स्वप्रतिमेच्या प्रेमात काही थोर भारतीय

नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्या अलीकडील भेटीत नरेंद्र मोदींनी घातलेल्या पोषाखाची चर्चा बरीच गाजली. त्यांनी जो सूट परिधान केला होता, त्यावर त्यांच्या नावाच्या नक्षीचे पट्टे होते. त्यावरील टीका अप्रस्तुत नव्हती. त्यांच्या पोषाखात दिखाऊपणा, भोंगळपणा तर होताच; तरीही मोदींचे त्यांच्या पेहरावातून दिसणारे स्वयंप्रेम हे आपल्याकडील किती तरी ताकदवान आणि यशस्वी भारतीय पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकीचे अनुकरण होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
याचे पहिले उदाहरण भारताच्या सुप्रसिद्ध आणि अनेक सन्मानांनी अलंकृत शास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांचे देता येईल. ते जगातील एका प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे सदस्य (फेलो) आहेत आणि आपल्या देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना अलीकडेच मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी बंगलोरमधील त्यांच्या एका चाहत्याने तेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स – ज्याचे प्रा.राव एक संचालक आहेत – या संस्थेसमोरील एका वर्तुळाकार बागेला त्यांचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव महापालिकेत संमत करून घेतला. आपल्या देशात उद्याने, रस्ते किंवा चौक यांना साधारणपणे दिवंगत व्यक्तींची नावे देण्याची पद्धत आहे; पण प्रा.रावांच्या हयातीतच आणि त्यांच्याच हस्ते त्या बागेचे नामकरण त्यांच्याच नावे व्हावे, हा अपवादच म्हणावा लागेल.
भारतीय वैज्ञानिकांच्या वर्तुळात प्रा.रावांनंतर होणारे दुसरे नाव रघुनाथ माशेलकर यांचे. डॉ.माशेलकर हे कौन्सिल फॉर सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे भूतपूर्व सरसंचालक (डायरेक्टर जनरल) आहेत, रॉयल सोसायटीची फेलोशिप त्यांच्या नावे आहे आणि अशी अनेक सन्मानदर्शक आभूषणे त्यांच्याजवळ आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या नावाने अद्यापपर्यंत कोणत्याही इमारतीची उभारणी झालेली नाही किंवा एखाद्या चौकाचे नामकरणही झालेले नाही. पण ‘करंट सायन्स’ या नियतकालिकाच्या अलीकडच्याच अंकात त्यांनी संपादकीय जागेत जो मजकूर लिहिला आहे, त्यातून त्यांची अहंता ठायी-ठायी प्रकट झाली आहे. ‘इनोव्हेशन’ फॉर अफोर्डेबल एक्सलन्स’ या शीर्षकाचा तो लेख फक्त माशेलकर आणि माशेलकरांबद्दलच सांगणारा आहे. त्या नियतकालिकाच्या फक्त दोन पानांमध्ये माशेलकरांच्या हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यूमध्ये जो लेख किंवा निबंध प्रसिद्ध झाला, त्याची माहिती आहे. त्या लेखाने जगभरच्या चर्चेला गती कशी मिळाली आहे आणि ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे त्या विषयावरील ‘खास अधिवेशन’ कसे गाजले याचा उल्लेख आहे. त्यांनी दिलेल्या एका टी.ई.डी. लेक्चरवर त्यांना पाच हजार प्रतिक्रिया मिळाल्या आणि तेवीस भाषांतून ते भाषण सबटायटल्ससह प्रसिद्ध झाले आहे; ‘ग्लोबल अलायन्स’ नावाच्या संस्थेचे डॉ.माशेलकर अध्यक्ष आहेत; युरोपियन संघराज्याने आमंत्रित करून दोन हजार श्रोत्यांपुढे त्यांना आपल्या विषयावर बोलायला लावले; ते जेव्हा सी.एस.आय.आर.चे डायरेक्टर जनरल होते, तेव्हा त्यांनी ‘न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लीडरशिप इनिशिएटिव्ह’ (नव्या सहस्रकातील भारतीय तंत्रविज्ञानाचे नेतृत्व प्रशिक्षण) अशा नावाने प्रस्थापित केलेल्या कार्यक्रमामागे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’चे तंत्र होते. माशेलकरांचा वरील लेख विज्ञानाच्या गाभ्याशी आणि उद्दिष्टांशी इतका विसंगत होता की, तो प्रसिद्धीसाठी स्वीकारण्यात तरी कसा आला याचेच मला नवल वाटते. ‘करंट सायन्स’च्या संपादकांनी त्यात काही आवश्यक काटछाट किंवा बदल केल्याशिवाय तो लेख छापला तरी कसा? एक तर तो संपादक अत्यंत अक्षम असावा किंवा ते माशेलकरांची कीर्ती आणि प्रतिष्ठा यांच्याखाली दबून जाऊन तो लेख दुरुस्त करण्याची सूचना करणे त्याने टाळले असावे.
