सूफी परंपरा

वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण आशियात फार गंभीर स्थिती आहे. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी अजमेरच्या गरीब नवाझ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर ठेवण्यासाठी चादर पाठविली. गेल्या 22 एप्रिलच्या वर्तमानपत्रांतील वृत्तानुसार सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनीही दर्ग्यावर चादर चढविली आहे.
जर आपण राजकारण आणि धर्म यांतील परस्परसंबंधांना बाजूला ठेवून पहिले तर, काही धार्मिक परंपरा, सर्व धर्माच्या लोकांना प्रभावित करतात हे अनोखे तथ्य समोर येते. दक्षिण आशिया आणि विशेष करून पाकिस्तान आणि भारतातील सुफी आणि भक्ती परंपरा क्रमशः हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या अशा दोन मानवतावादी धारा आहेत, ज्या धार्मिक समूहभानाच्या वर जाऊन संपूर्ण मानवतेच्या ऐक्याचा पुरस्कार करतात. या धर्माच्या संतांचे अनुयायी सर्व धर्मांचे होते आणि हे संत सत्तेपासून दूर राहत असत. राजा आणि नबाबांच्या दरबाराची शोभा वाढवणाऱ्या आणि त्यात गर्व वाटणाऱ्या मध्य युगातील पुरोहित वर्गापेक्षा हे संत भिन्न होते. हिंदू धर्मात कबीर, तुकाराम, नरसी मेहता, शंकर देव व लाल देध अशा संतांची समृद्ध परंपरा आहे, तर इस्लाममध्ये निजामुद्दीन औलिया, मोइनुद्दिन चिस्ती, ताजुद्दीन बाबा औलीया, अजान पीर व नुरुद्दीन नुरानी इत्यादी संतांची परंपरा आहे. याशिवाय, सत्यपीर व रामदेव बाबा पीर असे दोन संत होते, ते भक्ती आणि सुफी या दोन्ही परंपरांचे वाहक होते.
संत गुरु नानकांनी हिंदू आणि इस्लाम धर्माचे मिश्रण करून एक नवा धर्म स्थापन केला. इस्लामचा अभ्यास करण्यासाठी ते मक्केपर्यंत गेले तर हिंदूंचे अध्यात्मिक ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी काशीची यात्रा केली. त्यांचे सर्वात पहिले अनुयायी होते मरदान आणि शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिराची कोनशीला बसविण्यासाठी त्यांनी मिया मीरला आमंत्रित केले होते. गुरु ग्रंथ साहेब सर्व धर्मांबाबत समावेशी दृष्टीकोन ठेवतो आणि त्यात कुराणाच्या आयती, कबीर व अन्य भक्ती संतांचे दोहे सामील आहेत. ‘बाबा नानक संत कबीर, हिंदू का गुरु, मुसलमानों का पीर’ असे म्हटले जायचे, त्यात काहीच आश्चर्य नाही.
आज जर साऱ्या जगात धर्म चर्चा आणि वादाचा विषय बनला असेल, तर त्याचे कारण राजकीय क्षेत्रात त्याचा वापर हे आहे. या संदर्भात सुफी परंपरेबाबत लोकांमध्ये पुन्हा रुची निर्माण होणे हे सुखद आहे. दक्षिण भारतात सुफीवादाचा इतिहास जवळजवळ एक हजार वर्षांचा आहे. सुफी शब्दाचा अर्थ आहे, मोठा लोकरी कपडा, त्यापासून बनवलेली वस्त्रे सुफी संत वापरतात. सुफीवाद, शिया मुस्लीम धर्मापासून बनला. पण काही सुन्नींनीही त्याचा स्वीकार केला. सुफीवादात रहस्यमयतेला मोठे महत्त्व दिले आहे आणि तो कर्मकांडांना मुळापासून नाकारतो. तो अल्लाकडे मानवरुपात पहात नाही तर अध्यात्मिक शक्ती म्हणून पाहतो. हे भक्ती संतांच्या आस्थेशी जुळणारे आहे. अनेक सुफी संत सर्वेश्वरवादी होते आणि त्यांची जीवनमूल्ये मानवतेने ओतप्रोत भरली होती.
