साडेसाताळलेले, ‘शन्याळलेले ‘ दिङ्मूढ प्राणी

‘कुंडल्या कागदी असोत, नाही तर तळहाती असोत; त्यात चितारलेल्या प्रारब्ध-मर्यादेबाहेर मनुष्याला केव्हाही जाता येणार नाही. त्यातील भोग भोगल्याशिवाय सुटका नाही’, हा प्रवाद जर खरा मानला, तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वाव तरी राहिला कोठे? सगळाच जर दैववाद, तर यत्नवाद हा शब्द जन्मला तरी कधी? आणि का? आणि कोणाकोणाच्या पोटी? बरे, प्रत्येकाचे दैव आणि सुखदु:खाचे फेरे हे जर घडय़ाळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक आणि यथाकाळ, यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हात-पाय तरी का हलवावे? दु:ख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमुक वेळी कोसळणार म्हणजे धो धो कोसणारच. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी! मग मला हात-पाय हलविण्याची जरूर काय? दैववाद्यांचे विचार जवळजवळ असेच असतात. नवल वाटते ते हेच की, या कपाळवाद्यांनासुद्धा आढय़ाला तंगडय़ा लावून स्वस्थ मात्र बसवत नाही. त्यांची काही ना काही धडपड चाललेलीच असते.. मग हे प्राणी आजूबाजच्या परिस्थितीचा, स्वत:च्या प्रवृत्तीचा, अंतस्थ धमकीचा, कार्यकुशलतेचा, कार्यकारण संबंधाचा, हातातील विहित कर्तव्याचा, कशाचाही कधी विचार करायचे नाहीत.

‘आत्मशोधनाची आणि सत्यशोधनाची प्रवृत्ती शेकडा ९९ लोकांत सहसा नसते. ..अर्थात, सत्यशोधक प्रवृत्तीच्या अभावामुळे बहुतेक सारे साडेसाताळलेले लोक पृथ्वीवरील या जिवंत शनिच्या हातात शेणगोळ्या-मेणगोळ्याप्रमाणे हवे तसे दाबले-फुगविले जातात. बाधा शनिची, पण तेल-शेंदराचा अभिषेक मारुतीच्या मस्तकावर काय म्हणून? काय, मारुती म्हणजे शनि? का, शनिचा वकील? या पृथ्वीवरील एजंट? शनिचे चरित्र काय! मारुतीचे चरित्र काय!! कशास काही मेळ? पण असला एकही प्रश्न बिचाऱ्या शन्याळलेल्या दिङ्मूढ प्राण्यांना कधी सुचायचा नाही.

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.