अनश्व रथ, पुष्पक विमान या लेखमालिकेवरील चर्चासत्र

(रवींद्र रुक्मीणी पंढरीनाथ यांच्या आजचा सुधारक च्या सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2015 च्या अंकात अनश्व रथ, पुष्पक विमान ही लेखमालिका प्रकाशित झाली होती. त्या लेखमालिकेवरील चर्चासत्राचा हा वृत्तांत आहे. हे चर्चासत्र मुंबई सर्वोदय मंडळ, शांताश्रम, ताडदेव, मुंबई येथे दि. ७.१२.१४ रोजी आयोजित केली होती. व डॅनियल माजगावकर, सुनीती सु. र. व सुरेश सावंत या चर्चासत्राचे निमंत्रक होते. चर्चेचे शब्दांकन अनुराधा मोहनी यांनी केले आहे. – का. सं)

सुनीती: ही चर्चा केवळ वेळेवर नाही तर आशयावर अवलंबून आहे. हिंदुत्वाचे आह्वान व पुरोगाम्यांचे विखुरलेपण समजून घेत आपल्याला भूमिका निश्चित करण्यापर्यंत जाता येईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही चर्चा होईल. आपण अनेक ठिकाणी एकत्र येतो आहे, पण सम्यक संवाद आवश्यक. आज चर्चेसाठी पुरोगामी चळवळीतील वेगवेगळ्या प्रवाहातील मित्र आलेत ही चांगली गोष्ट आहे. आरोप प्रत्यारोप न करता गाठी सोडवण्यासाठी संवाद होईल अशी आमची अपेक्षा आहे. स्वाभाविक चर्चा होऊ द्यावी. रवींद्रने लेखातील भूमिका थोडक्यात सांगावी. त्याशिवाय त्याला इतरही काही सांगायचे असल्यास तेही मांडावे.

रवीन्द्र: आपण सर्वांनी लेख वाचलेलेच आहेत. ह्या संदर्भात शांताश्रमात झाडलेल्या अशाच एका चर्चासत्राची आठवण सांगावीशी वाटते. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नुकतेच रंगमंचावर आले होते. त्यावर ही चर्चा होती. पुरोगामी मंडळी खूप अस्वस्थ झाली होती. आपण नाटकावर बंदी आणण्याची मागणी करणार नाही, उलट अशा बंदीचा निषेध करू ह्यावर त्यांचे एकमत होते. पण ह्याचे उत्तर कसे द्यायचे ह्याविषयीच्या त्यांच्या मांडणीत विस्कळीतपणा होता. चर्चेत व्यवस्थित बाजू मांडणारा माणूस ग्राहक संघाचा, पर्यायाने रा. स्व. संघाचा होता. त्याला ह्या चर्चेत निमंत्रित करण्याचा भाबडेपणाही आपलाच. पण संघाचा माणूस मात्र उत्तमपणे मखलाशी करीत होता. त्यानंतर आजतागायत नथुरामचे प्रयोग सुरू आहेत, पण गांधीजींची बाजू व्यावसायिक नाटकांत, प्रायोगिक नाटकांत वा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे मांडलेली नाही.

इ.स. १९९२ च्या दंगलींनंतर आपण एकत्र आलोत. म्हणजे आपण फक्त प्रतिक्रिया देण्यासाठी जमतो, गेल्या चाळीस वर्षांत आपण स्वतःहून कृती केली नाही. म्हणून आज आपण एकत्र आलोत ही चांगली गोष्ट. मी लेखांमध्ये पुरोगाम्यांविषयी तिखटपणे मांडलेले आहे. प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण व आत्मटीका करण्याची आपल्याला सवय नाही. आज आपण ह्या लेखांवर खोलात जाऊन बोलू या. मतभेद असल्यास ते मांडू या. ‘पुढे काय करायचे ते बोला’ ह्याची घाई करू नये. कोणत्या गोष्टी पटतात, कोणत्या नाही हे समजून घेऊ या. उदा – गांधीनी ओबीसीसाठी काय केले ह्याची कदर ओबीसींनी केली नाही असे म्हटले आहे. त्याचा विस्तार केला नाही. कोणाला त्याविषयी शंका असेल तर आपण आधी गांधी व ओबीसी ह्याचे नाते स्पष्ट करू. त्यासाठी आपण स्वतःला गांधीवादी म्हणवण्याची, किंवा देवधर्म मानण्याची गरज नाही. आपापल्या मांडणीसह आपल्याला एकत्र येता येईल. दाभोलकरांच्या खुनानंतर दोन्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन कायद्याबद्दल काम करावे, म्हणजे तो मार्गी लागेल असे मी सुचवले होते, पण तेही स्वीकारले गेले नाही. आपण लोकशाहीवादी असल्यामुळे ताकद वाढत नाही, हे खरे आहे काय? आपली लोकशाहीनिष्ठा आपण आचरणातून सिद्ध केली पाहिजे. आजच्या चर्चेत मागच्या निवडणुकीचे राजकीय विश्लेषण फार करू नये. मोदी व संघ ह्यांचे आपसात जमणार नाही, किंवा संघाच्या शाखांमध्ये आजकाल फारशी माणसे येत नाहीत या बाबींवर संतोष न मानता आपण काय करायचे ह्यावर भर द्यावा.

