मेंदू प्रदूषण….

“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू स्वच्छ होते. तो अर्थ इथे अभिप्रत नाही. मेंदुप्रदूषण हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो. तुम्ही म्हणाल हे मेंदुप्रदूषण करणारे कोण ? ते कोणाच्या मेंदूचे प्रदूषण करतात ? कशासाठी करतात ? कशा प्रकारे करतात ? या प्रश्नांची बुद्धिगम्य उत्तरे द्यायला हवीत. ती तर्कबुद्धीला पटणारी हवीत.
प्रत्येक माणसाला, त्याच्या कुटुंबाला, किमान अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींसाठी बहुतेकांना धन मिळवावे लागते. म्हणजे पैसे कमवावे लागतात. (कांही थोड्या जणांना वडिलोपर्जित संपत्ती लाभलेली असते त्यांचा अपवाद सोडा.) पैसे मिळविण्यासाठी शारीरिक कष्ट अथवा बौद्धिक श्रम करावे लागतात. लहान मुले, शिक्षण घेणारे युवक-युवती, शारीरिक दृष्ट्या अकार्यक्षम असलेले वयोवृद्ध तसेच अपंग, मतिमंद व्यक्ती सोडून अन्य सक्षम माणसांतील बहुतेक जण शारीरिक/बौद्धिक कामे करतात. ते देशाच्या उत्पादनात भर घालतात. जी.डी.पी. (सकल राष्ट्रीय उत्पादन) वाढते. समाजासाठी, देशाच्या विकासासाठी त्यांचे काही योगदान असते.
पण समाजात कांही लोक असे असतात की जे स्वत: कांहीही उपयुक्त काम न करता दुसर्‍याच्या श्रमांवर जगतात. नुसते जगतात असे नव्हे तर सर्व सुविधापूर्ण ऐश्वर्ययुक्त, विलासी आयुष्य उपभोगतात. एवढेच नव्हे तर ज्यांच्या श्रमांवर ते अशी चंगळ करतात त्यांना असे भासवितात की आम्ही तुमच्यावर उपकारच करीत आहोत. स्वत: कोणतेही उपयुक्त कार्य न करता, राष्ट्राच्या उत्पादनात कसलीही भर न घालता स्वार्थासाठी श्रद्धाळूंचे मेंदू सतत प्रदूषित करणारी समाजवृक्षावरील ही परोपजीवी बांडगुळे कोणती हे वाचकांनी ताडलेच असेल. हे स्वार्थी, धूर्त आणि लबाड लोक म्हणजे बुवा-बापू-स्वामी-महाराज-स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू तसेच फलज्योतिषी-वास्तु(दिशाभूल) शास्त्री, प्राणिक उपचारी, श्रीयंत्रे-नजरसुरक्षाकवचे-रुद्राक्षे-भाग्यरत्‍ने इत्यादींचे उत्पादन करून ती अवाच्या सवा किंमतीला विकणारे, थोडक्यात म्हणजे देव-धर्म-श्रद्धा टिकविण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत -म्हणजे ज्यांना मोठा लाभ आहे- असे सर्व एकत्रितपणे. हे सगळे संघटितपणे, संगनमताने जनसामान्यांच्या मेंदूचे सतत प्रदूषण करीत असतात. भाविकांच्या मेंदूवरील श्रद्धेचे अवगुंठन (पांघरूण) तसेच राहील याची दक्षता घेतात. त्यामुळे या लबाड लोकांचे हितसंबंध अबाधित राहातात. श्रद्धाळूंची लुबाडणूक करता येते. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपली फसवणूक होत आहे हे, या श्रद्धेने लिप्त असलेल्या भाविकांना कळतही नाही. परिणामी ज्यांच्यासाठी हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करायचे तेच या कामाला विरोध करतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाकर्मकठीण बनते. (यांत पूजापाठ सांगणारे पुरोहित, भटजी, उपाध्याय यांचाही समावेश करायला हवा. पण ते फारसे मेंदूप्रदूषण करीत नाहीत. कारण ते जे काय मंत्र बडबडतात त्याचा अर्थ कोणालाच कळत नाहीत. त्या पुरोहितांनासुद्धा नाही.)
