रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रवाद

पुराणात भस्मासूर नावाच्या राक्षसाची गोष्ट प्रसिद्ध आहे. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याची जळून राख व्हायची. आजकाल संघ परिवाराने ह्याच भस्मासूराचा अवतार धारण केला आहे. संघाने आपल्या राष्ट्रपुरूषांच्या डोक्यावर आपला हात ठेवायला सुरूवात केली आहे. स्वामी विवेकानंदापासून योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी हे सर्वच संघाच्या क्षुद्रीकरणाच्या मोहीमेचे शिकार झाले आहेत, आणि आता पाळी आलीय रवींद्रनाथ टागोरांची. आजी सरसंघचालक मोहन भागवत मध्यप्रदेशच्या सागर येथील संघ शिबिरात आपल्या भस्मासूरी अवताराची ओळख करून देत म्हणाले की, रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या ‘स्वदेशी समाज’ नावाच्या पुस्तकात सर्वप्रथम हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली आहे. (मराटी दैनिक लोकसत्ता, नागपुर, दि. २०.०१.२०१५ अंक) पहिला मुद्दा हा आहे की, ‘स्वदेशी समाज’ नावाचे पुस्तक नाही, तर एकूण तीस पानांचा एक निबंध, जो टागोरांनी बंगभंग (१९०५) च्या नंतर लगेचच तेथील पाण्याच्या समस्येवर, एका टीकटिप्पणीच्या स्वरूपात लिहिला होता. त्यांनी त्या लेखात हिंदु राष्ट्र ह्या संकल्पनेचे समर्थन केलेले नाही, उलट त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ‘आर्यांनी जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा स्थानिक जातीजमातींनी त्यांना आपल्यात सामावून घेतले. त्यानंतर मुसलमान आले, त्यांनाही अशाच प्रकारे सामावून घेतले गेले.’ भारतभूमीच्या ह्या वैशिष्ट्याचा टागोरांनी आपल्या निबंधात उल्लेख केला आहे. महत्वाची बाब ही आहे की, टागोरांनी नेहमीच नेशन स्टेट (राष्ट्र-राज्य) ह्या संकल्पनेवर टीका केली आहे. त्यांनी ही संकल्पना शुद्ध युरोपीय आहे असं म्हटलं आहे. आपल्या १९१७ च्या ‘नॅशनॅलिझम इन इंडिया’ नावाच्या निबंधात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘राष्ट्रवादाचा राजकीय आणि आर्थिक संघटनात्मक आधार केवळ उत्पादनवृद्धी तसेच मानवी श्रमामध्ये बचत करून अधिक संपन्नता प्राप्त करण्याचा यांत्रिक प्रयत्न इतकाच आहे. राष्ट्रवादाची धारणा मुळातच जाहीरात आणि माध्यमांचा उपयोग करून राष्ट्राची समृद्धी तसेच राजकीय शक्ती ह्यामध्ये वाढ करण्यात आकारीत झाली आहे. बलविकास ह्या संकल्पनेने राष्ट्रांमध्ये परस्पर द्वेष, घृणा आणि भयाचे वातावरण निर्माण करून मानवाच्या जीवनाला अस्थिर आणि असुरक्षित केले आहे. हे तर सरळ सरळ जीवनाशी खेळणे आहे, कारण की राष्ट्रवादाच्या ह्या बलाचा उपयोग बाह्य संबंधांसोबतच राष्ट्राच्या अंतर्गत परिस्थितीवर बंधन टाकण्यातही होतो. अशा परिस्थितीत समाजावर नियंत्रण वाढणे स्वाभाविकच आहे. परिणामी, सामाजिक, तसेच व्यक्तीच्या खासगी जीवनाला राष्ट्र व्यापून टाकते, आणि एक भयावह नियंत्रणात्मक रूप आकारात येते.’