पुरोगाम्यांनी काय चुका केल्या हा पहिला मुद्दा. परंपरा म्हणजे काय, परंपरेतही परिवर्तन असते व परिवर्तनाचीही परंपरा असते ह्या बाबी त्यांनी समजून घेतल्या नाहीत. आपणच पहिले व शेवटचे क्रांतिकारक आहोत अशी आपली समजूत आहे. आपण फक्त फुले आंबेडकरांचे नाव घेतो, पण आपला त्यांचा अभ्यास नाही. तुकाराम, कबीर, बुद्ध वगैरेंचेही तेच. अनश्व रथ व पुष्पक विमान ह्या बाबी आपण हास्यास्पद मानतो, पण आज बहुसंख्य लोक तसे मानत नाहीत. त्यांच्या गळी ते उतरविण्यात आले आहे. आपण परंपरा मानताना मूल्यविवेक जागा ठेवला तर प्रश्न येणार नाही. पण आपण सर्व युरोसेंट्रिक परंपरांचे गुलाम आहोत. आयुर्वेद, योग, शास्त्रीय संगीत. नृत्य, लोककला ह्या चांगल्या परंपराही आपण नाकारल्या, ह्याउलट संघाने सर्व परंपरांचे उदात्तीकरण केले. त्याच वेळी परंपरेतील शंबुकवध, प्रल्हाद, सीतात्याग इत्यादी गोष्टीवर त्यांनी मौन बाळगले. त्यामुळे रास्वसंघ म्हणजे परंपरेचे समर्थक व आपण म्हणजे तिचे विरोधक असे चित्र उभे राहिले. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आता अस्मितेचे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. स्वतःची ओळख सांगताना परंपरेविषयी अभिमान जागृत होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर सगळीच परंपरा नाकारणारे आपण सर्वसामान्य लोकांकडून दूर लोटले जातो. सर्वोदयातही गांधीविचाराशी प्रतारणा करणारी माणसे शिरली. पण त्याला विरोध आपण केला नाही. एकमेकांचे वाभाडे काढण्याचे काम मात्र करत राहिलो, हे चुकले. आताही हे मानले तर शिकून पुढे जाता येईल.

संघाची कार्यपद्धती पाण्याचा थेंब टपटपत असताना खडकालाही भेग पडते. त्याचप्रमाणे एकच विचार वारंवार सांगत राहिला तर तो लोकांच्या गळी उतरतो. यासाठी संघाने अनेक लोकांना कार्यक्रम दिला. उदा. फोटोफ्रेम मागे हे हिंदुराष्ट्र आहे हे चिकटवणाऱ्याची गोष्ट. जो माणूस जेथे आहे, तेथून काय करता येईल ते सांगणारा संघ. आपण क्रांतीच्या गप्पा करताना मध्यमवर्गाला बाजूला टाकले ही चूक होती. प्रत्येकाला शोधून कार्यक्रम देणारा संघ, आपण त्यात कमी पडलो. दगडावर संततधार धरली तर त्याला भेग पडलीच पाहिजे. पन्नास वर्षे संघ राजकारणामध्ये दुर्लक्षित राहिला, पण सातत्याने काम करीत राहिल्यामुळे आता त्यांना त्याचे फळ मिळाले आहे.

दीक्षाभूमीवरचा अनुभव दलितांचे खरे शत्रू गांधीच हा प्रचार सुरू आहे. बुद्धमूर्तीचा तालिबानने केलेला विध्वंस. हे पूर्ण पुस्तक संघीय विचारांच्या माणसाने लिहून घेऊन आंबेडकरी माणसाने प्रकाशित केले आहे. गांधी द्वेष जाणीवपूर्वक पसरवला जातो आहे. धर्म हा अस्मिता फुलविणारा असतो हे खरे, पण त्याशिवाय परंपरा म्हणून वेगळी गोष्ट असते.

गांधीवर भर कशासाठी आपल्या पूर्वसूरींमध्ये परंपरा जाणणारा माणूस तोच एक होता. दुसरे असे की गावाकडे परत जायचे असले तर, पर्याय म्हणूनही आपल्याला गांधींकडेच जावे लागते. गांधींचाच खून का झाला? आशिष नंदी म्हणतात, संघाला गांधी बरोबर कळले. Hatred makes your sight sharp. संघाची पहिली पन्नास वर्षे गांधीशी झगडण्यात गेली. त्यामुळे तेवढा काळ तो प्रभावी नव्हता. गांधींकडे सर्व पुरोगाम्यांनी पाठ फिरविल्यानंतरच संघाला त्यांच्या अजेंड्यासाठी बळ मिळाले.

विजया चौहान: संघाचे स्वरूप व कार्यपद्धती याबद्दल विस्तृत माहिती द्या.

रवींद्र: पूर्वीचा व आताचा रा स्व संघ ह्यात खूप फरक आहे. इ.स. १९२५ मध्ये त्याची स्थापना झाली. हेडगेवार हे संस्थापक व पहिले सरसंघचालक हे उत्तम संघटक होते. ते मूळचे कॉग्रेसचे. नंतर गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले. ते संघटक नसून तत्त्वज्ञ होते. सावरकर व गुरुजी ह्यांनीच हिंदुत्ववादाची वैचारिक मांडणी केली. संघाने सावरकरांचा अन्यधर्मीयांचा द्वेष घेतला पण समाज सुधारणेच्या बाबतीत चालूपणा करून बहुसंख्यांकांना न दुखावणारी भोंगळ मांडणी केली.

१९७५-७७ मध्ये जेलमध्ये गेल्यावर संघाचा पुनर्जन्म झाला. बाळासाहेब देवरस कारणीभूत. त्यांनी तुरुंगात जाणीवपूर्वक संघविरोधकांशी संवाद साधला. संघाविषयीचे आक्षेप समजून घेतले व त्यानुसार संघाने आपला मूळ गाभा कायम ठेवत स्वतःला बदलले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला. संघाच्या शाखेत लहानपणापासून जाऊन मनावरील संस्कार पक्के केले जातात. ही कार्यकर्त्यांची फौज नंतर शेती, इतिहासाचे पुनर्लेखन, ईशान्य भारतातील सेवा, आरोग्य, तत्त्वज्ञान सगळ्या क्षेत्रात काम करते. संघपरिवारात अनेक संस्था आहेत. त्यांचे आपसात सामंजस्य असते, पण त्या त्या वेळच्या रणनीतीनुसार संघ त्यांच्यापासून अंतर घेतो. उदा.- अतिशय जहाल हिंदुत्ववाद मांडणाऱ्या व्यक्ती, संस्था – साध्वी, सनातन संस्था आमच्या नाहीत.