हे सगळे फुकटे लोक मेंदूप्रदूषण कसे करतात? यांना वक्तृत्वकला अवगत असते. ते बोलण्यात पारंगत असतात. वेद-उपनिषदे-पुराणे-गीता-भागवत यांची थोडी-फार ओळख असते. कांही ओव्या, श्लोक, वचने मुखोद्गत असतात. परमात्मा-परब्रह्म-जीवात्मा-पुनर्जन्म-संचित-प्रारब्ध-क्रियमाण-स्वर्ग-नरक-परलोक-अर्चिरादि मार्ग-मोक्ष इ. शब्द ठाऊक असतात. एवढ्या भांडवलावर श्रद्धाळूंचे मेंदूप्रदूषण करता येते. ते अधिक प्रभावी ,परिणामकारक व्हावे म्हणून हे लबाड लोक सोंगे-ढोंगे करतात. कोणी दाढी- मिशा आणि केसांच्या जटा वाढवतात. कपाळावर, दंडावर, खांद्यांवर, पोटावर भस्माचे/गंधाचे पट्टे ओढतात. काही जण गुळगुळीत गोटा, दाढी घोटून तुळतुळीत चेहरा बनवतात आणि संन्याशाचे सोंग आणतात. काहीजण आपल्या कपाळावर लाल-पिवळ्या रंगात ओ, यू किंवा व्ही असे इंग्रजी अक्षर रेखाटतात. तर काहीजण कोणताच मेकप न करता चेहर्‍यावर नुसता साळसूदपणा आणतात आणि -लोकांच्या कल्याणा संतांच्या विभूती- त्या आपणच असे भासवतात. अशा सोंगांमुळे हे कोणीतरी साधू, संन्यासी, सत्पुरुष आहेत असे श्रद्धाळूंना वाटते.
आपण तपश्चर्या केली आहे. आपल्याला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे. आपण सिद्धयोगी आहोत. आपल्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व सांसारिक समस्या सुटतात. आर्थिक विवंचना मिटतात. असाध्य रोग बरे होतात. नोकरी धंद्यात यश मिळते. घरात सुख-शांती नांदते. अशा थापा मारतात. आपल्या पाळीव प्रचारकांद्वारे अशा अफवा पसरवतात. वर्तमानपत्रांत जाहिराती देतात. हॅंडबिले वाटतात. टीव्हीवर प्रायोजित कार्यक्रम करतात. भक्तांचे खोटे अनुभव प्रसिद्ध करतात. अशा प्रकारे श्रद्धाळूंचे मेंदूप्रदूषण करतात. पुरेसा प्रदूषित झालेला मेंदू -म्हणजे तो माणूस-त्या बुवा-बाबा-गुरू-स्वामीच्या पूर्ण आहारी जातो. स्वामी सांगेल ते ऐकतो. तसे करतो. मग त्याची लुबाडणूक होणे अपरिहार्य असते.
या मेंदूप्रदूषण कार्यात मोठा सहभाग असतो तो इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचा. म्हणजे टी.व्ही. वाहिन्यांचा. या सर्व वाहिन्यांचा एकमेव उद्देश अधिकाधिक धनसंपादन करणे हा असतो. दूरदर्शनसुद्धा याला अपवाद नाही. हा पैसा त्यांना जाहिरातींद्वारे मिळतो. बर्‍याच वाहिन्यांवर फलज्योतिष, वास्तु (दिशाभूल) शास्त्र, श्रीयंत्रे, पिरॅमिडस्, रुद्राक्षे, प्राणशक्तिउपचार, नजरसुरक्षा कवचे, यांच्या धादान्त खोट्या जाहिरातींचे दळण सतत चालू असते. तसेच बुवा-बाबा-गुरू-महाराज्-स्वामी-योगी यांनी प्रयोजित केलेले कार्यक्रम प्रसारित होतात. दर्शकांची (प्रेक्षकांची) अशी दिशाभूल करतात की ही वाहिनी आपल्याला काही महत्त्वपूर्ण, उपयुक्त माहिती देत आहे असे वाटावे. प्रत्यक्षात ती प्रयोजित केलेली जाहिरात असते. त्यातून श्रद्धाळू दर्शकांच्या मेंदुप्रदूषणाचे कार्य प्रभावीपणे होते.