रवींद्रनाथ टागोरांनी ह्याच आधारावर राष्ट्रवादावर टीका केली आहे. ते म्हणतात, ‘राष्ट्रवाद म्हणजे जनतेच्या स्वार्थाचे असे संघटीत रूप की ज्यामध्ये मानवता तसेच आपलेपणा किचिंतही शिल्लक राहात नाही. दुर्बल आणि असंघटीत शेजारी राज्यांवर अधिकार मिळवण्याचे प्रयत्न हा राष्ट्रवादाचा स्वाभाविक परिणाम आहे. ह्यातूनच निर्माण झालेला साम्राज्यवाद, अखेर मानवतेचा खुनी बनतो. राष्ट्राच्या बलविकासावर काही नियंत्रण शक्य नसते, त्याच्या विस्ताराला काही सीमा नसते. राष्ट्रवादाच्या अनियंत्रित शक्तीमध्येच मानवतेच्या विनाशाचे बीज आहे.’
राष्ट्रांचा परस्परांतील संघर्ष जेव्हा विश्वव्यापी युद्धाचं रूप धारण करतो, तेव्हा त्याच्या संहारक शक्तीच्या समोर सर्वच नष्ट होत जाते. हा निर्मितीचा रस्ता नाहीये तर विनाशाचा रस्ता आहे. राष्ट्रवादाची भावना कशा रितीने मानवी समुहांमध्ये शत्रुत्व आणि स्वार्थ निर्माण करते, ह्या गोष्टीला उघड करणारे रविंद्रनाथ टागोर ह्यांचे हे मौल्यवान चिंतन, सर्व विश्वाकरता एक अमूल्य योगदान आहे, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत मात्र टागोरांना हिंदु राष्ट्रवादाचे समर्थक बनवून त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतासाठी राष्ट्रवाद हा पर्याय होऊच शकत नाही. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय की, भारतात राष्ट्रवाद नसल्यासारखाच आहे. वास्तव हे आहे की, भारतात युरोपासारखा राष्ट्रवाद वाढूच शकत नाही, कारण स्पष्ट आहे, सामाजिक जीवनात रूढींचे पालन करणारेच जर राष्ट्रवादाच्या गोष्टी करू लागले तर राष्ट्रवाद कसा विकसित होईल? त्या काळातील काही राष्ट्रवादी विचारवंत स्वित्झर्लंडला (जो बहुभाषी आणि बहूजातीय असूनही राष्ट्राच्या स्वरूपात असित्त्वात आहे) भारताच्या दृष्टीने एक अनुकरणीय उदाहरण मानत होते. परंतु रवींद्रनाथ टागोर असे मानत होते की, ‘स्वित्झर्लंड आणि भारत ह्यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर आहे. तेथे व्यक्तीव्यक्तींमध्ये जातीभेद नाही आणि त्यांच्यात आपसात आपलेपणाचे नाते तर आहेच, पण आंतर्विवाहही मान्य आहे, कारण की ते आपल्याला एकाच रक्ताचे मानतात. परंतु भारतात जन्माधिकार समान नाही. जातीजातीतील विभिन्नता तसेच परस्परातील भेदभाव ह्या कारणांमुळे भारतात त्या प्रकारची राजकीय एकता प्रस्थापित करणे ही कठीण बाब आहे, जी कुठल्याही राष्ट्राला अत्यावश्यक असते.’ टागोरांचे मत आहे की समाजाकडून बहिष्कृत होण्याच्या भितीमुळे भारतीय भेकड बनले आहेत. जेथे खाण्यापिण्याचेही स्वातंत्र्य नाही, तेथे राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ, काही व्यक्तींचे इतर सर्वांवर नियंत्रण असाच होणार. ह्यातून निरंकुश राज्यसत्ता आकारात येईल, आणि राजकीय जीवनात विरोधी वा वेगळे मत असणाऱ्याला जगणे अशक्य होईल. अशा नावापुरत्या असलेल्या स्वातंत्र्याकरता आपण आपल्या नैतिक स्वातंत्र्याला तिलांजली देणार आहोत का?
संकुचित राष्ट्रवादाच्या विरोधात ते पुढे लिहितात की, राष्ट्रवादातून जन्मणारी संकुचितता हा मानवाचे नैसर्गिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकास यांच्या रस्त्यावरील अडथळा आहे. ते राष्ट्रवादाला, युद्धपिपासू वृ्त्तीला उत्तेजन देणारा आणि समाजविरोधी समजतात, कारण की, राष्ट्रवादाच्या नावांवर होणारा शासनशक्तीचा अनियंत्रित उपयोग अनेक अपराधांना जन्म घालतो. व्यक्तीला राष्ट्राकरता समर्पित करणे त्यांना कदापीही मान्य नव्हते. राष्ट्राच्या नावानं मानवसंहार, तसेच मानवीय संघटनांवरील बंधन हे त्यांना सहन होणे शक्य नव्हते.