‘करंट सायन्स’ हे नियतकालिक प्रख्यात शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते सी.व्ही.रामन यांनी सुरू केले. त्यातील मजकुराचे स्वरूप अमेरिकेतील ‘सायन्स’ आणि ब्रिटन‘धील ‘नेचर’ या दोन नियतकालिकांच्या धर्तीवरच आहे. त्यांच्याप्रमाणेच ‘करंट सायन्स’मध्ये शास्त्रीय निबंधांच्या मूळ प्रती आणि त्यांच्यावरील छोटी टिपणे, ग्रंथ परीक्षणे आणि स्मृतिलेख किंवा श्रद्धांजली अशा स्वरूपाचे लिखाण प्रसिद्ध होते. पण ‘सायन्स’ किंवा ‘नेचर’ या नियतकालिकांमध्ये संपादकीयात अशा प्रकारच्या स्वयंस्तुतीने ओतप्रोत भरलेले लिखाण कधीच प्रसिद्ध होणार नाही. आपल्या लिखाणाला आकार देतानाआपण विकिपीडियाला ही स्वलिखित माहिती पुरवत नाही किंवा नोकरीसाठी एखादा अर्ज भरत नाही; तर एक अभ्यासपूर्ण लेखन करीत आहोत, जे राष्ट्रातील वैज्ञानिक जगताची ध्वजा फडकवीत ठेवणार आहे, याची जाणीव डॉ.माशेलकरांना नसेल का?
‘करंट सायन्स’मधील डॉ.माशेलकरांचे संपादकीय वाचत असताना मला ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ जे.बी.एस.हाल्डेन यांच्यासंबंधीच्या एका घटनेची आठवण झाली. हाल्डेन १९५० मध्ये भारतात आले. त्यांनी भारतीय नागरिकत्व पत्करले आणि कलकत्यात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एक प्रयोगशाळा उघडली. एकदा त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना स्वत:ची हकिगत ते कंटाळेपर्यंत ऐकवली. त्यात त्याच्या कुटुंबाची कहाणी, त्याचे शैक्षणिक रेकॉर्ड, ठरवून थांबवलेला विवाह यांबद्दल तो इतका काही बोलला की, हाल्डेन यांनी हात वर करून त्याला थांबविले आणि ते म्हणाले, ‘‘तू फक्त तुझ्याचविषयी बोलत राहिला आहेस, पण विज्ञानाला स्वारस्य आहे ते तुझ्या बाहेरील जगाबद्दल!’’