प्रारंभी मुस्लिमांतील कट्टरवादी पंथांनी सुफी संतांचा दमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुढे त्यांनी सुफीवादाशी समझोता केला. सुफी संतांतून काही दरवेश बनले. दरवेशचा अर्थ होतो, असे संत, जे एका जागेवर राहत नाहीत, सतत भ्रमण करीत असतात. अनेक देशांमध्ये सर्व धर्मांचे लोक त्यांच्या दर्ग्यांवर आपले गाऱ्हाणे घालतात. याच प्रकारे भक्ती संतांचेही अनुयायी सर्व धर्मांचे आहेत.
सुफीवादाला समानांतर भक्ती परंपराही धार्मिक इतिहासातील निम्न प्रवाहाचे प्रतिनिधित्व करते. भक्ती संत समाजाच्या सर्व स्तरातील, विशेषतः कनिष्ठ जातींतील होते. या परंपरेने धर्माला संस्थात्मक स्वरूप देण्यास विरोध केला आणि त्याचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. धर्म व्यक्तीचा वैयक्तिक मामला आहे, असे त्यांचे मत होते. ते धर्म आणि राजकारणाला एकमेकांपासून वेगळे करण्याच्या मताचे होते आणि त्यांनी ईश्वरभक्तीला ज्ञानार्जनाच्या परंपरेशी जोडले. भक्ती संतांच्या लिखाणातून गरिबांची दु:खे पाझरत होती. भक्ती परंपरेने अनेक खालच्या जातींना प्रतिष्ठा दिली. ही परंपरा मुसलमानांकडे समावेशक दृष्टीने पाहत होती आणि त्यांनी वरिष्ठ जातींच्या वर्चस्वाला आव्हान दिले. भक्ती परंपरा कर्मकांडविरोधी होती. या संतांनी जनतेला समजणारी भाषा वापरली. ते ईश्वरी अवधारणेबरोबर विश्वास ठेवत होते. या परंपरांतील संतांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भर दिला.
प्रत्येक धर्मात विभिन्न विचार असतात, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. धर्म आणि सुफी परंपरा धर्मांचा मानवतावादी चेहरा आहे. त्यांनी मानवतेला एक केले आणि धर्माच्या नैतिक, अध्यात्मिक भागावर जोर दिला. याच्या विपरीत, धर्माच्या असहिष्णू प्रवृत्तीचा वापर राजकीय शक्तींनी आपल्या उद्देशांच्या पूर्तीसाठी केला. भारतीय उपखंडात स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी राजा, नबाब आणि जमीनदारांनी जातीयवादी राजकारणाचा पाया रचला. या धार्मिक राष्ट्रवादाला धर्माच्या नैतिक भागाशी काही देणे-घेणे नव्हते. तो केवळ धार्मिक समूह्भानाचा राजकीय लक्ष्य साध्य करण्यासाठी वापर होता. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील गांधीजी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारखे अनेक नेते अत्यंत धार्मिक होते, परंतु ते ना धार्मिक राष्ट्रवादावर विश्वास ठेवत होते, ना ही त्यांच्या मनात अन्य धार्मिक परंपरांबाबत जराही वैरभाव होता.
सुफी आणि भक्ती परंपरा आपल्याला वर्तमान काळात धर्माच्या नैतिक आणि अध्यात्मिक भागाला कमजोर केले जात आहे याची आठवण देतात. जर आपल्याला मानवतेचे भविष्य शाबूत ठेवायचे असेल तर आपल्याला धर्मांच्या सर्वसमावेशक मानवतावादी विचारांना दृढ करावे लागेल आणि समाजाला विभाजित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना हतोत्साहित करावे लागेल. धर्म मूलतः नैतिकता आणि मानवतेवर भर देतात ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. आपणाला धर्माच्या बाह्य अवडंबराला न स्वीकारता धर्माचा मूळ आत्मा स्वीकारायला हवा.

ram.puniyani@gmail.com,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.