्म –उपासना पद्धती –ठरवतो की कांही गोष्टी चांगल्या व कांही वाईट: त्यांना पाप आणि पुण्य अशी नावे ही दिली जातात. पाप-पुण्य ठरवण्यासाठी ‘देव’ – एक अदृश्य शक्ती – या संकल्पनेचा आधार घेऊन “ पाप कराल तर देव शिक्षा करेल” असे सांगून मानवाच्या वर्तणुकीवर लगाम लावला जातो. मात्र पाप काय व पुण्य काय हे सांगणारी माणसेच असतात, पण ती ‘देवाने निवडलेले’ प्रेषित किंवा ऋषी असतात. श्रद्धाळू यावर विश्वास ठेवतात. परंतु आपला अनुभव दाखवून देतो की “पाप केल्याने देव शिक्षा करतो” या नियमाला हजारो अपवाद आहेत. ‘वाईट’ वागणाऱ्याना शिक्षा होणे बाजूलाच, अशी माणसे श्रीमंत पण होऊ शकतात आणि सुखात राहताना दिसतात. शिवाय हजार-दोन हजार वर्षे अनेक धर्मांच्या प्रयत्नांनी सुध्दा पाप करणे बंद झालेले दिसत नाही. म्हणजेच अदृश्य शक्तीची भीती फार उपयोगी ठरते असे नाही.

माणसाने कसे वागावे हे नक्की करण्यासाठी अशा तर्काला न पटणाऱ्या भीतीची जरूरच नसावी. “विवेकाची कास धरून नीतीमत्तेचे नियम बनवता येतील का?” ह्या प्रश्नाचे उत्तर विसाव्या शतकापासून होकारार्थी आहे. तर्कशास्त्रावर भिस्त ठेवून, कुठल्याही प्रकारच्या अमूर्त देव-संकल्पनेचा आधार न घेता नीतीचे नियम ठरवता येतात्त व ते तसे ठरवले गेलेले आहेत. हे ठरवायची पद्धत इतकी साधी व समजायला सोपी आहे की ती सर्वांना समजेल आणि पटेल.

नीतिमत्ता

नितीमत्तेची तीन अंगे आहेत. ज्याला आपण सर्वमान्य असा ‘सदाचार’ (morals) म्हणतो हे एक अंग; दुसरे अंग आहे ‘सदवृत्त’ (ethics) आणि तिसरे आहे कायदा (laws). भारतीय व इतर पौर्वात्य संस्कृतींमध्ये एथिक्स ही संकल्पना नाही, आणि पाश्चिमात्य संस्कृतीत पण सदाचार व सदवृत्त यातील फरक स्पष्ट दाखवलेला नाही. या तीनही संकल्पनांच्या व्याख्या खालील प्रमाणे केलेल्या आहेत.

समाजातील प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वतःच्या सुखासाठी/हितासाठी कृती करत असते. कृती या दोनच प्रकारच्या असतात: ज्यांचा इतर एक अथवा अनेक व्यक्तींवर परिणाम होउ शकतो अशा, किंवा ज्यांचा इतर कोणावरही काही परिणाम होत नाही अशा. ‘रांगेत पुढे घुसणे’ ही कृती इतरांवर परिणाम करणारी आहे, पण ‘पुस्तक वाचणे’ ही कृती इतर कोणावरही परिणाम करणारी नाही. केवळ मनोविकृतीने पछाडलेली माणसे जाणून बुजून स्वतःला त्रास होईल अशी कृती करतात.

सदवृत्त: समजा ‘क’ या व्यक्तीने स्वतःच्या सुखासाठी ‘क्ष’ ही कृती केली व तिचा परिणाम ‘ख’ या व्यक्तीवर झाला. आता ‘ख’ ने तीच कृती ‘क्ष’ केली, तर तिच्या परिणामाने ‘क’ सुखी राहील का? जर राहिला, तर क्ष सदवृत्तात मोडेल. अशी कृती कारणे ‘चांगले’ ‘इष्ट’ अथवा ‘योग्य’ ठरते. जर ख ने क्ष केल्यावर क दुःखी होत असेल तर क्ष ही कृती वाईट/अनिष्ट/अयोग्य ठरते.

उदाहरण घेतले की ही व्याख्या सहज समजेल. “मी व्यक्ती क) जर तुमचे (व्यक्ती ख) रु. 1000 चोरले (कृती क्ष) तर मी खुष होइन. पण तेच तुम्ही माझे पैसे चोरले तर मी दुःखी होईन. म्हणून ‘चोरी करणे’ ही कृती वाईट. चोरी कारणे हे सदवृत्तात मोडत नाही, ते सद्वर्तन नाही.