सत्य असे आहे की, सर्वच भारतीय शास्त्रज्ञ डॉ.राव किंवा डॉ.माशेलकर यांच्यासारखे स्वत:ला मिरवून घेणारे अगर फुशारक्या मारणारे नसतात. माझ्या संपर्कातील बुद्धिमान आदर्श मित्रांपैकी ओबेद सिद्दिकी हे एक होते. त्यांनी नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल रिसर्च या भारतातील नि:संशयपणे सर्वोच्च दर्जाच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेची उभारणी केली. सिद्दिकींमध्ये बौद्धिक चमक आणि व्यक्तिगत वर्तनातील अचूकपणा किंवा संयम यांचा विलोभनीय संगम होता. त्यांनी त्या संस्थेसाठी उत्तम व सुयोग्य पार्श्वभूमीच्या तरुण वैज्ञानिकांची निवड केली आणि काही काळाने संस्था चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. एन.सी.बी.एस.मध्ये म्हणजे त्याच संस्थेमध्ये त्यांनी एक प्रकारच्या मुक्त आणि आदर्शवादी वातावरणाची निर्मिती केली, जिथे कनिष्ठ पातळीवरचे वैज्ञानिक तरुण वरिष्ठांना बेधडकपणे आव्हान देऊ शकतात आणि जिथे ‘सर’, ‘प्रोफेसर’ अशा प्रकारच्या वरवरच्या आदरणीय पण मनात धाक निर्माण करणाऱ्या संबोधनांनाही फाटा देण्यात येतो. दुर्दैवाने या ओबेद सिद्दिकींच्या साच्यात बसणारे वैज्ञानिक या देशात फारसे नाहीत. सी.एन.आर.राव आणि डॉ.माशेलकर यांनी त्यांच्या तरुण वयात प्रथम दर्जाचे वैज्ञानिक संशोधन नि:संशयपणे केले; पण वैज्ञानिक नेतृत्व आपल्या मागील तरुण संशोधकांच्या स्वाधीन करण्याऐवजी त्यांनी स्वत:ला त्यातच दीर्घ काळ बुडवून घेऊन ते पोक्त झाले. त्यांनी आपली सत्ता आणि सत्तास्थाने दोन्ही बळकट केली. त्यातही आणखी वाईट गोष्ट अशी की, निव्वळ भाटगिरी आणि खुशामत या दुर्गुणांना त्यांनी उत्तेजनच दिले. डॉ.राव यांनी त्यांच्या संस्थेसमोरील मैदानाला आपले नाव देण्यास दिलेली संमती हा त्याचाच पुरावा आहे.
आपल्या देशातील वैज्ञानिकांच्या मार्गावर समाजशास्त्रज्ञही चाललेले आहेतच. या संदर्भात समाजमनावर दबदबा असणाऱ्या जगदीश भगवती आणि अमर्त्य सेन या अर्थशास्त्रज्ञांचे वर्तन तपासून पाहणे आवश्यक आहे. सुशिक्षित भारतीय या दोघांना नावाने तर ओळखतातच, शिवाय आर्थिक धोरणांबाबत त्या दोघांमध्ये सतत चाललेले वादही लोकांना माहीत आहेत. भगवती हे खुल्या बाजारव्यवस्थेचे समर्थक व प्रचारक आहेत. परकीय गुंतवणूक आणि स्पर्धा यांना आपली अर्थव्यवस्था खुली असली पाहिजे, असा श्री.भगवती यांचा दावा आहे. सेन यांना विकासाइतकेच त्याचे वितरणही महत्त्वाचे वाटते आणि जनतेच्या संगोपनातील सरकारची भूमिका त्यांना अधिक जबाबदारीची वाटते. राजकीय प्रभावाच्या पातळीवर सोनिया गांधी आणि त्यांचे राष्ट्रीय सल्लागार मंडळ (अ‍ॅडव्हायझरी कौन्सिल) यांना अमर्त्य सेन जवळचे सल्लागार वाटत, तर नरेंद्र मोदींचा भगवतीवर अधिक भरवसा आहे.
