“विचारां”चा विचार

(प्रा. दि.य.देशपांडे यांच्या विवेकवादास…)

कधी आला आहे का तुझ्या मनात असा विचार,
विचार…की करू यात आता विचारांचा संचार, विचारांचा विचार!

जेव्हा वास्तवतेचा आधार देतोस तू डावलून, तेव्हा उरतात ते फक्त अनिर्बंध, निराधार तर्क
अन मग त्यातून येतात जन्माला पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, स्वर्ग आणि नरक!

का ठेवतोस तू अशा संकल्पनांवर विश्वास ज्याला नाही काही पाया,
अन दुर्देवाला कोणत्या आधारावर म्हणतोस तू “भूत का साया”?

जर करत बसलास तू मागचा-पुढचा जन्म, पाप अन पुण्य,
तर या निराधार विचारात करून घेशील हे मिळालेले जीवनही नगण्य!

कधी विचारल आहेस का स्वत:ला,
की तू का ठेवतोस अशा गोष्टींवर विश्वास, न करता काही विचार…
अरे कर काहीतरी उपयोग त्या बुद्धीचा…नको होऊस असा लाचार!

तूच टाकतोस तुझ्या संकटात भर जेव्हा पाळतोस अंधश्रद्धा…
अन कुठे आहे पुरावा म्हणायला की जगण्यासाठी आवश्यक आहे ईश्वरावरील श्रद्धा?
कधी केले आहेत का तू उलट प्रश्न धर्मग्रंथातील तत्त्वज्ञानावर?
जेव्हा बघशील करून, कशी येईल बघ त्यातील तथ्यातथ्यता उघड्यावर!

नको रे, नको जाऊस शरण त्या निराधार अध्यात्माला…
नको जाऊस शरण त्या काल्पनिक संकल्पनांना, ज्या म्हणतील आम्ही शांत करू तुझ्या ‘आत्म्याला’!

मुळात, जेव्हा तू लागतोस मागे करून घ्यायच्या मोक्षप्राप्ती,
तेव्हा वास्तवता, वैज्ञानिकता, तर्कशुद्धता यातून करून घेतोस तू ‘मुक्ती’…

का लागू देतोयस तुझ्या चिकित्सक बुद्धीला अशी बुरशी,
जेव्हा करशील तू त्याचा उपयोग, अशा अविवेकतेशी लढायला बघ कशी येईल चुरशी…!

नको लागून देऊस गंज, अरे कर जरा वापर तुझ्या बुद्धीचा,
कर जरा वापर तुझ्या विवेकशक्तीचा, कर जरा वापर तुझ्या विवेकशक्तीचा…!

अवास्तव, अवैज्ञानिक गोष्टींना हात देऊन नको लावून घेऊस तू आपली ‘वाट’…
घे वास्तवतेची, विज्ञानाची, विवेकतेची साथ…
बघ कशी येईल सम्यक सुखासमाधानाची लाट,
बघ कशी येईल सम्यक सुखासमाधानाची लाट!

(‘सम्यक सुखसमाधान’: हा शब्द विवेकनिष्ठ मानासोपचारशास्त्राला अभिप्रेत असणारऱ्या ‘Healthy Emotions’ या इंग्रजी शब्दाचा प्रतिशब्द म्हणून वापरला आहे.)

prasannajeetmane94@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.