आपण जसे इतरांशी वागतो तसेच त्यांनी वागले तर आपल्याला चालेल का? हाच साधा विचार सदवृत्त म्हणजे काय ते सांगतो.

सदाचार: अगदी लहान असल्यापासून व्यक्तीच्या मनावर काय करावे व काय करू नये याची जी शिकवण मनावर ठसविली जाते त्या सर्वांची यादी म्हणजेच सदाचाराचे नियम. सर्वप्रथम आई-वडील, नंतर कुटुंब, धर्म, शाळा, जात-जमात, विद्यापीठ, व समाज इ. सर्वांतर्फे ‘करा’, ‘नका करू’ चे धडे मिळत असतात. व्यक्ती क्वचितच त्याविषयी स्वतंत्र विचार करते. हे धडे मनात इतके ठाम ठसलेले असतात की ते ‘योग्यच’ आहेत अशी भावना असते.

सदवृत्ताचे व सदाचाराचे नियम हे स्वेच्छेने पाळावयाचे असतात. प्रत्येक व्यक्ती असा कुठलाही नियम पाळावा की नाही ते ठरवू शकते व तशी वागू शकते.

कायदा: समाजाला जेव्हा कांही नियम सर्वांनी सक्तीने पाळावेत असे वाटते तेव्हा त्या नियमाला कायदा म्हणतात. असा नियम तोडला –कायदा मोडला –तर व्यक्तीला शिक्षा दिली जाते.

aasu20150401

 नीतीच्या या तीन अंगांचा परस्पर संबंध आकृती दर्शवते. यातील प्रत्येक वर्तुळ एकेक अंगातील सर्व कृतींचा समुदाय दर्शवते.या तीन छेदणाऱ्या वर्तुळातून सात वर्ग निर्माण होतात. जगातील कुठल्याही व्यक्तीने/समुदायाने केलेली कुठलीही कृती या   सातापैकी एका वर्गात पडते, मग ती कृती इतरांवर परिणाम करणारी असो व नसो. प्रत्येक कृती ही त्या वर्गात ‘स्वीकारणीय’ ‘त्याज्य’ अथवा ‘तटस्थ’ असते. उदा: ‘हिंदू व्यक्तीने गाईचे मांस खाणे.’ ही कृती सदाचाराच्या दृष्टीने हिंदूंसाठी   वाईट आहे; व्यक्ती मुसलमान, ख्रिस्ती किंवा बौध्द असली तर त्यांच्या सदाचारात ही कृती बसते. ‘जैन व्यक्ती बटाटा खाते’ यातील कृती पण अशीच आहे. इतरांना बटाटा खाणे वाईट किंवा निषिद्ध नसते. क ने गोमांस खाल्ले तर ख वर काहीच परिणाम होत नाही. आणि भारतात गोमांस खाऊ नये असा कायदा नाही. म्हणजे ही कृती सदवृत्तात तटस्थ, सदाचारात त्याज्य आणि कायद्यात तटस्थ आहे.

‘खाणे’ ही कृती नेहमीच सदवृत्ताला तटस्थ असते; अपवाद एकच – माणसाचे मांस खाणे. खाणारा व खाद्य यांची अदलाबदल केली तर सुख देत नाही म्हणून!

दुसरे एक उदाहरण घेऊ या: ‘समलिंगी संभोग’. हा करणाऱ्या क आणि ख दोन्ही व्यक्ती सुखी होत असल्याने हा प्रकार सदवृत्तात बसतो, पण बहुतेकांच्या सदाचारात बसत नाही. कांही देशात अजून भारतात सुद्धा) यास कायद्याने बंदी आहे. म्हणजे ही कृती सदवृत्तात स्वीकार्य, सदाचारात त्याज्य आणि कायद्यात कुठे तटस्थ तर कुठे त्याज्य असते.

तिसरे उदाहरण ‘चोरी करणे’: ही कृती सदवृत्त, सदाचार आणि कायदा या तिन्ही अंगांनी त्याज्य आहे.

एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की आपण पाप व पुण्य ह्या दोन्ही शब्दांना एकदम छाट दिली आहे. या देव या संकल्पनेशी जोडलेल्या असल्याने त्यांच्या संबंधात प्रश्न उभे करण्याची परवानगी नसते, तर्काला वाव नसतो, त्या निव्वळ     ( अंध?) श्रद्धेवर आधारित असतात.