या बौद्धिक आणि सैद्धांतिक मतभेदांमुळे भगवती आणि सेन हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून जगासमोर आले. पण या दोघांमध्ये एक समान गोष्ट अशी आहे की, दोघेही जिवंत असताना सी.एन.आर.राव या वैज्ञानिकाप्रमाणेच त्यांच्याही नावे काही गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. भगवतींनी कोलंबिया विद्यापीठात अनेक वर्षे ज्ञानदान केले, त्याचे स्मारक आता राजकीय अर्थशास्त्र विभागात जगदीश भगवती अध्यासनाच्या (चेअर) रूपाने तिथे झाले आहे आणि त्याचा ताबा सध्या भगवतींचेच लेखन-सहकारी व वारसदार अरविंद पनगरिया यांनी घेतलेला आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (भारतीय समाजविज्ञान संशोधन संस्था) या संस्थेने सर्वोत्कृष्टतेच्या निकषावर सुरू केलेले अमर्त्य सेन वार्षिक पुरस्कार त्यांच्याच अध्यक्षतेखाली वितरित करण्यात आले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘व्यक्तिपूजा ही लोकशाही मूल्यांना मारक आहे’ असा दिलेला इशारा सर्वांना माहीतच आहे. हा इशारा राजकीय क्षेत्राला जसा लागू आहे, तसाच किंवा त्याहूनही अधिक वैज्ञानिक क्षेत्राला लागू पडणारा आहे. ज्ङ्मेष्ठ विद्वान मंडळी किंवा अभ्यासक यांच्याबद्दल आदर ठेवणे ही गोष्ट चांगलीच आहे; पण या आदराचे रूपांतर अतिनम्रतेत किंवा व्यक्तीबद्दलची गाढ श्रद्धा आणि चमत्काराच्या भावनेमध्ये होते, तेव्हा त्याचा परिणाम स्वतंत्र व मूलभूत विचारांच्या विकासाच्या आड येतो. म्हणूनच जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठे आणि संशोधन संस्था या यादीच्या तळाच्या जवळपास पोहोचलेल्या दिसतात. माझे या विषयावरचे हे स्तंभलेखन चालू असताना माझ्या एका मित्राने मला विचारले की, सी.एन.आर.राव यांच्याप्रमाणेच बंगलोरमध्ये अनिल कुंबळे या क्रिकेटपटूच्या नावाने एका चौकाचे नामकरण करण्यात आले तेव्हा तोही तिथे हजर होता, हे खरे का? ‘माहीत नाही’ हे उत्तर देताना मी पुढे म्हटले की, नैतिकतेच्या किंवा कलात्मकतेच्या कसोट्या – ज्या वैज्ञानिकांना आणि विद्वान मंडळींना लावल्या जातात, त्या – खेळाडूंना लागू पडत नाहीत. जगदीश भगवतींचे एक जवळचे मित्र आणि पूर्वीचे सहकारी रॉबर्ट सोलो हे सध्या जगातील एक सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ मानले जातात. जेव्हा ते ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत शिकवत होते, तेव्हा त्यांच्या संस्थेत ‘रॉबर्ट सोलो चेअर इन पोलिटिकल इकॉनॉमी’ असे एखादे अध्यासन निर्माण करण्यात आले होते काय? अमर्त्य सेनप्रमाणेच केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये सर्वोच्च पदावर मार्टिन रीझ हे खगोलशास्त्रज्ञही एके काळी होते, पण या असामान्य ब्रिटिश शास्त्रज्ञाने वैज्ञानिक प्रगल्भतेसाठी दर वर्षी ‘मार्टिन रीझ’ पुरस्कार दिले होते काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच असावीत.
सी.एन.आर.राव, अमर्त्य सेन आणि जगदीश भगवती या तिघांनीही वेगवेगळ्या गोष्टींना त्यांचे नामकरण करण्यास परवानगी किंवा प्रोत्साहन दिले, यात त्यांनी बेकायदेशीर काही नाही; त्यात अनैतिकही काही नाही; पण हीन अभिरुची दर्शन आणि औचित्यभंग मात्र नक्कीच आहे. या सर्व गोष्टींच्या पाश्र्वभूमीवर आता नरेंद्र मोदी आणि त्यांचे नाव विणलेला त्यांचा सूट याचा विचार केला, तर ‘समानता’ हा गाभा व रचना असलेल्या समाजात किंवा ज्या समाजात कलांचा आविष्कार सौम्य व संयमी असतो त्यात मोदींनी दाखविलेली अभिरूची अप्रस्तुतच आहे; पण ज्या देशात व्यक्तिपूजा सर्वत्र चालते, जिथे सामर्थ्य आणि कीर्ती लाभलेल्याची मुजोरी अमऱ्याद असते, त्या समाजात अशा प्रकारची औचित्यशून्य वागणूक अगदी सहज असते. म्हणून भारतातील थोर विद्वान आणि शास्त्रज्ञ स्वप्रतिमेच्या कौतुकात इतके उत्कटपणे पडलेले असतात; तेव्हा स्वत:च्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या, साधारण शिकलेल्या राजकीय नेत्याला त्याच गोष्टीबद्दल फार दूषणे देता होणार नाहीत.

(अनुवाद: कुमुद करकरे)

‘साप्ताहिक साधना’च्या सौजन्याने

weeklysadhana@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.