संघ बांधणीचा माझा अनुभव अगदी लहानपणी संघात गेलो व कट्टर स्वयंसेवक बनलो. प्रथम स्वयंपाकघरात जाऊन बाईशी नाते जोडून मावशी, काकू म्हणून विचारपूस करायला संघाने शिकवले. आपण तसे करीत नाही. त्यासोबत संघ चिकाटीही शिकवतो. मी आठवी ते अकरावी वसतिगृहात राहत होतो. पण प्रत्येक सुटीत गावी गेल्यावर बंद पडलेली शाखा नव्याने सुरू करीत होतो. दलित वस्तीतही जाणीवपूर्वक जात होतो. एकटा उभा राहून झेंडा लावून प्रार्थना करून एक तासाने परत येत होतो. खेळही कसे तर मोगल – मराठे. हिंदूचा हिंदूस्तान असे म्हणायचे. मुसलमानांनी केलेले अत्याचार आणि आपल्या लोकांचे पराक्रम पुन्हा पुन्हा सांगितले जात. संघ आपल्या कार्यक्रमाला अन्य विचारांच्या किंवा कोणताही विशिष्ट विचार नसणाऱ्या लोकांना मुद्दाम बोलावतो. त्यानंतर त्यांच्याशी न कंटाळता संपर्क ठेवतो. शाखेत या, ते न जमल्यास कार्यक्रमात, तेही न जमल्यास फक्त गुरुदक्षिणा द्या. मध्यम वर्गाला संघकार्य म्हणजे समाजकार्य, राष्ट्रसेवा असे मनापासून वाटते. संघ शिक्षा वर्गात मोठमोठी प्रतिष्ठित मंडळी अन्न वाढायचे काम करतात. ते पाहून भारावलेले अनेक जण संघकार्याशी जोडले जातात. ईशान्य भारतातही त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. संघटित ताकद. त्यामध्ये सहानुभूतिदारांची ताकद (गुडविल) जास्त.

गेल्या ऐंशी वर्षांत भारतातील सर्व पुरोगामी संस्था, संघटना तुटल्या. समाजवाद्यांची, कम्युनिस्टांची अनेक शकले झाली. मात्र रास्वसंघ एकसंध राहिला. एवढेच नव्हे तर विस्तारला, फोफावला. ह्याचे श्रेय केवळ एकचालकानुवर्तित्वाला देणे आत्मघातकीपणाचे ठरेल. अहंकाराला मुरड घालायला आपण संघाकडून शिकलेच पाहिजे. गोळवलकर गुरुजींऐवजी देवरस सरसंघचालक होणार होते, पण ऐनवेळी गुरुजी झाले, त्यांनी देवरसांना अनुल्लेखाने मारले व लहान पद दिले, तरीही देवरस निष्ठेने गप्प राहून काम करीत राहिले. सांगलीच्या देवल ह्यांनी जातिनिर्मूलनाचे काम हाती घेतले व संघाने परवानगी न देताही ते तें एकनिष्ठेने करीत राहिले. कोणीही संघापासून तुटून बाहेर पडले नाही. हे निव्वळ आज्ञापालन नव्हे, त्यामध्ये निष्ठा आहे. हे पूर्वीच्या कम्युनिस्ट, सर्वोदयात होतेच. आज मात्र ह्यात बदल झाला आहे. आपण मानतो की क्रांतीचा रस्ता फार चिंचोळा आहे. मागून येणाराच माझा कॉम्रेड. पुढे जाऊ लागलास तर तू माझा शत्रू नंबर एक. ह्याला व्यक्तिगत अहंकार नाही तर आणखी काय म्हणायचे?

मोदी अधिक संघ हे समीकरण अधिक धोक्याचे का म्हणून? मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारणे हे जणू अमेरिकेच्या पुरोगामित्वाचे प्रतीक आहे असे आमचे मार्क्सवादी मित्रही मानत होते. अमेरिकेचे निधर्मीपणाशी, लोकशाहीशी काहीच देणे घेणे नाही हे आपल्याला माहीत नाही का? अमेरिकेला सारा देश लुटायला परवानगी दिली, तर ती मोदींना सन्माननीय नागरिकत्वही बहाल करील व आपल्याविरुद्धच्या लढाईत त्यांना मदतही करील. एकीकडे जागतिकीकरणाचा बेछूट सुटलेला घोडा व दुसरीकडे संघ अशा कैचीत आपण सापडलो आहोत. साई बाबांबरोबर पीर, सूफी संत ह्याच्यासारखी जी समन्वयाची प्रतीके आहेत, त्यांच्यावर प्रहार होईल. सामाजिकदृष्ट्या डावे असलेले जे लोक आर्थिकदृष्ट्या उजवे झाले, त्यांचीही त्यांना साथ आहे.

डॉ. सुगन बरंठ: गांधीवाद्यांच्या शिखर संस्थेतही असा अभ्यास कुणी केला नव्हता पण सर्व सेवा संघात गेल्यावर बजरंगच्या पिढीकडून मी शिकलो. आपण खरे तर आत्मविश्लेषण करायला पाहिजे. रमेश ओझा व यशवंत सुमंत ह्यांनीही अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. मी व्यापक कामासाठी मालेगावच्या बाहेर पडलो, काही वर्षांनी परतल्यावर मला जाणवले की सार्वजनिक जीवनात मी निर्माण केलेली सर्व जागा संघाच्या मंडळींनी व्यापून टाकली आहे व आपल्या लोकांना त्याची जाणीवही नाही. आत्मपरीक्षण, अभ्यास ह्यांची आता कुणालाही सवय उरलेली नाही. पूर्वी १० दिवसांची शिबिरे आता ७ दिवसही जास्त होतात. छुटपुट कार्यक्रम घेत राहतात फक्त. आमच्या कामाचेच मूल्यमापन आम्ही करीत नाही. मालेगावला तेच, सेवाग्रामलाही तेच. नवीन लोकांना प्रशिक्षण देण्याचीही काहीच सोय नाही. मग मी पुस्तके शोधली. आपल्याकडे एक मुलगा आला, तर तो शेवटपर्यंत कसा राहील ह्याचा विचार आपण करीत नाही. पण मी निराश नाही. कारण आजही आपण ठरवून काम केले तर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो हा माझा अनुभव आहे. मालेगावला परतल्यावर मी स्वतःला प्रश्न केला, – तुम्हारे पोतेका क्या होगा? मग पुन्हा माझ्यापुरती राष्ट्रसेवादलाची शाखा सुरू केली. मी एक शिबिर आयोजित केले. त्यासाठी सिलॅबसही तयार केले. पंधरा दिवसांमध्ये नाटक, आकाशदर्शन, चित्रकला. शेवटच्या दिवशी आजी आजोबांसह पालकांची उपस्थिती होती. प्रचंड यश मिळाले. आपण शाखाप्रमुखाला शून्य समजतो. उलट त्याला २०,००० रु द्यायला पाहिजेत. अशा प्रकारची शिबिरे आजही सर्वत्र यशस्वी ठरतील.