त्यांच्या विचारानुसार राष्ट्रवादाचा सर्वात मोठा धोका हा होता की, सहिष्णूता आणि त्यात अभिप्रेत असलेली नैतिक परमार्थाची भावना, राष्ट्राच्या स्वार्थपरायण नितीमुळे नष्ट होईल. अशा अनैसर्गिक आणि अमानवीय विचारांना राजकीय जीवनाचा आधार बनवल्याने सर्वनाशच होईल. ह्याचकरता, राष्ट्रवाद हा केवळ भारतासाठीच नव्हे तर सर्व विश्वासाठीच त्याज्य समजावा, असा टागोरांचा आग्रह होता. ते भारताच्या राष्ट्रवादी आंदोलनातील राजकीय स्वतंत्रतेच्या संबंधातही पक्षाचे टीकाकार होते, कारण त्यांचा असा विश्वास होता की भारत राष्ट्रवादातून शक्ती प्राप्त करू शकणार नाही. त्यांचे म्हणणे होते की, भारतानं राष्ट्र ह्या सकुंचित संकल्पनेला सोडून आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन अनुसरायला हवा. आर्थिक दृष्टीने भारत मागासलेला असेलही, मानवी मूल्यांमध्ये तरी इथे मागासलेपण नको. दरिद्री असूनही भारत विश्वाला मार्गदर्शन करून मानवतावादी एकतेचा आदर्श प्रस्थापित करू शकतो. भारताचा पुरातन इतिहास हेच सिद्ध करतो की, भौतिक संपन्नतेची फिकीर न करता भारताने अध्यात्मिक जाणीवेचा सफलतापूर्वक प्रचार केला आहे.
समाज आणि राज्य
टागोर राष्ट्रवादावर टीका करतात, ह्याचे कारण ते समाजाला राज्यापेक्षा जास्त महत्व देत होते आणि मानवी विकासात माणसाला अधिक महत्वपूर्ण मानत होते. ते फॅसिझमला राष्ट्रवादाच्या पागलपणाचे प्रतिक मानत. फॅसिझमच्या उदयाच्या आधी राष्ट्रवाद, आर्थिक विस्तारवाद आणि साम्राज्यवादाशी जोडलेला होता. पहिल्या महायुद्धानंतर राज्याच्या वाढत्या शक्तिमुळे राष्ट्रवादाला राज्याने अधिक ताकदवान केले. वेनितो मुसोलिनी म्हणाला होता की, राष्ट्र राज्याची निर्मिती करू शकत नाही, तर राज्य राष्ट्रांची निर्मिती करू शकते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील राजकारणात महत्वाची झालेली राष्ट्रवादाची संकल्पना, मुळात सांस्कृतिक स्वरूपाची होती. ह्या विचाराच्या प्रभावाखाली येण्याआधी पश्चिमी देश हे अधिक विशाल विश्वव्यापी दृष्टिकोन राखून होते, आणि त्यामुळेच तेथील राष्ट्रवाद प्रथम सुप्तावस्थेत होता. परंतु प्रादेशिकतावादाने हळू हळू परिस्थितीत बदल होत गेला. यांत्रिकीकरणाने एक वेगळं नव्या प्रकारचे वातावरण आकारात आले. परंपरागत मूल्ये नष्ट केली जाऊ लागली, त्याचप्रमाणे मानव समुदायांच्या एकतेची विचारसूत्रे शबल होऊ लागली. भारतात हिंदू राष्ट्रवाद तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदयाला ह्या संदर्भातच समजून घ्यायला हवे.
दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर (१९३१) हिंदू महासभेचे वरिष्ठ नेते धर्मवीर डॉ. मुंजे सरळ इटलीला गेले. तेथे त्यांनी अनेक स्थळांना भेटी दिल्या तसेच नाझी संघटनांची स्कूल्स, कॉलेजेस आणि प्रशिक्षण संस्था यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला. डॉ. मुंजे ह्यांच्या डायरीची १३ पानं (जी नेहरू मेमोरीयलमध्ये उपलब्ध आहेत) दाखवून देतात की, त्यांनी १५ मार्च ते २४ मार्च, १९३१ ह्या दिवसांत तेथील मिलिट्री कॉलेज तसेच फॅसिस्ट अकादमी ऑफ फिजिकल एज्युकेशनचे निरीक्षण केले. महाराष्ट्रातील नागपूर येथे १९२५ मध्ये सुरू झालेल्या आर.एस.एस. च्या प्रशिक्षणासाठीच त्यांनी हा अभ्यास केला होता आणि इटलीहून निघण्याच्या आधी त्यांनी मुसोलिनीची भेट घेऊन इटलीमध्ये सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमांची भरपूर प्रशंसा केली होती. डॉ. हेडगेवार ह्यांना भेटून आर.एस.एस. ला घडविण्यात ते साह्यभूत झाले. त्याचाच परिणामस्वरूप म्हणजे आजचा आरएसएस. ह्यांच्याकडून नागपूर आणि नाशिक येथे असलेल्या भोसले मिलीटरी स्कूलचे व्यवस्थापन केले जाते. ह्यानंतर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विविध संघटनांना आकार देऊन संघ आज आपल्या ताकदीची ओळख करून देत आहे. ज्यामध्ये क्रूरता, विकृती आणि फुटीरता वाढते, अशा राष्ट्रवादाच्या भूमिकेवर, रवींद्रनाथ टागोरांनी कडक टीका केली होती. ते राष्ट्रवादाला सत्तेचे संघटीत सर्वव्यापी रूप मानून राज्याच्या शोषक भूमिकेकडे लक्ष वेधतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिमेत राष्ट्रवादाच्या यंत्राने प्रचंड दाबाचा उपयोग करून, व्यापार आणि राजनिती ह्यांच्या मान्यतेचे साफ, स्वच्छ गठ्ठे तयार केले गेले. आर.एस.एस. राष्ट्रवादाच्या नावांवर ह्याच संकल्पनेची येन केन प्रकारेण वकिली करत आहे. त्याच धोरणाच्या अंतर्गत, त्यांचे नेते वेळोवेळी कधी सरदार वल्लभभाई पटेल तर कधी रवींद्रनाथ टागोर ह्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या वचनांना, आपल्या विचारांच्या प्रचार, प्रसाराकरता, काटछाट करून संदर्भहीन उदधृत करतात.
रवींद्रनाथ टागोरांनी भारताला पश्चिमेच्या राष्ट्रवादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मतानुसार, आंतर्राष्ट्रीय सहयोगासाठी ह्या विषारी राष्ट्रवादापासून भारताने दूर राहणे ही गरजेची बाब आहे. त्यांचे असे म्हणणे होते की, पाश्चिमात्य विचार एक असा बांध आहे की जो त्यांच्या संस्कृतीला राष्ट्रवादी नसलेल्या देशाकडे प्रवाहित होण्याच्या आड येतो. ते भारताला राष्ट्र नसलेला देश मानत होते, कारण भारत हा विभिन्न वंशियांचा देश आहे आणि ह्या सर्व विभिन्न वंशियांमध्ये समन्वय राखणे ही देशाची गरज आहे. युरोपला अशी गरज भासत नाही. म्हणून युरोपमधील देश राष्ट्रवादाच्या मद्याचे सेवन करून आपल्या अध्यात्मिक आणि मनोवैज्ञानिक एकतेला धोका निर्माण करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानूसार भविष्यकाळात पश्चिमी राष्ट्रे एक तर परदेशियांकरता आपले दरवाजे बंद करतील किंवा परदेशीयांना ते आपले गुलाम बनवतील, ह्यातूनच त्यांच्या वंशवादी वृत्तीतून उदभवलेल्या समस्येची सोडवणूक होऊ शकेल. सरळच आहे, भारतासाठी हा पर्याय होऊच शकत नाही.
