आपली बाजू नेमकी कोणती?

मुंबईच्या स्वामीनारायण मंदिरातील कार्यक्रमामध्ये एका महिला पत्रकाराला रीतिरिवाजांचा दाखला देत पहिल्या रांगेमधून उठायला सांगितल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. त्यामुळे धर्माच्या नावावर चालणारी स्त्री-पुरुष असमानता आणि भारतीय राज्यघटनेने दिलेले स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले. खरे तर ह्या संघर्षाचा आपल्या देशात मोठाच इतिहास आहे. अगदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असताना इंदिरा गांधींनादेखील जगन्नाथ पुरीच्या मंदिरामध्ये अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. वर्तमानाचा कानोसा घ्यायचा झाला तर स्त्री-पुरुष समतेच्या बाबतीत इतर क्षेत्रांमध्ये आपण प्रगती केलेली असली तरी भारतात अजून अशी असंख्य मंदिरे आहेत की जिथे महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही.
भारतीय संविधानाची साठी ओलांडून गेल्यानंतरसुद्धा अशा घटना आपल्याकडे अजून का घडतात ह्याची कारणमीमांसा आपण जर करू लागलो तर धर्माने स्त्रीला दिलेल्या दुय्यम स्थानापाशी आपण येऊन पोहोचतो. जवळ जवळ सर्वच धर्मांनी स्त्रीला दुय्यम स्थान दिलेले आहे. इस्लामने तीन वेळा तलाक उच्चारून विवाहित स्त्रीला काडीमोड देण्याची सोय ठेवली आहे. इतकेच नाही, तर त्या स्त्रीला पोटगीचा अधिकारदेखील नाकारला आहे. यहुदी धर्माची आज्ञा अशी सांगते की, ‘जेवताना भाकरी करपली तर पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी.’ हिंदू धर्मातील मनुस्मृतीमध्ये असे लिहिले आहे की, पती व्यसनी, जुगारी, वेश्यागमनी कसाही असला तरी स्त्रीने त्याच्या आज्ञेत राहावे. ख्रिश्चन धर्माच्या मते पुरुषाच्या जन्मानंतर केवळ त्याच्याचसाठी स्त्रीची निर्मिती झाली आणि तीदेखील पुरुषाच्या बरगडीपासून. आणखी इतर धर्मांमध्येही आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्या उघडपणे पुरुषसत्ताक समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच स्त्री-पुरुष भेदभावाचे समर्थन करणाऱ्या आहेत. असे असतानादेखील आधुनिक मूल्यांचा स्वीकार करून स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूने भूमिका घेण्याचे आपल्यापैकी बहुतांश लोक का टाळतात हा कळीचा मुद्दा आहे.
जर हा गुंता सोडवायचा असेल तर हे मान्य करण्यावाचून गत्यंतरच नाही की, आपण जन्माने कुठल्याही धर्माचे असू, आपल्या धर्मामध्ये जे कालबाह्य झाले आहे ते मागे टाकले पाहिजे. पण जागतिक पातळीवर भारतासकट अनेक ठिकाणी धर्माचे कट्टरीकरण होत असताना आणि विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या लोकांचे गोळ्या घालून खून होत असताना हे कसे घडू शकेल, अशी शंका कुणाच्याही मनामध्ये येऊ शकते. आपल्याला जर खरेच आधुनिक माणूस बनायचे असेल तर आपले बाह्यरंग आधुनिक होऊन कसे चालेल? आपल्या धारणा आणि मूल्ये आधुनिक व्हायला नको का?