भारती शर्मा: आत्मनिष्ठ परिक्षणाबरोबर आत्मनिरपेक्ष परीक्षण केले पाहिजे. खा उ जा धोरणाबरोबरच १९९१ साली झालेला सोवियत युनियनचा पाडाव हा संदर्भही लक्षात घ्यावा. जगात आज अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीची सरकारे आलेली आहेत. फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचा प्रश्न चर्चेत आहे. अमोरिकेने पोसलेले तालिबानी, धार्मिक पुनरुज्जीवनवाद हे वास्तव आपला भाग नसले तरी आपल्यावर परिणाम करणारे आहे. त्याचा विचार व्हावा. जागतिक संदर्भात औद्योगिक भांडवलशाहीची जागा आता वित्तीय भांडवलशाहीने घेतली आहे. त्यामुळे घडणारे परिवर्तनही आपण ध्यानात घेतले पाहीजे. ७० ते ८० हा स्त्रीवादाचा सुवर्णकाळ होता हे खरे, पण तो काळ वेगळा. आजच्या काळाच्या संदर्भात विवेचन आवश्यक, पण ते आत्मक्लेशाकडे जाता कामा नये.

कुंदा प्र नी: केवळ भारतातच नाही, तर जगातच पुनरुज्जीवनवादी प्रवाह आला. चर्चेस, मशिदी, देवळे ह्यांची संख्या वाढली. सर्वत्र आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत व त्याचा फायदा धर्मांध शक्ती घेत आहेत. हे निव्वळ दृश्य स्वरूप. ह्याच्या मागे एक अदृश्य संघर्ष फार कठीण आहे. मुस्लिम स्त्रिया आपापले प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेत येत असल्या तरी धर्माशी घट्टपणे बांधलेल्या आहेत. आयडेंटिटी क्रायसिस गेल्या वीस वर्षांत का सुरू झाला, ह्याचा विचार केला पाहिजे. तो केवळ औद्योगिक व वित्तीय भांडवलशाहीशी संबंधित नसून धार्मिक एकाधिकाराशी जगभरात निगडित आहे. भारताचे सोशल फॅब्रिक व्यामिश्र आहे. जाती – पोटजातींत विभागलेले आहे.

जयंत दिवाण: आज लोकसभा, विधानसभा, कुटुंबसंस्था सर्वांमध्येच परिवर्तन झाले आहे. ते असे की व्यक्तिवादिता वाढत जाऊन सामूहिकतेचा, सामाजिकतेचा लोप झालेला आहे. म्हणून मला काही झाले तर मी सरकारलाच दोष देतो. हे पूर्वी असे नव्हते. कारण खा उ जा धोरणामुळे कुटुंबापासून संसदेपर्यंत सर्व संस्थांचा क्षय झालेला आहे, त्यामुळे राज्यसंस्था व व्यक्ती ह्यांच्या दरम्यान एक पोकळी निर्माण झाल्यामुळे लोक आपल्याला आधार शोधायला निघालेत. हेच धार्मिक पुनरुज्जीवनवादाचे मूळ कारण. ह्याचा साकल्याने विचार व्हावा. केवळ संघाचा विचार करता येणार नाही.

बजरंग: आजच्या वातावरणात मी एकट्यादुकट्याला उत्तर देऊ शकतो, पण समूहाला नाही. सिद्धिविनायकाला जाणाऱ्याची गर्दी वाढली, त्याबद्दल टीका केली, तर लोक नास्तिक म्हणून लेबल लावून टाकतात व दुर्लक्ष करतात. म्हणून आजच्यासारखी चर्चा आवश्यक आहे. आम्ही – जात संपवा, जातीची होळी करा हा कार्यक्रम विदर्भात घेतला, कॉलेजमध्ये घेतला, तेव्हा तीव्र विरोध झाला. कार्यक्रम झाला नाही. अशा वेळी ह्या शक्ती बरोबर काम करतात. जल देश को तोडता है, मिट्टी देश को जोडती है हा कार्यक्रम झाला, पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मोदींच्या राज्यात आपली कोंडी होत आहे का?

अनिल सावंत: ७७ साली जॉर्ज फर्नांडिस जेलमध्ये असताना एक कामगार स्त्रीला सांगितले की तुझ्या बेड्या तुटतील, पण हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आजचे भीषण वास्तव – जगभरात धर्मांधता बोकाळली आहे. कितीही जोरात सांगितले, तरी लोक मोठ्या प्रमाणावर बाबा-बुवांच्या मागे का लागत आहेत ते समजून घेतले पाहिजे. नोकरीतले आठ तास झाल्यानंतर चांगले काम करण्यास इच्छुक लोक सत्संगात जाऊन बसतात. दुबईत जाऊन पैसे कमवून पुण्यास परतलेला एक माणूस मला सांगतो की मला आणखी पैसे नकोत तर पुण्यात सनातन संस्थेचे काम करायचे आहे, कारण त्यातच मला जीवनाचे सार्थक वाटते.

विकासाचे कोणते मॉडेल आपल्याला स्वीकारायचे आहे हे आपण स्पष्ट केले पाहिजे. कारण रास्वसंघ, भाजप ह्यांना पक्के माहीत आहे की लोकांना विकासाचे गाजर दाखवल्याशिवाय लोक आपल्यासोबत येणार नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या गोष्टी घडत आहेत हे खरे तर आपल्याला माहीत आहे पण ते सर्व एका सूत्रात बांधून लोकांपुढे सुसूत्रपणे ठेवले तरच लोक आपल्यासोबत येतील. आजच्या तरुणाला ह्यांनी आपल्यासोबत घेतले आहे. कारण विकास करणारे हेच लोक आहेत असे त्याला प्रामाणिकपणे वाटते. त्याला इतिहास माहीत नाही. जाणून घेण्याची इच्छाही नाही. त्याला फक्त व्यक्तिगत विकासाची आकांक्षा आहे. त्याचा भ्रमनिरास केव्हा होईल कोण जाणे. तंत्रज्ञानाने आज आमूलाग्र बदल घडवला आहे. आपण पूर्वी ह्याला विरोध केला होता, पण आज अनेक रूपांत ते आपल्यासमोर आहे. त्याविषयी निश्चित धोरण असावे. त्याशिवाय प्रसारमाध्यमांची भूमिका काय असावी ह्याचेही स्पष्ट उत्तर आपल्याकडे हवे.