राष्ट्रवादाची समीक्षा करण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी तीन प्रमुख आधारभूत मुद्दे उपस्थित केले आहेत-
१) राष्ट्रवादी राज्यशासनाचे आक्रमक धोरण
२) व्यापारी स्पर्धा, आणि
३) वंशवाद
टागोर नाझीवादावर प्रखर टीका करायचे. फॅसिझम आणि कम्युनिझमची तुलना करताना त्यांनी फॅसिझमची असहनीय निरंकुशवाद अशी व्याख्या केली आहे. ते फॅसिस्टांच्या सत्तेला सर्वात अमानवी समजत होते, कारण त्या व्यवस्थेत प्रत्येकच गोष्ट नियंत्रित केली जाते. भारतात आर.एस.एस. हे काम प्रथमपासूनच करत आली आहे. मे २०१४ ला केंद्रात भाजपा सरकार आल्यावर संघ परिवाराचा उत्साह अधिकच वाढला आहे. ह्यामुळेच लवजिहाद, रामजादे-हरामजादे हे राग गायले जात आहेत. मदर टेरेसासारख्या गरीबांच्या संत महिलेपासून, चर्चवरील हल्ले, दंगली, तसेच आपल्याला अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाच्या प्रचार व प्रसाराच्या उद्देशानुसार, वेगवेगळ्या राष्ट्रनायकांच्या उक्तींचा विनासंदर्भ विकृत पद्धतीने उपयोग करणे, हा त्यांच्या सुनियोजित रणनितीचा भागच आहे. त्याच दिशाक्रमात संघाचे सरसंघचालक, रवींद्रनाथ टागोरांना हिंदु राष्ट्राचे समर्थक बनवण्याचा प्रयत्न करून, टागोरांचा अपमानच करत आहेत.
संघाच्या संदर्भात विनोबाजींचे विचार
आर.एस.एस. ने ह्यापूर्वी विवेकानंदांचीही ह्याच प्रकारे काटछाट करून त्यांची आपल्या सोयीची प्रतिमा जनमानसात नेण्याची अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. स्वामीजी वैश्विक पातळीवरील विचारवंत होते. परंतु संघाने त्यांना संकुचित हिंदुत्वाच्या वेठीला बांधून त्यांना हिंदू सन्यासी वा साधूच्या रूपात पेश करून, त्यांचे अवमूल्यनच केले आहे. असत्याचा आधार घेणे, कोणतीही गोष्ट काटछाट करून, आपल्याला सोयीस्कर पद्धतीने विकृत करून पेश करणे, हा संघाच्या रणनितीचाच एक हिस्सा आहे. खुद्द आचार्य विनोबा भावे तसे म्हणाले आहेत. गांधीजीच्या हत्येनंतर ११ मार्च ते १५ मार्च १९४८ ह्या दिवसांत सेवाग्रामला एक चिंतन-बैठक झाली होती. त्या बैठकीत विनोबाजीनी आपले मत अगदी स्पष्ट शब्दात व्यक्त केले की, “ मी त्याच प्रांतातला आहे, जिथे आर.एस.एस.चा जन्म झाला आहे. मी जात सोडून बसलोय, पण हे विसरू शकत नाही की मी त्याच जातीचा आहे, ज्या जातीतील नाथूराम गोडसेने गांधीजीची हत्त्या केली आणि तो अशा संघटनेचा माणूस होता, जी संघटना एका हेडेगेवार नावाच्या ब्राह्मणाने स्थापित केली आहे. त्यांच्या देहांतानंतर जे सरसंघचालक बनले आहेत ते श्री. गोळवलकर हेही महाराष्ट्रीयन ब्राह्मणच आहेत. ह्याचे बरेचसे प्रचारक जरी पंजाब, मद्रास, बंगाल किंवा उत्तर भारत, कुठेही काम करत असतील, तरी त्यातील बहुतेकजण महाराष्ट्रीयन ब्राह्मणच आहेत. ही संघटना खूपच मोठ्या प्रमाणात पंरतु मोठ्या कुशलतेने पसरवली गेली आहे. ह्याची मुळे खूप खोल गेलेली आहेत. ही संघटना एकदम फॅसिस्ट पद्धतीची संघटना आहे. ह्यात मुख्यतः महाराष्ट्राच्या बुद्धीचा उपयोग केला गेला आहे. ह्याच्यातील सर्व पदाधिकारी आणि संचालक बहुधा महाराष्ट्रीयन आणि ब्राह्मणच राहिले आहेत. ह्या संघटनेचे लोक इतरांना विश्वासात घेत नाहीत. गांधीजींचा मार्ग सत्याचा होता. ह्यांचा मार्ग असत्याचा आहे, असे दिसते. हेच असत्य त्यांच्या तंत्राचा आणि विचारसरणीचा भाग आहे.
