कुंभारवाडा

काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे
भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्‍यात
मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प,
न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला
दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्‍या थेंबांतून निघताना
घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे
आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं
प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून

कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी
चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत
तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच्या झाडाआड,
आणि छचोर तोता मैनेच्या पिंजर्‍यावर सावलीचं जाळं पडतं
लाजेचं काजळ थोबाडावर पसरून मग सूर्यच काळाठिक्कर पडतो
आणि युगायुगांची रात्र निर्लज्जपणे फैलावत राहाते.

ghaski@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.