संस्था, कुटुंबसंस्था, सपोर्ट रचना काय असावी ह्यांचे पर्याय काय असावेत ह्याचाही विचार आवश्यक.

संजीव चांदोरकर: रवीने महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. विचारसरणी व संघटन ह्याचा परस्परसंबंध असतो काय हा माझा नेहमी प्रश्न पडतो. कधीकधी विचारसरणी आर्टिक्युलेट नसतेही. पण संघटन चांगले असते. मी संघाचा वाढता प्रभाव, त्याचा जागतिक संदर्भ व त्याचे परिणाम नाकारत नाही. पण त्याच्या परस्परसंबंधाचा विचार होणे आवश्यक. जगभर भांडवलशाही ही ड्रायव्हिंग सीटवर आहे. औद्योगिक व वित्तीय ही एकाचीच प्रारूपे. जागतिक पटलावरती आज भारतातील बाजारपेठ हे अनेकांचे गंतव्यस्थान बनले आहे. जागतिक भांडवलाला आकर्षित करणारा आपला देश आहे ह्याचे भान ठेवावेच लागेल. धोरणात्मक अनिश्चितता हा भांडवलासाठी सर्वात मोठा धोका असतो नेहमीच. भांडवलाला भगवा, हिरवा वा लाल रंगही वर्ज्य नाही. राजकीय स्थिरता ही आवश्यक. त्यासाठी ते परताव्याचा कमी दरही मंजूर करते. म्हणून कॉंग्रेसचे गाडे गडगडले, तसतसे जागतिक भांडवलदार भाजपला बूस्ट करीत राहिले. इंग्लिशमधील ऑर्गॅनिक हा शब्द चांगला. जीव असणे, त्याची वाढ होणे, त्याने अन्न शोषून घेणे हे व्यवच्छेदक लक्षण. ते संघाकडे आहे. त्यामुळेच तो वर्धिष्णु आहे. ह्याउलट डाव्यांनी विचारसरणीच्या स्पष्टतेवर अतोनात भर दिला, विचारसरणी योग्य असल्यास ती उदबत्तीच्या वासाप्रमाणे पसरेल असा त्यांचा समज होता. त्यामुळे त्यांनी संघटना कौशल्याकडे दुर्लक्ष केले, ज्याने त्याची वाढ खुंटली.

विजया चौहान: मेक इन इंडियाचा नेमका अर्थ काय?

संजीव: प्रत्येक देशातील पक्षांची, भांडवलाच्या मर्यादा काय ह्याची उत्तम समज जागतिक भांडवलशाहीकडे आहे. ते कधीही आदर्शवादाची भूमिका घेत नाही. युरोपच्या सर्व संस्था कोसळणार असे अंदाज केले होते. अमेरिकेने भागभांडवल घालावे, भांडवलाची महत्ता टिकली पाहिजे, मालकी दुय्यम आहे असा निष्कर्ष काढला एवढी त्यांची प्रगल्भता आहे. हे आपण मान्य करून तशा प्रकारची प्रगल्भता आपणही दाखवली पाहिजे. डब्ल्यू टी ओ च्या पूर्ण विरोधात जाऊनही निर्मला सीतारामनने मांडलेली भारताची भूमिका त्यांनी मान्य केली आहे. ही आहे त्यांची परिपक्वता. हे सारे विरोधाभास खाऊन पचवणारे ते लोक आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे प्रचंड चिकाटी आहे. भारतातले पायाभूत सुविधा, स्वस्त कामगार व शेवटी इथली बाजारपेठ हे त्यांना हवे आहे व ते ते मिळवूनच राहतील. एस ई झेड लाही हेच हवे आहे. उद्या ह्या सुविधा वेगळ्या देण्याचीही गरज राहणार नाही, साध्या कायद्यामधूनच ते घडेल व त्याची सुरुवातही झाली आहे. मोठमोठ्या भांडवलदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी मदत केली आहे. रास्वसंघ व आजचे नमो सरकार ह्यांचा नेमका संबंध काय हे मला माहीत नाही. संघ पाताळयंत्री नाही असेही मला म्हणायचे नाही. पण भांडवलशाहीची भूमिका लक्षात घेतली पाहिजे.

रवीन्द्र: त्या दोन्ही गोष्टी धोकादायक. दोहोंचा विचार करावाच लागेल.

विजया: सामाजिक अशांतता, असमंजसता त्यातून समाजातील एका भागाला जगणे अशक्य करणे हे काय आहे? सहकार चळवळही आज संकुचित झाली आहे. त्या सर्वांचा परिणाम काय होणार आहे?

संजीव: हेच मॉडेल कॉन्सोलिडेट करणे, आतले प्रश्न खदखदत ठेवणे, जास्त झाल्यास त्याला एक चापट ठेवून देणे हीच त्यांची नीती राहणार आहे. ऐंशी वर्षांनंतर मिळालेली संधी ते सोडणार नाहीत. तिसरा पर्याय – हिंदू मुस्लिम एकतेचे कार्यक्रम आता कोण करणार? तुष्टीकरणाचा संदेश पोचला. पर्याय कोणताच उरला नाही. विचारसरणीच्या स्पष्टतेवर शंभर तास खर्च केले तर संघटना बांधणीवर दहा तासही खर्च केले नाहीत.

डॉ. विवेक कोरडे: जर भांडवलशाहीच्याच हातात सर्व काही असले, तर राज्य कॉंग्रेसचे असो की संघाचे, फरक काय पडतो? ह्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत व त्यांच्या विश्वासाचा, त्यांच्या उन्नतीचा मार्ग आमच्याकडे आहे हा विश्वास भाजपने साध्य केला, हे नाकारण्यात अर्थ नाही. म्हणून आपल्यापुढे, संघाचे खरे स्वरूप लोकांपुढे आणणे आणि संघ वा नमो ही गरीब, दलित, शोषित ह्यांच्याविरोधी शक्ती आहेत हे उघड करणे हे दोन मार्ग आहेत.