कुठल्याही कृतीचे वर्गीकरण करताना पूर्वग्रह आणि भावना यांचा वापर होऊ देता नये. हे लक्षात यावे म्हणूनच दोन ‘प्रक्षोभक’ उदाहरणे निवडली होती!

यावरुन लक्षात येते की:

  • सदवृत्त हे सर्व मानवजातीला लागू पडते: सदवृत्त हे देश-काल-संस्कृती यांवर अवलंबून नसते.
  • सदाचार हा संस्कृतीसापेक्ष असतो व
  • कायदा हा देशसापेक्ष असतो.

नीतीतत्वांचा व्यवहारात उपयोग

नीतीत काय बसते आणि काय नाही यावर एकमत होत नाही असे अनेकदा दिसून येते याला कारण आपण नीतीमत्तेच्या तीन अंगांचा स्पष्ट विचार करीत नाही. एकदा का सदवृत्त, सदाचार आणि कायदा यांच्या व्याख्या समजल्या आणि या तिन्ही अंगांचे परस्पर संबंध लक्षात आले की मनातला गोंधळ मिटतो. कुठल्याही कृतीचे वर्गीकरण सर्वाना पटेल अशा प्रकारे करता येते. प्रत्येक कृती प्रत्येक अंगाने स्वीकार्य, त्याज्य अथवा तटस्थ असते हे ही आपण बघितले. आणि असे वर्गीकेरण करताना भावना प्रधान न होता, शांत डोक्याने विवेकी विचार करावा लागतो हे पण आपण शिकलो.

वर्गीकरण झाले, पण स्वतः वागायचे कसे?

वर्गीकरण करणे वेगळे आणि ती कृती स्वतःच्या वागणुकीसाठी निवडणे वेगळे:

विवेक सांगतो की सदाचारात गणल्या जाणाऱ्या सर्व कृती या ‘चांगल्या’ असतातच असे नाही. प्रत्येक धर्मात कित्येक ‘सदाचार’ असे विचित्र आणि कित्येकदा विघातक आहेत की ते सदवृत्ताच्या कसोटीवर उतरूच शकत नाहीत. मात्र धर्माचा –उपासना पद्धतीचा – पगडा इतका जब्बर असतो, की त्याबाहेर पडून विवेकाने सदवृत्ताची कसोटी लावणे धर्मभोळ्या सामान्य माणसाना कठीण जाते. विवेकवादी विचारसरणी स्वीकारल्यानंतर मात्र अशी कसोटी लावणे सर्वांना जमते. या संदर्भात आपण मुख्य तीन धर्मातील एकेक उदाहरण घेऊन विचार करुया.

  • एके काळी हिंदू समाजात ‘सती जाणे’ हे कृती ‘चांगली’ समजली जात होती, इतकेच नव्हे तर सती जाणारी स्त्री पूजनीय ठरत होती. ‘मेलेल्या नवऱ्याच्या चितेवर स्वतःला जाळून घेणे’ हे सदाचारात मोडत असे. हे सदवृत्तात कसे बसेल? जरी नवरा पत्नीव्रती होऊन मेलेल्या बायकोच्या चितेवर स्वतःला जाळून घेऊ लागला (अदलाबदलीचे तत्व), तरी ही कृती सदवृत्त बनत नाही.
  • इस्लाम मध्ये विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या पत्नीला भर चौकात दगड मारून ठार करण्याची सजा ‘सदाचारात योग्य मानली जात होती. येथे त्यातील परपुरुषाची काहीच चूक नाही, व तो अपराधी नाहीच! हे सदवृत कसे बसायचे?
  • ख्रिस्ती धर्मात एके काळी एखाद्या स्त्रीला चेटकीण ठरवून ठार मारणे किंवा जाळून टाकणे समाजास मान्य होते. हजारो स्त्रिया चेटकीण ठरत! या प्रथेचा बीमोड करायला सती प्रथा बंद करताना आले तसे अनेक अडथळे त्या काळात आले होते.

म्हणून ‘चांगले’ काय हे ठरवायला प्रत्येक व्यक्तीने स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे. प्रत्येक सदाचार हा विवेक वापरून सदवृत्ताच्या कसोटीवर तपासून पहिला पाहिजे. मग त्या सदाचारात मोडणाऱ्या कृतीला धर्माचा अथवा समाजाचा कितीही पाठींबा असो, त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. सदवृत्ताला मान्य नसलेल्या कृती स्वतः करू नयेत व समाजाला पण करू देऊ नयेत. त्यांचा समाजातून बीमोड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. सदवृत्ताला अमान्य व त्याज्य असलेल्या कृती स्वीकारू नयेत. समाजाला वा स्वतःला फार त्रासदायक असतील तर त्या संपूर्णपणे सोडून द्याव्यात.