“एका धार्मिक नियतकालिकात मी त्यांच्या संघटनेचे सरसंघचालक श्री गोळवलकरांचा एक असा लेख वाचला, ज्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा उत्तम आदर्श अर्जुन आहे, असे म्हटले आहे. अर्जूनाला आपल्या गुरूजन आणि आप्तजनांबद्दल स्नेह आणि आदर होता, परंतु कर्तव्यकर्म म्हणून त्याने त्यांना नम्रतापूर्वक प्रणाम करून, नंतर त्यांना ठार केले. ह्या प्रकारची हत्या जो करू शकतो, तोच खरा स्थितप्रज्ञ असतो, असे त्यांचे मत आहे. ह्या लोकांची गीतेबद्दलची भक्ती माझ्यापेक्षा कमी नाही आणि मी ज्या श्रद्धेने गीतावाचन करतो त्याच श्रद्धेने तेही रोज गीता वाचत असतील.
मनुष्य जर पूज्य गुरूजनांना आणि आपल्या आप्तजनांना ठार मारू शकत असतील तर तो स्थितप्रज्ञ, हे त्यांच्या दृष्टीने गीतेचे तात्पर्य आहे. बिचारी गीता! तिचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो. अर्थ हाच आहे की, ही केवळ दंगली करणाऱ्या उपद्रव्यांची जमात नाहीये, ही तत्वज्ञान्यांची जमात आहे, त्यांचे आपले तत्वज्ञान आहे, आपले तंत्र आहे.”
गीतेपासून गुरूदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या स्वदेशी समाजापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आपल्या पद्धतीने सोयीस्कर अर्थ काढून त्याचा प्रचार, प्रसार करणे हा संघाच्या तंत्राचा एक भाग आहे. हे तंत्र संघाने १९२५ पासून हळूहळू विकसित केले आहे. रवीन्द्रनाथ टागोरांना १९१३मध्ये नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना सर्व जगात भ्रमण करण्याची संधी उपलब्ध झाली. त्या यात्रेच्या दरम्यान १९१७ मध्ये जपानच्या यात्रेमध्ये देखील त्यांनी राष्ट्रवादावर कडक टीका केली होती. त्यावेळी जपान राष्ट्रवादाच्या ज्वरामध्ये चांगलाच तापलेला होता, त्यामुळे टागोरांना भाषण न करताच जपानहून परतावे लागले होते. असे हे टागोर हिंदु राष्ट्राचे समर्थक होते असे सरसकट खोटे विधान भागवत करीत आहेत. विनोबानी अगदी योग्य शब्दात सांगितले आहे की, तत्त्वज्ञानी लोकांची ही अशी जमात आहे की, ज्यांचे आपले खास तंत्र आहे. गीतेपासून, विवेकानंदापासून, गांधी, नेहरू आणि पटेलांपर्यन्त सर्वांनाच आपल्या सोयीप्रमाणे ठाकूनठोकून, काटछाट करून पेश करण्यात ते एकदम पटाईत आहेत. ह्या साखळीत रवीन्द्रनाथ टागोर ही नवी कडी आहे, एव्हढेच.

संदर्भग्रंथ:
1. कल तक बापू थे. हू विल गाईड अस नाऊ?: गोपालकृष्ण गांधी, पर्मनंट ब्लॅक पब्लिकेशन
2. टागोर: सिलेक्टेड एसेज, रूपा पब्लिकेशन, न्यू दिल्ली
3. स्वदेशी समाज: रवींद्रनाथ टागोर (मराठी अनुवाद)
4. रवींद्रनाथ रचनावली: विश्व भारती पब्लिकेशन, शांती निकेतन
5. गांधी, नेहरू अँड टागोर: प्रकाश नारायण नातानी, पॉइंटर पब्लीकेशन, जयपूर

sureshkhairnar@yahoo.com,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.