अशोक राजवाडे: नमोविरोधी व समावेशक संघटना उभी करणे आवश्यक. पर्याय तयार करावा लागेल. त्यामध्ये जागतिक भांडवल इत्यादीचाही विचार करावा लागेल. आम आदमी पार्टीने असा प्रयत्न केला, पण त्यांना वेळ कमी मिळाला.

विवेक कोरडे: लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे ते निवडून आले, तर आपण काय करीत होतो? वाजपेयी सत्तेवर आले तेव्हाही आपण काही केले नाही.

विनय कामत: आठ महिन्यांपूर्वी शक्यता निर्माण झाली होती, सदतीस वर्षांपूर्वी मोरारजींच्या वेळी देखील अशी शक्यता निर्माण झाली होती, पण जेपींसारखा फेविकॉल असूनसुद्धा ती माणसातल्या आधाशीपणाला, सत्ताकांक्षेला थोपवू शकली नाही. एक पर्याय जनतेला दिसल्याबरोबर जनता त्याच्या मागे जाते, पण तो स्थैर्य देऊ शकतो का? अण्णा हजारेही आपल्या मनोऱ्यात परत गेले. मोदींना दिलेले मत हे भाजपाला दिलेले मत नाही, एकाच व्यक्तीला दिलेले मत आहे.

सुरेश सावंत: रवीन्द्र ह्यांच्याशी पूर्णपणे सहमत. पुरोगाम्यांचे काय चुकले? ते कालबाह्य झालेत काय? असल्यास त्याचे कारण निव्वळ त्यांची निष्क्रियता हेच नव्हे. डाव्यांचा भर आर्थिक मुद्द्यांवर होता. जात, धर्मांधता, सांस्कृतिक मुद्दे ह्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जीवनाला समग्रपणे भिडणे आवश्यक असते, पण डाव्या शक्ती ट्रेड युनियनपुरत्या उरल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्याग वाया गेला.

आपणही काही भ्रामक कल्पना सोडून दिल्या पाहिजेत. उदा. दलित किंवा मुस्लिम हे जन्मजात पुरोगामी असतात. ह्याउलट ब्राह्मण कार्यकर्त्याला वेळोवेळी आपली छाती फाडून पुरोगामित्व सिद्ध करावे लागते.

चळवळीचे एनजीओकरण झाले तेव्हा चळवळ संपली. ढोंगीपणा वाढला, छोटीछोटी रिंगणे तयार झाली. आज एनजीओ बंद करणे हा पर्याय नाही. परंतु आज ऍक्टिव्हिस्ट व कम्युनिटी वर्कर्स वेगवेगळे आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे, चळवळ व एनजीओ ह्यांमधील सीमारेषा स्पष्ट ठरवल्या पाहिजेत कारण एनजीओच्या दबावातून फक्त डब्ल्यू एस एफ घडू शकते, पण त्यातून नवे राजकीय केंद्र उभे राहू शकत नाही.

अनुराधा: लहान गावांत राहत असताना मला असा अनुभव आला की निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात रामाची पालखी मिरवत नेली जाते, व तिचे आपल्या घरासमोर स्वागत करण्यास प्रत्येकाला बाध्य केले जाते. परंतु मला ते करायचे नसल्यास, ते न करण्याचे, तसे ठामपणे सांगण्याचे बळ ह्या चर्चेतून मिळावे. तसेच निवडणूक व रामाची पालखी ह्यांचा परस्परसंबंध मध्यमवर्गीय महिलांना समजतच नाही, तो आपण त्यांना समजावून दिला पाहिजे. घराघरातील स्त्रीला, गृहिणीलाही ह्या कामात सामील करून घेऊन परिवर्तनाचे वाहक बनविले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्या पतीच्या संबंधातही महिलांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी. अपत्यांना त्याचे वेगळेपण समजावून सांगावे.

सुनीति सु. र. : रवीचे लेख हा या चर्चेचा आरंभबिंदू म्हणून मी पाहते. या विषयाला अनेक पदर आहेत. आपण कालविसंगत झालो असे मला वाटत नाही. एनएपीएम, अन्यही चळवळी, जगण्याच्या हक्काची आंदोलने, या सर्वांनी मिळून सामाजिक परिवर्तनाचा एक टप्पा गाठला आहे असे मला वाटते. तो त्या-त्या प्रश्नांची तड लावण्यासंदर्भात असेल, कायदे करण्याच्या किंवा बदलण्याच्या स्वरुपात असेल, शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडण्याच्या संदर्भात असेल. संजीवने सांगितलेल्या परिस्थितीत (आक्रमक नवभांडवशाहीच्या) आपण हे जे काही साध्य करू शकलो ही देखील मोठी गोष्ट आहे. आपण विकासाचे प्रश्न उपस्थित करू शकलो, त्या आधारावर देशभर विकासाच्या मुद्द्यावर जगण्याच्या हक्काची आंदोलने झाली. आजची ‘बचाव’, ‘हटाव’ ही मुळात विकासाचा वेगळा पर्याय मागणारी आंदोलने आहेत. निसर्ग, मानवसमाज व सर्व जीवसृष्टी ह्या सर्वाच्या अस्तित्वासाठी आपण व्यवस्थेपुढे प्रश्न उपस्थित केले आहेत. तेंव्हा पुरोगामी चळवळ विखुरलेली असली तरी पुरोगामी विचार व पुरोगामी आंदोलने संपली आहेत असे मला वाटत नाही.