मग सदवृत्ताप्रमाणे मान्य किंवा तटस्थ असलेया कृतींचे काय, त्या सर्व करणीय असतात असे नाही. सदवृत्त्तात समलिंगी संभोग ‘चांगला’ आहे म्हणून, किंवा गोमांस खाणे ‘तटस्थ’ आहे म्हणून ह्या कृती कराव्यात असे बिलकुल नाही.  अशा कृती कराव्या का नाही हा प्रत्येकाचा खासगी अधिकार आहे. तशी प्रवृत्ती असेल तर अशा गोष्टी कराव्यात, नसेल तर करू नये. मात्र जे अशा कृती करतात त्यांना समजून घ्यावे, त्यांचा तिरस्कार करू नये. समाजात सर्वांनीच सदवृत्ताच्या आड न येणारे व्यक्तीस्वातंत्र्य जपणे जरूर आहे.

सदवृत्तात बसणाऱ्या सदाचारातील कृती अवश्य स्वीकाराव्या व स्वतःच्या आचरणात बाणवण्याचा प्रयत्न करावा.

कित्येक कृती अशा असतात की ज्यांचा इतरांवर काहीच परिणाम होत नाही. उदा. पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे/म्हणणे, वाद्य वाजवणे, इतरास त्रास होइल इतक्या मोठ्याने नाही), फिरायला जाणे, संगणकावर काम कारणे इ. इ. अशा कृती बहुतांशी सदवृत्ताच्या आणि सदाचाराच्या दृष्टीने तटस्थ असतात. मात्र ते पुस्तक’चावट’ असले, किंवा संगणकावर अंतरजाल वापरुन ‘चावत’ चित्रफिती बघितल्या तर ते सदाचारात मोडत नसावे! अशा कृतींसाठी स्वतःचा निर्णय अप्पाप्ल्या कलाप्रमाणे करावा. मात्र इतरांच्या असल्या अ-सादाचाराविषयी घृणा बाळगू नये.

रोजच्या व्यवहारातील शिष्ठाचार पण नीतिमत्तेचा एक भाग असतात. ‘वडीलधाऱ्यांचा आदर करावा.’ ‘मोठ्यांना वाकून नमस्कार करावा.’ ‘मोठ्यांना उलट उत्तरे देऊ नयेत’ इ अनेक रीती सदवृत्त आणि सदाचार यांना संमत असतात. मात्र ‘कुटुंबप्रमुखाचा प्रत्येक निर्णय पाळलाच पाहिजे’ हा नियम पाळलाच पाहिजे असे नाही! तो निर्णय जर सदवृत्ताच्या विरुद्ध असेल तर त्याला योग्य रीतीने टाळले पाहिजे. शक्य तोवर त्या निर्णयातील ‘वाईट’पणा चांगल्या शब्दात दाखवून तो न मानण्याचे कारण स्पष्ट केले पाहिजे. इतर संस्कृतीत वेगळे शिष्ठाचार असतात हे लक्षात घेणे जरूर आहे. जर ते शिष्ठाचार सदवृत्ताला धरून किंवा तटस्थ असतील. तर त्यांचा मान त्या संस्कृतीत वावरत असताना राखला पाहिजे.उदा: अमेरिकेत लहान मुले अगदी आजी-आजोबाना देखील ‘हाय बडी’ असे संबोधतात. आपल्याकडे नको, पण तिकडे ठीक, नाही का?

विवेकी बुध्दीने कुठल्याही करा’ ‘नका करूअशा आदेशांना तपासून पाहिले पाहिजे.स्वतःच्या वर्तणुकीसाठी निवडायचे करणीयअथवा करणीयकृतींचे सदाचाराचे नियम सदवृत्त्ताच्या कसोटीवर तपासून घ्यावेत. ते देशातील विद्यमान कायद्याच्या विरुद्ध नाहीत याची खात्री करावी मगच स्वीकारावेत. सर्व कायद्यांचे पालन तर अनिवार्य समजावे. असे वागणे म्हणजे विवेक वापरून नीतीने वागणे.

‘मी नीतीने वागीन हो, पण बाकीच्यांचे काय? सगळा समाजच बिघडलेला असेल, तर मी सुधारून काय उपयोग? समाज नीतिमान आहे का?

….अपूर्ण

ashokgarde@hotmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.