धर्म ही आपल्या समाजातील बहुतांश लोकांच्या जीवनातील सर्वात मोठी धारणा असते; पण अडचण अशी आहे की, ही धारणा चिकित्सेच्या प्रांगणात आणलेली आपल्याला आवडत नाही. विधायक धर्मचिकित्सेचा आग्रह जर कोणी धरू लागले तर मात्र अनेकांचे पित्त खवळते. चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तीची आपण निंदा करू लागतो, निंदा करून ते थांबले नाहीत तर त्यांना धर्मद्रोही ठरवतो. तुम्हाला आमच्याच धर्मातील त्रुटी दिसतात असे म्हणून त्यांच्याशी भांडतो. ह्यातून स्वत:च्या धारणा आणि मूल्ये ही आधुनिक होण्याच्या मार्गातील आपण स्वत:च अडथळा बनत असतो हे अनेकांच्या लक्षातदेखील येत नाही. खऱ्या धर्माला चिकित्सेचे वावडे असण्याचे काही करणच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायम ह्या बाबतीत खऱ्या सोन्याला आगीचे भय नसते हे उदाहरण द्यायचे. जर अग्निपरीक्षेत धातू जाळून गेला तर ते सोने नसल्याचे सिद्ध झाल्याने दु:ख करण्याचे काही कारणच उरत नाही. जर ते खरेच सोने असेल तर ते आगीमध्येदेखील तावून-सुलाखून निघेल. म्हणून आपण चिकित्सेला घाबरता कामा नये.
आपण जर योग्य मूल्यांचा आग्रह धरून उभे राहिलो तर समाज ती मूल्ये स्वीकारू लागतो. कदाचित थोडा वेळ लागेल, काही किंमत मोजावी लागेल. पण समाजाची धारणा निश्चित करणारे प्रमाणमूल्य बदलू लागते. डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वीस वर्षांपूर्वी केलेल्या शनिशिंगणापूरच्या सत्याग्रहाचे उदाहरण बोलके आहे. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून बाबा आढाव, एन. डी. पाटील, पुष्पाताई भावे, श्रीराम लागू ह्यांच्यासोबत डॉ. दाभोलकरांनी सत्याग्रह केला. त्या वेळेच्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी श्रद्धेला हात घालणाऱ्या दाभोलकरांना लाथाबुक्क्यांनी तुडवले पाहिजे, असे जाहीर विधान केले होते. भाजप-शिवसेनेने उघड आणि काँग्रेसने छुपा विरोध केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आंदोलन झाले, त्यामुळे समाजात घुसळण झाली. वास्तवातील चित्र अजून बदलले नसले तरी ही लढाई अयशस्वी पण झाली नाही. प्रत्यक्षात अजूनही शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाही. याविषयीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. असे असले तरी एक महत्त्वाचा बदल मात्र नक्कीच झाला. ज्या पक्षांनी ह्या आंदोलनाला विरोध केला होता त्याच पक्षांनी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले आणि स्वामीनारायण मंदिरात स्त्री-पुरुष भेदभाव करण्याच्या प्रथेविषयी मुख्यमंत्र्यांना जाहीर नाराजी व्यक्त करावी लागली. भले अनेक वर्षांनी का होईना, समाजाचे ह्या बाबतीत विचार करण्याचे प्रमाणमूल्य योग्य दिशेने बदलते आहे अशी आशा निर्माण करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. मात्र, या गोष्टींमुळे स्त्री-पुरुष विषमतेची धर्माने पाठराखण करण्याचे चित्र बदलण्याच्या दृष्टीने प्रगतीचे केवळ एकच पाऊल पुढे पडले आहे. अजून बरीच मजल आपल्याला गाठायची आहे. त्यासाठी धर्माच्या नावावर चालणारी स्त्री-पुरुष असमानता आणि भारतीय राज्य घटनेने दिलेले स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य ह्यांच्या लढाईत आपण कोणत्या बाजूने उभे राहणार हे ठरवायला लागणार आहे. धर्मातील चुकीच्या गोष्टी गळून पडल्याने धर्म धोक्यात येत नाही, तर उन्नत होतो ही धारणा मनामध्ये ठेवून चांगल्या बदलाला पाठिंबा देण्याची निर्भय भूमिका आज प्रत्येकानेच घेण्याची गरज आहे. अशी पुरोगामी मनोभूमिका तयार झाली तर केवळ मंदिरांच्या ठिकाणी महिलांना प्रवेशासंदर्भातच नाही, तर कोणत्याही धर्माच्या नावावर होणारी विविध प्रकारची स्त्री-पुरुष असमानता आपण नष्ट करू शकू. फक्त त्यासाठी आवश्यकता आहे मनोनिर्धाराची…

दिव्यमराठीच्या सौजन्याने (१३ मे २०१५)

hamid.dabholkar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.