रवीने – हिंदुत्व: संघपरिवाराचे व गांधीजींचे’ – हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. संघपरिवाराची हिंदुत्वाची संकल्पना भारतीय संस्कृतीला असहिष्णुता व एकारलेपणाकडे नेणारी आहे तर गांधीजींची हिंदुत्वाची (अथवा भारतीयत्वाची) संकल्पना येथील सहिष्णु परंपरा व बहुविधता यांच्या जोपासनेकडे नेणारी होती. भारतीय समाजाला समतेकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे आपण आग्रहपूर्वक मांडणे आवश्यक आहे – विशेषत: मोदी आज ज्या पद्धतीने गांधीजींना ‘प्रोजेक्ट’ करत आहेत त्या पार्श्वभूमीवर. गांधींनी जे बदल समाजात घडवत नेले, तें ते स्वतःतही करीत गेले. हे प्रवाहित्व हेच आपले – पुरोगामित्वाचे संचित आहे व ते आपण व्यक्त केले पाहिजे.

समाजातील दलित-वंचितांचे लढे लढत असताना देखील हा प्रश्न पडतोच की त्या समुहांमध्ये तरी समतेचा विचार आपण कितपत रुजवू शकलो-शकतो? आपल्या प्रश्नापलीकडे ते समूह समूह म्हणून पुरोगामी प्रेरणा कितपत घेतात? आपल्या मुद्याशिवाय विषमतेच्या अन्य मुद्यांवर ते आपल्यासोबत येतात का? – परिवर्तनाच्या चळवळीपुढील हे पेच आहेत असं मला वाटतं.

मेधाताईंचा निवडणुकीतील पराभव हा निव्वळ संघटन किंवा ‘मतदारसंघ’ बांधले नाही म्हणून झालेला नाही. उलट त्या विभागात सर्वाधिक सघन असे जनाधारित काम होते. मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेत पैशासह अनेक शक्ती कार्यरत असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या सर्वाला आमआदमी पक्षाचे दिल्ली व इतरत्रचे काही चुकीचे निर्णयही कारणीभूत झाले आणि एक पर्याय बनताबनता विरून गेला, तेंव्हाच मतदारांनीही आपला असा एक निर्णय घेतला हे देखील आम्हाला त्यावेळी स्पष्ट जाणवले. तेंव्हा उद्या जरी अगदी आपणही निवडून आलो तरी भांडवलवादी शक्तींचाच प्रभाव आपल्यावर राहणार असेल तर मग संसदबाह्य राजकारणच प्रभावी करणे आवश्यक आहे का, याचाही विचार करायला हवा.

आपले लढे अनेकदा इश्यू बेस्ड बनतात. ते महत्वाचे आहेतच, परंतु त्याने समाजपरिवर्तनाच्या आपल्याच लढ्याला मर्यादा पडते. ढोबळमानाने विषमतेचे सर्व मुद्दे त्या अंतर्गत आपण उपस्थित करत असलो तरी विषमतेला मुळापासून उखडून टाकण्यासाठीचा लढा – असे त्याचे स्वरूप राहत नाही. शिवाय एकेका समाजसमूहाच्या विशिष्ट प्रश्नावर लढताना सर्व समाजाशी आपला संवाद, त्याला जायला हवे ते अपील कमी पडते का, हे देखील पाहिले पाहिजे. विशेषत: आज नवमध्यमवर्ग हा सर्व जाती-धर्मांमध्ये निर्माण झाला आहे तेंव्हा आपले जातिआधारित विषमता आणि शोषणाचे गृहीतक आणि वास्तव काहीसे बदललेले आहे. गरीबांच्या आकांक्षा ह्यादेखील मध्यमवर्गाच्या आहेत. “विकासाची फळे आता कोठे आम्हाला मिळू लागली, तेव्हा आता असा विकासच नको असे तुम्ही का म्हणता?” हा त्यांचा प्रश्न आहे. त्याला उत्तर काय द्यायचे, हा प्रश्न आहे. आपण संसाधनांवरील अधिकाराबद्दल बोलतो, पण संसाधनांवरचे अधिकार स्थानिकांना मिळाले तरी त्यातीलही वंचितांपर्यंत पोहोचतील का, हा देखील प्रश्न उरतोच. केवळ संसाधनांवरील अधिकारांबद्दल नव्हे तर समाजाअंतर्गतच्याही आर्थिक-सामाजिक विषमतांबद्दल बोलावे लागेल. ग्रामस्वराज्यासारख्या संकल्पनांचे काय करायचे, त्या कालसुसंगत करायच्या असतील तर गावसमाजाच्या पातळीवर किती काम करणे आवश्यक आहे, हे गंभीरपणे पहायला हवे.

आपले गरीब-श्रमिकांचे लढे लढवतानाही आपली भाषा अनेकदा टोकाची असते. ‘आपण व ते’ अशी वाटणी आपल्या अभिव्यक्तीतही अनेकदा असतेच. अशा वेळी अनेकदा आपला मित्र बनू शकणारा समुदाय आपणच ‘ते’ या कॅटॅगरीत टाकून देतो. मला वाटते की समतेच्या, परिवर्तनाच्या दिशेने जाणारी व सर्वांना सामावून घेऊ शकणारी एक भूमिका विकसित करणे, ती परिभाषित करणे, त्यावर आधारित (अनौपचारिक का असेना,) संघटन उभारणे आवश्यक आहे. अगदी नव्या तंत्रज्ञानाचा, विशेषत: माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडिया इत्यादीचा सकारात्मकतेने वापर केला पाहिजे.

सर्वोदयी मंडळींनी देखील न्यूनगंड टाकून सर्वोदयाची भूमिका जोरकसपणे मांडली पाहिजे. ‘सर्वोदय’, ‘अंत्योदय’ यांइतके अर्थपूर्ण व आपल्या भूमिकेचा पूर्ण आशय मांडणारे शब्द मला तरी अद्याप सापडलेले नाहीत. अहिंसा, सत्य, सत्याग्रह हे शब्द आपल्याला गांधीजींनी दिले. बाबासाहेबांनी देखील सत्याग्रह हाच शब्द वापरला. गांधीजींनी पुरस्कारलेली मूल्ये संविधानात आली. मग हे सारे शब्द वापरायला कचरायचे कशाला? ते शब्द, त्या संकल्पना, तो विचार आजच्या परिप्रेक्षात मांडणे व कालसुसंगत पद्धतीने अनुसरणे म्हणजेच गांधींजीना समकालीन करून घेणे होय.