या ऐतखाऊ बुवा-बाबा-बापू-गुरूंच्या अशा भूलथापांना प्रामुख्याने बळी पडतात त्या निम्नमध्यमवर्गीय स्त्रिया आणि श्रमिक महिला. टी.व्ही.वरील कार्यक्रमांतून , प्रवचनांतून, जाहिरातीतून जे दाखवतात, सांगतात ते त्यांना खरे वाटते. त्यामुळे त्या महिला अनेक निरुपयोगी व्रत-वैकल्ये करतात. भाग्यरत्‍ने, श्रीयंत्रे, रुद्राक्षे, विकत घेतात. त्यांच्या कष्टाचा, घामाचा पैसा वाया जातो. आर्थिक स्थिती सुधारत नाही. उलट खालावत जाते. कुटुंब वर येत नाही. श्रम करूनही या कुटुंबांची प्रगती होत नाही. कारण त्यांच्या श्रमाचा पैसा हे फुकटे बुवा-बाबा-गुरू लुटतात.
सर्वकाळीं, सर्व समाजात असल्या मनोवृत्तीचे लोक असतात. असे म्हणतात की जगात प्रत्येक मिनिटाला एक नवा धूर्त-लबाड समाजशोषक निर्माण होत असतो. चिटफंडवाले, लॉटरीवाले, सागवान लागवडवाले, अधिक पैशाचे आमिष दाखवणारे सी.आर्. बी., के.सी.बी. असे अनेक जण त्यापैकी आहेत. ते जाहिरातीद्वारे लोकांचे मेंदूप्रदूषण करून लोभी लोकांचे पैसे लांबवतात. पण त्यांना बळी पडणार्‍यांचे प्रमाण अल्प असते. कारण हे फसवणूक प्रकार देवाधर्माशी निगडित नसतात. तसेच ही फसवणूक उघडकीला आल्यावर थांबते. आपण फसलो हे बळी पडणार्‍यांना समजते. पण धर्ममार्तंडांनी श्रद्धाळूंचे मेंदुप्रदूषण करून त्यांच्यावर लादलेले पिंडदान, बारावे, तेरावे, श्राद्ध या फसणुकप्रकारांना समाजातील 90% हून अधिक लोक बळी पडतात. आपली फसणूक होत आहे हे त्यांच्या कधी लक्षातच येत नाही. त्यामुळे शतकानुशतके, पिढ्यानुपिढ्या फसवणूक चालूच राहाते. फसवणारे कधीच पकडले जात नाहीत.
हे मेंदुप्रदूषण, हे शोषण, थांबायला हवे. खर्‍या सेवाभावी संस्थांनी कार्य केले, त्यांना प्रसारमाध्यमांचे साहाय्य लाभले, शासनाने इच्छाशक्ती दाखवली तर हे शक्य होईल. त्यासाठी उच्च उत्पन्न गटांतील लोकांनी, उद्योगपतींनी आर्थिक साहाय्य द्यायला हवे. असे करणे त्यांचा हिताचेच आहे. कारण श्रमिक वर्गातील परिवारांची फसणूक थांबली, आर्थिक स्थिती सुधारली, प्रगती झाली, मुले शिकून चांगल्या नोकरी-धंद्याला लागली तर सामाजातील गुन्हेगारी कमी होईल. पुढील पिढ्यांचे जीवन अधिक सुरक्षित होईल. याचा विचार व्हायला हवा.

ynwala@gmail.com,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.