‘हम वैज्ञानिक स्वभाव के नही. मोदीने दिखाया है कि वे वह कर सकते है. मेरी समझ मे कोई पुरोगामी है ही नहीं.’ सिंगरूर प्रकरणानंतर हे स्पष्ट झाले की प्रत्येक पक्ष हा भांडवलवादी पक्षच आहे. जातीयवादाला शह देण्यासाठी वैज्ञानिकतेचा विकास करण्याची व जनतेत जाऊन प्रबोधन करण्याची गरज. संघटित धर्माची संकल्पना. पण धर्म कधी संघटित नसतोच. कोणताच माणूस कोणत्याही विचारधारेला मानणारा नसतोच. लोकशाही तंत्रज्ञान आणण्याची गरज. चर्चेतून उत्तरे कधीच मिळत नाहीत.

बजरंग: गांधीचा खून का झाला? आत्मकथा वाचताना हिंदू म्हणून किती संस्कार होते, तरी त्यांचा खून होतो, आणि आंबेडकर म्हणतात मी हिंदू म्हणून जन्मलो तरी तसा मरणार नाही, तरी त्यांचा खून होत नाही. दुसरीकडे गोडसे समर्थक अतिशय हीन पातळीवर उतरून गांधींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात.

प्रियदर्शन भारती: मी एक नवीन, तरुण कार्यकर्ता आहे. मला काही प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून हवी आहेत.-

 • आपला मुख्य शत्रू कोण – धर्मांधता की भांडवलशाही?
 • धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? त्यात ओवेसी कोठे बसतो? त्याच्या बद्दल कोणी बोलत का नाही?
 • रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारखी आपली संस्था आपण तयार करू शकतो का?
 • पुरोगामी संघटनांची दयनीय अवस्था आहे, त्यावर उपाय काय?
 • आजचे नेते गेल्यावर आंदोलनाचे भविष्य काय?
 • कार्यकर्त्यांना आपण काही प्रतिष्ठा (ग्लॅमर) देणार आहोत काय?
 • पुरोगामी युवक व विद्यार्थी संघटना मजबूत कशा बनतील?
 • लालू, मुलायम हे पर्याय होऊ शकत नाहीत, तर आजच्या राजकारणाला आपण पर्याय कसा उभा करणार?

सावरकर, भगतसिंग ह्यांची पुस्तके वाचून आपण इतर चळवळींचा अभ्यास करावा असे वाटले. अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो. मग संघाचा खोटेपणा उघड झाला. विश्वास आला की घरचे नसले तरी चळवळीचे लोक आपल्यासोबत आहेत. गांधी वा आंबेडकर ह्यांच्याशी आजच्या युवकाला काही घेणे नाही. त्याला बदल हवा आहे. त्यासाठी तो कुणाचाही झेंडा उचलायला तयार होईल.

अशोक राजवाडे: आपण आपापल्या विचारधारा बाजूला ठेवून ह्या तरुणांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले पाहिजे.

कुंदा प्र. नी. : आपण आता पर्यंत घालवलेली वर्षे फुकट गेली कारण परिवर्तन म्हणजे converting the converts, असेच घडले.

त्यानंतर पुस्तिका प्रकाशित करण्याबद्दल चर्चा झाली. त्यात आलेल्या सूचना पुढीलप्रमाणे.

 • सर्वोदय साधनेच्या हीरक महोत्सवानिमित्त सर्वोदयाकडे ही चर्चा व्हावी. त्याशिवाय आणखी दोन चार ठिकाणी ती चर्चा व्हावी. त्यानंतर पुस्तिकेला अंतिम स्वरूप द्यावे.
 • पुरोगामी चळवळीवरील टीका व संघावरील टीका वेगळ्या कराव्या.
 • सध्या सुरू असलेल्या चर्चेला अंतिम रुप देऊन पुस्तिका तयार करावी. ती पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी असेल. रवीने त्यासोबतच सर्वसामान्य जनतेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमका कसा आहे हे समजावून सांगणारी वेगळी पुस्तिका लिहावी.

प्रा. यशवंत सुमंत व प्रा. सदानंद मोरे ह्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा केल्यास ती उपयोगी ठरेल.

ह्यानंतर आपापल्या संघटनांतर्फे कोणते कार्यक्रम घेता येतील ह्याविषयीच्या सूचना आल्या. त्या अशा

 • राष्ट्रसेवा दलाच्या शाखांना ताबडतोबीने पुनरुज्जीवन करावे.
 • राष्ट्रसेवा दलाच्या आदेशांची वाट न पाहता जमेल त्या पद्धतीने लहान मुलांमध्ये काम सुरु करावे. चळवळीच्या माध्यमातून लहान मुलांसाठी आताच नाटके करणे. खेळ, गाणी, निबंधस्पर्धा वगैरे काम करता येईल.
 • २६ जानेवारीला संविधानाची उद्देशिका लोकांना समजावून सांगावी.
 • २६ जानेवारीच्या निमित्ताने विविध माध्यमे, उदा. नाटक, फिल्म शो, टॉक शो, वापरून लोकशाही उत्सव साजरा करावा. त्याला जोडून पर्यायी विकास पद्धती ‘साजऱ्या’ करणारा जीवनोत्सव भरवावा.
 • संघाची सत्ता आल्यापासून सांस्कृतिक दहशतवादाची भीती सर्वाना भेडसावते आहे. त्या मुद्द्याला धरून काम व्हावे.
 • आज तरुण पिढी ‘प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार’ असे वेगळे ( डाव्यांना माहित नसलेले) मुद्दे घेवून संघाच्या दहशतीविरुद्ध उभी राहते आहे. आपण तिची साथसंगत करणार का?
 • ह्या पुस्तिकेतील अनेक मुद्दे छोट्या परिच्छेदात बसवून फेसबुक सारख्या माध्यमातून प्रसृत करावे. आपण सर्वांनी ह्या माध्यमांची ताकद ओळखून त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करावा.
 • विभिन्न विषयांवर फिल्म शो व त्यावर चर्चा ह्या माध्यमाचा वापर करावा.

अखेरीस आपला सर्वांचा ह्यानंतरही सैल, पण संवादी समन्वय असावा, ह्या सुरेश सावंत ह्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेने चर्चेचा समारोप झाला.

anumohoni@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.